तुझं माझं जमेना...
तुझं माझं जमेना...
आज रविवार सुट्टीचा दिवस म्हणजे सर्व काही निवांत.पण रिया आणि रुपेशच्या रूममध्ये मात्र सकाळी सकाळीच वादाला सुरुवात झाली.वाद एवढा वाढला की, त्याचा आवाज रूमबाहेर पडून सासूबाईंच्या कानावर गेला. असे छोटे- मोठे वाद नेहमीच होतात दोघांमध्ये.त्यामुळे हे काय नेहमीच आहे असं म्हणतं सासुबाईंनी त्यांच्या भांडणाकडे दुर्लक्ष केलं.पण आज वातावरण भलतंच तापलं होतं.
त्याच झालं असं की आठवडा भर रिया आणि रुपेश आपापल्या कामांमध्ये बिझी असतात.एक रविवारच तो काय दोघांना एकत्र वेळ घालवण्यासाठी मिळतो.त्यात आज रविवार असून रुपेश ने कॉलनीतल्या मित्रांसोबत क्रिकेटचा प्लान बनवला आणि रियाने रुपेश सोबत मूव्हीचा. झालं माशी इथेच शिंकली आणि दोघांची वादावादी सुरु झाली.दोघांपैकी कोणीही माघार घ्यायला तयार होईना.चिडचिड करतच रियाने रूमचं दार उघडलं.आपली रविवारची पेंडींग काम करायला सुरुवात केली.पण तीची धुसफुस चालूच होती.
रुपेशने नाश्ता केला.ऑफिसची एक दोन काम पेंडींग होती ती केली.तेवढ्यात खालून मित्रांनी आवाज दिला.रुपेश ने घड्याळात पाहिलं काटा 12वर आलेला.म्हणजे मॅचची वेळ झाली तर. मित्रांना खुणेनेच येतो म्हणत त्याने कोपरयातील बॅट हातात घेऊन चप्पल पायात सरकवली.रियाला जातो म्हणण्यात अर्थच नव्हता ती अजूनच चिडली असती.त्याने आईला हळूच खुणावलं आणि तिथून पळ काढला. रियाच्या नजरेतून हे काही सुटले नाही. ती आणखिनच भडकली.माझ्या पेक्षा ह्याला ह्याचे मित्र आणि तो क्रिकेट प्यारा आहे तर.ठिक आहे मी ही माझा प्लान रद्द करणार नाही.अकेले ही सही पर मूव्ही तो आज देखेंगे ही असं म्हणतं तिने मनाशी निर्धार केला.
दुपारी 3च्या शो चं ऑनलाईन बूकिंग केलं.आणि कामं आटपायला घेतली.जेवण करून दुपारी दोन लाच ती घरातून बाहेर पडली.रिक्षात बसली.मी एकटी मूव्ही पाहू शकत नाही काय? नाही गरज मला तुझी.दरवेळी आपलं ह्याचचं ऐकायचं.आज दाखवूनच देते त्याच्याशिवाय माझं काही एक अडत नाही. विचारात असतानाच रिक्षा मल्टीप्लेक्स समोर थांबली.रिक्षातून खाली उतरली पाहिलं तर रविवार असल्याने तूफान गर्दी होती.तिला पुन्हा रुपेश ची आठवण आली.मूव्ही दोघांचाही वीक पॉइंट होता.अगदी कॉलेज मधे असल्यापासूनच. त्या वेडानेच तर त्यांना एकत्र आणलं होतं.कॉलेज मधे असताना एकही मूव्ही सोडला नाही त्यांनी पाहायचा.फ्रेंडस् तर सगळे मूव्ही लव्हर म्हणूनच चिडवायचे.आजही तिने दोघांसाठी मूव्ही चा प्लान केला पण रुपेशने सगळा प्लान चौपट केला.शांत झालेला राग पुन्हा बाहेर डोकवु लागला.
तिने एकवार आपल्या अवतीभवती पाहिलं.सगळीकडे गर्दीच गर्दी कोणी कुटुंबासोबत,कोणी कॉलेज ग्रूप सोबत,तर कोणी आपल्या प्रेमिकेला घेऊन आलेले.आपण मात्र एकटेच तिचं मनं खट्टू झालं. पण नाही रुपेश शिवाय काही अडत नाही असा विचार करत तिनं डोअर किपर च्या हातात तिकिट टेकवलं आणि आत एण्ट्री केली.मूव्ही सुरु झाला खरा पण रियाची नजर अवतीभवती फिरु लागली. पुढच्याच रांगेत एक प्रेमीयुगुल बसलेलं.तिने छान पैकी त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलेलं.रियाला कससच झालं.रुपेशच्या आठवणीची तीव्रता वाढू लागली.मूव्ही मधे तिचं लक्षच नव्हतं. हळूहळू तिची अस्वस्थता वाढू लागली. तशी ताटकन उठली. इंटरवलपर्यंत ही न थांबता ती तडक थिएटरच्या बाहेर पडली.
