Swati Mane

Others

4.0  

Swati Mane

Others

द प्रेशिअस गिफ्ट

द प्रेशिअस गिफ्ट

2 mins
137


    "मी ना माझ्या बाबांना एक छानसे पाकीट देणार आहे" ,"मी पण एक भारीतला पेन देणार आहे","मी पण"...वर्गातल्या मुलींच्या चाललेल्या गप्पा स्मिता शांतपणे ऐकत होती.आज 'फादर्स डे'कसा साजरा करायचा याचीच सगळ्या वर्गात चर्चा चालू होती.

     स्मिता मात्र या सगळ्यातून अलिप्त होती.तिला काही सुचत नव्हते असे नाही.पण या सगळ्या गोष्टी प्रत्यक्षात उतरणे शक्य नाही,याची तिला पूर्ण कल्पना होती.

     स्मिता ...सतीश आणि मिताची लाडकी लेक.तिचे गोड हसू तिचे नाव सार्थ करत होते.जेमतेम 10-12 वर्षाची असेल ती.पण प्रचंड बुद्धिमान आणि लाघवी होती.म्हणूनच शाळा असो की घर सर्वांची ती लाडकी होती.सतीशचा जीव की प्राण. म्हणून तर 5 वर्षांपूर्वी आजाराने मिता गेली तरी त्याने दुसरे लग्न केले नाही. कारण त्या दोघांच्या नात्यात त्याला 'सावत्र'हा शब्द नको होता.म्हणून तर तो स्मिताची आई आणि बाबा झाला होता.

    वर्गातल्या चर्चेने स्मिता थोडी खट्टू झाली होती. नाराजीतच ती घरी आली. तिचा बाबा अजून घरी आला नव्हता.तसा तो रोजच उशिरा यायचा.

    लोकांचे डबे पोचवण्यात त्याचा वेळ कसा जायचा ,हे त्याचे त्यालाच समजत नव्हते.तो 'मुंबईचा डबेवाला' होता.पण आपल्या लाडक्या लेकीला काही कमी पडणार नाही,याची तो पूर्ण काळजी घेत होता.त्यासाठी वाट्टेल ते कष्ट करण्याची त्याची तयारी होती.स्मिताही तितकीच समजूतदार होती.

    बाबाची वाट बघत स्मिता दारातच बसली होती. सतीशला उशीर होणार असला की तो शेजारच्या साने काकूंना घरी जेवणाचा डबा द्यायला सांगायचा. त्याप्रमाणे साने काकूंनी डबा आणून दिला होता.

    सतीश घरी पोचला तेव्हा खूप थकला होता. इतका की अंथरुणावर पडल्या पडल्या त्याला कधी झोप लागली, हे कळलंच नाही.

     स्मिता त्याच्याजवळ आली, तेव्हा सतीश झोपला होता. त्याच्या चेहऱ्यावरून तो थकलाय हे स्मिता ला जाणवले.त्याच्याजवळ बसत ती म्हणाली, "बाबा,आज फादर्स डे आहे. तुम्हाला खूप काही द्यावं असं वाटत होतं.पण काही विकत घेण्यापेक्षा मी स्वतः तुमच्यासाठी काहीतरी करावं असं मला मनापासून वाटलं."

    "म्हणून मी हे ग्रीटिंग माझ्या हाताने तुमच्यासाठी बनवले आहे.आणि हे आपल्या कुंडीतल्या गुलाबाचे फूल,जे आईने लावले होते. आमच्या दोघींकडून जगातल्या बेस्ट फादर ला फादर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा"."तुम्ही खूप दमलेले आहात हे ही मला कळतंय. फार काही मी नाही करू शकत ,पण आज मनापासून तुमच्या तळव्यांना तेल लावावेसे वाटत आहे".असे म्हणत स्मिता ने सतीशच्या पायांना तेल लावायला सुरुवात केली.

    लेकीचा हात पायाला लागताच सतीशच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आज सकाळी लोकल मध्ये चढताना गर्दीत त्याच्या पायातली चप्पल निसटून पडली होती . आज संपूर्ण दिवस तो अनवाणी रणरणत्या उन्हात डबे पुरवत फिरत होता. त्याचे पाय प्रचंड हुळहुळ करत होते.आज आपल्या पायाला कोणीतरी तेल लावावे असे त्याला मनापासून वाटत होते.पण ......

    त्याची इच्छा त्याच्या लाडक्या लेकीने आपसूक च पूर्ण केली होती. तेल लावून झाल्यानंतर स्मिता उठली आणि तिने बाबांच्या चेहऱ्याकडे पाहिले. एक समाधानाचे स्मित हास्य त्या चेहऱ्यावर होते.

   जगातील सर्वात अनमोल असे गिफ्ट त्याला आज त्याच्या लेकीने दिले होते.खऱ्या अर्थाने आज फादर्स डे साजरा झाला होता.


Rate this content
Log in