STORYMIRROR

Swati Mane

Inspirational

4.0  

Swati Mane

Inspirational

सोनेरी पिंजरा #फ्री इंडिया

सोनेरी पिंजरा #फ्री इंडिया

9 mins
567


' मृणालचे पत्र ' गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची एक अप्रतिम आणि अजरामर कलाकृती.1914 साली गुरुदेव टागोर लिखित या पत्रातून स्त्रियांच्या तत्कालीन परिस्थिती वर भाष्य केले आहे.

     पण आज म्हणजे हे पत्र लिहिल्यानंतर 106 वर्षांनी आणि स्वातंत्र्याच्या 74 वर्षानंतरही स्त्रियांची परिस्थिती बदलली आहे का ? अतिशय खेदाने म्हणावेसे वाटते की आजही ही मृणाल आजच्या स्त्रियांच्या परिस्थिती चे प्रतिनिधित्व करते.

     असो, काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा हे पत्र वाचनात आले आणि नकळत डोळ्यासमोर उभी राहिली अस्मिता.

    उंचीपुरी, सोनचाफ्याच्या वर्णाची,चाफेकळी नाकाची ,लांबसडक आणि विपुल असा केशसंभार .थोडक्यात अस्मिता म्हणजे मूर्तिमंत सौन्दर्य.

देशमुखांच्या खानदानी घराला साजेशी अशी देशमुखांची थोरली सून म्हणजे अस्मिता.

    तिचे सासरे सूर्यभानसिंह देशमुख म्हणजे एक बडी राजेशाही आसामी.त्यांची शालीन आणि राजस पत्नी सुलोचनाबाई यांच्या कडक शिस्तीत तयार झालेली रणजितसिंह ची पत्नी अस्मिता.

     संस्थाने गेली पण या घरांचे राजेपण मात्र कायम राहिले.आजही या घरातील स्त्रियांना सर्वसामान्य स्त्रियांसारखे चारचौघात मोकळेपणाने फिरणे मान्य नाही.बोलणे ,वागणे अगदी हसणे देखील अदबशीर ,हळुवार आणि नाजूक.

    यांचा वाडा हेच यांचे विश्व .त्यापलीकडचे जगच यांना माहीत नाही.मोठ्याने बोलणे सुद्धा जिथे वर्ज्य तिथे या बायकांना कसले आले आहेत छंद ? त्यामुळे की काय या घराचा उंबरा ओलांडून आल्यापासून अस्मिता चे गाणे तिच्या गळ्यातच राहिले.ओठांची चौकट ओलांडून ते कधी बाहेर पडलेच नाही.

     अस्मिता ...एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी.कॉलेजच्या एका कार्यक्रमात सूर्यभानसिंह यांनी तिला पाहिले. तिचे सौन्दर्य पाहून त्यांनी तिला सून म्हणून मागणी घातली.

     तिच्या मध्यमवर्गीय कुटुंबाला ही बरोबरी पेलणार नव्हतीच .म्हणूनच तर सूर्यभानसिंह यांनी फक्त नारळ आणि मुलगी मागितली होती.सुलोचनाबाईंना खरंतर तोलामोलाची सोयरीक हवी होती.पण सूर्यभानसिंह यांचा शब्द अखेरचा असल्याने आता कोणी काहीही बोलू शकत नव्हते.

     अस्मिता नवी सून म्हणून वाड्यात आली आणि तिच्या आयुष्याच्या नव्या अध्यायाला सुरुवात झाली.एकतर मध्यमवर्गीय कुटुंबातून आल्यामुळे या सगळ्या चालीरीती तिला पूर्णपणे नव्या होत्या.अतिशय शिस्तीचे आणि मर्यादांचे पालन करावे लागत असल्याने तिच्यातील स्वच्छंदीपणा कुठेतरी हरवत होता.त्यामुळे एक प्रकारचे दडपण आल्यामुळे ती जरा कोमेजली होती.

    तिच्या आईने तिची ही घालमेल ओळखली .पण एक खानदानी सून म्हणून तिच्या जबाबदऱ्यांची तिला जाणीव करून देत ,तिच्या नशीबवान असल्याची तिला खात्री पटवून देत तिची समजूत काढली.

    पुन्हा सासरी गेल्यानंतर मात्र तिने स्वतःला पूर्णपणे देशमुख घराण्याच्या परंपरा आणि मर्यादा याप्रमाणे नव्याने घडवले. एकदा बागेतील फुले काढत असताना ती नकळतपणे 'केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर' म्हणून गुणगुणत होती.खरंतर तिला सुरांची देणगी होती.आणि गायन तिचा जीव की प्राण होता.

     "हे गाणं बजावणं कुलीन स्त्रियांना शोभा देत नाही ", या सासूबाईंच्या शब्दांनी ती भानावर आली. त्यानंतर मात्र पुन्हा कधीही या गळ्यातून सूर उमटले नाहीत.

    त्यानंतर काही दिवसांतच देशमुख वाड्यात धाकट्या सूनबाईंचे राजलक्ष्मी चे आगमन झाले. वाईच्या एका सरदारांची लेक होती ती.त्यामुळे इकडे सासरी देखील तिचा रुबाब काही वेगळाच होता.

     अस्मिता सर्वसामान्य कुटुंबातील आहे,हे राजलक्ष्मी ला ठाऊक होते.त्यामुळे ती अस्मिताला फारशी किंमत देत नव्हती.त्यामुळे अस्मिता मात्र सतत सर्वांच्या सेवेशी हजर राहून आपली प्रतिष्ठा जपण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होती.

     पण स्वतःच्या स्वाभिमानाला जपण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्या अस्मिताला एका वेगळ्या परिस्थिती ला सामोरे जावे लागणार होते.

    एका नैसर्गिक आपत्तीत तिने तिच्या आई वडिलांना गमावले होते.तिची एक 15 -16 वर्षांची छोटी बहीण होती.तिला एकटं सोडणं अस्मिताला शक्य नव्हतं.म्हणून ती तिला घेऊन सासरी आली. 

   खरं तर एवढ्या मोठ्या वाड्यात त्या छोटीची म्हणजेच अमृता ची तशी काही अडचण होणार नव्हती.पण फक्त घरच नाही तर मनही मोठं असावं लागतं.सूर्यभानसिंह गेल्यानंतर वाड्यातील परिस्थिती बदलली होती.

    सुलोचनाबाई आणि राजलक्ष्मी यांना स्वतःच्या तालेवार माहेरचा फारच अभिमान होता.त्यात रणजितसिंह देखील घरातल्या गोष्टींमध्ये फारसे लक्ष घालत नसतं. त्यामुळे अस्मिता सतत दडपणाखाली असायची.

    त्यात अमृताचे येणे त्या दोघींनाही आवडले नव्हते.त्यामुळे त्या सतत या दोघींचा पाणउतारा करत असायच्या.त्यामुळे अस्मिता फारच दडपणाखाली होती.अमृताचा अपमान ,तिला दिली जाणारी वागणूक याचा तिला त्रास होत होता.पण ती हतबल होती.त्यात तिच्या मुलाकडे वीरप्रताप कडे तिला लक्ष द्यावे लागत होते.

    आपल्या बहिणीकडे आपल्याला आश्रय मिळाला हेच मोठे उपकार मानून अमृता देखील जे कोणी जे काही सांगेल ते करत होती.मानपान याची तिला अपेक्षा ही नव्हती.

     अस्मिता मात्र या साऱ्या प्रकाराने खचत चालली होती.खरं तर अमृताला जवळ घेऊन तिला मानसिक आधार देण्याची ही वेळ होती.पण आपल्या बहिणीला आश्रय दिला हेच उपकार मानून ती मात्र सर्वांना खुश करण्याचा प्रयत्न करत होती.तिची खूप तारांबळ होत होती.कारण कधी नवऱ्याचे आवरून द्यायला जावे तर मुलाने चिडायचे नाहीतर कधी सासूने.त्यात राजलक्ष्मी ची भर होतीच.मग बऱ्याचदा ती या सगळ्याचा राग अमृतावर काढत असे.आपण फार पेचात अडकलो आहे,हीच तिची भावना होती.

     या सगळ्यात तिचा धाकटा दीर 'धनंजय 'चा तिला फार आधार वाटे.राजघराण्यातील असूनही धनंजय फार साधा आणि स्वतंत्र विचारांचा होता.त्यामुळे तो कधीही या परंपरा ,रीतिरिवाज यात अडकला नाही.अतिशय सर्वसामान्य असे जीवन तो जगत असे.त्यामुळे घरच्यांच्या दृष्टीने तो विद्रोही विचारांचा असला तरी तो मात्र स्वतःला फार आधुनिक समजत असे.

    घरचे अनेक उद्योगधंदे होते ,पण तिथल्या कमिटीवर काम करण्यापेक्षा कामगारांचा नेता बनून तो त्यांना मदत करण्यासाठी तत्पर असायचा.त्यामुळे इतरांना तो देवदूत वाटत असला तरी घरच्यांसाठी मात्र तो डोकेदुखी ठरत होता.

    अस्मिता या घरात आली ,तेव्हा तो लहान होता.त्यामुळे खानदानी पणात रमलेल्या त्याच्या जन्मदात्रीपेक्षा साधीभोळी अस्मिताच त्याला त्याची आई वाटत होती.

    अस्मिता ची चाललेली घालमेल त्याला समजत होती.त्यामुळे तो अमृताला शक्य तितकी मदत करत असे.अस्मिता च्या मनात असूनही तिला कधी नवे कपडे घेणे तिला जमत नव्हते.कारण त्यासाठी घरातून परवानगी हवी होती ,जी मिळणे शक्य नसायचे.अशा वेळी धनंजय तिचा प्रश्न सोडवत असे.

    घरातल्या व्यक्तींना हे खटकत असे .पण धनंजय ला बोलणार कोण? एक दिवस काही लोक घरी येऊन गेले.त्यावेळी अस्मिता ला समजले की तिच्या सासूबाईंनी अमृतासाठी स्थळ बघितले आहे.अमृताला पुढे शिकायचे होते.त्यामुळे अस्मिताने याबाबत सासूबाईंशी बोलायचे ठरवले.

    पण सासूबाईंनी मात्र तिच्या सात पिढ्यांचा उद्धार केला.खूप अद्वातद्वा बोलल्या त्या.त्या दोघी बहिणी म्हणजे कशी त्यांच्या घरातली अडचण आहे,व्याह्यांनी बाकी काही दिले नाही ,पण आमच्या डोक्यावर मात्र दोन दोन लेकींचे ओझे ठेवले आणि खूप काही.

    त्यांच्या प्रत्येक शब्दानिशी अस्मिताच्या काळजाचे तुकडे तुकडे होत होते.पण तिच्या समोर काही मार्ग नव्हता.ती खूप रडत होती.तिच्या मनात हाच विचार होता,गेल्या 10 वर्षातील प्रत्येक क्षण मी या कुटुंबासाठी दिला आहे.मग माझा इथे काहीच अधिकार नाही का?ज्या घराचा वंश माझ्या कुशीतून जन्माला आला त्या घरावर माझा काहीच अधिकार नाही का ? मी फक्त एक सून,एक बायको आणि एक आईच आहे का?एक मुलगी आणि एक बहीण म्हणून माझी काही कर्तव्ये नाहीत का? 

    माझ्या कुटुंबात माझ्या बहिणीला काहीच स्थान नाही.तिच्यासाठी एक रुपया खर्च करण्याची मला परवानगी नाही ,कारण मी कमवत नाही.आज या घरात जे नोकर चाकर आहेत,त्यांना देखील त्यांचा मोबदला मिळतो.मग मी इतकी वर्षे माझं कर्तव्य म्हणून निरपेक्ष पणे सर्वांची

सेवा केली ,मग त्याला काही किंमत नाही का ? 

    जर आजही या घरात माझ्या एकाही इच्छेचा मान ठेवला जात नसेल ,तर मी नक्की आहे तरी कोण ? मी दुसरी तिसरी कोणी नाही ,मी फक्त एक गुलाम आहे .फरक इतकाच आहे की मी सोन्याचा मुलामा दिलेली गुलाम।आहे .

    देवासमोर बसून चाललेलं तिचं हे स्वगत धनंजय ने ऐकले. आता मात्र वहिनीची ही ससे होलपट थांबवायची हे त्याने ठरवले.

    दोन तीन दिवसातच सकाळी न्याहारीच्या वेळी सगळे कुटुंबीय एकत्र असताना तो धापा टाकत आला.सुलोचनाबाई त्याला म्हणाल्या ,"अहो,झालंय काय एवढं पळायला?" त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत तो अस्मिताला म्हणाला ,"वहिनी ,अभिनंदन अग तुझी निवड झाली." धनंजय चे बोलणे ऐकून सगळेच अवाक झाले.सगळ्या बाजुंनी प्रश्नांचा भडिमार सुरू झाला.

    सगळ्यांना शांत करत धनंजय अस्मिताला म्हणाला,"वहिनी ,मी तुझ्या गाण्याचे रेकॉर्डिंग एका प्रसिद्ध कॅसेट कंपनी ला पाठवले होते.त्यांना तुझे गाणे खूप आवडले.त्यांना तुझ्या बरोबर काम करायचे आहे.त्या संदर्भात ते दोन दिवसात तुझ्याशी बोलणी करणार आहेत."

   "हीच गाणं ? अस्मिता,मी तुला गायला मनाई केली होती ना .मग तरीही तू गायलीस ?"

"नाही हो आईसाहेब,मी नाही गायले ."  

    "अरे हो हो,मातोश्री थोडं सबुरीने घ्या.वहिनी मुद्दाम नाही गायल्या .त्यादिवशी त्या वीरप्रताप साठी अंगाई गात होत्या ना ,तेव्हा केलं मी रेकॉर्डिंग .की आता तुमच्या वाड्यात एका आईला अंगाई गायला पण मनाई आहे का ?"

    "धनंजय, हे तुम्ही योग्य केलं नाही.एरव्ही बाहेर तुम्ही नको ते उपद्व्याप करता,ते आम्ही दुर्लक्षित करतो.पण आमच्या धर्मपत्नी बाबत असले उद्योग आम्ही खपवून घेणार नाही ."

   "अरे वा, तुमच्या लक्षात आहे म्हणायचं ,या तुमच्या धर्मपत्नी आहेत म्हणून.जरा स्पष्ट च बोलतो दादासाहेब, हे तुम्हाला आधीच समजायला हवं होतं.पत्नी म्हणून सगळी कर्तव्ये त्यांची आणि तुमचा फक्त अधिकार होय?कधीतरी विचार करायचा होता ,तिच्याही काही अपेक्षा आहेत.दोन वेळा खायला ,कपडे आणि दागिने दिले की झालं का? आज इतक्या वर्षानंतरही स्वतःच्या पत्नीच्या आवडीनिवडी माहीत आहेत का तुम्हाला?"

    "आजतागायत या माऊलीने काही मागितलं नाही तुम्हाला.तुमच्या खानदानी पणाच्या नावाखाली घुसमटून गेल्या त्या .पण आज एक बहीण म्हणून जर त्यांना काही करावंसं वाटलं ,तर ती ही परवानगी नाही त्यांना ?का,तर त्या काही कमवत नाहीत म्हणून ?"

   "पण आता नाही .वहिनी,तुमच्या बहिणीसाठी तुमची काही स्वप्ने आहेत ना.पण अडचण एकच होती तुम्ही आत्मनिर्भर नाही.मग वहिनी आता विचार करू नका,ही उत्तम संधी आहे .हो म्हणा या कामाला ,आणि करा पूर्ण तुमची स्वप्ने. हा भाऊ कायम तुमच्या बरोबर असेल."

   "बस करा धनंजय,आमच्या संसाराची वाट लावू नका.भलते सलते विचार त्यांच्या मनात भरवू नका ,अस्मिता असलं काहीही करणार नाही.एक नवरा म्हणून आम्ही सांगतोय हे.आमच्या पत्नीने हे असले उद्योग केलेले मला चालणार नाहीत."

   " एक मिनिट ,हे सगळं मला वहिनीच्या तोंडून ऐकायचं आहे.बोला वहिनी ,बोला."

   " त्या काहीही बोलणार नाहीत."

   "मला बोलायचं आहे."

  "अस्मिता ,तुम्ही काहीही बोलणार नाही.मुकाट्याने आत व्हा."

   "नाही जाणार ,नाही जाणार मी आत .आजपर्यंत मी गप्प राहिले .पण आता नाही .कारण आज जर मी गप्प राहिले ना ,तर माझ्या बहिणीच्या आयुष्याची वाताहत होईल आणि त्याला फक्त मी जबाबदार असेन."

    "आजपर्यंत मी सगळं निमूट सहन केलं. सून,बायको,आई ही नाती निभावत असताना मी एक माणूस आहे,हे पण मी विचारले.प्रत्येक वेळी काहीही करताना ,ह्यांना काय वाटेल ,त्यांना काय वाटेल हा इतकाच विचार."

   "कधी मोकळं बोलणं नाही की मोकळं हसणं नाही.माझा आनंद माझं गाणं माझ्यापासून हिरावलं तरी मी गप्पच .प्रत्येक वेळी परंपरा,मर्यादा याच्या नावाखाली मी दबत होते".

   "पण हे सगळं करूनही आजही या कुटूंबात मला स्थान नाही.माझी एखादी चूकही मला या घराबाहेर घालवू शकते,हेच सतत दडपण. ज्या घरात मी इतकी वर्षे घालवली तिथल्या एका काडीवरही माझा अधिकार नाही."

   "पैसे कमावून एखादी वस्तू आणली तरच ती आपल्या मालकीची .पण जो पैसे कमावण्यासाठी बाहेर जातो त्याच्या अपरोक्ष त्याच घर ,त्याची माणसं ,त्याची नातं सांभाळणं याला तुमच्या लेखी काहीच किंमत नाही ."

    "माझे आई वडील गरीब होते.त्यांनी नाही कोणती संपत्ती मला दिली .पण त्यांनी दिलेलं शिक्षण, संस्कार यांना तुमच्या सोन्याचांदीच्या बाजारात काहीच किंमत नाही.सतत त्यांचा पाणउतारा होत राहिला."

    "आज त्यांच्या माघारी माझ्या एका बहिणीला सांभाळण्याची मला परवानगी नाही ?फक्त एक उत्तर मला हवंय ,आज माझ्या जागी तुम्ही आणि माझ्या बहिणीच्या जागी तुमची बहीण असती ,तर हीच भूमिका असती का तुमची ?"

    " नक्कीच नाही .कारण बहीण ही एका भावाची जबाबदारी असते.तसेच बहीण ही बहिणीची पण जबाबदारी असते.या असल्या विचारांमुळे च तर समाजात मुलगा हवाच हा अट्टाहास असतो."

   "कारण एका मुलीला तिच्या आई वडिलांना आणि भावंडाना सांभाळण्याचा अधिकार हा समाज देत नाही.मुलाचे आईवडील म्हणजे जबाबदारी आणि मुलीचे आईवडील म्हणजे ओझे?कसली कोती मनोवृत्ती आहे ही."

    "ह्या असल्याचं मनोवृत्ती मुळे कितीतरी मुली जन्माला येण्याअगोदर च मारल्या जातात .तुमच्या सारखे मोठे लोक गोरगरिबांच्या मुलींना सूना म्हणून स्वीकारत नाहीत.एखादी माझ्यासारखी आलीच तरी सतत तिला दाखवायचं तू आमच्या बरोबरीची नाहीस म्हणून ."

