चिंधी
चिंधी
"भरजरी ग पीतांबर दिला फाडून
द्रौपदीस बंधू शोभे नारायण"
"माझ्या आजीचे हे आवडते गीत.एकदा श्रीकृष्णाच्या बोटाला जखम झाली ती पाहून द्रौपदीने श्रीकृष्णाला बोट बांधायला आपला भरजरी शालू फाडून चिंधी काढून दिली.त्या चिंधीचे ऋण श्रीकृष्णाने कौरव महासभेत द्रौपदी का अखंड वस्त्र पुरवून तिचे लज्जारक्षण केले.या अर्थाने हे गीत आहे.आज मी देखील अशाच एका चिंधीची कथा सांगणार आहे."
एका जाहीर सत्कार समारंभाला उत्तर देताना स्नेहाताई भावविवश होत बोलत होती.स्नेहाताई.....एक समाजसेविका .तिच्या कार्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली होती.तिला एका आंतरराष्ट्रीय सन्मानाने सन्मानित करण्यात आले होते.त्यामुळे तिचा मुंबईत एक जाहीर नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
"खरं तर मी एक मानसशास्त्र विषयाची विद्यार्थिनी. *गुन्हेगारांचे मानसशास्त्र* या विषयावर माझी पी .एच .डी चालू होती.त्याच संदर्भाने मी मुंबईतील एका कारागृहाची निवड केली होती.तेथील प्रमुख देशमुख साहेबांशी चर्चा करून काही कैद्यांची नावे निश्चित केली होती.
फक्त एका नावावर आमचे एकमत नव्हते.त्या नावाला त्यांचा विरोध होता कारण त्यांना माझ्याबाबतीत कोणताही धोका पत्करायचा नव्हता.मी मात्र ठाम होते.
पुरेशी सुरक्षा व्यवस्था पुरवित त्यांनी त्याच्याशी माझी पहिली भेट घडवून आणली."परशू ...परशू च ना तुझं नाव.मी स्नेहा आपटे.मी मानस...."
"ओ बाई,तुम्ही कोण? कुठल्या ?मला याच्याशी काही घेणं देणं नाही.तुम्हाला पहिलं आणि शेवटचं सांगतो,मला बाई माझ्या डोळ्यासमोर पण सहन होत नाही."त्याची भेदक नजर माझ्यावर रोखत तो म्हणाला.क्षणभर माझ्या काळजात धस्स झालं.नकळत माझी ओढणी मी सावरली.तरीही धीर एकवटून त्याच्याशी बोलत राहिले.तो माझ्याशी वाद,प्रतिवाद करत होता.मी पण इतक्या सहज मागे हटणार नव्हते.
शेवटी वैतागून तो म्हणाला,"बाई ,तुम्हाला परत एकदा सांगतो. बायका समोर दिसल्या की माझी तळपायाची आग मस्तकात जाते.उगा विषाची परीक्षा घेऊ नका."
"अरे पण स्त्रियांची इतकी घृणा वाटण्यासारखं काय आहे? स्त्री म्हणजे ईश्वराची सर्वोत्तम निर्मिती.तिची अनेक रूपे आहेत,म्हणून तर जगात ती वंदनीय आहे."
"असेल तुमच्या जगात.माझ्यासाठी बाई म्हणजे नरक च.मग ती जन्मदाती आई असो,सात जन्म साथ देण्याच्या शपथा घेऊन दगा देणारी मैत्रीण असो,नाहीतर जिला तुमच्या देवघरात स्थान आहे ,ती तुमची देवी असो.माझ्या साठी सगळ्याच विनाशकारी आहेत."
