Swati Mane

Others

3.8  

Swati Mane

Others

शकुन

शकुन

7 mins
305


आज सकाळपासूनच अबोलीचं मन अस्वस्थ होतं. एकतर दिवस भरत आले होते.कधीही दवाखान्यात जावं लागणार होतं.त्यामुळे एक प्रकारची भीती मनात दाटून आली होती. त्यात का कुणास ठाऊक एक अनामिक हुरहुर तिच्या मनाला लागली होती.

   आई तिला स्वस्थ बसायला सांगत होती.पण अबोली मात्र बेचैन होती.अचानक तिला भोवळ यायला लागली.त्यामुळे आईबाबांनी तिला ताबडतोब दवाखान्यात हलवले.

    आजपर्यंत चे तिचे सगळे रिपोर्ट नॉर्मल होते.मग आज अचानक असं काय झालं,या विचाराने तिची आई घाबरून गेली होती.

   डॉक्टरांनी emergency म्हणून लगेचच ऑपरेशनची तयारी केली.पण जाताना ते अबोलीच्या आईबाबांना म्हणाले,"जरा गुंतागुंत निर्माण झाली आहे.त्यामुळे आम्ही आता ठामपणे काहीही सांगू शकत नाही.आम्ही सर्वतोपरी आमचे प्रयत्न करूच आई आणि बाळ दोघांनाही वाचवण्याचे.तुम्ही प्रार्थना करा."डॉक्टरांचे हे शब्द ऐकून त्या दोघांच्या पायाखालची जमीनच सरकली.

   इकडे अबोली प्रचंड वेदना सहन करत होती.डॉक्टरांनी तिला भुलीचे इंजेक्शन दिले. तिने हळूहळू तिचे डोळे मिटले.पण तिचे मन मात्र फुलगावात जाऊन पोहोचले.

    समीर ..अबोलीचा नवरा एक समाजसेवक होता.डॉ.दाभोळकरांच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा खंदा कार्यकर्ता होता.आडवळणी ,दुर्गम भागात राहून तो आपले काम नेटाने करत होता.गेले वर्षभर त्याने फुलगाव आणि आजूबाजूच्या गावांमध्ये त्याची चळवळ सक्रिय केली होती.त्यामुळे तो फुलगावातच राहायला जाणार होता.

    यावेळी अबोलीने ही हट्ट केला की ती देखील त्याच्या बरोबर येणार.समीर ने तिची खूप समजूत काढली.गावात खूप समस्या आहेत,तिथे तुला नाही जमणार आणि खूप काही,पण अबोली मात्र ठाम होती.शेवटी समीरने हात टेकले ....स्रीहट्ट आणखी काय !

    फुलगाव....उंच डोंगरावर वनराईच्या कुशीत विसावलेले.एका बाजूला नजर जाईल तिथपर्यंत पसरलेले फुलांचे ताटवे आणि दुसरीकडे काळजात धडकी भरवणारा कातळ फोडीत वाहणारा धबधबा. अबोली तर या निसर्गाच्या प्रेमातच पडली.समीरने एक छोटंसं घर घेतलं .टुमदार असं कौलारू घर,दारातला बहरलेला सोनचाफा,इवल्या इवल्या फुलांच्या मोगरा ,जाई जुई च्या वेली आणि अबोलीची लाडकी अबोली.अबोली तर अगदी हरखून गेली.

    या इवल्या गावात राजराणीचा नवा संसार सुरू झाला. हळूहळू अबोलीला इथल्या समस्या जाणवू लागल्या. सततचा पाऊस,वाहनांची असुविधा,विजेचा लपंडाव, अनेक वेळा दर्शन देणारे सरपटणारे प्राणी आणि खूप काही. पण हळूहळू तिने या सर्वांची सवय करून घेतली.

     गेले दोन दिवस अबोली जरा कोमेजलेली होती.सततच्या उलटयांनी ती हैराण झाली होती.खरं तर तिची गोड बातमी समजल्यापासून समीर तिला आईबाबांकडे शहरात जा म्हणून मागे लागला होता.पण माझं बाळ मला निसर्गाच्या सानिध्यात वाढवायचे आहे,हा नवा हट्ट अबोली धरून बसली होती.त्यामुळे आता दोघांनीही ही जबाबदारी पेलायचे ठरवले होते.

