Shital Thombare

Horror

3.3  

Shital Thombare

Horror

आणि त्या रात्री

आणि त्या रात्री

4 mins
2.1K


वर्षभरापूर्वीची गोष्ट असेल... आई बाबांना गावाहून फोन आला ...बाबांचे काका जे गेल्या काही दिवसापासून आजारी होते ते देवाघरी गेले. त्या वेळी मी आर्ट्स च्या शेवटच्या वर्षाला होतो....माझी परिक्षा जवळ आली होती म्हणून आईबाबांनी मला घरीच ठेवण्याच ठरवलं... खरतर अश्या बातम्यांनी मी पार घाबरून जायचो ...पण मन घट्ट करून मी आइबाबान्चा निरोप घेतला ...


आईने शेजारच्या काकूंना सांगून माझी जेवणाची सोय केली होती ....मी रात्री आठ वाजता क्लास वरून घरी आलो... काकूंकडे घरच्या किल्ल्या ठेवल्या होत्या...त्या मी घेतल्या...काकूंनी जेवणासाठी आग्रह केला...पण मी घरीच जेवेण भूक नाही...असा बहाणा करून...मी काकुंकडून डब्बा भरून घेतला...


किल्ल्या फिरवत मी काकूंच्या घरातून बाहेर पडलो...मनातून भीती जेवढी वाटत होती...तेवढीच एक्सायटमेंट सुद्धा होती...कारण यापूर्वी मी कधीच एकटा राहिलो नव्हतो...ही माझी पहिलीच वेळ...मनाचा हिय्या करून मी दार उघडलं... दारातून कर्रर्रर्र असा आवाज आला...मी जागीच थबकलो...इकडे तिकडे पाहत मी आत प्रवेश केला...आपल्याच घरात दबक्या पावलांनी मी एक फेरी मारली...सारं काही ठिक आहे ...स्वत: लाच समजावत ...मी खांद्यावरची ब्याग कॉटवर भिरकावली...


शीळ मारत मनातील भीती घालवण्याचा पुरेपुर प्रयत्न केला...काकूंनी दिलेला डब्बा उघडला...जेवण आवडीच होतं...खूप बरं वाटलं...ताट वाटी घेऊन जेवायचा कंटाळा आलेला...डब्ब्यातच जेवायला सुरुवात केली... हात धुवून कॉट वर आडवा झालो...घरात कोणीच नसल्याने अभ्यास करण्याचा प्रश्नच नव्हता...आणि आईबाबा घरात नसल्याने मन ही लागत नव्हतं...झोपायचा प्रयत्न केला पण अर्धा तास झाला...तरी झोप लागेना...


नजरेसमोर बाबांचे काका म्हणजे माझे चुलत आजोबा सतत येऊ लागले...त्यांचा चेहरा नजरेसमोर येई...पुढे तो चेहरा अक्राळविक्राळ रूप धारण करी...व मागे मागे जाई...मी डोळे घट्ट मिटले ...पण प्रयत्न करुनही मी त्या कल्पनेतून बाहेर पडू शकत नव्हतो... डोळे बंद केले की चित्र विचित्र आकृती नजरेसमोर नाचत ...मी ठरवल आता झोपायच नाही...पण वेळ जात नव्हता म्हणून मी टी.व्ही पहायचं ठरवलं...


रात्रीचे साडे अकरा झाले होते...रविवारचा दिवस असल्याने प्रत्येक चॅनेलवर चित्रपट लागले होते....काहीतरी लावायचं म्हणून मी जास्त त्रास न घेता...आहे तो चॅनेल चालू ठेवला...नेमका त्यावर हॉरर चित्रपट सुरु होता...घरात एकटा असुनही मी तो चित्रपट पाहू लागलो...जणू काही काल्पनिक भूत पाहून मी माझी भीती घालवत होतो....किती वेळ गेला असेल कोणास ठाऊक ...मी भूताचा चित्रपट पाहण्यात गुंग झालो होतो... आणि मध्यरात्रीनंतर अचानक दरवाजावर कोणीतरी थाप मारली ... माझ्या हृदयाचे ठोके जोरजोरात धडधडू लागले ...बाहेर कोण आलं असावं ...या कल्पनेनच हात पाय गळून गेले...घसा कोरडा पडला...मी स्वत: ला चादरीमध्ये गुरफटून घेतलं...मुठी घट्ट आवळल्या...डोळे घट्ट मिटून घेतले... पण तेवढ्यात दारावरची ती थाप देण्याचा वेग चांगलाच वाढला...दारावर आता जोरजोरात लाथा मारण्याचा आवाज येऊ लागला...तसं माझं शरीर भितीने थरथरू लागलं...थोड्याच वेळात आवाज बंद झाला...


सगळीकडे नीरव शांतता पसरली...मला जाणवू लागले की माझ्या अंगावरची चादर खाली खाली सरकत आहे...मी जोर लावून ती खेचून धरण्याचा प्रयत्न केला...पण तो निष्फळ ठरला... मला जाणवलं खोलीत माझ्या व्यतिरिक्त कोणीतरी आहे...तशी माझी बोबडी वळली....आता आपलं काही खरं नाही...मी मनाशीच म्हणालो...डोळे उघडून पाहण्याशिवाय पर्याय नव्हता...मी डोळे उघडले... समोर एक काळी आकृती बलाढ्य आकारात माझ्यासमोर उभी होती...त्या आकृतीने माझा पाय ओढतच मला कॉट वरून खाली पाडलं...मला पाय धरून खेचून नेण्याचा प्रयत्न करु लागला...मी ओरडत होतो.. पण माझा आवाज तोंडातून बाहेर पडत नव्हता...


मी त्या काळ्या आकृतीला विरोध करण्याचा प्रयत्न करत होतो ...पण ती आकृती जणू काही सुडाला पेटली होती...मला खेचत असतानाच ती आसुरी हास्य हसत होती...अन् मी मात्र जिवाच्या आकांतानी स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करत होतो.... त्या आकृतीने मला खेचत एका अंधाऱ्या जागेत नेलं...तिथे माझी मानगुट पकडून त्याने मला वर उचललं...मला जाणवत होतं...माझं शरीर जास्त काळ त्या काळ्या आकृतीचा प्रतिकार करु शकणार नाही... माझा स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न आता मंदावला...माझं शरीर थंड पडलं...शरीराचे अवयव हळूहळू ताठ होऊ लागले...माझे प्राण माझ्या शरीरातून बाहेर पडले....आता उरलं होत फक्त निर्जीव शरीर....माझं शरीर जे मला प्रिय होतं ...पण या क्षणी ते माझं राहिलं नव्हतं...


तेवढ्यात माझ्या शरीराला पुन्हा कोणीतरी जोरजोरात हलवलं....शरीरात एक तीव्र कळ सळसळली...मेंदूला झिनझिन्या आल्या....त्यासरशी माझं शरीर दोन फूट उंच उडाल्याचा भास झाला.....मी खाडकन डोळे उघडले...तो माझा बालमित्र परेश समोर बसलेला....माझ्याकडेच रोखून पाहत होता..त्याला पाहून मी दचकलोच...


त्याने माझ्या कपाळाला हात लावला...मी घामाने चिंब झालेलो...अंग थरथरत होतं...त्याने मला पाणी आणून दिले...तू इथे कसा? मी त्याला विचारले....तर तो म्हणाला अरे ! तू एकटाच होतास...आणि मला माहित आहे तू किती भित्रा आहेस...तुला सोबत करण्यासाठी आलो होतो...किती वेळ दार ठोठावत होतो...


अरे ! पण दार बंद होतं मग तू आत कसा आलास?...तू दार उघडलं नाहिस शेवटी गावी काकूंना फोन केला...त्यांनीच सांगितलं शेजारच्या काकूंकडे एक्स्ट्रा किल्ली ठेवलेली असते...मग काय तीच घेऊन दार उघडलं...पाहतो तर तू गाढ झोपलेला...म्हणून बसून राहिलो...मी त्याला म्हटलं बरे केले आलास ...तसंही मला सोबतीची गरज होतीच...त्याला म्हटलं झोप पण तो म्हणाला झोप नाही आली तू झोप घाबरला आहेस ...मी बसून राहतो खुर्चीवर...


त्याला असं सोबतीला पाहून मला ही थोडा धीर आला...त्याच्या भरवशावर मी निवांत झोपी गेलो...सकाळी जाग आली...पाहतो तो परेश खुर्चीवर नव्हता...बाथरूममध्ये असेल असा विचार केला...पण बराच वेळ झाला तरी तो आला नाही...म्हणून मी दार वाजवलं... पण आतून कसलाच प्रतिसाद आला नाही...मी दार ढकललं दार उघडंच होतं...पण परेश आत नव्हता...मी सगळ्या घरात शोधलं पण तो कुठे ही नव्हता...मला वाटलं तो सकाळी सकाळीच उठून गेला असेल...पुन्हा येऊन कॉट वर लोळत पडलो...तेवढ्यात फोन वाजला...माझ्या मित्राचा फोन होता...तो रात्रभर मला फोन लावत होता पण माझा फोन लागत नव्हता...त्याने घाईने मला हॉस्पिटलमध्ये बोलावलं...


काय झालं विचारलं...पण तो सांगायलाच तयार नव्हता...त्याने सांगितलेल्या पत्त्यावर पोहोचलो...हॉस्पिटलमध्ये गर्दी होती... परेशचे आई बाबा रडत होते...कॉटवर परेशचा मृतदेह होता...मला धक्काच बसला ...रात्रभर माझ्यासोबत असणारा परेश इथे कसा काय?


काकूंना विचारलं तेव्हा त्या म्हणाल्या, रात्री तुला सोबत करण्यासाठी म्हणून तो निघाला...पण वाटेत त्याचा अपघात झाला...अपघात इतका मोठा होता की...परेशचा जागीच जीव गेला...


म्हणजे रात्री माझ्या सोबतीला जो होता तो परेश नव्हताच... म्हणजे त्याचं भूत होतं... मी कोणाला सांगू रात्रभर परेश माझ्या सोबत होता... कोण माझ्यावर विश्वास ठेवेल...


अन् माझा तरी विश्वास कुठे बसलाय...की परेश आता या जगात नाही...


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror