Shital Thombare

Drama

3.7  

Shital Thombare

Drama

भविष्याची ऐशी की तैशी

भविष्याची ऐशी की तैशी

4 mins
263


सोनलचं बी. एड. पूर्ण झालं... आणि ती एका खासगी शाळेत साहाय्यक शिक्षिका म्हणून रुजू झाली... "मुलगी शिकली प्रगती झाली..." असं आपण कितीही म्हटलं तरी शिक्षण पूर्ण झालं की प्रत्येक मुलीच्या आई-बाबांची एकच इच्छा असते ती म्हणजे आपल्या मुलीसाठी उत्तम स्थळ शोधणे... आणि तिची योग्य घरी पाठवणी करणे.... मग याला आपली सोनल आणि तिचं कुटुंब तरी कसं अपवाद राहणार....


सोनल आपल्या कामात व्यस्त होती... तर आई-बाबा तिच्या वरसंशोधनाच्या....


नातेवाइकांकडे सोनलच्या फोटोंची रवानगी करण्यात आली... कधी भेटीगाठी न झालेल्या पाहुण्यांच्या आवर्जून भेटीगाठी वाढू लागल्या... घरात आलेल्या प्रत्येक लग्नपत्रिकेतल्या लग्नाला कधी नव्हे ते सोनलचे आई-बाबा आवर्जून हजर राहू लागले.... सोनलचं शिक्षण आणि तिचा स्वभाव याचं कौतुक प्रत्येक लग्नात होऊ लागलं... नातेवाईकांत बातमी पोहोचली... सोनलचं यंदा कर्तव्य आहे हो...!!!!!


जो तो आपापल्या परीने स्थळ सुचवू लागला... कांदे-पोह्यांचा कार्यक्रम पार पडू लागला... चहा-साखरेचं बिल वाढू लागलं... पण सोनलसाठी उत्तम स्थळ काही मिळेना... आता सगळं जमून येईल असं वाटत असताना देव जाणो कशी कधी अन् कुठे माशी शिंकायची... अन प्रत्येक स्थळाकडून सोनलला फक्त नकार यायचा...


नाही नाही तुम्हाला वाटतंय तसं मुळीच नाही बरं... आपली सोनल नाकी डोळी नीटस चार चौघीत उठून दिसेल अशीच होती अगदी... आणि तरीही तिच्यासाठी सुयोग्य असा वर शोधणं कठीण होऊन बसलं होतं...

ओळखीपाळखीतील स्थळांची यादी संपुष्टात आली तशी... सोनलच्या बायोडाटाची रवानगी वर-वधू संशोधन कार्यालयात झाली पण तिथूनही फक्त निराशाच पदरी पडली...


दर रविवारी नित्यनियमाने होणारा कांदे-पोह्यांचा कार्यक्रम आता फक्त चहावर येऊन पोहोचला होता... आठवड्याला होणारा कार्यक्रम आता महिन्यावर येऊन ठेपला होता... पूर्वी उत्साहाने साडी नेसून तयार असणारी सोनल... दाखवण्याचा कार्यक्रम आता ड्रेसवरच आटपू लागली...


5 वर्ष होत आली सोनलच्या वरसंशोधनाला... पण वरसंशोधन काही संपलं नाही... आधी उत्साहाने स्थळ सुचवणारे नातेवाईक आता सोनलच्या कुटुंबाला टाळू लागले....

आपलं लग्नच होणार नाही अशी खात्री सोनलची झाली... पण आपण हे जग सोडण्यापूर्वी... आपलं काही बरं वाईट होण्याआधी सोनलचे हात पिवळे करायचेच हा चंग आई-बाबांनी बांधला होता...

आणि त्यांची इच्छापूर्ती होण्याचा तो क्षण त्यांच्या आयुष्यात आला... सोनलचा मोठा मामा त्याने आपल्या लाडक्या भाचीसाठी त्याच्या एका मित्राच्या मुलाचं स्थळ सुचवलं...


आणखीन एक नकार असं गृहीत धरूनच सोनलचा दाखवण्याचा कार्यक्रम पार पडला...

पण यावेळी दोन्ही कुटुंबाकडून पसंती झाली.... मुलाकडच्या मंडळींना आणि मुलालाही सोनल पसंत पडली... सोनलच्या कुटुंबालाही मुलाला नाही म्हणावं असं एकही कारण नव्हतं मग काय आता फक्त पत्रिका जुळणं बाकी होतं.... ते जमलं की बार उडालाच समजा...


सोनलच्या मामांनी दोघांच्याही पत्रिका आपल्या ओळखीतल्या एका गुरुजींना दाखवल्या... त्या गुरुजींच्या कपाळावर पडलेल्या आठ्या पाहून.... सोनलच्या मामाच्या हृदयाचे ठोके अति वेगाने धावू लागले...

गुरुजींनी भविष्यवाणीच केली... सोनल आणि त्या मुलाचे 32 गुण जुळत आहेत... पण सोनलशी लग्न झालं तर मुलाचा मृत्यू अटळ आहे... कारण सोनलच्या पत्रिकेत दोन विवाहांचा योग आहे...


सोनलच्या मामाच्या पायाखालची जमीनच सरकली... आपल्या लाडक्या भाचीच्या नशिबात असं काही असेल याची त्यांना याआधी सुतराम कल्पनाही नव्हती... सगळं काही जुळत असताना पुन्हा हा विषाचा खडा... सोनलचं आयुष्य नक्की काय वळण घेणार आहे...

त्यांनी सोनल आणि तिच्या घरच्यांना सगळं सत्य सांगितले.... आता सोनलच्या आई-बाबांनीच त्या मुलाला नकार कळवला... पण सोनलच्या कुटुंबाकडून आलेला नकार न पटल्याने मुलाकडची मंडळी सोनलच्या घरी त्यांना भेटायला आले... सोनलचे मामाही तिथेच होते...


मुलाकडच्या मंडळींनी खूप आग्रह केल्याने अखेर त्यांना या लग्नाला दिलेल्या नकाराचे कारण उघड करावेच लागले... त्यावर मुलाकडच्या मंडळींची प्रतिक्रिया सगळ्यांनाच अनपेक्षित होती....

एवढंच ना पुढे काय होणार याचा विचार आता का करत बसायचा... आजच्या युगातही तुम्ही या अशा गोष्टी मानता आश्चर्य आहे... तुम्ही म्हणालात म्हणून आम्ही पत्रिका जुळवण्याला तयार झालो... मुळात पत्रिका, भविष्य या गोष्टीवर आमचा कोणाचाही विश्वास नाही... पत्रिका न जुळवताही कित्येक लग्न होतात आणि ती टिकतातही... आणि 36च्या 36गुण जुळवून झालेली सगळीच लग्न टिकतात असं नाही ना...


सोनलच्या पत्रिकेत दुसऱ्या लग्नाचा योग आहे... पण आमच्या मुलाच्या पत्रिकेत तर एकाच लग्नाचा योग आहे... आणि जन्म-मृत्यू आपल्या हातात नाही... पुढे भविष्यात काय होईल हे आधीच पाहून वर्तमान का खराब करायचं... आम्हाला सोनल सून म्हणून पसंत आहे... तुमचा होकार असेल तर याच महिन्यात आपण लग्नाचा बार उडवून टाकू...

सोनलच्या आई-बाबांना, मामाला यावर काय उत्तर द्यावे कळेचना...


शेवटी नवरा मुलगा पुढे आला आणि म्हणाला... मी या लग्नाला तयार आहे... इतकी वर्ष सोनलच्या लग्नाचा जुळून न येणारा योग जुळून आला आहे... आणि मलाही इतक्या मुलींमध्ये सोनलच पसंत पडली आहे... मग यातून काही वाईट कसं काय घडू शकतं... यामागे नक्कीच काहीतरी चांगलं दडलेलं आहे... जे होईल ते चांगलंच होईल... सोनल तू आहॆस का लग्नाला तयार... तुझा होकार माझ्यासाठी सर्वात महत्वाचा आहे...


सोनलने डोळ्यांनीच आपला होकार दर्शविला.... आणि सगळ्यांनाच आनंद झाला... महिन्याभरातच सोनलचं लग्न झालं... ती आपल्या सासरी नांदू लागली.... एक अनामिक भीती होती मनात... पण नवरा आणि सासू सासऱ्यांनी दिलेल्या प्रेमाने सोनलचं आयुष्य सुरळीत सुरु झालं...


सोनलच्या लग्नाला दहा वर्ष झाली... तिला आज एक गोंडस मुलगीदेखील आहे... आपल्या नवऱ्याबरोबर एक आनंदी आयुष्य ती जगत आहे.... भविष्याची ऐशी की तैशी म्हणत वर्तमानाला आनंदी करण्यात व्यस्त आहे...


सत्यघटनेवर आधारित... (एक आठवण)


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama