पुण्याई
पुण्याई


'श्रावणमासी हर्ष मानसी
हिरवळ दाटे चोहीकडे
क्षणात येते सरसर शिरवे
क्षणात फिरुनी ऊन पडे'
बालकवींच्या या काव्यपंक्ती आज अगदी प्रत्यक्षात उतरल्या होत्या.कधी पावसाची रिमझिम तर कधी अगदी हवेहवेसे वाटणारे ऊन त्यामुळे माधवी चे मन अगदी प्रसन्न झाले होते.त्यात आज रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस .त्यामुळे ती अगदी निवांतपणे बाहेरचा पाऊस बघत कॉफी चा आस्वाद घेत होती.
इतक्यात मंगेश...तिचा नवरा फोनवर बोलत बोलत तिथे आला.फोन वरचे त्याचे बोलणे ऐकून बहुदा त्याला ऑफिसमध्ये जावे लागणार आहे,हे तिच्या लक्षात आले होते.ती मंगेश चा फोन कॉल संपण्याची वाट बघत होती.
"माधवी,अगं बॉस चा फोन होता.एक अत्यंत महत्वाचे काम असल्याने मला तातडीने ऑफिसला जावे लागेल,जरा प्लिज पटकन आवरून दे ना."
थोड्याशा नाराजीनेच माधवी उठली.खरं तर आजचा दिवस तिघांनी एकत्र घालवायचा असं ठरलं होतं.त्यांच्या लाडक्या लेकाला सोहम ला आज संध्याकाळी जवळच्या हॉटेलमध्ये घेऊन जाण्याचे प्रॉमिस त्यांनी केले होते. पण अचानक सगळा प्लॅन फिस्कटला.त्यामुळे माधवी नाराज झाली.पण बोलून काहीच फायदा नव्हता .म्हणून मंगेशला"जमलं तर लवकर ये"इतकंच तिने सांगितलं.
सोहम उठला आणि बाबा घरात नाही ,हे पाहून त्याची चिडचिड झाली. माधवी ने कशीतरी त्याची समजूत काढली आणि 'आपण नक्की जाऊ आज बाहेर' असे प्रॉमिस दिल्यानंतर च तो शांत झाला.
घरातली कामे आणि सोहमचा होम वर्क करून घेण्यात कधी 4 वाजले हे माधवी ला कळलेच नाही.मंगेश चा काही फोन किंवा मेसेज आला नव्हता.त्यामुळे त्याला वेळ होणार आहे ,हे नक्की होतं.
सोहमला ही हे आता कळलं होतं की ,बाबा लवकर येणार नाही.त्यामुळे तो पुन्हा चिडचिड करू लागला."आई,बाबा लवकर येणार आहे का ग नक्की?"
"हो,रे बाळा येतील बाबा वेळेत".अशी त्याची ती सतत समजूत घालत होती.
पण आता तिला ही हे पटलं होतं की आज रात्रीचा प्लॅन प्रत्यक्षात येणं जरा अशक्यच आहे.हिरमुसलेल्या सोहमला पाहून तिला वाईट वाटले."चल बाळा,आपण बाहेर जाऊन येऊ",असे म्हणत तिने सोहमला पटकन तयार केले आणि ती दोघे घराबाहेर पडली.
सततच्या पावसाने रस्त्यावर चिखल आणि पाण्याची डबकी साचली होती.त्यातून सोहमला सांभाळत ती कोपऱ्यावर असलेल्या केक शॉप मध्ये त्याला घेऊन गेली आणि त्याच्या आवडीची पेस्ट्री खाऊ घातली.
छोटासा सोहम घराबाहेर पडायला मिळालं, याचं गोष्टीने खुश झाला होता आणि वरून पेस्ट्री ..मग तर काय स्वारी हॉटेलचा प्लॅन विसरूनच गेली.त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून माधवीला ही हायसे वाटले.
दोघे छान पैकी एकमेकांचा हात धरून गप्पा मारत घराकडे चालले होते. इतक्यात सोहम अचानक थांबला.माधवी ने विचारले,"काय झालं सोहम?"
"आई थांब जरा, इथे कसला तरी आवाज येतोय".असे म्हणत तो पुढे गेला.
तिथे एक कुत्र्याचे पिल्लू वेदनेने विव्हळत होते.त्याच्या पायाला जखम झाली होती,त्यातून रक्तस्त्राव होत होता.त्यात पावसाने पूर्ण भिजल्यामुळे ते कुडकुडत होते.
कित्येकजण त्याला पाहून तसेच पुढे निघून गेले होते.पण सोहमचा पाय तिथून निघेना.त्याला त्या पिल्लाची खूप दया आली."आई,अग ह्या पिल्लाला किती लागलंय आणि ते थंडीने पण कुडकुडतंय"."हो रे बाळा,पण आपण काय करू शकतो?चल सोहम, पावसाला सुरुवात होईल आता".पण सोहम मात्र आता हट्ट च करू लागला."आई आपण या पिल्लाला घरी घेऊन जाणार आहोत." "सोहम,हे शक्य नाही,नाही जमणार रे आपल्याला ",माधवी समजावत होती.पण सोहम मात्र अजिबात ऐकण्याच्या मूड मध्ये नव्हता.तो पूर्णपणे हट्टाला पेटला होता.
रस्त्याने येणारे जाणारे लोक माधवी आणि सोहम कडे पाहत होते.त्यामुळे माधवी ला अवघडल्यासारखे झाले होते.त्यात सोहम अजिबात ऐकत नव्हता.शेवटी तिचा नाईलाज झाला आणि तिने होकार दिला.सोहमने पटकन ते पिलू उचलून छातीशी कवटाळले.
माधवी खरं तर वैतागली होती.पण सोहमच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून ती शांत झाली.घरी गेल्या गेल्या सोहम उत्साहाने कामाला लागला.आईकडून टॉवेल घेऊन त्याने आधी पिल्लाला स्वच्छ करून कोरडे केले.सोहमने त्याचे 'जिमी 'असे नामकरण ही करून टाकले.
मुलांचे मन निरागस असते,याचा प्रत्यय माधवी ला येत होता.ज्या पिल्लाला हात लावायला पण तिचे मन तयार होत नव्हते,त्याच पिल्लाची सोहम मायेने शुश्रुषा करत होता.त्याच्या पायाच्या जखमेवर प्रथमोपचार करून त्याने आईला जिमी साठी दूध आणण्याचे फर्मान सोडले होते.
या सगळ्या प्रपंचात रात्रीचे नऊ वाजलेले पण माधवीच्या लक्षात आले नाही.तिला एकदम मंगेशची आठवण झाली.तिने त्याला फोन लावला तर तो स्विच ऑफ येत होता.आता मात्र तिला काळजी वाटू लागली.त्यात पाऊस ही सुरू झाला.त्यामुळे ती दारात येरझाऱ्या मारत होती.
इतक्यात दारावरची बेल वाजली. घाईघाईने तिने दरवाजा उघडला.तर समोर मंगेश उभा होता.पूर्ण पावसात भिजलेला होता तो.पण तो प्रचंड घाबरल्याचे तिच्या लक्षात आले.तिने त्याला आधी घरात यायला सांगितले.फार काहीही न बोलता तिने त्याला ,"तू आधी कपडे बदलून ये,आपण नंतर बोलू"असे सांगितले.
कपडे बदलून मंगेश हॉल मध्ये येऊन बसला.आता तो बऱ्यापैकी शांत झाला होता.माधवी ने गरम गरम कॉफी आणून त्याला दिली."आता सांग काय झालं?"
मंगेश ने कॉफी चा एक घोट घेतला आणि तो सांगू लागला."माझं काम संपेपर्यंत खूप वेळ झाला होता.त्यात माझ्या मोबाईल ची बॅटरी पण डाऊन झाली होती.त्यामुळे तुमच्याशी कोणताही कॉन्टॅक्ट मला करता येत नव्हता.पावसामुळे ऑफिस मधले लँडलाईन ही बंद झाले होते.त्यामुळे मी माझे काम संपले की गडबडीत बाहेर पडलो."
"रस्त्यावर तशी फारशी वर्दळ नव्हती त्यात दिवेही नव्हते आणि सिग्नल पण बंद होते .त्यामुळे मी जपूनच गाडी चालवत होतो.सोहम चिडला असेल आता त्याची समजूत कशी काढावी याचा विचार करत होतो.तोपर्यंत आपल्या कोपऱ्याजवळच्या चौकात कधी पोहोचलो ते कळलेच नाही.इतक्यात अचानक एक कुत्रे माझ्या गाडीला आडवे आले.मी करकचून ब्रेक दाबला म्हणून ते कुत्रेही वाचले आणि मी पण.ती मादी होती आणि बहुदा तिच्या पिल्लाला शोधत असावी.तिच्या डोळ्यातील कणव स्पष्ट दिसत होती."
"मी तिच्याकडे पाहतच होतो,इतक्यात धाडधाड असा आवाज आला.ज्या चौकात मी थांबलो होतो ना,त्याच चौकात डाव्या बाजूने एक टेम्पो भरधाव वेगाने येत होता.बहुदा त्याचे ब्रेक फेल झाले होते.त्यामुळे जे काही आडवे येईल त्याला तो उडवत चालला होता."
"उरात धडकी भरवेल असं ते दृष्य होतं.पण माधवी, जर ते कुत्रे आडवे आले म्हणून मी थांबलो नसतो ना,तर त्या टेम्पो ने मला पण......"
पुढचे शब्द मंगेशच्या तोंडून फुटलेच नाहीत.त्या गारव्यातही त्याच्या कपाळावर घाम ठिबकला.माधवी पण हे सगळं ऐकून अगदी सुन्न झाली होती.मनातल्या मनात सगळ्या तेहतीस कोटी देवांचे स्मरण करून तिचे सौभाग्य वाचवल्याबद्दल आभार मानून झाले होते.
"माधवी,"मंगेशच्या हाकेने ती सावध झाली."माधवी,खरं तर पाप ..पुण्य...असलं मी फार काही मानत नाही ग.पण आज इतक्या जवळून साक्षात काळाचे दर्शन झाल्यानंतर मात्र मनापासून वाटलं की ही नक्कीच कोणाची तरी पुण्याईचं असावी, जी त्या कुत्राच्या रूपाने उभी राहिली आणि माझा जीव वाचला."मंगेश बोलतच होता आणि माधवी मात्र....
माधवी मात्र जिमी बरोबर प्रेमाने खेळणाऱ्या सोहमकडे भरल्या डोळ्यांनी पाहत होती.