   अंगणातल्या झाडाखाली अबोली शांतपणे बसली होती.इतक्यात तिच्या पाठीवर हात फिरला. अबोली ने दचकून मागे पाहिले.तर समोरच्या घरातील साधारण साठीच्या मंजुबाई उभ्या होत्या.

   "दोन दिवस झाले मी बघतेय,सारख्या वांत्या करतीयास. पोटुशी हायेस का ग?"

मंजुबाईंच्या प्रश्नावर काय उत्तर द्यावं हे अबोलीला समजेना .

   मंजुबाई.....तिच्या समोरच्या घरात राहत होत्या.तशा त्या एकट्याच राहत होत्या आणि फारशा घराबाहेर पडत नसत. त्यात गावातल्या बायकांनी दिलेला अनाहूत सल्ला तिला आठवला."तुमच्या समोरच्या मंजुबाई पासून जरा लांबच राव्हा. अपेशी हाय ती बया." खरंतर समीरची बायको असलेली अबोली या गोष्टी मानत नव्हती. पण अचानक मंजूबाईला समोर पाहून नकळत तिचा हात पोटाकडे गेला आणि काळजात धस्स झालं.

    बहुदा अबोलीच्या मनातली ही कालवाकालव मंजुबाईच्या लक्षात आली. तिने पटकन हात बाजूला घेतला आणि मागे सरकली."मला मेलीला अक्कलच न्हाय.सगळी दुनिया म्हणते मी अपेशी हाय आणि आज मी हे काय केलं? माफ कर पोरी,माझी सावली तुझ्यावर पडाया नगो." असं म्हणत मंजुबाई माघारी वळली.

  "थांबा" अबोली म्हणाली आणि मंजुबाईची पावलं जागेवरच खिळली."इकडे या,मला बोलायचं आहे तुमच्याशी." असे म्हणत अबोलीने मंजुबाईचा हात धरून तिला घरात नेलं .कधीही कोणाच्या घरात न जाणारी मंजुबाई जरा बावरली. पण अबोलीने तिला बसायला लावलं आणि चहा दिला.चहा घेतल्यावर अबोली म्हणाली,"मला जाणून घ्यायचं आहे तुमच्याबद्दल?"

    "काय करणार आहेस माहीत करून घेऊन? अशा दिवसात बायकांनी चांगलं ऐकावं म्हणत्यात. कशाला माझे भोग तुला ऐकवू?"पण अबोली काही हट्ट सोडेना.

    "त्या डोंगरावर दिसतंय ना ते काठेवाडी माझं माहेर. माझा बा शेतकरी हुता. लय नाय पर पोट भरलं इतकं कमवत हुता. माझी आय बी म्हणं त्याच्या बरोबरीनं राबत हुती. मला तीन भनी आणि दोन भाऊ हायत. म्या सगळ्यात धाकटी. शेतात राबराबून माझी आय पार थकली व्हती.त्यात माझ्या येळेला डाकटरनं सांगितलं हुत, बाय लय अशक्त हाय, रगात भरावं लागलं.पर बा परत दवाखान्यात गेलाच न्हाय."

  "शेवटी व्हायचं तेच झालं मला जलम दिऊन माझी आय या जगातन निघून गेली."

  "एकतर मी पोरगी झाले म्हणून माझी आजी आधीच वैतागली व्हती, त्यात माझी आय बी मेली.'कसली अवदसा जलमाला आली रं, आयला खाऊन बसली.'

माझ्या आजीचं बोलणं माझ्या बा च्या मेंदवात कायमच बसलं.आन त्यानं उभ्या जलमात माझं त्वांड बघितलं न्हाय.आजीनं मारल्याला अपेशी चा शिक्का मातर मला बसला."

   "ज्यानं त्यानं मला बघितलं की त्वांड फिरवावं. त्यातच माझं लगीन ठरलं. वाटलं आता ह्या गावातन भाहेर पडले की सुटन ह्या समद्यातून."

  "गाव सुटलं पर भोग न्हायी सुटलं बघ. सहा महिन्यातच जनावर चावून माझा दादला मेला. तवा मी दोन महिन्याची पोटुशी व्हते. झालं लेकाला गिळलं म्हणून सासूनं बी घराभाहेर काढलं. बा नं तर आधीच सांगितलं व्हतं, दिली तिथंच मेली.परत इकडं हे अपेशी त्वांड दाखवाय यायचं न्हायी."

  " मी जाणार तरी कुठं व्हते? गावचं पाटील देवमाणूस व्हतं.त्यांनी सासूला दम दिला,या घरावं तुझ्या सुनचा बी अधिकार हाय.तिज तिला निम्मं घर दे.न्हाय दिलं तर फौजदारी करतो म्हणाला. तवा या दोन खोल्या तिनं मला राहाय दिल्या."

   " मी अपेशी हाय, माझी सावली नग ,म्हणून कुणी मला काम बी देईना .मग ह्ये जंगलच माझा मायबाप झाला बघ. लाकडं, रानमेवा,रानभाज्या गोळा करून मी डोंगराखाली जाऊन इकून माझ्या लेकीला वाढवलं .गावातली लोकं मला अपेशी म्हणत्यात त्याच माझ्या लेकीला लय वाईट वाटायचं बघ. लय जीव लावायची माझी लेक मला."

   असं म्हणत मंजुबाई ने डोळ्याला पदर लावला."मग आता कुठे असते तुमची लेक?"अबोलीने विचारले. "लांब तिकडं देवाच्या घरात" म्हणत मंजुबाई ने आभाळाकडे बोट दाखवले.

  "माझ्या फुटक्या नशिबाने माझ्या लेकीला पर गिळलं. माझी लेक म्हणून माझ्या सोन्यासारख्या लेकीला कुणी पसंद करत नव्हतं.पर माझ्या च एका पावण्याच्या हातापाया पडून सोयरीक जुळवली. पर येक अट घातली,लग्नानंतर माझी लेक कधी माहेरी येणार न्हाय आणि म्या कधी तिज्या घरी जायाचं न्हाय."

   "माझ्या लेकीच्या भल्यासाठी म्या काळजावर दगड ठेवून लगीन लावून दिलं. गावातल्या लोकांकडून तिजी खुशाली कळायची.सासू ताप द्यायची म्हण पर नवरा चांगला होता."

  "त्यातच मी आजी व्हणार म्हणून कळलं तर म्या खुशीने येडी झाले बघ. लय वाटायचं लेकीला बघावं पर काळीज दगडाचं करून घेतलं. पर त्या दिवशी मला लय वंगाळ सपान पडलं. म्हणून म्या धाडस करून इचारत इचारत लेकीच्या घरला गेले. तवा कळलं तिला दवाखान्यात न्हेली हाय. पळत पळत दवाखाना गाठला पर तवर...."

   आता मात्र मंजुबाई हुमसून हुमसून रडू लागली. अबोलीने तिला शांत केले. "माझ्या लेकीला सासून लय छळल. दिवस भरत आलं तरी आडाला पाणी काढाय पाठवलं.माझं लेकरू पाय घसरून पडलं ग."आता मात्र अबोली पण स्वतःला रोखू शकली नाही .तिच्या डोळ्यातून आपोआप अश्रू वाहू लागले.

   "दवाखान्यात जासतवर लय उशीर झाला व्हता. तिज्या सासून मला बघितलं आणि वरडाय लागली, ह्या अपेशा बायन माझ्या सुनला आन नातवाला गिळलं. लय तमाशा केला तिनं. तवा जावयान हाताला धरून मला भायेर काढलं. माझ्या लेकराला मला बघू बी दिलं न्हाय ग."

   आता मात्र मंजुबाई आणि अबोली एकमेकींच्या गळ्यात पडून रडू लागल्या. काही वेळाने दोघीही शांत झाल्या.

   "तुला बघितलं आन मला माझी लेक दिसली बघ.वाटलं माझ्या लेकीसाठी काय करता न्हाय आलं. तुला चालत आसल तर करावी तुझी सेवा. मी तुला खाया प्याया घालीन. घरातली समदी कामं करीन.तू फकस्त आराम करायचा."

