Swati Mane

Romance

3  

Swati Mane

Romance

थंडी गुलाबी

थंडी गुलाबी

4 mins
210


  'ही गुलाबी हवा ...वेड लावी जीवा ...' विराज आपल्या मोबाईल वर अगदी धुंद होऊन गीत ऐकत होता ." क्या रे विराज ...क्या सून रहा है ? ही गुलाबी हवा ...कसली लेका गुलाबी हवा ? इथे सियाचीन ला येऊन आमच्या चौकीवरची हवा अनुभवा ..मग कळेल ही गुलाबी हवा कशी हवा काढते ते ?" समीर च्या बोलण्यावर सगळेच जवान एकमेकांना टाळी देऊन हसू लागले .

    विराज ही या हास्यात सामील झाला आणि समीरला म्हणाला .."तुझं बरोबर आहे मित्रा ,सियाचिन ची हवा आणि गुलाबी कशी असणार ? पण थोडे दिवस थांब ..पुढच्या सुट्टीत जाणार आहेस ना घरी आणि लवकरच घोड्यावर पण चढणार आहेस ना मग कळेल तुला ...हवा कशी गुलाबी होते ते ..."विराजच्या वाक्यावर समीर लाजून खरंच गुलाबी झाला ..मग काय आता आयता बकरा सापडला सर्वांना .सगळेच समीरला चिडवू लागले .

   हे सगळं पाहून विराजच्या मनात मात्र सुरू झाला खेळ भावनांचा , "समीर चं खरंच आहे म्हणा , सियाचीन च्या या हाडं गोठवणाऱ्या थंडीत कुठे असणार तो गुलाबी रंग ! पण आम्हा भारत मातेच्या सुपुत्रांमध्ये कायमच देशरक्षणाची मशाल धगधगत असते .त्या जाज्वल्य अग्निपुढे ही थंडी ...अरे चल हट ...काय बिशाद आहे आम्हाला गोठवण्याची ..." असा विचार करत विराज ने चौकीवरच्या तिरंग्याला सलाम ठोकला आणि आपली रायफल घेऊन गस्तीसाठी बाहेर पडला .

     विराज ....सत्तावीशीचा एक तरणाबांड उमदा सैनिक. शिवराय त्याचे आराध्य .लहानपणापासून एकच स्वप्न देश रक्षणार्थ आर्मी मध्ये जायचे आणि अत्यंत कष्टाने त्याने त्याचे स्वप्न पूर्ण केले होते.

     मोलमजुरी करणाऱ्या आई वडिलांचा तो आधार होता .गावाकडे आता त्याने स्वतःची थोडी शेतजमीन घेतली होती आणि शेतातच एक छोटंसं पण टुमदार घर बांधले होते .

    त्यातच गेल्या महिन्याभरापूर्वी त्याची अबोलीशी जन्मोजन्मी ची रेशीम गाठ बांधली गेली होती . अबोली ...फक्त आठवणीनेच विराजच्या सर्वांगावर रोमांच फुलले आणि चेहऱ्यावर एक स्मितहास्य .

     उंचीपुरी ,आकर्षक बांधा ,लांबसडक कुरळे केस ,सावळीशी पण बघताक्षणीच नजरेत भरणारी अबोली . पण विराज मात्र तिच्या बोलक्या डोळ्यांमध्ये च हरवून जायचा कारण ती नावाप्रमाणेच अबोल होती .

    लग्नाला आठ एक दिवस होऊन गेले होते .पण हे सगळे दिवस एकदम धामधुमीत गेले .अनेक विधी , कुळाचार , पै पाहुणे यातून उसंतच मिळाली नाही .पण अबोली तशी कमी बोलते हे विराजला आतापर्यंत कळले होते .

    त्यामुळे आता ही कळी खुलवायची असा विचार करून त्याने महाबळेश्वर ची तयारी केली .त्याने घरात सांगितल्यानंतर आई बाबांनी अगदी आनंदाने परवानगी दिली कारण विराजला कधीही ड्युटी वर जावे लागते याची त्यांना कल्पना होती .

    शब्दांतून व्यक्त न होणारी अबोली महाबळेश्वर ला जाण्याच्या नुसत्या कल्पनेनेच मोहरली आहे हे विराजला कळलं होतं ...आताशी सुरू झाला होता त्यांचा खेळ भावनांचा ...

   विराज आणि अबोली आपले साहित्य पॅक करण्यात दंग होते . दुसऱ्या दिवशी सकाळी ते निघणार होते .आई बाबाही त्यांना पुन्हा पुन्हा सूचना देत होते.

   इतक्यात दारात पोस्टमन येऊन उभा राहिला .पोस्टमन ला पाहून विराज जे समजायचं ते समजून गेला होता .त्याची सुट्टी रद्द झाली होती आणि त्याला ताबडतोब हजर व्हायचे होते .किती स्वप्ने रंगवली होती त्याने महाबळेश्वर ला जाण्याची आणि किती स्वप्ने दिसली होती त्याला अबोलीच्या डोळ्यातही .

   आई बाबांना सवय होती अशा धक्क्याची ,पण खोलीत बॅग भरत असणाऱ्या अबोलीला काय सांगू ..असा विचार करत विराज खोलीत पोहोचला होता .तो अबोलीला काही सांगणार त्या आधीच अबोलीने स्वतःची बॅग मोकळी करून त्याचे साहित्य भरायला सुरुवात केल्याचे त्याला दिसले .

    त्याला काही शब्दच सुचत नव्हते .तो अबोलीला काही विचारणार तोच तिने उत्तर दिले ," फौजी ,ज्या दिवशी तुमच्याशी गाठ बांधली ना तेव्हाच माझ्या मनाला मी समजावले होते ...बाई अबोली ..चारचौघींसारखा तुझा संसार नाही .एकत्र राहण्याचे ,हिंडण्या फिरण्याचे क्षण तुझ्या वाट्याला तसे कमी येणार आहेत .त्यामुळे तुझ्या हौस मौजेच्या बंधनात स्वतःला बांधून घेऊ नकोस .तुझा नवरा सैनिक आहे ..तो त्याचे शीर तळहातावर घेऊन फिरतो ...म्हणजे तू ही तुझं कुंकू तळहातावर घेऊन फिरायचं ..रोज सकाळी कुंकू लावताना मनात येतं ,आज तर लावते मी कुंकू ..पण उद्याचं काय ...माहीत नाही .पण घाबरायचं नाही ..धैर्याने वागायचं आणि या सौभाग्याला दीर्घायुष्य लाभावं ..हीच प्रार्थना करायची .त्यामुळे मला वाटत आपण फिरायला जाण्यापेक्षा तुम्ही आता ड्युटीवर लक्ष द्या .कळलं...."

    असं म्हणून अबोली पुन्हा कामाला लागली .सकाळी निघताना विराजला वाटलं की आता जर अबोली रडली तर आपला पाय निघणार नाही .पण बाईसाहेब तर हातात दही साखर घेऊन आल्या .

    शेवटी न राहावून विराजने तिला विचारले ,"अबोली ,खरंच तू इतक्या सहज कसं घेतलं हे सगळं ? तुला वाईट नाही वाटत का ?"

    तेव्हा ती म्हणाली ,"सगळ्या भावना अशा शब्दांत व्यक्त नसतात करायच्या ..काही डोळ्यांनी व्यक्त करायच्या आणि डोळ्यांनीच समजून घ्यायचा तर काही मनाने ."

   "किती धीराची आहेस ग तू ! " "हो ना ,मग आता ऐका "... असं म्हणून अगदी पोज घेऊन ती म्हणाली ..."लय असत्याल मनमौजी ..पण लाखात एक माझा विराज फौजी "..

   त्यावेळी असणारे तिचे डोळ्यातील काजळा आडचे पाणी ,वाढलेली धडधड आणि गरम श्वास विराजला जे सांगायचे ते सांगून गेला होता .

    अबोलीच्या आठवणीत दिवस कसा संपला ते कळलेही नाही .संध्याकाळी तो बंकर मध्ये परत आला ..तो त्याला त्याच्या नावाचे पार्सल दिसले .मोठ्या उत्सुकतेने त्याने ते उघडले .

   तो त्यात त्याच्या आवडीच्या निळ्या आणि पांढऱ्या रंगाचा स्वेटर दिसला .त्यात विणलेली व्ही आणि ए ही एकमेकांना चिकटलेली अक्षरे पाहून तो सगळंच समजून गेला होता .त्या स्वेटरची प्रत्येक वीण त्यांच्या नात्याच्या दृढतेची साक्ष होती .पत्र न लिहिता अबोलीने तिची प्रत्येक भावना त्याच्यापर्यंत पोहोचवली होती आणि त्याने ही ती समजून घेतली होती .

    दुसऱ्या दिवशी तो पुन्हा गस्तीवर हजर झाला ..पण आज सियाचीन ची थंडी त्याला बोचत नव्हती तर अबोलीच्या स्वेटरने ती आज गुलाबी गुलाबी झाली होती ...


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance