uday joshi

Drama Thriller Others

4.4  

uday joshi

Drama Thriller Others

सूड

सूड

10 mins
252


गेले काही दिवस विचार करकरुन मानसीचे डोके भणभणत होते. आपल्या सुखी, सुरळीत आयुष्यात असे काही घडेल असे तिला स्वप्नातही वाटले नव्हते. मिहीर बरोबरचे गेल्या पाच वर्षांचे ते फुलपाखरी (?) जीवन , ते जीवन हे एक फसवे स्वप्नच होते याची तिला आता जाणीव झाली होती, आणि आज आजन्म साथ देण्याच्या आणाभाका विसरुन जन्मोजन्मी एकमेकांचे तोंड न पहाण्याचा दोघांचा निर्णय झाला होता. मनाने आणि विवाहबंधनाने एकत्र आलेल्या त्यांच्यातील दुरावा पराकोटीला पोचला होता. त्याचीच परिणती म्हणजे “वेगळं व्हायचंय मला” चा दोघांनी घेतलेला निर्णय. गेल्याच आठवड्यात त्या वेगळेपणाची कायदेशीर पूर्तताही झाली होती.

या एवढ्या मोठ्या घरात ती आज एकटीच बसली होती. प्रचंड हौसेने, उत्साहाने जीव ओतून सजवलेल्या त्या घरावर तिचे प्रेम होते. त्यातील एक एक वस्तू तिच्या कलात्मकतेची जाणीव करुन देत होती. घर सजवण्यासाठी केलेल्या धावपळीत तिला मिहीरची साथ असली तरी इंजिनियर असल्यामुळे आलेला थोडासा रुक्षपणा त्याच्यातही होता. तिला मात्र प्रत्येक गोष्टीतील सौंदर्य शोधायची सवयच होती, परिपूर्णतेचा हट्ट होता. त्यातूनच साकारलेले हे घर.

आज ते भकास वाटत होते. सर्व वस्तू जागच्याजागी निर्जीव वाटत होत्या. मिहीर तर त्यातून केंव्हाच निघून गेला होता. पण कोर्टाच्या निर्णयानंतर परिस्थिती उलटी झाली होती. मानसी हे घर सोडून जाणार होती आणि मिहीर मनिषाला घेउन त्यात नव्याने रहायला येणार होता. घरासाठी केलेल्या कष्टाची, मेहनतीची आठवण करीत मानसी विषण्ण अवस्थेत बसली होती.

शेवटचे तीन दिवस... होय... मानसीचे त्या घरातले शेवटचे तीन दिवस राहिले होते. आणि त्या तीन दिवसांत काय काय करायचे , त्यानंतर कुठे जायचे वगैरे सर्व गोष्टींचे मानसीने अगदी व्यवस्थित प्लॅनिंग केले होते. अगदी थोड्याच वेळात बरीच कामे करायची होती. बघता बघता वाढत गेलेला सामानाचा पसारा आता आवरायची वेळ आली होती. हे “आवरणे” हाच एक कामाचा डोंगर होता.

कुठेतरी सुरूवात करायलाच हवी असा विचार करीत तिने हॉलपासून सुरवात केली. पण त्यात तिचे स्वत:चे किंवा जे ती बरोबर नेणार होती असे फारसे काही नव्हते. गाडी पटकन पुढे बेडरुमकडे वळली. तिथे मात्र दागिने, साड्या आणि अन्य वस्तू भरपूर होत्या.

प्रवासाला वापरल्या जाणा-या बॅगा रिकाम्या करून तिने हळूहळू सर्व सामान भरले. नाही म्हणता म्हणता त्या चार मोठ्या बॅगा पूर्ण भरुन गेल्या आणि त्या बाहेर आणून ठेवेपर्यंत २ - ४ तास कसे गेले, ते तिचे तिलाच कळले नाही. घड्याळात वाजलेले दोन आणि पोटाची हाक या दोन्हीचा परिणाम.. काम थांबले.. जेवण , स्वतःच केलेलं आणि कोणाची साथ नसतांना घेतलेलं... त्यात जिभेच्या चोचल्यांपेक्षा उदरभरणाचा हेतूच जास्त होता. ते संपता संपताच तिने स्वयंपाकघरावर चौफेर नजर टाकून अंदाज घेतला व थोड्याच वेळात उरलेली आवराआवर संपवली. अगोदरच बाहेर आलेल्या चार बॅगांबरोबर एक पाचवी बॅग येऊन उभी राहिली.