   "पर नको,जाते म्या.माझी सावली तुझ्याव नगो."असं म्हणून मंजुबाई उठली.अबोलीने तिला हात धरून खाली बसवले."हे शकुन अपशकुन असलं आम्ही मानत नाही. माझा नवरा अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करतो. उलट तुम्ही आमच्याकडे आलात तर त्याला मदतच होईल लोकांना पटवून द्यायला. त्यामुळे आता तुम्ही रोज यायचं. आणि हो आणखी एक मी तुम्हांला मंजुआई म्हटलं तर चालेल का?"

   आपल्या हाताची बोटं अबोलीच्या गालावरून फिरवून कडाकडा मोडत मंजुबाई म्हणाली,"म्हण ग म्हण मला मंजुआई. माझी लेक ती."

   त्याच क्षणापासून मंजुबाईंनी अबोलीच्या घराचा ताबा घेतला. समीरच्या नकाराचा प्रश्नच नव्हता. गावात मात्र कुजबूज सुरू झाली होती. पण अबोली, समीर आणि आता मंजुबाईला ही कशाचा फरक पडत नव्हता.

   बघता बघता अबोलीला सातवा महिना लागला. एक दिवस तिचे आईबाबा अचानक फुलगावात पोहोचले.अबोलीला बरोबर घेऊन जाण्याचा त्यांनी हट्टच धरला. एका अर्थी ते बरोबरच होते. समीर सतत बाहेर असायचा.त्यामुळे आता अबोलीला सोबतीची जास्त गरज होती.अबोली सामान बांधत असतानाच मंजुबाई एक पिशवी घेऊन आल्या.ती अबोलीच्या हातात देत म्हणाल्या,"लेकीच्या ढवाळ जेवणासाठी घेतली व्हती. तिला न्हाई देता आली म्हणलं या लेकीला तरी द्यावी,चाललं न्हवं?"अंजलीच्या आईकडे बघत त्यांनी विचारले.

    आई उत्तर देईपर्यंत अबोली ती हिरवीगार साडी नेसून आली सुद्धा. तिला डोळे भरून बघतच मंजुबाई ने तिला निरोप दिला.अबोलीच्या डोळ्यातल्या पाण्यात मंजुबाई ची प्रतिमा धूसर होत गेली आणि अबोलीची गाडी शहराच्या रस्त्याला लागली.

    डोळे किलकिले करत अबोलीने डोळे उघडले. अस्पष्टपणे तिला आई ,बाबा आणि समीर दिसला.अबोलीला शुद्ध आल्याचे पाहून सर्वांनाच आभाळ ठेंगणे झाले.अबोलीला फारसे बोलता येत नव्हते,म्हणून तिने खुणेनेच विचारले."मुलगी झाली तुला "आईने उत्तर दिले.अबोलीच्या चेहऱ्यावर हास्य उमटले.

    जरा वेळाने ती चांगलीच सावध झाली.म्हणून समीर तिच्याजवळ येऊन बसला."समीर, मंजुआईला कळवले ना ती आजी झाली म्हणून ,एका गोड नातीची."

   समीर मात्र एकदम शांत झाला होता."काय झालं समीर ,बोल ना?" अबोलीला शांत करत समीर म्हणाला,"काही नाही तू शांत हो ." "समीर बोल ना रे काय प्रॉब्लेम आहे? आपलं बाळ ...." 

  "आपलं बाळ एकदम ठीक आहे अबोली. पण ....पण गावातून फोन आला होता थोड्या वेळापूर्वी. आपली मंजुआई आपल्याला सोडून गेली ग अबोली ..."आता मात्र समीरला सुद्धा अश्रू अनावर झाले.

   इतक्यात नर्स ने बाळाला आणून अबोलीच्या हातात दिले.अबोलीने बाळाला हलकेच कुरवाळले ." नाही रे समीर,मंजुआई कुठे नाही गेली. ती इथेच आहे.० आपलं आयुष्य मला आणि आपल्या बाळाला देऊन ती आज शुभशकुनी झाली."

   "माझी मंजुआई शुभशकुनी झाली" ,असे म्हणत तिने बाळाला हाक मारली,"मंजू". त्या इवल्या जीवाने हळूच डोळे उघडले आणि एक गोड हास्य दिले .

    अबोली आणि तिच्या लेकीला जीवन संजीवनी देणाऱ्या मंजुआई च्या शुभशकुनाची ही तर सुरुवात होती.


Rate this content
Log in