रुपेशशिवाय असं पहिल्यांदाच ती एकटीने मूव्ही पहायला आली होती. रागाच्या भरात आपण वेड्यासारखं वागायला नको होतं. आता ती स्वत:लाच दोष देऊ लागली. काय गरज होती त्याच्याशी वाद घालायची. एक दिवस तो मित्रांसोबत गेला तर कुठे बिघडलं. नेहमीच काय त्याने माझ्या मागे मागे फिरावं का?चुकलच माझं उगाच वाद घातला त्याच्याशी. आत्ताच्या आत्ता घरी जाते मला घरी नाही पाहिलं तर काळजी करत बसेल.तिने रिक्षाला हात केला गणेश नगर म्हणतं ती रिक्षात बसली.
रुपेशची ही इकडे काही वेगळी परिस्थिती नव्हती. बॉलिंगसाठी मैदानात उतरला खरा पण त्याचं लक्ष खेळाकडे मुळीच नव्हतं. उगाच रियाशी भांडलो. एकच दिवस तर तिला माझ्यासोबत घालवायला मिळतो. त्याची सुरुवातही मी अशी भांडणाने केली. तो स्वत: वरच चिडला. हातातून बॉल फेकला तो नेमका समोरच्याच्या नाकावर मित्र ओरडले. ए रुप्या लक्ष कुठे आहे तुझं. रुपेश भानावर आला. तब्ब्येत ठिक नसल्याच कारण सांगत तो तिथून सटकला. तो थेट घरी पोहचला पाहतो तर रिया घरात नाही. आईने सांगितलं ती रागावून एकटीच गेली आहे मूव्ही पहायला. बापरे! भलतीच चिडलेली दिसतेय रिया. त्याने तिला फोन लावला.
रिंग वाजली रियाने फोन पाहिला रुपेशचा कॉल पाहून ती खूश झाली. पण हे काय फोन उचालणार इतक्यात फोन ऑफ झाला. रियाने कपाळाला हात लावला. वाद घालण्याच्या नादात फोन चार्ज केलाच नाही. रुपेश फोन करतोय फोन लागला नाही तर तो टेन्शनमधे येईल. आधीच टेन्शनने बिपी हाय होतो त्याचा. देवा उगाच बाहेर पडले मी. कुठून दुर्बुद्धी सुचली मला. रिया रडकुंडीला आली. डोळ्यातल्या पाण्याला तिने बाहेर पडण्यापासून रोखलं. विचारांमध्ये गुंग असतानाच रिक्षाला मागून जोरात धडक बसली. सुसाट येणारा कारवाला रिक्षावर धडकला. त्या धक्क्याने रिया पुढे फेकली गेली तिच्या डोक्याला मार बसला, हातापायाला खरचटले. रिक्ष्यावाल्याला ही लागलं.आसपासच्या माणसांनी त्यांना दवाखान्यात नेलं.
या सगळ्या प्रकारात खूपच उशीर झाला. थोडं बर वाटल्यावर रिया घरी निघाली. फोन आधीच बंद झालेला त्यामुळे रुपेशशी संपर्क साधता येईना.तिने रिक्षा केली अन निघाली घरी जायला. रिया अजून आली नाही म्हणून रुपेश चांगलाच टेन्शनमधे आला. सोसायटीच्या आवारातच तो फेऱ्या मारत होता. किती उशीर झालाय कुठे राहिली ही. त्यात तिचा फोनही लागेना.
उगाच मनात शंकांचं काहूर माजलं. बस्स झालं आता पोलिसात तक्रार करायलाच हवी असा विचार करून सोसायटीतून बाहेर पडणार इतक्यात त्याच्यासमोर रिक्षा थांबली. त्यातून रिया बाहेर पडली. डोक्याला पट्टी बांधलेली. रुपेशला पाहून रिया त्याच्या गळ्यातच पडली. इतका वेळ दाबून ठेवलेला अश्रूंचा बांध बाहेर पडला. दोघं एकमेकांची माफी मागू लागले. हे सगळ माझ्यामुळे झालं दोघंही दोष स्वत:वर घेऊ लागले.
इतका वेळ रुपेशची आई खिडकीतून सारं पाहत होत्या त्या गालातल्या गालात हसल्या अन म्हणाल्या 'यालाच म्हणतात तुझं माझं जमेना अन तुझ्या वाचून करमेना.'