Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Shital Thombare

Others


2  

Shital Thombare

Others


बालपण

बालपण

2 mins 323 2 mins 323

आम्हा तीन भावंडांचं बालपण फार श्रीमंतीत गेल नसलं तरी आनंदात, मौजमजेत, मोकळ्या जगात नक्कीच गेल. आजही बालपणीचे दिवस आठवले की आठवतं चाळीतलं आमचं छोटेखानी घर. तिथे शेजारी चालणाऱ्या भांडणापासून ते फोडणीच्या खमंग वासापर्यंत सगळाच आस्वाद मिळायचा. चाळीत आम्हा पोरांची नुसती धमाल असायची. हवे तसे खेळलो, भटकलो पण इकडे जाऊ नको तिकडे जाऊ नको, पडशील, लागेल असं पालुपद कधी कानावर पडलंच नाही. खेळताना लागलंच तर मैदानातील माती जखमेवर चोळून पुन्हा खेळायला लागायचो. डेटॉलचा शोध लागला तरी आमची जखम मातीनेच बरी केली (निदान आमचा तरी तसा समज होता) पैसे देऊन शिकवणी कधी लावली नाही. चाळीतील पोरं एकत्र येऊन सगळा अभ्यास करत त्यातही मजा होती. वडिलांचा फार दरारा त्यामुळे दिवसभर उंडारणारे आम्ही वडिल येण्याआधी घरी हजर. मोबाइल नावाच्या यंत्रान तोंड उघडलं नव्हतं. त्यामुळे आमचं जग माणसाभोवती फिरत होतं.


टि.व्ही वर ठराविक कार्यक्रम. चित्रपट फक्त रविवारी संध्याकाळी. सायकलची घंटा वाजवत आलेला आइस्क्रीमवाला त्याच्याकडचा तो लालेलाल बर्फाचा गोळा. हातावरचे ओघळ कोपरापर्यन्त गेले तरी भान नसायचं. एक रुपया भाडं देऊन चालवलेली सायकल. कधी कुठल्या खेळण्याची गरज भासली नाही. मैदानी खेळ खेळायला कधी कोणी अडवलं नाही. पाऊस पडल्यावर ओल्या मातीत टाचेनं गोल रिंगण करणं, हातातील काठी नेम धरुन मातीत रोवणं, टायरची गाडी, काठीच्या गाडीवर डबलसीट घेणं, गोट्या, लगोरी, उन्हाळ्यात आंब्याच्या कोयी जमवून त्यापासून खेळणं, नदीत पोहणं, चहा चपातीचा पोटभर नाष्टा, अन् टि.व्हीला आलेल्या मुंग्या अँटीना अॅडजस्ट करून घालवणं, सुट्टीत मामाचं गाव ठरलेलं. अशा कितीतरी आठवणी मनात आजही रुंजी घालतात. आज हातात स्मार्टफोन आहे, पण बालपणीच्या ब्लॅक अँण्ड व्हाईट टि.व्हीची सर नाही त्याला. आज आपण कमावलेल्या पैशांना वडिलांनी खाऊसाठी दिलेल्या पैशांची सर नाही येणार. आम्ही तीन भावंडं तीन दिशांना विखुरलो गेलोय. व्यवहारी जगात हरवलोय. संसार आणि जबाबदारी यात अडकून पडलोय. बालपणीचा तो काळ आजही मन बेचैन करतो. जबाबदारीची ओझी वाहताना जगण्यातील निरागसता हरवून बसलोय. एखाद्या निवांत क्षणी पुन्हा ते बालपण आठवतं आणि सहजच म्हटलं जातं... "लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा."


Rate this content
Log in