STORYMIRROR

archana d

Drama Tragedy Inspirational

3  

archana d

Drama Tragedy Inspirational

ती आणि तो उंबरठा

ती आणि तो उंबरठा

7 mins
254

बी एम सी च्या अनधिकृत बांधकाम विभागात बदली झाल्याने मी जरा नाराज होते. एक तर इथे रस्ता रुंदीकरण, अनधिकृत मजले पाडणे, अनधिकृत दुकानांवर कारवाई असे कटकटीचे काम होते. आणि माझा स्वभाव कोठल्याही पॉलिटिक्स विषयामध्ये अजिबात रस नव्हताच. या विभागामध्ये रस नसल्याने मला ह्या डिपार्टमेंट मध्ये अजिबात स्वारस्य नव्हते. पण नोकरी म्हटलं कि सगळं थोडंच आपल्या इच्छेप्रमाणे होईल, म्हणून मी रुजू झाले.

त्या दिवशी अंगारक चतुर्दशी होती, पाऊने एक वाजले असावेत, थोड्याच वेळात लंच टाईम सुरु होणार होता, तेव्हढ्यात शिपाई शिंदेंनी येऊन विचारले," मॅडम त्या एस पी शेड जवळच्या बंगलावाल्या, देशपांडे आजी आल्यात, पाठवू का आत त्यांना?" त्याच ऐकल मी आणि बॅगेतून काढलेला खिचडीचा डबा मी परत आत सरकवला.

म्हातारी आजी आत आल्या, वय असेल साधारण ८० ते ८५. नऊ वारी साडी नेसलेल्या, हातात बांगड्या, पाटल्या सगळे काही होत, चेहऱ्यावर श्रीमंतीचे तेज, कमरेत थोड्या वाकलेल्या, आणि चेहऱ्यावर एक प्रकारची उदासीनता, हातात आधारासाठी काठी. का कोण जाणे त्या मला ओळखीच्या वाटत होत्या.

 आजी आल्या, माझ्या समोरच्या खुर्चीत बसल्या.

"मॅडम , मसुरेकर साहेब बदली होऊन गेले आणि तुम्ही आलात कळलं म्हणून भेटायला आले. "

"आमच एस पी शेड जवळ दोन माळ्याच घर आहे गोखले रोडवर, त्याचा गॅलरीचा भाग म्हणे आडवा येतो म्युनसिपाल्टीच्या रस्त्याला, उंबरठ्यापासून पुढचा भाग पाडून टाका म्हणून सांगतायत सारखं."

"आम्ही साधारण वीस वर्ष झाली, दावा पण ठोकून झालाय, आमचं म्हणणे इतकच कि रस्त्याच्या दोनही बाजूनी रस्ता वाढवण्यासाठी सारखा आराखडा काढला तर आमचं घर वाचेल, भले तुमचा रस्ता खेटून जाईल घराला, पण पाडापाडी करावी  लागणार नाही, समोरच्या सोसाटीचं पंप रूम थोडं शिफ्ट करावं लागेल इतकच" आजीनी एका दमात सारं सांगून टाकलं.

"आजी, मी परवाच येथे बदली होऊन आले आहे, माझी इथल्या डिपार्टमेंटमध्ये माणसांशी आणि फाईलींशी जरा जरा ओळख होतेय आत्ताशी . मी आधी फाईल बघून घेते, बघूया काही करता आलं तर ,मग तुम्हाला काय ते सांगू शकेन ." 

आजीच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावर थोडे हास्य उमटले.

 आजींना कुठेतरी बघितल्या सारखे वाटत होते. मग मी त्यांना म्हणाले,"एव्हड्या उन्हाच्या कशाला आलात, फोन केला असता तरी चाललं असतं, आणि तशी ह्या कामाला तुम्ही स्वतः येण्याची गरज नाही, तुमचा कोणी मुलगा वैगेरे आले तरी चालतील. " 

हे ऐकल्यावर आजींचा चेहरा केविलवाणा झाला.

"अहो मुलगा आणि सून असतात तिकडे अमेरिकेला, त्यांच्या नोकऱ्या, त्यांच्या मुलांच्या शाळा, त्यांचे व्याप, येतात कधीतरी दोन तीन वर्षांनी, पण ह्या भानगडीत अजिबात रस नाही त्यांना , म्हणतात विकून टाक घर एखाद्या बिल्डरला आणि, या कायमचे तिकडे ये, हे तर गेले, आता माझी किती वर्ष राहिलीत, पांच्याईश चालू झालं परवाच."

" तशी आम्हाला काही आवडली नाही बघा अमेरिका, त्या पेक्षा आपलं दादर च बरं, काय होईचे ते इथेच होऊ दे, एकदा कायमची गेले कि सुटले."

 "मुलगा येईल मग एखादे दिवस कार्याला, काय माहित मग घर सुध्दा विकून टाकतील आमच्या माघारी " आजी सांगत होत्या, जवळची माणसे सात समुद्रापलीकडे असण्याचे केविलवाणे दुःख काय असते ते त्यांच्या थिजलेल्या डोळ्यातून जाणवत होते आणि मला अचानक आठवले, बहुतेक मी ह्या फॅमिलीला ओळखत होते.

मी आपली मनातच जुळवाजुळव करीत होते. एस पी शेड जवळच घर दुमजली म्हणजे, नक्की च तेच घर असावं. मला नेमका अंदाज येत नव्हता .

"कोण, संदीप देशपांडे ?, म्हणजे तोच का किंग जॉर्ज शाळेतून दहावीला बोर्डात आलेला' मी नाही नाही म्हणता अंदाज घ्यावा म्हणून विचारून टाकल एकदाच.

"हो, तोच, दहावीच काय, बारावीला सुध्दा बोर्डात आला होता, अमेरिकेला जाऊन पुढं शिकला, नोकरीला लागला आणि कायमचा आम्हाला मुकला, पण तुम्हाला कसे ठाऊक" आजी म्हणाली.

"अहो, मी सुमन, तुमच्या बंगल्यापुढे गोखले रोडला ती दादाभाई चाळ नव्हती का, हो तिथेच तर राहायचे मी" मी सांगितले. 

"असेल, असेल, येते मी" आजी बोलल्या आणि उठू लागल्या.

आजी निघून गेल्या खऱ्या, पण मला तीस पस्तीस वर्षे मागे घेऊन गेल्या. लहानपणी आम्ही दादरला, गोखले रोड जवळ दादाभाई चाळीत राहत होते.

 आमच्या चाळीत ओळखीत कोणाकडेच टी. व्ही. नव्हता. आमच्याकडे तर रेडिओ हि नव्हता. आईच्या एकटीच्या जीवावर घर चालत होत.

 लहानपणी मला टीव्ही चे भयंकर वेड होते. पेपरात कोणताही नवीन पिक्चर आली की कोणतीही कात्रणे कापून मी एक संग्रह वही सुध्दा केली होती. तेव्हा भुताचे सीरियल ची एक वेगळीच क्रेझ वैगेरे असली कि टी व्ही बघायला आम्ही कोणाच्या तरी घरी जायचो. 

नवीनच एक सीरियल आला होता आहट नावाचा.

मला कसेही करून ती सीरियल बघायचीच होती.

 आईने मला बजावले होते की, गृहपाठ पूर्ण केलास तरच मी कोणाकडे तरी तुला टीव्ही बघायला पाठवेन.

 मी नेटाने बसून गृहपाठ पूर्ण केला होता. आईने ओळखीच्या दोघं तिघांना विचारले पण त्यांच्याकडे आधीच काही मंडळी मॅच बघायला येणार होती आणि बसायला पण जागा नव्हती. आणि ते तो सीरियल वाला चॅनल लावणार नाहीत म्हणून सांगून मोकळे झाले. म्हणून मग मी काहीतरी पर्याय शोधू लागले.

माझ्या शाळेत तेव्हा संदीप देशपांडे नावाचा एक हुशार मुलगा होता, तसा तो माझ्यापेक्षा खूप मोठा होता. त्यांचा बंगला होता आणि कुटुंब स्वतःला थोडे ग्रेट समजायचे कारण ते खूप श्रीमंत होते .

 शेवटी मी त्याला टी व्ही बघायला येऊ का असे विचारायचे ठरवले, तो म्हणाला आईला विचारून सांगेन. शाळा सुटल्यावर मी मोठ्या आशेने त्याच्या बंगल्या बाहेर उभी होते. 

संदीप आईला विचारून आला आणि म्हणाला " ये तो सीरियल बघायला पण उंबरठ्याबाहेर बसावे लागेल" आईने घरात कोणाला आणू नको म्हणून सांगितलंय.

 मी विचार केला बाहेरून तर बाहेरून, सीरियल तर बघता येईल. घरी जाऊन आवरून मी निघाले, तेव्हढ्यात चाळीतील दर्शना आणि श्रध्दा भेटल्या. आम्ही पण येऊ का, मी म्हंटले नाहीतरी दरवाज्यात बसूनच बघायची सीरियल.त्यात संदीपला काय विचारायचे, म्हंटले चला. 

 आम्ही गेलो दरवाज्यात बसलो, खरे तर दरवाज्यातून पूर्ण टीव्ही वरची चित्र नीट दिसत नव्हती पण अगदीच काही न दिसण्यापेक्षा थोडे फार तर दिसत होते आणि ऐकूही येत होते थोडे थोड. बघता बघता थोडा वेळ असाच गेला. 

संदीप जणू काही माझ्या ओळखीचा नाही असाच वागत होता. त्याच्याकडेही काही पाहुणे आले होते.ते सरबत पीत होते, काही खात होते. टीव्ही ला सारखीच जाहिरात चालली होती. आम्ही आपलं सीरियल बघण्यासाठी तर्मळत होतो. 

 आम्ही मात्र उपऱ्या सारखे दाराबाहेरून शांतपणे टीव्ही बघत होतो. टीव्ही मध्ये सीरियल मध्ये भूत आलं की डोळे झाकत होतो.

 तेव्हढ्यात आमच्या चाळीतील अजून दोघे तिघे मुले तेथे आली आणि दारात आमच्याबरोबर बसली, संदीपच्या घरच्यांना ते बहुधा आवडले नसावे. 

रात्रीचे ८ वाजले असावेत, त्यांना बहुधा जेवायला बसायचे असेल, संदीपच्या आईला काय वाटले कुणास ठाऊक, त्या आल्या, "ह्या दादाभाई चाळीतल्या भिकारड्या मुलांना कशाला बोलावतोस तू टी. व्ही. बघायला, त्यांच्या नजरा बघितल्यास, कसे बघत होते आतमध्ये, सीरियल पेक्षा घरातच लक्ष जास्त आहे त्या पोराचं. आणि ती पोरगी तिची आई तर दुसऱ्यांच्या घरी भांडी घासायला जाते. शी स्स कसली घाण दारात आणतोस" आणि त्यांनी धाडकन दरवाजा बंद केला.

 मी उंबरठयाला चिकटून अगदी पुढेच बसले होते आणि माझे बोट दरवाज्यात चिमटले, मी मोठ्याने ओरडले, त्यांनी दरवाजा परत उघडला आणि म्हणाल्या "काय झालं ओरडायला." मी त्यांना बोट दाखवले, रक्त येऊ लागलं होते. "हा, जा घरी जा, हळद लाव, काही लागला नाही एवढं"

मी तशीच बोट दुसऱ्या हाताने दाबून घरी आले. श्रध्दा आणि दर्शना ही रक्त बघून घाबरल्या होत्या. चांगलेच लागले होते.घरी आल्यावर रक्त बघून आई रडू लागली.

 बहुधा नख निघाले असावे. आम्ही तसेच डॉक्टरांकडे गेलो, त्यांनी मलमपट्टी केली पण म्हणाले नख मुळापासून निघालाय त्यामुळे नवीन येईस्तोवर जरा काळजी घ्यावी लागेल. 

त्या नंतर बरेच दिवस ते दुखरे बोट बघत मी रडत बसत असे. 

ह्या वाईट अनुभवावरून आम्ही मुलांनी मग त्यांच्याकडे टी. व्ही. बघायला जायचे सोडून दिले.

 बरीच वर्षे गेली.आम्हीही दादर सोडले. राहत घर विकले आणि ठाण्याला शिफ्ट झालो. वडील नसल्यामुळे सगळी घराची जबाबदारी आईवर होती.तिने आमच्या शिक्षणासाठी किती खस्ता खाल्ल्या आहेत. आमच्या शिक्षणासाठी धुणी भांडी ही केली हे आठवून माझे डोळे भरून आले.

  आज मात्र आजीनी सगळा भूतकाळ माझ्या डोळ्यासमोर उभा केला . मला स्वस्थ बसवेना, मी त्यांची फाईल काढली, पुन्हा पुन्हा वाचली, आणि मला जे शोधायचे होते ते मिळाले. 

दोनच दिवसांनी मी आजींकडे गेले. तो तोच दुमजली बंगला होता ज्याच्या उंबरठ्यात बसून कधीकाळी मी टी. व्ही. बघायला बसले होते.

 मी बेल दाबली, आजीनीच दार उघडले. इतकी वर्षे झाली तरी बंगल्याची रचना तशीच ठेवली होती, फक्त डागडुज्जी केलेली होती. मोठ्या आकाराचा जाडजूड टी. व्ही . जाऊन फ्लॅट टी.व्ही. आला होता. 

"अरे, ये, मला नक्की माहित होत तू येणार म्हणून, संदीपने सांगितलं फोन वर त्या दिवशी कि तू त्याच्या शाळेत होतीस म्हणून " मला पाहताच आजी म्हणाल्या.

मी पेपर्स काढले, खरे तर दाव्याचा निकाल अजून लागला नव्हता. पण निकाल लागायला हवा होता. पण हे प्रकरण कोणी व का दाबून ठेवले होते ते मला समजत नव्हते. 

"आजी, म्युनसिपाल्टीची हेड ऑफिसची ऑर्डर आहे, तुमच्या बंगल्याची पाडापाड न करता रस्ता थोडा बाजूने न्यावा आणि समोरच्या सोसायटीने आपली पंप रूम थोडी मागे हलवावी असं स्पष्ट म्हटलंय आदेशात" मी त्यांना आदेशाची कॉपी दिली. 

आजी भिंतीवर टांगलेल्या संदीपच्या वडिलांच्या फोटोला नमस्कार करत म्हणाल्या. "उशिरा का होईना जिंकलात बरं का लढाई "आजीनी मग मला चहा केला. मी निघाले.

निघताना आजी दाराशी आल्या माझा हात हातात घेतला आणि चाळीस वर्षां पूर्वी जो प्रश्न विचारायला हवा होता तो त्यांनी आज विचारला "बोटाला खूप लागला होतं का ग? तुझ्या त्या वेळी, परवा संदीप मला सांगत होता, सुमन म्हणजे तूच असणार दादाभाई चाळीत मधली, टीव्ही बघायला उंबरठ्याच्या बाहेर बसणारी, एकदा नाही का तिचं बोट दारात चिमटले होतं "

मी काहीच बोलले नाही. आजीनी जाण्याकरिता दार उघडले.

 मी उंबरठ्याशी बराच वेळ थोडा घुटमळले, मला बाहेर पडायचेच समजेना, आमच्या चाळीतील काही मुले उंबरठ्याबाहेर टी व्ही बघत बसली होती, आणि मला समजत नव्हते त्यांना ओलांडून कसे जायचे ते, माझं मन तिथेच घुटमळत होतं आणि मी बाहेर जायचा रस्ता शोधत होते. 

खरंच उंबरठ्याच्या मर्यादा आपणच आपल्याला घालून घेतो, उंबरठ्या पलीकडची आणि अलीकडची माणसे ह्यांच्यात इतकं अंतर असतं का?


एका कवीच्या ओळी.....

दुबली, पतली, छोटी सी

काली, लंबी, मोटी सी

वो हर रूप और हर रंग की

स्त्री ही तो है

नहीं, वह स्त्री नहीं

बस एक गरीब है

पेट बढ़ाए, कमर झुकाए

सांस फुलाए, आस लगाए

वो हर भाव, और हर ढंग की

स्त्री ही तो है

नहीं, वह स्त्री नहीं

बस एक गरीब है

पत्थर तोड़े, बासन रगड़े

कपड़े धोती, मैला ढोती

वो हर काम और हर मकाम पर

स्त्री ही तो है

नहीं, वह स्त्री नहीं

बस एक गरीब है

वो बिकती है बाजारों में

लुट जाए घर-बारों में

वो छलनी कपड़े से लाज बचाती

स्त्री ही तो है

नहीं, वह स्त्री नहीं

बस एक गरीब है

भीख माँगती, देहरी लाँघती

जूठा खाती, ढोर हाँकती

वो हर दर्द का थूक गटकती

स्त्री ही तो है

नहीं, वह स्त्री नहीं

बस एक गरीब है।

वो भुके पेट सोने के लिये मजबूर थी

अपनो बच्चे का पेट भरने के लिये वो मजदूर थी

उसे रोज दुनिया के ताना सूनना पडता है

स्त्री ही तो है

नहीं, वह स्त्री नहीं

ये लाचार नही है वो, बस एक गरीब है।



Rate this content
Log in

Similar marathi story from Drama