सुविचार -प्रसंगी मदतीला येतो
सुविचार -प्रसंगी मदतीला येतो
प्रसंगी मदतीला येतो तोच खरा मित्र
राज एक मध्यमवर्ग़ीय मुलगा. परिस्थितीशी लढा देत त्याने शिक्षण घेतले. त्यामुळे अनेक इच्छा त्याला माराव्या लागल्या.
मित्र-मैत्रिणींबरोबर फिरणे ,गप्पा मारणे, पिकनिक ला जाणे. या गोष्टीस तो पैशाअभावी तो मुकला होता. पण मनात कुठेतरी ठाम होते. नोकरीला लागलो तर पहिली ही मजा करायची. लग्न, संसार , घर हे सगळे नंतर.
उत्तम गुण मिळवून पास झाल्याने त्याला गलेलठ्ठ पगाराची नोकरी लागली. खूप खूश झाला तो. बरीच वर्षे ज्या गोष्टीची तो आतुरतेने वाट पहात होता तेच घडले होते.
फेसबुक वॅाट्स अॅप च्या साहाय्याने बालपणीचे मित्र जमवले. राज चांगला नोकरीला असल्याचे समजल्याने आपल्याला काहीतरी उपयोग होईल या विचाराने बरीच जण जमा झाली. मित्रांच्या संख्येचा आकडा वाढल्याने तो खूप खूश होता. असतील शिते तर जमतील भुते. या युक्तीप्रमाणे मित्र-मैत्रिणींची संख्या वाढत होती. त्याचबरोबर पार्ट्यांचीही. बऱ्याच दिवसांची इच्छा पूर्ण झाल्याने त्याचा कसा फायदा घेतला जात आहे. तेच त्याला समजेना. आईवडील ही संभ्रमात पडले. लहानपणी त्याला ते सुख देऊ शकले नव्हते. म्हणून ते जास्त अडवूही शकत नव्हते. फक्त त्याला सावध रहा. कष्टाचा पैसा असा उधळू नको. सगळेच मित्र चांगले असतात असे सांगत होते. पण तो ते ऐकण्याच्या मूडमध्येच नव्हता. आपण काहीतरी बचत करायला हवी. हे त्याला समजतच नव्हते. नातेवाईकांनीही त्याला समजावून पाहिले पण तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.
अति झाले की त्याची माती होते. त्याप्रमाणेच घडले. कामावर त्याच्या हिशोबात चूक झाली. कंपनीला मोठा तोटा सोसावा लागला. सारी जबाबदारी त्याची होते. चूक कुठे झाली ते समजले होते. ते पैसे हिशोबाने परत मिळवले असते. पण त्याला दिवस लागणार होते. त्याने कंपनीची माफी मागितली. पैसे परत मिळवून देण्याची हमी दिली. परंतु , आधी तू ते पैसे भर. वसूल झाल्यावर तुझे तू घे.अन्यथा नोकरी सोडून जा.असे सांगितले
करोड रुपयांचा प्रश्न होता. एव्हडे कोठून आणणार. बरे आत्तापर्यंत कमावलेल्या पैशात त्याने बचतही केली नव्हती. बुडत्याला घागरीचा आधार. घरी सांगायचे तरी कोणत्या तोंडाने? मोठा यक्षप्रश्न त्याच्यासमोर होता.
त्याने सर्व मित्रांना बाहेरच एका ठिकाणी भेटण्यास बोलावले. सगळ्यांना वाटले. चला आज चमचमीत पार्ट
ी मिळणार. सगळे छान छान कपडे घालून नियोजित ठिकाणी जमले. तिथे खाण्यापिण्याची काहीच सोय नव्हती. सगळ्यांना आश्चर्य वाटले. राजचा चेहराही पडलेला वाटला. त्याने उभे राहून त्याच्यासमोर आपली व्यथा सांगितली. मदतीची अपेक्षा केली. त्याबरोबर सगळ्यांचे चेहरे पडले. एकेक करुन काही ना काही कारण सांगून तिथून पसार झाले. सगळ्यांनी थोडेथोडे पैसे दिले असते तर राजचा प्रश्न सुटणार होता. तो त्यांना ते पैसे व्याजासहित परत करणार होता. पण छे! मैत्रीचा खरा अर्थ त्याला समजला होता पण वेळ निघून गेली होती. मित्रांवर वाया घातलेला पैसा घरी दिला असता तर आज घरचे नक्कीच उभे राहिले असते. त्याला खूप पश्चात्ताप झाला होता. तो तिथेच बराच वेळ बसून राहिला. तोपर्यंत त्याच्या मित्रांनी आणखी एक कामगिरी केली होती. ती म्हणजे झाल्या गोष्टीचा बोभाटा गावभर केला .अगदी त्याच्या घरापर्यंत.
त्याच्या आईवडिलांच्याही पायाखालची जमीन सरकली. त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसले. तितक्यात राजचा आणखी एक मित्र घरी आला. तो त्याबरोबर शाळेत होता. त्यावेळी राज त्याला खूप मदत करी. परिस्थितीमुळे तो जास्त शिकला नव्हता. नोकरी साध्या पगाराची असल्याने तो राजच्या मित्रमंडळीत सामावला नव्हता. राजनेही त्याकडे लक्ष दिले नव्हते. तो यशाच्या धुंदीत होता. त्याने मैत्रीचे ऋण लक्षात ठेवले होते. म्हणूनच कोणीही न सांगता विराज त्याचा मित्र घरी येवून बसला होता.
राज जड पावलाने घरी आला. आई वडील व विराज चिंताग्रस्त होऊन वाट पहात असताना पाहून त्याला आश्चर्य वाटले. मग सगळी गोष्ट त्याच्या लक्षात आली.
आईवडिलांनी त्याला धीर दिला. विराजनेही मदतीचा हात पुढे केला. चौघांनी मिळून पैसे कसे मिळवता येतील. त्याचा आराखडा केला. पैसे उभे करून दिले.
त्याने पैसे नेऊन कंपनीत भरले. लवकरात लवकर गेलेले पैसेही कंपनीला मिळवून दिले. पुन्हा अशी चूक घडणार नाही म्हणून माफी हि मागितली. नोकरी वाचली. पैसेही मिळाले. राज मोठ्या संकटातून सहीसलामत सुटला. शंभर मित्रांपेक्षा संकटात धावणारा एकच मित्र बरा. हे त्याला पटले. आई वडिलांपेक्षा चांगला मित्र हितचिंतक असूच शकत नाही. हेही त्याला उमजले.
त्याने विराजला बोलावून घेतले. तिघांची हात जोडून माफी मागितली. नव्या उमेदीने ,आईवडिलांच्या आशिर्वादाने, विराज सारख्या दोस्ताच्या सहकार्याने पुढील पाऊले टाकायची असा त्याने निश्चय केला.