    "आईसाहेब ,मी आज विचारते तुम्हाला.काय फरक आहे हो माझ्यात आणि राजलक्ष्मी मध्ये ?माफ करा पण तिच्यापेक्षा शिक्षण ,संस्कार आणि सौंदर्य या बाजुंनी मीच उजवी आहे.पण त्याचा मला कधीही अभिमान नाही."

   "पण तरीही ती मोठ्या घरची म्हणून तिच्या आईवडिलांना किती सन्मान मिळतो या घरात .आणि मी विसरले नाही,पण माझ्या आईवडिलांना मात्र तुम्ही कायम मागच्या दाराने आत घेत होता.त्यांना साधं पाणी सुद्धा तुम्ही तुमच्या ठेवणीतल्या भांड्यातून कधी दिलं नाही."

   "कधीच नाही विसरणार मी हा अपमान.पण आम्ही साधी माणसं. आम्हाला कुठला आलाय हो मानापमान ? ज्या घरी दिली तिथेच मेली हे आमचे संस्कार .पण आता नाही ,कारण आता प्रश्न माझ्या बहिणीचा नाही ,तर माझ्या लेकीचा आहे.कारण माझ्या अमृता साठी मीच सर्वस्व आहे."

    "भाऊजी,माझा निर्णय झाला आहे.मी हे काम करणार.माझ्या अमृतासाठी करणार.त्यासाठी काहीही करण्याची ,सोसण्याची माझी तयारी आहे."

   "अस्मिता,पुन्हा एकदा विचार करा .ही असली थेरं या घरात चालणार नाहीत.जर तुम्ही या कामासाठी बाहेर गेलात तर पुन्हा या घरात तुम्हांला प्रवेश नाही ",रणजितसिंह कडाडले.

   "खरं तर मीच तुम्हाला सांगणार होते,ज्या घरात मला मोकळा श्वास घेण्याची परवानगी नाही,जिथे माणसाला किंमत नाही,माणसाच्या भावभावना ,स्वप्ने यापेक्षा तुमच्या रूढी परंपरा जास्त मौल्यवान आहेत,अशा घरात नाही सोनेरी पिंजऱ्यात आता मी राहणार नाही."

    "अमृता ,चल आपण आता लगेच इथून निघतोय."

    काही क्षणातच अस्मिता त्या सोनेरी पिंजऱ्यातून बाहेर पडली .आज एका शोभेच्या बाहुलीवर एका रणरागिणीने मात केली होती.ती बाहेर पडली पण स्वतःसाठी नाही,तर ज्या कुशीतून तिने हे जग पाहिले त्या कुशीचे ऋण फेडायला.आज अस्मिता खऱ्या अर्थाने मोकळा श्वास घेत होती.स्वातंत्र्याचा खरा अर्थ आज तिला उमगत होता.

    अर्थातच पुढचा प्रवास इतका सोपा नव्हता तिच्यासाठी. एक नवा संघर्ष तिची वाट पहातच होता.

    स्त्री जातीला संघर्ष नवा नाही.आधी मुलगी असली की जन्माला येण्यासाठी संघर्ष.त्यातूनही जन्माला आली की नकुशी म्हणून संघर्ष.स्वावलंबी होण्यासाठी संघर्ष .स्वतःच्या अधिकारांसाठी संघर्ष.इतका संघर्ष की स्त्री चे दुसरे नावच संघर्ष आहे की काय असे वाटू लागते.

      आज कायद्याने स्त्रियांना अनेक प्रकारे संरक्षण दिले आहे .पण एकच सांगावेसे वाटते,

  मज नको आरक्षण संरक्षण

  फक्त सन्मान हवा स्वातंत्र्य हवे

  उत्तुंग भरारी घेण्यासाठी

  फक्त मोकळे आकाश हवे


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational