Shital Thombare

Horror

4.0  

Shital Thombare

Horror

ती एक रात्र

ती एक रात्र

5 mins
19.3K


रेवतीने थर्मामीटर तीनदा पाहिलं. समोर तिचा पाच वर्षांचा मुलगा सुयश तापाने फणफणत होता. ताप उतरायचं काही नाव घेत घेईना.औषध देऊन सहा तास झाले पण तरीही ताप उतरत नाही म्हटल्यावर रेवतीची काळजी वाढू लागली....संध्याकाळपर्यंत सगळं घर डोक्यावर घेणारा सुयश रेवतीसमोर निपचित पडला होता. अचानक आलेल्या तापाचं कारण काही समजेना. त्यात सुनील... रेवतीचा नवरा कामानिमित्त सकाळीच तालुक्याला गेला होता. तो आता सकाळीच परतणार. सुनीलला फोन करावा तर तो काळजी करत बसेल. त्यातही सकाळशिवाय तो परत येऊच शकत नव्हता. त्यात हे गाव अन् घर दोन्हीही नवीन असल्याने काय करावं रेवतीला सुचेना.


घड्याळाने बाराचे टोले दिले तसे रेवती दचकली. बापरे! बारा वाजले अजूनही सुयशचा ताप उतरला नव्हता. शेजारीपाजारी ना कोणाची फारशी ओळख ना पाळख. चारच तर दिवस झाले होते त्यांना या गावात घरात येऊन. त्यांचं सामान जेव्हा गाडीतून उतरलं तेव्हा लोकांच्या नजरा आपल्यावरच रोखल्यासारख्या वाटल्या तिला. सुनीलला तस तिने बोलूनही दाखवलं. पण आपण नवीन आहोत कुतूहलाने पाहत असतील अस म्हणत सुनीलने रेवतीचं म्हणणं उडवून दिलं.


घर फार मोठं नव्हतं. पण पाहता क्षणीच रेवतीला आवडलं. दार उघडून ते आत जाणार तोच एक जोरदार वाऱ्याचा झोत त्यांना स्पर्शून गेला. रेवतीच्या तर अंगावर शहाराच आला. घर अजून पूर्णपणे आवरलं ही नव्हतं. दिवसभर सुयश इकडून तिकडे उड्या मारत फिरायचा. त्याला ही घर फार आवडलं. विशेष करून पडवीत असलेला झोपाळा. आल्या आल्या त्या झोपाळ्याचा सुयशने ताबाच घेतला होता. सुयशचं मन नवीन जागेत रमलंय म्हटल्यावर रेवती अन् सुनील निश्चिंत झाले. त्यातच दोन दिवसांसाठी सुनीलला तालुक्याला जावं लागलं. घरी आता रेवती अन् सुयश दोघेच होते.


रेवतीने घर आवरायला घेतलं. छोटसं घर पण ते आवरताना रेवतीची अक्षरशः दमछाक झाली. दोन तीनदा तिला वाटले की तिने आवरलेलं सामान पुन्हा अव्यवस्थित झालयं. पण ती इतकी दमली होती की आपणच सामान लावायला विसरलोय अस वाटून तिनं दुर्लक्ष केलं. तिने सामान लावता लावता जेवण बनवले. तोपर्यंत सुयश झोपळ्यावरच खेळत होता. ती सुयशला जेवणासाठी बोलवायला गेली. तिला वाटलं सुयश कोणाशीतरी बोलत आहे. पण ती झोपळ्याजवळ गेली तिथे कोणीच नव्हतं. सुयशला विचारलं कोणाशी बोलत होतास पण सुयशने रेवतीकडे दुर्लक्ष केलं. खेळताखेळता स्वत:शीच बोलत असेल असं म्हणत तिने सुयशला जेवायला नेले. ताट वाढायला घेतलं तर जेवण आधीच कोणी खाल्लेलं होतं. हा सगळा काय प्रकार आहे काहीच कळेना. रेवतीने विचार केला कोणी मुद्दाम त्रास देण्यासाठी तर काही करत नसावं. तिने ताट केलं सुयशला जेवण भरवणार तोच सुयशच्या शर्टावर भाताचे शित पडलेले दिसले.


हे सगळ काय चाललंय. सुयश जेवला? पण कसं शक्य आहे. त्याला सगळ्याच कामासाठी माझी मदत लागते. मग तो हाताने जेवण घेऊन कसं जेवू शकतो. सकाळपासून इतकी कामं झाली आहेत की माझं डोकं चालत नाही बहुतेक असा विचार करून रेवतीने थोडा आराम करावा असा विचार केला. सुयशला घेऊन ती खोलीत झोपायला गेली. सुयशला झोपवलं पण प्रयत्न करुनही तिला झोप लागेना. सकाळपासून घडणाऱ्या विचित्र घटनांनी रेवतीची झोप उडाली. शेवटी कंटाळून ती उठली. सुयश शांत झोपला होता. तिने प्रेमाने त्याच्या चेहऱ्यावरुन हात फिरवला. तिच्या हाताला चटका लागला. बापरे सुयशचं अंग चांगलंच भाजत होतं. तेव्हापासून ते आता रात्रीचे बारा वाजलेत. सुयशचा ताप तसूभरही कमी झाला नव्हता. सकाळी उठल्याउठल्या तिने डॉक्टरकडे जायच ठरवलं. थंड पाण्याच्या पट्ट्या तिने सुयशच्या डोक्यावर ठेवल्या. रात्री अडीच तीन वाजले असतील. रेवतीच्या डोळ्यांवर झोप आली तसं सुयशच्या बाजूला डोकं टेकवून तिने डोळे मिटले.


किती वेळ झाला कोणास ठाऊक... रेवतीने आपले डोळे किलकिले करत उघडण्याचा प्रयत्न केला पण तिचे डोळे काही केल्या उघडेनात. किलकिल्या डोळ्यांनीच तिने डोळ्यांना आणि मेंदूला त्रास देत समोर पाहण्याचा प्रयत्न केला. तिला समोर पुसटशी आकृती दिसली. रेवतीने डोळ्यांना अजून ताण दिला. तसतशी ती आकृती रेवतीला स्पष्ट दिसू लागली. नऊवारी साडी नेसलेली, कपाळाला रुपयाएवढं कुंकू, केस मोकळे, दात विचकत ती रेवतीकडेच पाहत होती. रेवतीच्या अंगावर सरसरुन काटा आला. कोण ही बाई? माझ्या घरात काय करतेय? रेवतीने डोळे उघडण्याचा प्रयत्न केला. पण एक विचित्र ताकद तिला रोखत असल्याचा भास झाला. तेवढ्यात रेवतीचं लक्ष त्या विचित्र बाईच्या हाताकडे गेलं. एक लहान मुलगा तिचा हात धरुन उभा होता. रेवती आता अधिक सावध झाली. तिने डोळे ताणत पुन्हा पाहण्याचा प्रयत्न केला. तो मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून रेवतीचा सुयश होता.


सुयशला पाहताच सगळं बळ एकवटून रेवती उठण्याचा प्रयत्न करु लागली. पण तिला जाणवू लागलं की तिला कोणीतरी उठण्यापासून रोखत होतं. तरीही सगळी ताकद एकवटून तिने हात पुढे केला. सुयशला पकडण्यासाठी रेवतीने हात पुढे केला. तशी ती बाई दात विचकत सुयशला घेऊन मागे मागे जाऊ लागली. रेवतीने आपला हात अधिकच पुढे नेला. पण तिचा प्रयत्न निष्फळ ठरला. अचानक ती बाई आणि सुयश रेवतीच्या डोळ्यासमोरुन गायब झाले. रेवतीच्या तोंडून जोरदार किंकाळी बाहेर पडली. तिला दरदरून घाम फुटला. डोळे विस्फारुन रेवती समोर पाहण्याचा प्रयत्न करु लागली. पण तिच्या समोर कोणीच नव्हतं. रेवतीचं अंग थरथरु लागलं.


आपण इतका वेळ स्वप्न पाहत होतो तर. कारण समोर कोणीच नव्हतं. रेवती सुयशचा ताप पाहण्यासाठी त्याच्याकडे वळली आणि रेवतीला घाम फुटला. सुयश बेडवर नव्हता. अंगात एवढा ताप असताना हा मुलगा गेला कुठे? रेवती बेडवरुन खाली उतरली. सुयशला शोधू लागली. पण सुयश कुठेच दिसेना. रेवतीचे पाय थरथरू लागले. आपण जे पाहिलं ते स्वप्न नव्हतं. कसं शक्य आहे हे. रेवतीने सुयशला हाका मारल्या पण काहीच प्रत्युत्तर आले नाही. दार उघडून पहावं म्हणून ती दाराकडे वळली. कडी काढताना तिला बाहेरुन हसण्याचा आवाज आला. इतक्या रात्री कोण असावं आणि सुयश... तिने घाईत दार उघडलं. पडवीत झोपाळ्यावर तिच बाई सुयशला मांडीवर घेऊन बसलेली. एक विचित्र हास्य तिच्या चेहऱ्यावर होते. जणू ती याच क्षणाची वाट पाहत असावी.


रात्रीची ती भयाण शांतता अन् तिचे हास्य वातावरण अधिकच भयाण करत होतं. काय करावं रेवतीला काही सुचेना ती वाऱ्याच्या वेगाने झोपळ्याजवळ गेली. सगळा धीर एकवटून आपल्या भीतीवर मात करत रेवतीने सुयशला उचलण्याचा प्रयत्न केला तसा त्या बाईने रेवतीला हिसका दिला. रेवती भिंतीवर आपटली. पुन्हा रेवतीने उठण्याचा प्रयत्न केला पण यावेळी तिने जोरजोरात रामरक्षा म्हणायला सुरुवात केली. तसं तिचं विचित्र हास्य हळूहळू बंद झालं अन् तिने कानावर हात ठेवले. तसं रेवतीने चपळाइने सुयशला उचललं अन् धावतच घराबाहेर पळाली. शेजारच्या सावंतांच दार ठोठावलं. सावंतांनी दार उघडलं. रेवतीला असं पाहून त्यांच्या सगळं लक्षात आलं. रेवतीला पाणी देऊन शांत केलं. सुयशला देव्हाऱ्यातला अंगारा लावला.


"नशीब चांगलं म्हणून वाचलात दोघं." सावंत काकू म्हणाल्या. तसे रेवतीने डोळे विस्फारले.


"मला माहित आहे सारं. तुम्ही ज्या दिवशी आलात तेव्हाच तुम्हाला सगळं सांगणार होतो पण त्या बयेनं आम्हालाही त्रास दिला असता. नाईलाजाने गप्प बसलो. तू आज जिला पाहिलंस ती सुमती..."


कोण सुमती? रेवतीने विचारलं.


देशपांडेंची सून. लग्नाला 10 वर्षे झाली तरी मूलबाळ झालं नाही. सासरच्यांच्या जाचाने तिला वेड लागलं. कोणाचंही मूल उचलायची अन् पळवायची. लोकांनी तिला मारहाण केली त्यात तिचा जीव गेला. रात्री अपरात्री ती लोकांना दिसू लागली. देशपांडेंच कुटुंब घर सोडून मुंबईला गेलं. हे घर एजंटकडून भाड्याने देतात. पण सत्य सांगत नाहीत. तुम्ही या घरातले दुसरे भाडेकरू. याआधी सुमतीने एक जीव घेतलाय. दैव बलवत्तर म्हणून वाचलात तुम्ही.


रेवती सावंत काकूंकडे पाहतच राहिली. तिने सुयशला घट्ट पोटाशी धरलं.


सकाळी सुनील आल्यावर त्याला सारी हकीकत सांगितली. तासाभरातच त्याने ते घर खाली केलं. रेवती अन् सुयशला घेऊन तो तिथून निघाला.


....पण सुमती मात्र वाट पाहत आहे आजही नव्या शिकारीची...


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror