तिमिरातून तेजाकडे...
तिमिरातून तेजाकडे...
कधी कधी आपल्या मनालाही खूप थकायला होतं ! शरीरात आमुलाग्र बदल होतच असतात. कधीही कोणीही मनाचा विचार करीत नाही. फक्त फक्त शारीरिक जडणघडणीचा विचार सदैव मनुष्य करीत असतो. पण मन ही आजारी पडू शकते...ते खोल दुःखाच्या दरीत गेल्यामुळे नैराश्याने ग्रासते.
तणाव, चिंता यामुळे मनावर खूप खोलवर घाव होत असतो. त्यात फक्त दिसत असतो अंधकारमय जीवनाचा प्रवास. त्या अंधारातून उजेडाकडे नेणारा प्रवास आपणच स्वतः करावा लागतो.
सोप्पा नक्कीच नसतो हा प्रवास....तिमिरातून तेजाकडे जाणारा. कधी कधी मिशन फत्ते झाल्याचा कोण कोणास आत्मविश्वास येतो. शरीरात ऊर्जा आणि मनात उत्साह नुसता महासागराच्या लाटे समान उसळत असतो. पण दरवेळी हे आलेले शहाणपण अल्पायुषी ठरतं. आपण लगेच ताळ्यावर येतो. इतके दिवस , जिंकत असल्याच्या खोट्या स्वप्नात रमलेले आपण ताडकन झोपेतून एखादं दिवशी जागे होतो. खूप अगतिक, बिचारे वाटतो आपण स्वतःलाच. धाय मोकलून रडावं वाटतं. कित्यक वेळा आवंढेच्या आवंढे मनातच आपल्याकडून गिळले जातात...हुंदक्यांची मनातच खूप कोंडी होते. तर कधी अश्रूंचा पाट घळाघळा झोपताना वाहतो. प्रत्येकाची केस वेगवेगळी असते. कुणा कुणास व्यक्त होता येत नाही. अव्यक्त राहिल्यामुळे कोंडमारा मनातच होत राहतो. तेच असतात कधीही न संपणारे हा भोग?
हो भोगच! जणू कायम सुख दुःखाचा पाठशिवणीचा खेळ जणू काही आपल्या सोबत रोजच खेळत असतात.
कधी कधी षड्रिपुंनी ग्रासलेले असलेलो आपण मुक्तीच्या मार्गावर तरी आहोत का हे ही कळायला पर्याय नसतो, आपणास योग्य मार्ग दाखवणारा आपल्या पाठीमागे कुठलाही गुरू नसतो. सतत आपणास सगळ्या बाजूंनी अगदी काळोखात चाचपडल्या सारखं वाटतं . अख्खं आयुष्य आपले भलतीकडेच भरकटत जाते!
पण "Time heals everything" म्हणत वेळ द्यायला हवा. खरंतर हा नुसता वेळ नसून शहाणपणा येण्यासाठी आपणच स्वतःसाठी वेळेचीच मोजलेली किंमतच म्हणावी लागेल. योग्य वाटेवर असलोच तर काही तुटपुंजे साक्षात्कार आपल्याच पदरी पडतात. ते अनुभव कण कण आयुष्याच्या वाटेवर साठवत राहिलो की, पुढचा रस्ता सपाट सुपीक तयार होऊ लागतो. प्रवासात आपली योग्य दिशाच हरवल्यासारखं वाटत असेल तर मात्र अवाजवी किंमत मोजावी लागते. अश्यावेळी मनासोबत शरीरही साथ वेळेवर देत नाही.
असह्य असतं एखाद्याच मन भरकटणं ! आणि त्या मनाला वेळेवर ताळ्यावर आणणं काही वेळा खूप अवघड होऊन बसते...
ठराविक अंतर कापून झाल्यावर थांबून आपण कुठवर आलो नि अजून किती पल्ला अजून गाठायचाय याचं निदान स्वतः आपणास जीवन जगताना आत्मचिंतन करायला हवंय...
सोप्पा नसलेला ....तिमिरातून तेजाकडे जाणारा...हा प्रवास प्रत्येकाने खुद्द स्वतः वेळ आल्यावर करायला हवाच..
