स्वच्छतेचे महत्व
स्वच्छतेचे महत्व
विदया बालनची सरकारी जाहिरात असो की हँडवॉश कंपनीची जाहिरात प्रत्येका मधून स्वच्छतेचा संदेश दिला जातो. उत्तम आरोग्यासाठी स्वच्छता ही आवश्यक बाब आहे. निरोगी शरीरात निरोगी मन वास करते असे म्हणतात. निरोगी शरीरासाठी निरोगी परिसर हवा व त्यासाठी वैयक्तिक व परिसर स्वच्छता असावी लागते. तसेच निरोगी समाजासाठी स्वच्छ परिसर आवश्यक असतो.
अशा निकोप समाज रचने साठी सर्व प्रथम प्रयत्न केला तो राष्ट्रसंत गाडगेबाबा यांनी. दिवसभर गावातली घाण साफ करत आणि रात्री लोकांच्या डोक्यातील घाण काढत. स्वच्छतेकडून समृध्दीकडे जाण्याचे मार्ग गाडगेबाबा यांनी दाखवले.
तोच धागा पकडून महाराष्ट्र शासन यांनी सन 2000-2001 मधे "संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान " सुरू केले. तीच योजना केंद्र सरकारने 2014 ऑक्टोबर 2 ला गांधी जयंती ला उचलली व "स्वच्छ भारत अभियान " सुरू केले आहे. महाराष्ट्राने केंद्राला दिलेला हा एक चांगला उपक्रम म्हणता येईल. अतिशय चांगल्या पध्दतीने हा उपक्रम आजही प्रधानमंत्र्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने चालू आहे.
शालेय पातळीवर शारिरिक शिक्षण या विषयात "आरोग्य शिक्षण " या घटकाचा समावेश केला आहे. मात्र बऱ्याच प्रमाणात त्या घटकाकडे दुर्लक्ष केल्या जाते. त्याकडे लक्ष देवून जर वैयक्तिक स्वच्छता याकडे लक्ष दिले तर नक्कीच एक निरोगी पिढी घडेल. अंघोळ, नखे व केस कापणे, कपडे स्वच्छता, कान व नाक स्वच्छता इ. बारीक सारीक गोष्टी लहानपणापासून शिकवल्या तर पुढे आपोआप स्वच्छतेच्या सवयी लागतील. लहानपणी केलेले संस्कार हे चिरकाल टिकणारे असतात. वैयक्तिक स्वच्छता हा सुद्धा एक संस्काराचा भाग होणे गरजेचे आहे.( ग्रामिण भागात याकडे आजही लक्ष दिले जात नाही).
वैयक्तिक स्वच्छतेचि आवड निर्माण झाली की समाजात वावरताना ती व्यक्ती स्वच्छतेचे नियम पाळते. आपले घर जसे आपण स्वच्छ ठेवतो तसेच परिसर सफाई हेही आपले कर्तव्य आहे , याची जाणीव करून देणे गरजेचे आहे. फक्त वैयक्तिक स्वच्छता किंवा घरातील स्वच्छता महत्त्वाची नसून जेंव्हा पूर्ण वस्ती शहर स्वच्छ होईल
त्याच वेळस निरोगी पिढी तयार होईल.
आज जे साथीचे आजार आपण पाहतो ते बऱ्याच वेळेस या अस्वच्छतेमुळेच होतात. त्यामुळे स्वच्छता ही महत्वाची आहे. मात्र फक्त मी व माझे घर स्वच्छ नको तर सर्व गाव शहर स्वच्छ हवे. १५ ऑक्टोबर हा "जागतिक हात धुवा " दिन आपण साजरा केला आहे.
हात धुणे हे खूप महत्वाचे आहे. अगदी शौचास जावून आल्यावर, जेवणाआधी हात धुणे महत्वाचे आहे. शौचास जाणे हे नैसर्गिक असले तरी शौचालयाचा वापर करावा हे सुध्दा सांगणे गरजेचे आहे. हात अगदी राख किंवा मातीने जरी धुतले तरी योग्य होय. उपलब्ध साधनांचा ही वापर कसा करावा ते समजावून दयावा लागेल
तीसरीमध्ये ओला व कोरडा कचरा या विषयी वले आहे. त्याचा वापर केल्यास कचरा कसा वेगळा करावा तेही कळेल. कचरा कसा होतो कचरा कमी कसा करता येईल या बाबतीत मागदर्शनही करता येईल.
6हे घडत असतांना स्वच्छतेने उत्पन्न होणारा कचरा त्याची विल्हेवाट कशी लावावी ही देखील समस्या निर्माण होत आहे. शहर व गाव दोन्ही कडे असे कचरा पासून मुक्ती देणारे प्रकल्प निर्माण करून ही समस्या सोडवावी लागेल. नाहीतर डंपींग ग्राउंड वरुन बरेच वाद घडताना दिसत आहेत. काही शहरात कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते, मात्र बऱ्याच ठिकाणी उघड्यावरच फेकला किंवा साठवला जातो. त्यातुन आरोग्याच्या वेगळ्या समस्या निर्माण होत आहेत.
त्याच बरोबर कचरा गोळा करणारे लोक व त्यांच्या आरोग्याच्या समस्या याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. केवळ फोटो काढण्यापुरते हातात झाडू घेणारे यांना आपण प्रसिद्धी देतो, त्याचप्रमाणे दररोज हे काम करणारे लोक यांनाही कुठेतरी प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. त्या सफाई कामगार वर्गाची देखील आपणास जाण ठेवावी लागेल. उपेक्षीत घटक म्हणून न बघता त्यांनाही समाजात योग्य स्थान व मान मिळाला पाहिजे. सामाजीक आरोग्यासाठी सतत कार्यरत असणारा तो देखील एक महत्वाचा घटक होय.
स्वच्छता ही जशी शरीराची तशीच मनाची ही ठेवावी लागेल, नाहीतर म्हणावे लागेल, " नाही निर्मळ मन, काय करील साबण. "