"अच्छा, म्हणजे या सगळ्यांनी तुला दगा दिला तर.पण स्त्री चं आणखी एक रूप तुला माहीतच नाही वाटत...बहिणीचं. कधीतरी ते नातं अनुभवून बघ.तुझं स्त्रियांविषयी चे मत नक्की बदलेल." असं म्हणत मी माझी ओढणी फाडली आणि त्याची चिंधी काढून त्याच्या हातात बांधली."हे काय आहे?"एकदम गोंधळून त्याने विचारले."काही नाही,आज रक्षाबंधन आहे आणि आजपासून मी तुझी बहीण आहे.राखी नव्हती आणली मी ,म्हणून हीच माझी राखी."इतकं बोलून मी तिथून बाहेर पडले.
दोन दिवसांनी मी परत त्याला भेटायला गेले. यावेळी तो शांत होता.मी त्याला एक बॉक्स दिला.त्याने तो उघडला आणि त्याचे डोळे आनंदाने चमकले.
मी काही कवितासंग्रह आणि डायरी व पेन त्याला दिले होते."तुम्हाला कसं समजलं की मला कविता आवडतात ?"
"मी मानसशास्त्राची विद्यार्थिनी आहे.इतकं तर मला नक्की समजू शकतं. परवा माझ्याशी बोलताना तू इतका छान युक्तिवाद करत होतास,त्यातूनच मला तुझी काव्याची आवड समजली.तू कविता पण करतोस ना म्हणून ही डायरी आणि पेन." त्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता.डायरी छातीशी कवटाळून तो म्हणाला,"कविता तर माझं विश्व होतं ,माझी ओळख होती ताई.ताई म्हटलं तर चालेल ना?"
"चला,म्हणजे तू माझा बहीण म्हणून स्वीकार केलास तर."आम्ही दोघेही मनमोकळेपणाने हसलो.इतके की पोलीस आत डोकावून गेले.
" परशू नाही परशुराम माझे नाव.नाशिकमधल्या एका छोट्या गावात मी माझे आईवडील आणि माझे दोन भाऊ आम्ही राहत होतो.परिस्थिती जेमतेम होती ,पण आनंदी होतो. तसा मी शाळेत पण हुशार होतो.दहावीला पहिला आलो होतो.म्हणून बापाने हौसेने सायकल घेऊन दिली होती."
"तीच सायकल घेऊन ऐटीत तालुक्यातील कॉलेजला जात होतो.कॉलेजच्या स्नेहसंमेलनात माझा काव्यवाचनाचा कार्यक्रम झाला.माझ्या याच कवितांवर भाळून *कविता* माझ्या आयुष्यात आली."
"तशी मोठ्या तालेवार घरातली होती.पण माझ्यासाठी सगळ्या सुखावर पाणी सोडण्याची तयारी होती.अगदी फुलपाखरासारखे जगत होतो मी,अलगद हळुवार."
"पण तो दिवस माझ्या आयुष्याची राख करून गेला.मी कॉलेजला जायला निघालो होतो.इतक्यात काही लोकांना माझ्या घराकडे जाताना पाहिले.मला उशीर होत होता म्हणून मी सरळ कॉलेजला निघून गेलो."
"त्या दिवशी आई वडील पण काळजीत दिसत होते.रात्रभर ते जागेच आहेत ,हे मला जाणवलं.सकाळी उठल्यावर त्यांनी आपल्याला गावाला जायचे आहे म्हणून सांगितले. मी फार काही चौकशी केली नाही."
"सकाळी मी आणि आई वडील असे तिघे बाहेर पडलो.आम्ही एका गावाला येऊन पोचलो.ते गाव माझ्यासाठी पूर्ण नवीन होते.आमचे कोणी नातेवाईक ही तिथे नव्हते.मग आम्ही एका घरात गेलो.मला बाहेरच थांबवून आई वडील आत गेले."
"तिथलं वातावरण फार गूढ होतं. मला भीती वाटायला लागली.इतक्यात आई वडील आणि काही लोक बाहेर आले.हे तेच लोक होते जे माझ्या घरी आले होते."
"परशू ,आता तू इथेच राहायचं ,आम्ही निघतो "आई म्हणाली.मला काही समजेना ."आई,असं काय करतेस?मी नाही ओळखत या लोकांना .मी इथे कसा राहू आणि का राहू? माझं कॉलेज आहे.परीक्षा तोंडावर आल्या आहेत.मला वकिलीचा अभ्यास करायचा आहे.मी इथे नाही राहू शकत."
"असं म्हणत मी त्या घरातून निघालो.तर एका आडदांड माणसाने माझा हात धरला.मला खूप वेदना झाल्या."
"तू आता कूट बी जाणार न्हायी .तू हितच राहणार ." स्त्री वेष परिधान केलेल्या पण एकदम करारी पुरुषी आवाजात त्या बोलल्या.गुरुआई ....गुरुआई म्हणत होते त्यांना सगळे."
"तुझ्या आई बा न तुला देवाला व्हायला हाय.इतकं दिवस तिकडं राह्यलास ह्येच लय झालं.पर आता न्हायी".
"मला काही समजत नव्हतं.कोणीतरी कानात तापलेले शिसे ओतत आहे ,असं वाटत होतं.मी आईकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले. तिने मान खाली घातली आणि म्हणाली,"होय परसू,मला लय वर्ष पोरबाळ व्हतं नव्हतं.म्हणून म्या आईला नवस केला होता.मला पोरबाळ होऊ दे,माझं पहिलं पोर मी तुला वाहीन.तू लहान व्ह्तास म्हणून इतकं दिवस सांभाळला. पर आता तुला हितच रहावं लागलं."
"मला काही सुचत नव्हतं.मी खूप प्रतिकार केला आरडाओरडा केला.कोणीतरी माझ्या डोक्यात मारलं ,मी बेशुद्ध झालो.नंतर शुद्धीवर आलो .तर आई वडील निघून गेले होते.मला त्या नरकात ढकलून.त्या लोकांनी माझे खूप हाल केले.सतत मारहाण व्हायची कारण मी त्यांच्या फडात तुणतुणे घेऊन नाचायला नकार दिला होता.शेवटी राहिलो उभा."
"नामर्द.... हा शिक्का मारला होता समाजाने माझ्यावर.एकदा एका जागरणाला गेलो होतो.नेमका तिथं माझ्या गावातला एक माणूस आला होता.त्याने जाऊन सगळ्या गावात माझ्या नावाची बोंब ठोकली.मला या नरक यातना सहन होत नव्हत्या."
"शेवटी एक दिवस संधी बघून मी तिथून पळून आलो.आई बापाशिवाय मला कोण होतं?म्हणून त्यांच्याकडे गेलो. तर त्यांनी मला ठेवून घ्यायला नकार दिला.त्यांच्यावर देवीचा कोप झाला असता.त्यांच्या लेकांना कोणी पोरी दिल्या नसत्या .म्हणून त्यांनी मला आधार द्यायला नकार दिला ."
"ताई, अशी असते का आई? स्वतःची कूस उजवावी म्हणून आपल्याच पोटच्या गोळ्याच्या आयुष्याची माती करणारी?आणि अशी असते का ग देवी?स्वतःच देवत्व सिद्ध करण्यासाठी माझ्यासारख्या निष्पाप लोकांचा बळी घेणारी?"
"त्या दिवसापासून *आई* या शब्दावरचा विश्वासच उडाला.तिथून निघून कविता ला शोधत आलो.वाटलं तीच आपला आधार.ती नेमकी कॉलेजच्या वाटेवर दिसली.एकदम तिच्या समोर जाऊन उभा राहिलो. मला अचानक पाहून ती घाबरली.मी एकदम तिचा हात धरला आणि म्हणालो,कविता ...आता तूच माझा आधार ग .चल आपण पळून जाऊ आणि लांब जाऊन आपलं जग निर्माण
करू .माझ्यावर विश्वास ठेव. मी तुला काहीही कमी पडू देणार नाही."
"पण तिने माझा हात झिडकारला.मला हे अनपेक्षित होतं. तिने एक कुत्सित कटाक्ष टाकला आणि म्हणाली,"एका नामर्दाचा हात धरून पळून जायला,मला काय पिसाळलेलं कुत्रं चावलंय की काय?"
"कविताच्या शब्दांनी माझा राग अनावर झाला .इतका की आता मी जनावर झालो होतो."नामर्द काय...? दाखवतो तुला माझी मर्दानगी ."असं म्हणत मी तिला ओढत नेली आणि नको ते करून बसलो.मी काय करतोय हे मलाही कळत नव्हतं."
"तेवढ्याने ही माझे समाधान झाले नाही.म्हणून जवळचा दगड उचलून घातला तिच्या डोक्यात.ती तडफडत होती आणि मला मात्र आसुरी आनंद होत होता. सूड घेतल्याचा..…इतकं होऊनही तिथेच बसून राहिलो. शेवटी मला पोलिसांनी अटक केली."
"मला माझ्या कृत्याचा कोणताही पश्चात्ताप होत नव्हता.म्हणून मी सगळे गुन्हे कबूल केले.आणि शेवटी फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब करून मला इथे आणले गेले."
"आता कळलं ना ,मला इतका का तिरस्कार वाटतो स्त्री जातीचा.कारण माझ्या आयुष्याची राखरांगोळी केली या स्त्रियांनी.तूच सांग आता ताई ,मी कसा आदर करू स्त्री जातीचा?"
"परशू ची कहाणी ऐकून खरं तर मी निःशब्द झाले होते.तरीही मी स्वतःला सावरलं."हे बघ परशू,तुझ्यावर अन्याय झाला हे खरं आहे.म्हणून त्याचा असा बदला घेऊन काय मिळालं तुला?फाशीच ना...अरे तुला वकील व्हायचं होतं ना.मग तू तुझ्या परिस्थिती विरोधात,समाजातील घातक परंपरांच्या विरोधात ठामपणे उभा राहिला असतास ना,तर तुझं पण आयुष्य सावरलं असतं आणि तुझ्या सारख्या किती तरी परशूचे पण.परिस्थिती वर मात करायची रे,असा सूड ..बदला काय कामाचा..? असो...आता मागच्या गोष्टींपेक्षा पुढे काय करता येईल याचा विचार कर.चल ,भेटू पुन्हा."म्हणत मी निघाले.
"ताई" मी मागे वळून पाहिले."ताई तुझी ओवाळणी उधार आहे माझ्याकडे .वेळ आली की नक्की देईन."असे म्हणत परशू निघून गेला."
"एक दिवस देशमुख साहेबांनी मला फोन करून तातडीने तुरुंगात बोलावले.मला खरं तर टेन्शन आलं होतं.मी गडबडीने पोचले.पाहते तो काय ? तुरुंगातले सगळे वातावरण बदलले होते.एकीकडे योगा चालू होता.एकीकडे प्रौढ साक्षर वर्ग चालू होते .प्रत्येकजण आपापले काम शिस्तीत करत होता.मला ही काही समजेना ."
"स्नेहाताई ,ही कमाल तुमच्या परशू ची बरं का.त्याने बदल केलाय हा सगळा.सगळ्यांना विश्वासात घेऊन त्याने सगळं चित्र च बदलून टाकलं.ज्याला आम्ही सगळ्यात खतरनाक म्हणत होतो,तो आज इथला हिरो आहे.ही सगळी तुमची कमाल आहे."
"परशू चे कौतुक ऐकून मला ही खूप आनंद झाला.बक्षीस म्हणून मी त्याला काही कायद्याची पुस्तके आणून दिली.किती खुश झाला तो.त्याने त्याचं काम चालू ठेवलं आणि मी माझं शोध निबंधाचं."
"आज जवळजवळ सहा महिन्यांनी मी तुरुंगात जात होते.कसा असेल परशू?काय बदल केले असतील त्याने?याची खूप उत्सुकता लागली होती मला."
"मी तुरुंगात पोहोचले.पण आज तिथे नेहमीचा उत्साह नव्हता.एक गंभीर शांतता पसरली होती .एरव्ही मला बघून हसणारे चेहरे आज माझ्याकडे एका विचित्र नजरेने पाहत होते.थोडीशी गोंधळतच मी देशमुख साहेबांच्या केबिन मध्ये गेले."
"मला बघून देशमुख साहेब उठून उभे राहिले.त्यांनी माझी विचारपूस केली.मी मात्र त्यांना परशू बद्दल विचारले.आता मात्र त्यांचा चेहरा उतरला.माझ्या मनात खूप शंका येऊ लागल्या.त्याची फाशी....? नाही नाही.त्याला तर वेळ आहे अजून.सर सांगा ना .मला भेटायचे आहे त्याला."
"स्नेहा ताई ,आपला परशू गेला हो." "काय ...?" हे शक्य नाही.असा कसा गेला ?"
"ताई ,तुम्ही शांत व्हा .खाली बसा, मी सांगतो सगळं."
"असे म्हणत त्यांनी एक पाकीट माझ्या हातात दिले.मी ते उघडले तर त्यात एक पत्र होते, परशू चे...."
आदरणीय ताई,
तुला हे पत्र मिळेल,तेव्हा मी या जगात नसेन.पण फक्त शरीराने जिवंत नसेन,कारण तुझ्या रूपाने मी जिवंतच आहे. मृत्यू जवळ आल्यानंतर या जीवनाचे मोल मला तुझ्यामुळे समजले.स्वतःसाठी तर कोणीही जगतं, दुसऱ्यासाठी जगणं हेच खरं आयुष्य आहे,हे तू मला शिकवलं. आपलं विधिलिखित पण बदलता येतं, त्यासाठी जिद्द हवी आणि परिस्थिती वर मात करण्याचे अर्थात योग्य मार्गाने धाडस हवे,हा विचार तुझ्यामुळे पटला. त्यामुळेच काही चार दोन लोकांचे प्रबोधन करू शकलो. तू माझा दृष्टिकोन बदलला म्हणून मी काहींचा बदलू शकलो.आज तेच माझे तुरुंगातले मित्र बाहेर जाऊन सन्मार्गाने जगत आहेत.याचे खूप मोठे समाधान घेऊन मी जात आहे.
ताई,माणूस गुन्हेगार म्हणून जन्माला येत नाही.परिस्थिती त्याला बनवते.तुरुंगात शिक्षा भोगून तो जेव्हा बाहेर पडतो ना,तेव्हा त्याची खरी अग्निपरीक्षा सुरू होते.कारण शिक्षा भोगली तरी *गुन्हेगार* असा शिक्का त्याला समाजात उजळ माथ्याने जगू देत नाही.त्यामुळे नाईलाजाने पुन्हा हे लोक वाईट मार्गाला लागतात. त्यांची कुटुंबे उध्वस्त होतात.
ताई,तू एका परशू ची बहीण बनून त्याचा उद्धार केलास. आता या भावाचे तुला एक मागणे आहे,इथेच थांबू नकोस.आज असे असंख्य परशू आहेत,ज्यांना तुझ्यासारख्या ताई च्या राखी च्या आधाराची गरज आहे.
खरं तर मी तुला ओवाळणी देणं अपेक्षित आहे.पण आज मी तुला ओवाळणी मागतो,तुझ्या हृदयात मला कायम जिवंत ठेव आणि दीपस्तंभ हो,माझ्यासारख्या वाल्या ची.
हीच या भावाची शेवटची इच्छा.
-परशू (परशुराम)
"त्या पाकिटात आणखी काही तरी होते.तर ती तीच चिंधी होती ,जी मी परशूला बांधली होती."
"स्नेहा ताई सावरा स्वतःला.परशू चे बलिदान वाया जाऊ देऊ नका.तुमची तब्बेत नाजूक आहे.त्याच्यासाठी तरी खंबीर व्हा.हो ,आणखी एक ,परशू जिवंत आहे ....तुमच्या हृदयात. होय स्नेहाताई,तुम्हाला ह्रदय देणारा डोनर दुसरा तिसरा कोणी नसून परशू आहे."
"मी मटकन खाली बसले .त्याच्या पत्राचा आता मला अर्थ लागला होता."
"तुम्हाला हृदयाचा गंभीर आजार असून,त्याला प्रत्यारोपण हाच एकमेव उपाय आहे.हे समजल्यापासून परशू सैरभैर झाला होता.त्याने हट्टाने त्याचे नमुने तपासून घेतले होते.आणि नशिबाने ते मॅच पण झाले."
"मग मात्र परशू ने खूप धडपड केली .तुम्ही दिलेली कायद्याची पुस्तके वाचली.संविधान ,मानवाधिकार सगळ्याचा बारकाईने अभ्यास करून त्याने त्याची बाजू एखाद्या निष्णात वकीलाप्रमाणे मांडली. ताई,परशु खरंच एक फार मोठा वकील झाला असता."
"असो, अगदी राष्ट्रपतींपर्यंत त्याने त्याची फिर्याद मांडली. *मरणार तर मी आहेच ,पण माझ्या ताईसाठी मेलो ना तर माझं आयुष्य सार्थकी लागलं असं मी समजेन,कारण या आयुष्यावर तिचाच तर अधिकार आहे*.या निश्चयावर तो ठाम होता."
"शेवटी त्याने अवयव दानाची तर परवानगी मिळवलीच .तीच त्याची शेवटची इच्छा होती.खरंच ताई,इतके दिवस फक्त ऐकून होतो.पण वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो, हे परशू मुळे समजले."
"खरं आहे सर तुमचे.एक राखी ...राखी कसली फक्त चिंधी च बांधली होती .पण वेडा ओवळणीत नवं आयुष्य मला देऊन गेला.कशी उतराई होऊ मी ऋणातून?,मला आता अश्रू आवरत नव्हते."
"ताई ,सावरा स्वतःला.परशू चे स्वप्न तुम्हाला पूर्ण करायचे आहे.आज असंख्य परशू तुमची वाट बघत आहेत.तुमची राखी त्यांना नवीन आयुष्य देऊ शकते."
"अगदी बरोबर आहे सर तुमचे.आजपासून माझे हे नवे आयुष्य जे मला परशू ने दिले आहे,ते मी कैद्यांच्या पुनर्वसनासाठी वापरणार आहे.त्यासाठी एक फाउंडेशन मी स्थापन करत आहे,त्याच नाव असेल *राखी फाउंडेशन*".
"वा ,काय योगायोग आहे ताई.आज तुम्ही नवी सुरुवात करणार आहात आणि मुहूर्त आहे रक्षा बंधनाचा.होय ताई,आज रक्षा बंधन आहे.आणखी एक या कामी आमचे पोलीस दल कायम तुमच्या सोबत असेल. आज खऱ्या अर्थाने *रक्षाबंधन* साजरे होत आहे."
"तर ही आहे कहाणी या चिंधीची.जिच्या मुळे आज असंख्य परिवार सावरले.आज जो सन्मान मला मिळत आहे,त्याचे खरे श्रेय माझ्या भावाचे परशू चे आहे.म्हणून आज मी हा सन्मान परशूला समर्पित करते."
ताई खाली बसल्या आणि टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला.ताई मात्र त्यांच्या हातातल्या चिंधीकडे साश्रू नयनांनी बघत होत्या.