ती आणि तो
ती आणि तो
ती आणि तो एकाच गावातले, एकाच गल्लीतले, वर्गात पाचवीपर्यंत एकाच बाकड्यावर बसत असत. नाकातून गळणारा शेंबूड दोन्ही बाह्यांना पुसायचा म्हणून ती त्याला शेंबडा म्हणायची, तर तिचे केस कायम विस्कटलेले म्हणून तो तिला झिपरी म्हणायचा. लहानपणी दोघांच्या खूप मारामाऱ्या व्हायच्या तो तिच्या झिपऱ्या ओढायचा तर ती त्याला चावायची, ओरबाडायची.
जेवण मात्र दोघेपण एका डब्यात जेवायचे, त्यांना एकमेकांशिवाय करमायचे नाही. अशी त्यांची घट्ट मैत्री! पाचवीत गेल्यावर सरांनी मुलांना आणि मुलींना वेगवेगळे बसवलं म्हणून दोघांनी देखील भोकाड पसरलेलं होतं.
आठवीपासून तर वर्गच वेगळे, पण दोघांना एकमेकांशिवाय चैन पडत नव्हतं. अजून दुपारच्या सुट्टीतला डबा दोघेजण एकत्रच खात असत. एकदा पकडापकडी खेळताना त्याने तिला मागून पकडले, त्याच्या हाताला काहीतरी मांसल लागले. त्याची कानशिले गरम झाली आणि ती पण गोरीमोरी झाली. नेमके त्याच दिवशी विज्ञानाच्या सरांनी मुलगा आणि मुलगी यांचे वयात येतानाचे बदल शिकवले. तेव्हा त्याला काय ते कळले, मग ती खेळायला यायची बंद झाली. डबा पण खायला एकत्र येईना.
”अशी काय करतेस? मला काही माहीत नव्हतं त्यादिवशी चुकून झालं आता नाही होणार..." पण ती लांबच झाली. रोज एकमेकांशी मारामाऱ्या करणारे दोघं आता एकमेकांकडे चोरून चोरून बघू लागले काहीतरी नवीन भावना मनात जन्म घेत होती. एकमेकांना वह्या-पुस्तके देताना चुकून निसटता स्पर्श झाला तरी अंगभर झिणझिण्या येत होत्या. गालावर लाली येत होती. नजरा आपोआप एकमेकांना भिडत होत्या आणि खाली पण वळत होत्या. वयात येतानाचे ते भ्रम विभ्रम दोघेपण अनुभवत होते.
हळूहळू काही वर्षे गेली आणि दोघांना पण वास्तवाचं भान आलं. जात, धर्म, सांपत्तिक स्थिती यातला फरक लक्षात येत होता. शेवटी त्याने धाडस करून एक दिवस तिला प्रपोज केलं, “सोनू! मी लहानपणापासून तुझ्यावर प्रेम करतोय देशील का मला साथ?”
“राजा तू माझा बालमित्र आहेस परंतु मला तुझ्यात माझा प्रियकर दिसत नाही आणि माझे एक स्वप्न आहे मला काहीतरी भव्यदिव्य करणारा मुलगा प्रियकर म्हणून आवडेल,” ती भाबड्या वयातल्या भाबड्या स्वप्नात बोलली.
आता भव्य दिव्य काय करायचं ?त्याला प्रश्न पडला.
“भव्यदिव्य म्हणजे काय करायचं?” त्याने तिला विचारलं.
”काहीतरी देशासाठी कर ,धर्मासाठी कर, समाजासाठी कर पंचक्रोशीत तुझं नाव झालं पाहिजे आणि मी अभिमानाने मिरवलं पाहिजे.”
शेवटी त्याने मिलिटरीत जाण्याचा निर्णय घेतला. कारण समाजसेवेसाठी घरची परिस्थिती अनुकूल नव्हती. समाजसेवा करण्यासाठी आधी रोजचं, पोट नीट भरावं लागतं. घरची आर्थिक परिस्थिती जेमतेमच होती. आई-बाप आणि दोन बहिणी यांच्या आशा त्याच्याव
र होत्या. स्वार्थ आणि परमार्थ पैसा पण मिळेल आणि देशसेवा पण होईल या हेतूने तो मिलिटरीत गेला.
होता पण उंचापुरा धिप्पाड! एकावेळी दहा माणसांना लोळविण्याची ताकद त्याच्यात होती कोणताही विशेष खुराक न लावता निव्वळ भाजीभाकरीची ताकद होती, त्याला परमेश्वरी देणगी होती. तो मिलिटरीत गेला आणि तिला गाव सुनंसुनं वाटू लागलं. कोणत्या गोष्टीत तिचं मन रमेना. तेव्हा मोबाईल नव्हते त्याची येणारी पत्रे हाच विरंगुळा. ती पण घरच्यांना चोरून पोस्टमनकडून हस्तगत करावी लागत. आता तो त्याच्या नोकरीत रुळला होता कर्तव्याला खिळला होता. एक-दोन वर्षे गेली की आपण आपापल्या घरच्यांना सांगू या असा विचार त्यांनी केला होता.
पण सगळ्याच प्रेमाचा शेवट लग्नात होत नाही. घरात आधीच कुणकुण होती. तो मिलिटरीत गेल्यावर घरच्यांनी नि:श्वास सोडला आणि तिला स्थळे बघू लागले. शेवटी भावकीतल्या एका पोराला आई-बापांनी पसंत केले तिचा होकार नकार कोणी विचारलाच नव्हता. असेही त्या काळामध्ये परजातीतली लग्न सर्रास होत नव्हती आणि त्याला लोक मान्यता पण देत नव्हते. "एक वेळ पोरीला विहिरीत ढकलून देऊ पण त्याला देणार नाही" असा खाक्या त्याकाळी होता.
लग्नाची तारीख ठरवली. 27 मेला... लग्न पोरीच्या दारात मांडव घालून दोन्ही अंगाने करून द्यायचं होतं. वऱ्हाडणीचे मानपान व्यवस्थित करून द्यायचे होते आणि पंचवीस तारखेला गावात वाऱ्यासारखी ती बातमी आली. काश्मीरच्या सीमेवरती तो शहीद झाला होता, जाता जाता त्याने आठ जणांना कंठस्नान घातले. वारंवार टीव्हीवर बातमी आणि त्याचा फोटो झळकत होता. दोन दिवसांवर लग्न आले होते, एकाच गावात, एकाच आळीत एका दारात लग्नाचा मांडव पडला होता तर दुसऱ्या दारासमोर काय होते? तर शवपेटीका होती. साऱ्या गावावरती स्मशानकळा पसरली होती आणि लग्नदेखील आल्या मुहूर्ताला करणे गरजेचे होते.
तिच्या डोळ्यासमोर राहून राहून त्याचा चेहरा, त्याचे बोलणे, त्याचा स्पर्श, आठवत होता. लग्न अगदी साध्या पद्धतीने करायचे ठरले, वाजंत्री मिरवणूक इत्यादी गोष्टींना फाटा दिला मुलाकडच्यानी पण समजून घेतले. एकाच वेळी तिची वरातीची गाडी आणि त्याची मिलिटरी इतमामाने अंत्ययात्रा निघाली. दोघांचीही मिरवणूक होती एक नव्या जीवनाकडे निघालेली तर दुसरी अनंताकडे निघालेली. दोघांच्याही अंगावर हार होते पण एकातली फुले हसत होती तर दुसऱ्यातली फुले रडत होती. एका मिरवणुकीच्या पुढे माणसे चाललेली होती आणि एका मिरवणुकीच्या मागे माणसं चाललेली होती. सारी पंचक्रोशी जमा झालेली साऱ्या पंचक्रोशीत त्याचे नाव झाले अगदी अभिमान वाटावा असेच!
ती मात्र धाय मोकलून रडत होती. लोकांना वाटत होते ती सासरी जाते म्हणून रडते पण ती का रडते आहे हे फक्त त्याच्या आणि तिच्या आत्म्यालाच ठावूक होते.