Swati Mane

Inspirational

2  

Swati Mane

Inspirational

परीस

परीस

4 mins
135


   'बापाचा कोणताही दिवस नसतो ,तर आपला प्रत्येक दिवस बापाचा असतो' बाप...वडील ..पिता ...तात.... जन्मदाता.…कुटुंबाचा आधार ...तरीही तसा दुर्लक्षित च .आईचे प्रेम , वात्सल्य ,त्याग याचे गोडवे गायला आकाशाचा कागद आणि सागराची शाई केली जाते .पण साहित्यातही बापाला तसे उपेक्षित च ठेवले गेले आहे .पण म्हणून बापाचे महत्त्व कमी होत नाही .  आपल्या जडणघडणीत आईइतकेच वडिलांचे महत्त्व असते .प्रत्येकाच्या आयुष्यात वडिलांचे एक विशेष स्थान असते.माझ्या आयुष्यात माझे वडील म्हणजे माझा आधारस्तंभ तर आहेतच ,पण ते माझी प्रेरणा आहेत .


    साधारण वयाच्या 20 व्या वर्षी एक प्राथमिक शिक्षिका म्हणून सुरुवात केली .माझा जन्म ,बालपण ,संपूर्ण शिक्षण पुणे शहरात झाले . सुरुवातीला एक वर्ष भर पुण्यातीलच एका नामांकित शाळेत नोकरी करत होते.त्यातच लग्नही झाले .माझे यजमान एका जिल्हा परिषदेच्या एका शाळेत नोकरी करत होते.  त्यामुळे मलाही त्याच जिल्हा परिषदेच्या शाळेतील नोकरी स्वीकारावी लागली . माझ्या नोकरीची सुरुवात जिल्ह्याच्या हद्दीवरील एका दुष्काळी गावात झाली .

   

 त्या शाळेत मी हजर होण्यासाठी गेले आणि खरोखर मला ब्रह्मांड आठवले.कधी स्वप्नातही कल्पना केली नव्हती अशा गावात मी येऊन पोहोचले होते. सासर आणि माहेर दोन्हीही 100 किमी च्या पलिकडे ,ना वाहनांची सोय ना फोनची.एकदा त्या गावात पोहोचले की पुढचा संपूर्ण आठवडा माझा जणू संपूर्ण जगाशी संबंध तुटत असे . पुण्यातील सगळ्या सुख सुविधांची सवय असलेल्या मला बोअरवेल वरून पाणी भरताना कळशी डोळ्यातल्या पाण्यानेच भरते की काय अशी अवस्था असायची .


    क्षणाक्षणाला बस,रिक्षा मिळण्याची सवय असलेल्या मला दिवसातून फक्त 2 बस दिसायच्या .टीव्ही आणि रेडिओ माझा जीव की प्राण ,परंतु या दोन्ही गोष्टी जणू माझ्या आयुष्यातून नामशेष झाल्या होत्या . नवरा एका टोकाला तर मी दुसऱ्या .त्यात पुण्यातल्या मोकळ्या वातावरणात वाढलेल्या माझ्या मनाची त्या गावात जणू घुसमट होत होती.रूढी ,परंपरा यावर प्रचंड विश्वास असणारे लोक,मुलांच्या शिक्षणाबाबत कमालीची उदासीनता असणारे पालक, आपण पुढाकार घेऊन नव्याने काही करावं तर एक स्त्री म्हणून येणारी बंधने अशा जणू चक्रव्यूहातच मी अडकले होते.


    कमालीचे औदासिन्य माझ्या मनात निर्माण झाले होते .कधी कधी तर नको असली नोकरी म्हणून परत निघून जावेसे वाटत होते. अशातच एक दिवस माझे वडील अचानक माझ्यासमोर येऊन उभे राहिले.वडिलांना म्हणजे माझ्या पप्पांना पाहून मात्र माझ्या अश्रूंचा बांध फुटला .त्यांच्या जवळ जाऊन मी खूप रडले . पप्पानीही मला मोकळे होऊ दिले.चहा वगैरे घेतल्यानंतर ते मला फिरायला म्हणून समोरच्या मैदानात घेऊन गेले .माझ्या चेहऱ्याकडे पाहून त्यांना थोडा अंदाज आला होताच ,तरीही त्यांना माझे मत जाणून घ्यायचे होते.


     "नाही जमणार मला इथे राहायला .इथे सगळंच वेगळं आहे,इथल्या वातावरणात गुदमरायला होतंय मला.एकवेळ या भौतिक अडचणींवर मी कशीही मात करेन .पण इथल्या पालकांना कशाचे सोयरेसुतक नाही .मुलं पण हवा तसा प्रतिसाद देत नाहीत ,नाही ऍडजस्ट होत मला ,मला इथून घेऊन चला " माझी गाडी सुसाट सुटली होती .


    माझं सगळं बोलून संपल्यावर आम्ही एका झाडाखाली बसलो .पप्पानी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले," मान्य आहे मला की तुला खूप अडचणींना तोंड द्यावं लागत आहे .पण माझा अनुभव सांगतो .मी सुद्धा खूप प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेतले आहे .जे इथले वातावरण आहे ,काहीसे तसेच माझ्याही घरचे वातावरण होते.पण माझा शिक्षणाचा प्रवास सुसह्य केला माझ्या शिक्षकांनी .माझ्या घरची परिस्थिती माहीत असल्याने त्यांनी प्रत्येक वेळी मला सहकार्य केले आणि पुढे शिकण्यासाठी प्रवृत्त केले .माझे शिक्षक माझ्यासाठी परीस बनले .त्यांच्या स्पर्शाने माझ्या आयुष्याचे सोने झाले ."


    " आणि आता मला असं वाटतंय की ,तू या अडचणींचा विचार करण्यापेक्षा संधीचा विचार कर.ज्ञानदानाची वाट जितकी पवित्र असते ना तितकीच ती खडतर असते.म्हणून मागे फिरायचे नाही.या वाटेकडे अनेक डोळे आस लावून बसलेले आहेत .त्यांचा हात धरून त्या डोळ्यातील स्वप्ने पूर्ण करण्यासाठी तुला पुढे यायचे आहे.तुला मी एकच सांगेन ,जिथे सगळ्या सुखसुविधा आहेत अशा ठिकाणी काम करण्यात सुख मिळेल पण खरे समाधान तुला इथे मिळेल .कारण सोन्याचा दागिना घडवणे सोपे आहे ,पण लोखंडाचे सोन्यात रूपांतर करणे तितके सोपे नाही ."


    " या सर्वांसाठी तुला परीस बनायचे आहे .तूच म्हणालीस ना की इथले पालक मुलांच्या विशेषतः मुलींच्या शिक्षणाबाबत उदासीन आहेत.मग या मुलींचा तू आदर्श हो .तुझ्या पावलावर पाऊल ठेवण्यास त्यांना प्रवृत्त कर .हा प्रवास सोपा नाही पण अशक्यही नाही .शेवटी परमेश्वर ही अशाच लोकांना आव्हान देतो ,ज्याच्यात ते पेलण्याची ताकद असते.स्वतःची ताकद ,क्षमता ओळख आणि हो पुढे.सिद्ध कर की तू सुद्धा सावित्रीची लेक आहेस .या चिमुकल्यांच्या आयुष्यातला परीस हो आणि बदलून टाक त्यांचे आयुष्य ".


    पप्पांच्या या शब्दांनी माझा संपूर्ण दृष्टिकोन च बदलून टाकला .ज्या वाटेवर मला फक्त संकटे दिसत होती ,त्याच वाटेच्या पलीकडे मला आता सप्तरंगी इंद्रधनुष्य दिसत होते ,जे मला माझ्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यात फुलवायचे होते.


    दुसऱ्या दिवशी मी शाळेच्या प्रांगणात आले ते अंतर्बाह्य बदलून .माझ्या चेहऱ्यावरची उदासीनता जाऊन आता आत्मविश्वास आला होता कारण आता मलाही परीस स्पर्श झाला होता .....माझ्या पप्पांच्या विचारांच्या रूपाने. त्याच गावात त्यानंतर मी 8 वर्षे सेवा केली. माझ्या अनेक विद्यार्थिनी आता शिक्षिका ,इंजिनिअर ,अधिकारी अशा वेगवेगळ्या पदावर कार्यरत आहेत आणि हो त्या मान्य करतात की मी त्यांच्या आयुष्यातील परीस आहे .


    त्या गावात नोकरीची सुरुवात करताना माझ्या डोळ्यात पाणी होते आणि ते गाव सोडतानाही माझ्या डोळ्यात पाणी होते .पण दोन्ही वेळेची कारणे मात्र भिन्न होती . आता जवळजवळ 22 वर्षे मी या क्षेत्रांत काम करते आहे .अनेकदा खूप वेगवेगळ्या अडचणींना ,प्रश्नांना तोंड द्यावे लागते .पण आता पाऊल डगमगत नाही .कारण माझे पप्पा जरी आता या जगात नसले तरी त्यांची शिकवण माझ्यासाठी शाश्वत आहे . स्वतःच्या विचारांच्या, तत्त्वांच्या

आणि संस्कारांच्या परीस स्पर्शाने माझे आयुष्य सुवर्णमय करणारे माझे पप्पा माझे हिरो होते,आहेत आणि कायम राहतील .


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational