मळभ
मळभ


आकाशात काळे ढग जमा झाले होते.वातावरण अगदी कुंद झाले होते.सर्वत्र एका प्रकारची अस्वस्थता पसरली होती अगदी सविताच्या मनासारखी.
काही दिवसांपूर्वी च तिच्या शाळेतल्या मित्र मैत्रिणींचा व्हाट्स ऍप ग्रुप झाला होता.या ग्रुपच्या माध्यमातून 25 वर्षांपूर्वी च्या सगळ्या आठवणी अगदी काल परवा घडल्यासारख्या ताज्या झाल्या होत्या.
सगळेजण गप्पांमध्ये रमले होते.हळूहळू भूतकाळातून सगळे वर्तमानात आले. सध्या कुठे आहेत,काय करत आहेत याविषयी चर्चा सुरू झाली आणि सविता अस्वस्थ होऊ लागली.
सविता .....वर्गातली स्कॉलर.आजही सगळेजण तिचा स्कॉलर म्हणूनच उल्लेख करत होते.या विशेषणाने ती पण सुखावत होती.तिचे अनेक मित्र आणि मैत्रिणी म्हणजे जे शाळेत साधारण विद्यार्थी म्हणून ओळखले जात होते ते देखील डॉक्टर, इंजिनिअर ,अधिकारी, बँकर तर व्यावसायिक झाले होते.
त्यातच समीर ...त्यांच्या वर्गाचा टॉपर तो ही अमेरिकेत स्थिरावल्याचे कळले होते. संपूर्ण वर्गात समीर ला फक्त एकच प्रतिस्पर्धी होती ....सविता . बाकी सगळे कडेकडेने पोहणारे. त्यामुळे सविता सुद्धा नक्कीच काहीतरी स्पेशल असणार याची सगळ्यांना खात्री होती. त्यामुळे सर्वांना तिच्या उत्तराची आतुरता होती.
सविता मात्र भूतकाळात गेली होती. प्रचंड बुद्धिमत्ता असल्याने तिची स्वप्ने पण तितकीच उत्तुंग होती.पण परिस्थिती, जबाबदारी आणि कर्तव्य यांच्या ओझ्याखाली तिचे पंख कधी दुबळे झाले, हे तिला कळलेच नाही. त्यामुळे नियतीला जे मान्य होते त्याचा स्वीकार करून ती चालत होती.
एकच अपेक्षा होती,आर्थिक स्वावलंबन मिळल्यानंतर पुढचे शिक्षण पूर्ण करून अधिकारी पद मिळवायचे. पण शून्यातून विश्व निर्माण करत एक पत्नी,आई आणि गृहकर्तव्यदक्ष गृहिणी या जबाबदारी पार पडत तिचे स्वप्न कधी मागे पडले हे तिलाच कळले नाही. मनातली स्वप्ने मनातच विरून गेली होती.
आज या सगळ्या चर्चेने पुन्हा एकदा तिच्या मनातल्या जखमेवरची खपली निघाली होती. त्याच्या वेदना तिला आता असह्य होत होत्या.
मनात विचारांचे काहूर माजले असतानाच तिच्या कानावर एक ओळखीचा आवाज पडला. रेडिओ वर ज्ञानेश्वरी चे निरूपण सादर होत होते. आणि ते सादर करत होते तिचे आवडते शिक्षक कदम सर. सरांचा आवाज ऐकून ती सावध झाली. सर पसायदानावर बोलत होते.
"माऊलींनी विश्वाच्या कल्याणासाठी पसायदान मागितले. ती एक विश्व कल्याणाची प्रार्थना आहे. ",सर बोलत होते.ते म्हणाले,"मला जर परमेश्वर भेटला आणि त्याने मला विचारले की पुढच्या जन्मी तुला कोण व्हायला आवडेल? तर मी उत्तर देईन की सरकारी शाळेतला शिक्षक. कारण या शाळेत येणारे अनेकजण अनाथ, पोरके,गरीब असतात. अत्यंत कष्टाने आणि जिद्दीने ही मुले स्वतःच्या आयुष्याची बांधणी करत असतात. या त्यांच्या जीवन मंदिराची उभारणी करत असताना मला खारीचा जरी वाटा उचलता आला तरी माझे आयुष्य सार्थकी लागल्याचे मला समाधान लाभेल."
सरांचे हे शब्द ऐकत असताना सविताच्या डोळ्यासमोर गेल्या 20 वर्षातले अनेक चेहरे उभे राहिले. अनवाणी धावत 3 किलोमीटर वरील शाळा गाठणारे, लहान भावंडांचा सांभाळ करत अभ्यास पूर्ण करणारे, धुण्या भांड्याच्या कामात आईला मदत करून मग शाळा गाठणारे ,घरातील गुरांचा सांभाळ करत शाळा सांभाळणारे अनेक चेहरे क्षणार्धात समोर आले.
आज हीच मुले उच्च पदस्थ आहेत. ज्या घरी दिवा लागण्याची पंचाईत असायची आज तिथे टुमदार बंगले उभे आहेत. 10 वी झाली की लग्न करून जाण्याऐवजी आज कित्येक जणी शिक्षिका,नर्स इतकेच नव्हे तर अधिकारी पण झाल्या.
या असंख्य चेहऱ्याची प्रेरणा होती ....सविता. या सर्वांना मातृतुल्य वाटत होती ....सविता. यांच्या जीवन मंदिराच्या बांधणीतील एक वीट होती सविता. होय...या मुलांच्या जीवन प्रवासातील एक मार्गदर्शिका होती ...सविता.
"म्हणूनच अभिमान वाटतो मला मी एक शिक्षक आहे याचा", सरांच्या या शब्दांनी सविता भानावर आली. तिच्या चेहऱ्यावर आता औदासिन्य नाही तर तेज होते.
अत्यंत उत्साहाने तिने मेसेज टाइप केला,'अभिमान आहे मला मी सरकारी शाळेतील शिक्षिका असल्याचा.'
पाऊस पडून गेला होता. आकाशातील मळभ दूर होऊन आकाश अगदी स्वच्छ, निरभ्र झाले होते.....सविताच्या मनासारखे.