संध्याकाळचे सहा वाजत आले होते. जराही विश्रांती न घेता सकाळपासून केलेले काम, धावपळ यांनी मानसी पुरती थकून गेली होती. मदतीला आलेली लक्ष्मीही थोडी विसावली. तिला थांबायला व चहा करायला सांगून ती बाथरुममध्ये जाऊन फ्रेश होऊन आली. चहाचे घुटके घेता घेताच तिने सर्व आढावा घेतला आणि काम पूर्ण झाल्याचा समाधानाचा निःश्वास टाकला. एक टेन्शन संपले होते कारण सामान नेण्यासाठी माणसे रविवारी सकाळी ७ वाजताच येणार होती. रात्रीचे जेवण लवकरच आवरुन तिने सर्व बॅगांना व पिशव्यांना नावाचे आणि वर्णनाचे टॅग लावून , समाधानाने बिछान्यावर अंग टाकले.

दुसरा दिवस.. .. सकाळपासून सुरु झालेली धावपळ जवळपास चार वाजता संपली. सर्व सामान हलवून , जपून व्यावस्थितपणे टेंपोत गेले. सगळ्याचा हिशेब ठेवतांना मानसीची दमछाक झाली. लक्ष्मी आणि गंगारामची मदत होती म्हणून, नाहीतर हे सर्व निभावणे तिला एकटीला शक्यच नव्हते. गंगारामला सामानाबरोबर पाठवून ती ही लक्ष्मीसह टॅक्सीने गेली. घर रिकामे रिकामे करण्यासारखेच , नवे घर भरणे , सामान लावणे तितकेच त्रासदायक झाले होते, पण “झाले एकदाचे” म्हणत दोघींनी हुःश केले.

तिसरा आणि शेवटचा दिवस... सामान, वस्तू कमी झाल्यामुळे त्यातली भकासता वाढली होती. पण ठीक आहे, आजचाच दिवस अशी मनाची समजूत घालत मानसी नित्याचे व्यवहार करत होती. कुणाकुणाशी फोनवर बोलत होती. घरात सगळीकडे वावरतांना मधेच थबकून आठवणीत हरवून जात होती. पण जाणा-या प्रत्येक तासागणिक तिचे मन अधिकाधिक घट्ट होत होते. ठरवलेल्या सर्व गोष्टी काटेकोरपणे पहात ती मनाची जास्त तयारी करत गेली.

दुपारच्या विश्रांतीनंतर तिन्हीसांजेची वेळ कशी आली ते कळलेच नाही. तिचा सर्वात आवडता पदार्थ, कोळंबीची भाजी वा उसळ आणि कॅव्हीअरचे सार, यांचा भरपूर आस्वाद घ्यायचा असे ठरवूनच तिने तशी तयारी केली. आपल्या आवडत्या , नेहमीच्या सवयीतल्या डायनिंग टेबलवर मेणबत्तीच्या प्रकाशात आणि मंद संगिताच्या साथीने तिने आपले डीनर संपवले. तरिही राग, निराशा, भविष्याची चिंता, भूतकाळच्या आठवणी, सगळ्यांनीच आलेली एक अस्वस्थता.... तिला जेवण नीटसे गेलेच नाही.

शांतपणे आवराआवर करतांनाच तिला एक विलक्षण कल्पना सुचली. उरलेल्या कोळंबीचे तुकडे तिने कालवणात भिजविले. स्वतःच मोठ्या आवडीने आणलेले पडदे काढले. कालवणात भिजविलेले कोळंबीचे तुकडे तिने पडद्याच्या पोकळ दांड्यांमधे भरून व्यवस्थित बंद केले. हाँल, बेडरुमसह अगदी मधल्या दरवाजांना लावलेले सर्वच पडदे काढून तिने त्यात “मसाला” भरला व परत जागच्याजागी लावून ठेवले. कसल्यातरी एका वेगळ्या आनंदाने, समाधानाने मग सर्व स्वयंपाकघर आवरुन ती सोफ्यावर निवांत बसली. स्वतःच्याच कल्पनेवर खूष होऊन पुढे होणा-या परिणामांचे विचार करुन तिचे डोळे चमकत होते.

रविवार सकाळ.. सर्व आवरुन नव्या घरी जाण्यासाठी मानसी तयारच होती. अपेक्षेप्रमाणेच मिहीर मनिषाला घेऊन आला. चेह-यावर खूप आनंद. त्या आनंदाची कारणे आणि छटा वेगळ्या असल्या तरी एकंदरीत प्रचंड उत्साह दिसत होता. मानसीपासून सुटून मनिषाचा सहवास मिळाल्याचा आनंद तर मिहीरला गटवून या घरावर आपली सत्ता होणार या कल्पनेने मनिषा खूष.

फारसे काही न बोलता त्यांच्या हातात चाव्या देऊन आणि अत्यंत निर्विकारपणे , केवळ औपचारिकतेचे एक कृत्रिम स्माईल देऊन, अजिबात मागे वळून न पहाता मानसी टॅक्सीत जाऊन बसली.

..............................................


नव्या घराच्या आनंदात काही दिवस गेले. पण जुने घर आवरणे, वस्तूंची जमवाजमव कायद्याची कागदपत्रे वगैरे करता करता इतका वेळ जात असे की की नविन गृहप्रवेशाचा दिवस पुढे पुढेच जात होता. शेवटी जसे असेल तसे असे ठरवून शुक्रवार पासून नव्या घरी जायचे नक्की झाले.

..

शुक्रवार संध्याकाळ, शनिवार आणि रविवारचा विक एन्ड कसा साजरा करायचा याचा विचार करतच मनिषाने कुलुप काढले आणि दार उघडून ती आत शिरली. दिवसभराचा थकवा...हाश हुश करीत पर्स फेकत ती सोफ्यावर विसावली. गेल्या काही दिवसातील धावपळ, ताणतणाव यांनी थकली होती..

 विचार करता करता , अचानक तिला कसलीतरी जाणीव झाली. कसलातरी कुबट, घाण वास तिला जाणवू लागला. दिवसभर घर बंद असल्यामुळे असेल कदाचित, असे म्हणून तिने सर्व खिडक्या, दारे सताड उघडली. फ्रेश हवा यावी म्हणून सर्व पंखे चालू केले. आणि पसरलेले घर आवरण्यास सुरवात केली. थोड्याच वेळात मिहीरही आला. आल्या आल्याच त्यालाही काहीतरी वेगळे असल्याची जाणीव झाली. तो कुबट, नकोसा वास येताच त्याचेही तोंड थोडे वाकडे झाले. पण फारसा विचार न करता तो तडक फ्रेश होण्यासाठी बाथरुमधे शिरला.

“मग, आज काय करायचे, आपला हा पहिलाच विक एन्ड आहे?” मिहीर.

“अरे पण हा वास पाहिलास का कसला येतोय, फारच उग्र आहे. मला तर काही सुचतच नाहीये..”. मनिषा.

“ असेल ग, जाईल थोड्या वेळाने”

“आपण असे करुया, आज डिनर बाहेरच घेऊया. तूही थकली असशील. लेट अस एन्जॉय” मिहीर.

स्वयंपाकाला सुट्टी आणि बाहेरचे डिनर.. मनिषाने कल्पना ताबडतोब उचलून धरली. पाचच मिनिटात दोघेही कुलुप लावून घराबाहेर पडले.

डिनर घेऊन रात्री ११ वाजता दोघे परतली. पण कुलुप उघडतानाच दोघांनाही तो उग्र दर्प जाणवला. प्रथम त्यांनी त्याकडे दुर्लक्षच केले आणि पलंगावर अंग टाकले.

“हा वास फार त्रासदायक आहे रे, मला तर घुसमटल्यासारखे होत आहे.”

“अग पण आता एवढ्या रात्री काय करणार ?”

“नाही रे, मला तर झोपच येणार नाही.”

“ठीक आहे, एक काम करूया. मी सगळीकडे एअर फ्रेशनर मारतो आणि खिडक्या उघडतो. ग्रिल आहे , त्यामुळे तसा धोका नाही.” बोलत बोलत मिहीर उठला आणि ते काम करतच त्याने पुन्हा अंथरुणावर अंग टाकले.

सकाळ झाली. मनिषाला नेहमीपेक्षा लवकरच जाग आली. पण... वातावरणात पहाटेच्या हवेची प्रसन्नता नव्हती. तो घाण कुबट वास गेला नव्हता आणि तिला ते irritate व्हायला लागले होते. थोडा वेळ वाट बघून तिने मिहीरला उठवले. त्यालाही तो वास आणि मनिषाची अस्वस्थता जाणवली. त्याची तीव्रताही वाढत असल्याचे त्याला जाणवले.

“काहीतरी कर बाबा, भयानक आहे हा वास”

“अग पण कालच आपण फ्रेशनर मारला होता. काहीच परिणाम झालेला दिसत नाहीये.”

“ठीक आहे, मी जरा फ्रेश होतो आणि मग काहीतरी करतो. तोपर्यंत तू जरा फक्कडसा चहा कर”

थोडे स्थिरस्थावर झाल्यावर मिहीर उठला. 

“आपल्याकडे दोन दिवसाचा विक एन्ड आहे. आपण आधी सर्व साफसफाई करून घेऊया. नाहीतरी तसे पाहिले तर मानसी एकटीच रहात होती. फारसा वावर नसल्यामुळे एक प्रकारचे घुसमट वातावरण झाले असेल. काम पडेल, पण नाईलाज आहे.” मिहीर.

मनिषालाही ती कल्पना आवडली. दोघेजण कामाला लागली. छतावरील जळमटे काढण्यापासून ते सर्व खोल्यातील जमिन Dettol ने धुण्यापर्यंत, तर जुने कपडे भांडी काढून टाकणे, किचनमध्ये / फ्रीजमधे साठलेले पदार्थ फेकणे, अगदी सर्व त्यांनी केले. मदतीला लक्ष्मी, गंगाराम होतेच. मनासारखी स्वच्छता झाल्यावर त्यांना थोडे बरे वाटले.

 शनिवार सगळा त्यातच गेला. संध्याकाळी थोडे फिरुन आल्यावर त्यांनी अंदाज घेतला. पण छे, दुर्गंधी कमी झाल्याचे कोणतेच लक्षण दिसत नव्हते. मग दुस-या दिवशी त्यांनी पेस्ट कंट्रोल करायचे ठरवले. त्याप्रमाणे माणसे बोलाविली. त्यांनाही परिस्थितीची कल्पना देऊन योग्य ती उपाययोजना करण्यास सांगितले. त्याचवेळी प्लंबरला बोलावून सर्व ड्रेनेज साफ करण्यात आले. वाळवी किंवा चुकून कुठे मेलेला उंदीर वगैरे... सर्व सर्व चेक करण्यात आले. रविवारही त्यात गेला. पण नाईलाजाने तेही सोपस्कार पुरे करण्यात आले. पेस्ट कंट्रोलचे काम चालू असतांनाच हॉलमधले कारपेट, सोफाकव्हर वगैरे सर्व काढून त्यांनी ते लॉंड्रीत धुवावयास टाकले, आणि संध्याकाळी गेल्या दोन दिवसांप्रमाणेच बाहेर डिनर घेऊन दोघं रात्री उशीरा परतली.

मिहीर आणि मनिषा. दोघेही नोकरी करत होते. त्यामुळे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत दोघेही बाहेरच असत. घरी आल्यावर कसेबसे जेवण करुन पलंगावर अंग टाकत. आठवडाभर असाच गेला. दुर्गंधी मात्र तशीच. पुन्हा एकदा शनिवार आल्यावर पाहू असे करत त्यांनी दिवस काढले. शेवटी पेपरमधल्या जाहिराती आणि विविध हितचिंतकांचे सल्ले घेऊन त्यांनी घराला गँस ट्रिटमेंट देण्याचे ठरविले. संपूर्ण घर बंद करून जंतुनाशक गँसचा फवारा आणि नंतर एअर फ्रेशनर अशी ती किचकट प्रोसेस होती. नाईलाजाने त्यांनी तीही करून घेतली. त्यासाठी त्यांना दोन दिवस मिहीरच्या मित्राकडे जाऊन रहावे लागले.

 सोमवारी मित्राच्या घरूनच परस्पर ऑफिसला जाऊन मिहीर मनिषाची जोडी संध्याकाळी आपल्या घरी परतली. आता आपला प्रॉब्लेम नक्कीच संपला असेल अषी आशा, नव्हे त्यांनी जवळ जवळ खात्रीच होती. पण कुलूप काढून दार उघडताच त्यांची घोर निराशा झाली. अक्षरशः हताश होऊन आपापली पर्स / बँग फेकतच दोघे सोफ्यावर पडली.

“इतके उपाय करुन काहीच कसा परिणाम नाही?”…. मनिषा.

“आपण तर कुठलाच उपाय करायचा बाकी ठेवला नाहीये.”.. मिहीर.

“काहीच कळेनासे झालंय”

दिवस जात होते. निराशा वाढत होती. वैतागाला, त्रासाला अंत नव्हता. नव्या घराची पार्टीही झाली, पण परतणा-या प्रत्येकाच्या चेह-यावरचा त्रासिकपणा लपला नव्हता. हळूहळू पाहुण्यांची वर्दळ कमी झाली. घरकाम करणारी लक्ष्मीही नोकरी सोडून गेली. किरकोळ दुरुस्तीसाठी येणा-या माणसांनीही कामास यायला नकार दिला. त्या असह्य दुर्गंधीने दोघांची तब्येतही बिघडू लागली. सर्दी, खोकला, मळमळ आणि पोटाचे विकार यांनी दोघंही जर्जर झाली.

“हे सगळं असह्य होतंय रे”

“अग पण काय करणार”

“अरे आज तीन महिने झाले”

“ आपल्याला काहीतरी निर्णय घ्यायलाच हवा. मी नाही आता इथे राहू शकत.”


हो ना करता करता विषयावर खूप विचार , चर्चा झाली. शेवटी घर विकून दुसरीकडे जाण्याचा निर्णय पक्का झाला. इस्टेट एजंटसना पाचारण करण्यात आले. पहिल्यांदा काहीजण आले पण... परिस्थिती बघितल्यावर तेही येईनासे झाले. सहाजिकच किंमत कमी करावी लागली. पण ती अर्ध्यावर आणूनही त्यांना खरेदीदार मिळेना. बातमी पसरत गेली आणि परिस्थिती इतकी वाईट झाली की एकही एजंट त्यांच्या फोनला उत्तर देईना. शेवटी अक्षरशः नाईलाजाने बँकेकडून अव्वाच्या सव्वा व्याजदराने प्रचंड कर्ज घेऊन त्यांनी नविन घर घेतले.

अचानक... फोन घणघणला. पलीकडे मानसीचा आवाज.

“कोण, मिहीर कां ?”

“हो, बोल मानसी.” आवाज ओळखून मिहीरने थेट उत्तर दिले. “कशी आहेस ?”

“काही नाही रे, सहज फोन केला. आपल्या जुन्या घराची मला खूप आठवण येते आहे. तुमचं कसं काय चाललं आहे ? रुळलात का आता ?”

... आणि इतके दिवसांचा झालेला त्रास, कंटाळलेल्या मिहीरने तिच्यासमोर भडाभडा ओकला. ती भयाण दुर्गंधी, त्यांनी त्यासाठी केलेले उपाय... सर्वच. कुठेतरी मन मोकळे करायले मिळाल्याने न राहवून मिहीर बोलतच गेला. मानसी मात्र शांतपणे सर्व ऐकत होती. संभाषणात थोडा pause मिळाल्यावर

 “खरं सांगू मिहीर, मला मात्र आपले घर अजूनही तेवढेच प्रिय आहे. त्यातल्या प्रत्येक वस्तूचे, गोष्टीचे एक प्रकारचे नातेच असल्यासारखे वाटते आहे.”

थोडे थांबून ती मग म्हणाली,

“मिहीर, माझा एक प्रस्ताव आहे. तू हवं तर त्यावर विचार कर. मनिषालाही विचार. तुमची हरकत नसेल तर आणि दोघांची तयारी असेल तर, मी ते घर विकत घ्यायला तयार आहे. पण किंमत मात्र थोडी समजूनच सांग. माझी आर्थिक परिस्थिती काही फार चांगली नाही. पण जीव आहे रे त्या घरावर, वास्तूवर. त्यासाठी थोडा ताण सोसायचीही माझी तयारी आहे.”

क्षणभर मिहीर विचारातच पडला. तोपर्यंत मनिषाही बाजूला येऊन बसली होती. “ठीक आहे, आम्ही जरूर विचार करू. पण मला थोडा वेळ दे. नंतर मी तुला फोन करतो,” असे म्हणून त्याने फोन ठेवला. मनिषाबरोबर चर्चा करण्यासाठी त्याला थोडा वेळ हवा होता.

एकंदरीत अचानक आलेल्या या प्रस्तावाने दोघंही आश्चर्यचकीत झाली. थोडीशी कल्पना दिली असली तरी ते घर, त्यातली दुर्गंधी, त्यांचे असफल प्रयत्न याचे गांभीर्य मानसीला पूर्णतः माहित नसावे अशी अटकळ बांधत त्यांनी तिला घर विकण्याचा निर्णय घेतला.

“ठीक आहे, आम्ही तयार आहोत., आणि तसे पाहिल्यास आम्हांलाही आता पैशाची गरज आहे.”

“तुमची काय अपेक्षा आहे? आणि स्पष्टच सांगायचे झाले तर, मोठ्या रोख रकमेपेक्षाही आपल्या पोटगीच्या करारातील रकमेत थोडी सूट द्यायला मी तयार आहे.”

“किती ?”

“पन्नास टक्के. मला स्वखर्चाला थोडीतरी रक्कम शिल्लक पडली, म्हणजे बरे पडेल.”

उलटसुलट प्रस्ताव आणि चर्चा झाल्यावर शेवटी सुमारे रोख ५ लाख आणि अर्धी पोटगी यावर एकमत झाले. घराच्या वास्तविक बाजारभावापेक्षा ही रक्कम खूपच कमी होती. पण ही कटकट कायमची जाईल आणि मिळणा-या पैशांमुळे आर्थिक चणचण कमी होईल या विचाराने तो सुखावला. अक्षरशः बुडत्याला काडीचा आधार होता तो. पैशांच्या व्यवहाराबरोबरच सर्व सामान, फर्निचर घेऊन जाण्यासही मानसीने मान्यता दिली होती. मानसीला सर्व गोष्टी त्यातील गांभीर्यासहीत कळण्याअगोदरच, अजिबात वेळ न घालवता सर्व पूर्ण करण्याचे ठरवूनच त्याने भांडारकर वकिलांना फोन केला.

 रविवार असूनही मिहीरच्या आग्रहाखातर भांडारकर वकिलांनी घाईगर्दीने व्यवहारासाठी लागणारे योग्य कागदपत्र ताबडतोब तयार केले. त्याच दिवशी मिहीरने संध्याकाळी मानसीला भेटायला बोलावले. एकवार कागदपत्रांवर नजर टाकून आणि अटींची पूर्तता होत असल्याचे पाहून मानसीने त्यावर सही केली. दुस-याच दिवशी सोमवारी कोर्टात जाऊन त्यावर कायदेशीर शिक्कामोर्तब झाले.

सुमारे ८-१० दिवसानंतर ठरलेल्या वेळेस मानसी घराचा ताबा घेण्यास हजर झाली. सर्व सामानाची आवराआवर करून मिहीर-मनिषा तयारच होते. Movers & Packers ची माणसे टेंपो घेऊन आली होती. हळूहळू सर्व सामान भरले गेले. काही राहिले नाही ना वगैरे पहातांना दोघांची तारांबळ उडाली होती. मानसी मात्र सर्व शांतपणे पहात दरवाजात उभी होती.

 अचानक काहीतरी आठवून मिहीर परत आत आला. सर्व पडदे ठेवलेले एक पँकेट तसेच राहिले होते. 

“अरे, पण आपण हे पडदे लावणार कसे ?” मनिषा. “ आपण त्याच्या दांड्याही घेऊन जाऊया.” संमतीसाठी मिहीरने मानसीकडे पाहिले. एक छानसे स्मित करत मानसीने फारसे आढेवेढे न घेता होकारात्मक मान डोलावली, आणि त्या अखेरच्या दोन गोष्टीही टेंपोत गेल्या. परस्परांचा निरोप घेऊन दोघे निघाली. जाणा-या टेंपोकडे पहात मानसीने पुन्हा एकदा स्मितहास्य केले. तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. !!!!!!


Revenge of an Ex-Wife ( From the book Short Stories by Mr Roald Dahl )

या मूळ कथेचा कल्पनाविस्तार


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama