STORYMIRROR

uday joshi

Comedy

3  

uday joshi

Comedy

सा.. रे...ग...म...प..

सा.. रे...ग...म...प..

17 mins
9

वानखेडे स्टेडियम अगदी खचून भरले होते. मुंगीलाही आत शिरायला जागा नव्हती. (आपल्या जुन्या म्हणीप्रमाणे) . ५० हजाराची क्षमता असलेल्या त्या मैदानात सर्व मिळून १ लाखाच्याहीवर डोकी असावीत. आत येण्याचे सर्व दरवाजे बंद केले होते. आणि तरीही मिनिटागणिक वाढणा-या गर्दीचा रेटा इतका जबरदस्त होता की कुठले गेट केंव्हा कोसळेल याची शाश्वती नव्हती. सुरक्षारक्षक, पोलिस, राखीव दल, सर्वांची उपस्थितीही त्या गर्दीला आवर घालण्यास असमर्थ वाटत होती. तिकीटाच्या खिडक्या गेल्या दोन दिवसांपासून बंदच होत्या. त्यावरही मोठ्या आशेने येणा-या लोकांचे थवे आदळून परत जात होते. काळ्या बाजारात दसपट किंमत सांगूनही हातातील तिकीटे क्षणार्धात नाहीशी होत होती. आणि विक्रेत्यांचे खिसे नोटांनी ओसंडून वहात होते. तिकीटासाठी झालेली झुंबड इतकी भयंकर होती की दोन तीन काळाबाजारवाले आपण चेंगरले जाऊ या भितीने जीव वाचविण्यासाठी सैरावैरा पळत सुटले. “सर सलामत तो पगडी पचास” म्हणीप्रमाणे केवळ जीव वाचविणे हेच एक ध्येय ठरवून ते वाट फुटेल तिकडे पळत जात होते.

अनावर झालेल्या आणि क्षणाक्षणाला वाढणा-या गर्दीने एका बाजूला मरीन ड्राईव्हचा रस्ता अगदी समुद्रापर्यंत व्यापला होता तर दुस-या बाजूला असलेली रेल्वेची वहातूक पूर्णपणे ठप्प झाली होती. चर्चगेटच्या दिशेनेही गर्दी वाढतच होती, तर जवळच्याच चार-पाच जिमखान्यांमध्येही तुडुंब गर्दी झाली होती. भारत पाकिस्तान क्रिकेट किंवा हॉकी सामना, एखादा प्रचंड गाजलेला ऑर्केस्ट्रॉ, लोकप्रिय नेत्याची निवडणूक सभा, सिनेमा नाटकातील सेलिब्रेटींचा सहभाग असलेला करमणूकीचा कार्यक्रम..... या सर्वांना होणारी गर्दी ही आजच्या या गर्दीपुढे अगदीच कमी.. नगण्य...कःपदार्थ किंवा चिल्लर वाटावी अशी परिस्थिती होती.

 “हाऊसफुल्ल” कार्यक्रम, काळाबाजाराचे अवास्तव, न परवडणारे दर, गर्दीतील धक्काबुक्की वगैरे सर्व गोष्टींना कंटाळलेल्या, त्रासलेल्या, वैतागलेल्या आणि तरीही इरेस पेटलेल्या काही महाभागांनी मग आपला मोर्चा आजूबाजूंच्या इमारतींकडे वळविला. बाल्कनी, गच्ची यापैकी कुठेतरी जागा मिळेल असा विचार करत काहीजण तिथेही घुसले. बिल्डींगच्या सुरक्षारक्षकांचा प्रतिकार मोडून त्यांनी गच्चीचा ताबा घेतला तर काही शूरवीर ( शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचे वंशज असावेत ) पाण्याच्या पाईपवरून वर चढले आणि मिळेल त्या बाल्कनीत प्रवेश करते झाले. काही बिल्डींमधल्या लोकांनी तर चाणाक्षपणे संधी साधून प्रवेशासाठी पैसेही घेतले.

ही अशी गर्दी होणार, प्रवेश दुरापास्त होणार हे अगोदरच जाणलेल्या लोकांनी तर बरोबर दुर्बिणी आणल्या होत्या. ( हे खरे Professional प्रेक्षक ) सोहळा लांबून बघावा लागल्यास दुर्बिणीचा खूपच उपयोग होणार होता!!

“महाअंतिम सोहळा”

होय!. आज महाअंतिम सोहळा होता. टिव्हीवर गाजत असलेल्या सा.. रे… ग… म.. प... कार्यक्रमाचा. आजची ही अंतिम फेरीची स्पर्धा निवडक सहा स्पर्धकांमध्ये त्यांच्या कलेचा, कौशल्याचा, निग्रहाचा, धाडसाचा कस पहाणारी होती.

पण तरीसुध्दा... केवळ गायनकलेच्या स्पर्धेसाठी अशी अभूतपूर्व गर्दी.... कल्पनाच करवत नव्हती. कुठल्याही निकषाने या गर्दीची कारणमीमांसा करणे कठीण वाटत होते. सर्व तर्कवितर्कांना बाजूला करत केवळ एकच कारण त्याला पुरेसे होते. ... ही स्पर्धा सर्वसामान्य ( ? ) गायक कलाकारांची नव्हती. आपल्यातही प्रचंड सुप्त कलागुण (?) आहेत आणि त्यायोगे मी ही स्पर्धा जिंकणारच असे मानणा-या जगावेगळ्या ( योग्य अयोग्य, तालबध्द किंवा बेताल, सुरात किंवा बेसूरपणे कसेही असो,... स्वतःला एक कलाकार समजणा-या, सिध्द करू पहाणा-या , आणि प्रसिध्दीची हौस असणा-या ) स्पर्धकांची ती कसोटी होती.

लहान मुले, उत्साही तरूण, साठीनंतरचे हौशी गायक अशा सर्व Reality Show नंतर आजचा हा सोहळा त्यावर कळस ( की कहर ? ) होता. आजचे पर्व होते.....

“महाअंतिम सोहळा.... बाथरूम सिंगर्स...”

गेले सहा महिने चालू असलेल्या या स्पर्धेचे नियमही आगळेवेगळे होते.


स्पर्धकाने गायनविषयक कोणतेही शिक्षण घेतलेले असता कामा नये.कोणतेही गाणे संपूर्ण म्हणता कामा नये. उलट चुकीचे शब्द, चाल, ताल वगैरे गोष्टींकडे विशेष लक्ष असावे. पण मुद्दाम चूक केली तर बाद करण्यात येईल. सर्व हालचाली सहाजिक, उस्फूर्त व नैसर्गिक असल्या पाहिजेत.स्पर्धकांना कोणत्याही पारंपारिक वाद्यांची किंवा वादकांची साथ नसेल. फक्त कसले तरी ढँण ढँण आवाज उदा. कड्या वाजविणे, पत्र्याच्या बादलीचा आवाज नळाच्या किंवा शॉवरच्या पाण्याचा आवाज वगैरेंचीच स्वनिर्मित साथ संगत घेत आपली कला सादर करायची होती.स्पेशल इफेक्टसाठी समान वाटणा-या दोन तीन गाण्यांचे शब्द मिसळण्यास परवानगी आहे.अगदी हौशी कलाकाराच्या रुपातही कोणत्याही गायनाच्या कार्यक्रमात भाग घेतलेला असता कामा नये.आवाजातील भेसूरपणा, सुटलेला ताल, विसरभोळेपणा वगैरेलाही योग्य ते महत्व दिले जाईल. पण त्यात नैसर्गिक आविष्कार हवा. कोणतेही हावभाव ओढूनताणून करू नये.मर्यादित स्वरुपात अंगविक्षेपास हरकत नाही. पण त्यातून अश्लीलता डोकावता नये...................... आणि तत्सम बरेच काही नियम..


या आगळ्या वेगळ्या स्पर्धेत खूप जणांनी भाग घेतला. प्रचंड मेहनत, (?) संगिताची जाण,(?) शब्द-सुरांचा अनोखा मिलाफ(?) याचा संगम असलेल्या या सर्वातून शेवटी निवडक सहा जणांची वर्णी लागली होती. त्यांच्यामध्येच आता अंतिम स्पर्धा रंगणार होती.

 अंतिम सोहळ्याच्या आयोजकांनीही अपार, जीवापाड मेहनत घेतली होती. स्टेडियममध्ये मध्यभागी एक मोठे स्टेज उभारले होते. त्यावर येणा-या प्रत्येक स्पर्धकासाठी पारदर्शक काचा असलेले स्नानगृह तयार करण्यात आले होते. त्यात थंड, गरम, कोमट पाणी, मिक्सर, विविध प्रकारचे साबण, शांपू यांचीही आकर्षक मांडणी करून ठेवण्यात आली होती. टॉवेल, कपडे लटकविण्यासाठी हूक, हँगर, स्टील रॉड वगैरे योग्य जागी लावले होते. साध्या नळांपासून ते विविध प्रकारची कारंजी उडविणारे शॉवरही लावले गेले होते. प्रायोजकांकडून जाहिरातीचा भरपूर निधी मिळाल्याने या सर्व गोष्टींमध्ये आयोजकांनी कोणत्याही प्रकारे कसूर ठेवली नव्हती.

प्रेक्षकांसाठीही वेगवेगळ्या प्रकारची आसनव्यवस्था होती. जवळ , लांब, साधी खुर्ची, सोफा, फँमिली केबिन, वगैरे. आणि अर्थातच त्यांचे चढत्या भाजणीतले तिकीटाचे दर. Entrance पासून तर रेड कार्पेट... मुख्य स्टेडियमच्या बाहेरही भरपूर गर्दी होणार याचा अंदाज बांधूनच ब-याच ठिकाणी प्रोजेक्टर / भव्य स्क्रीन यांची व्यवस्था झाली होती. आणि त्यामुळेच अगदी दूरदूर समुद्रापर्यंत पसरलेल्या मानवी सागराला तो सोहळा “याची देही याची डोळा” पहाता येणार होता. गेल्या महिनाभरात टीव्ही कंपन्यांनी तर आजवरचे विक्रीचे सर्व उच्चांक मोडत नवे शिखर गाठले होते.

स्पर्धकांच्या नियमावलीबरोबरच परिक्षकांसाठीही गुण देण्याच्या पध्दतीचे काही खास निकष ठरविण्यात आले होते. कोणत्या गोष्टीसाठी किती व कसे गुण द्यावे वगैरे सर्व नियमबध्द केले गेले होते.


गीताची मूळ चाल - तशीच ठेवली, चुकली, मुद्दाम चुकविली याचे निरीक्षणताल सूर यांचा समन्वय – आहे की नाही.. काही वैशिष्ठ्यपूर्ण तानाPause घेण्याची जागा -- योग्य की अयोग्यश्वासावरचा कंट्रोल त्यातील अनियमितता , त्याने होणारी दमछाक इत्यादी.आवाजातला गोडवा / भसाडेपणा, विविध प्रकारे वळणारा सूर (किरटा पुरषी , बायकी किंवा स्पर्धकानुसार)आवाजातली थरथर ( कंप म्हणणार नाही )गीताचे मूळ शब्द, स्वतःचे घुसडलेले शब्द , त्यामुळे बदलणारा गीताचा अर्थ ...संगिताची / गाण्याची मूलभूत आवड (?) प्रकट होते आहे की नाही ( हौसेला मोल नाही हेच खरे मानावे )स्नानगृहातून बाहेर पडल्यावर स्पर्धक तसेच गायचे धाडस करेल का ही गोष्ट परिक्षकांनी न सांगता ओळखली / जोखली पाहिजे.स्नानगृहाबद्दल .. आकार, एकूण जागा, सर्वसोयी यांचा उपयोग कसा करावा हे गाण्यातून दाखविले गेले पाहिजे.अंगावर पडणारे पाणी व त्यावरची प्रतिक्रिया, कपड्यांचे भान बादली , नळ, शॉवर की बाथटब...आंघोळीची पोझ ( उभ्याने, बसून, )साबण, शांपू वगैरेचा उपयोग, या सर्व गोष्टींमुळे आवाजात होणारे बदल (उदा.. थंड पाण्याचे कापरं, अती गरम पाण्याचा चटका / किंचाळी, डोळ्यात गेलेला साबण या सर्वांचे demonstration परिस्थितीनुसार स्पर्धकाने करणे आवश्यक आहे.……………………………………

अखेर रात्री ८ वाजता ठरलेल्या वेळेवर सोहळा सुरु झाला. पडदा उघडताच स्टेजवरील भव्य दिव्य दिमाखदार सजावट रोषणाई पाहूनच उत्स्फूर्त असा टाळ्यांचा कडकडाट झाला. मुख्य निवेदक समोर आल्यावर त्याचेही जोरदार स्वागत झाले.

 “हजारो लाखोंच्या संख्येने आलेल्या प्रेक्षकवर्गास विनम्र अभिवादन करीत सादर करत आहोत.... “सा.. रे.. ग.. म..प.., बाथरुम सिंगर्स” चा महाअंतिम सोहळा. ज्या दिवसाची आपण सर्व आतुरतेने वाट पहात होता तो दिवस अभूतपूर्वच आहे. या सोहळ्याचा प्रत्येक क्षण आपण सर्वजण म्हणजेच आयोजक, स्पर्धक, परीक्षक आण रसिक प्रेक्षक जगणार आहोत, अनुभवणार आहोत. चला तर मग, परीक्षकांच्या परवानगीनंतर स्पर्धा सुरु करुया.”

“सर्वात प्रथम आपल्यासमोर येत आहे , पुरुष गटातून चैतन्य घोटाळे. टाळ्यांच्या गजरात त्याचे स्वागत करुया.”

निवेदकाने थोडक्यातच प्रस्तावना आवरत स्पर्धेला सुरुवात केली.

आपल्याच तंद्रीत डुलत डुलत चैतन्य आला. टॉवेल कपडे वगैरे डाव्या हातावर टाकत काहीतरी गुणगुणतच तो आत शिरला. बाथरुमचे दार त्याने सवयीनुसार ओढून घेतले. ( पण प्रत्यक्षात ते पारदर्शक होते.) दरवाजा बंद होताच त्याचा व्हॉल्यूम वाढला.

“तू कोणत्या प्रकारात / शैलीत गाणे सादर करणार आहेस?” .. निवेदक.

“मी शॉवर बाथ प्रकारात माझे कलागुण सादर करणार आहे....” चैतन्य.

( स्पर्धकांसाठी शॉवर बाथ, टब बाथ, किंवा बादली हे तीन पर्याय उपलब्ध होते.)

टॉवेल कपडे जागेवर ठेवून त्याने शॉवर सुरु केलाआणि गुणगुणतच तो पुढे सरकला. “घन घन माला नभी दाटल्या ...” या शब्दांबरोबरच थंड पाण्याचे थेंब अंगावर पडल्याने त्याने मधेच चित्कार केला. थरथराट... आणि हातपाय झटकून सावरत असतानांच प्रेक्षक आणि परीक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली. एका हाताने साबण शोधत त्याने गाणे चालू ठेवले, पण पुढचे शब्द न आठवल्याने स्वतःचेच काहीतरी घुसडले. ... लगेच परीक्षकांकडे त्याची नोंद झाली. साबण अंगावर फिरवतांना होणा-या त्याच्या लयबध्द हालचालींप्रमाणेच त्याचे सूरही गरगर फिरत होते , खालीवर होत होते, गटांगळ्या खात होते. शॉवरच्या धारा अंगावर घेतच “कोसळती धारा” म्हणत त्याने ते पुढे रेटले. कोसळती धारा म्हणतानांच त्याच्या हातातला साबण सटकला आणि तो पकडण्याच्या नादात त्याने पुढचे “आ., आ.. आ..” ( मूळ गाण्यातले ) अगदी सहजच पकडले. दोन चार प्रयत्नात साबण मिळाला पण त्या गडबडीत त्याने त्या “.. आ.. आ.. आ..” च्या दोन नविन स्टाईल नकळतच पेश केल्या. शॉवरमधून चालू असलेल्या थंड पाण्याच्या स्पर्शाने  “केकारव” करीतच त्याने आंघोळ केली. मधेच ट्रँक सोडून “बरस बरस तू मेघा रिमझिम..” च्या ओळी आठवून त्याने त्याचाही उध्दार केला. ( ट्रँक बदलल्याचे कसब अर्थातच परीक्षकांनी नोदवून घेतले.) साबणाचा भरपूर फेस करुन आंघोळीचा मनमुराद आनंद घेत त्याने शॉवर मोठा केला आणि त्याचवेळी “रुक जाना नही ...” म्हणत बाल्या डान्स केला.

शॉवर बंद करुन एक गिरकी घेत त्याने टॉवेल पकडला, पुढचे वस्त्र परिधानाचे कर्तव्य पार पाडले आणि एकंदरीत फ्रेश होऊन तो बाहेर पडला. “गाण्याने श्रम वाटतात हलके” या उक्तीचा फायदा घेत दिवसाचे अतिमहत्वाचे कार्य आटोपून तो बाथरुमच्या बाहेर पडला.

अपेक्षेनुसार “शिट्ट्या” व “टाळ्यां”चा कडकडाट झालाच.

“चैतन्यच्या धमाकेदार सुरवातीनंतर आपल्यासमोर येत आहे, महिला गटातील प्रथम स्पर्धक, चेतना हिंगोळे.... स्पर्धेच्या सुरवातीपासून तो आता अंतिम फेरीपर्यंत आपल्या खास शैलीने प्रेक्षकांची मने जिंकत तिने केलेला प्रवास अभूतपूर्वच. दिल थामके.. श्र्वास रोखून... आणि टाळ्या शिट्ट्यांच्या कडकडाटातच तिचे स्वागत करुया.....” निवेदक.

आणि खरोखरच चेतनाचे न भूता न भविष्यति असे स्वागत झाले.

बाथरुम सिंगर चेतना आता आपले कोणते कसब दाखविणार या उत्सुकतेपायी प्रेक्षकवर्गाने माना उंचावून , चीत्कार करत तिचे स्वागत केले. “बाथरुम” या शब्दाचाही त्यामध्ये मोठा हात होता. कारण रसिक प्रेक्षकवर्गाबरोबरच आंबटशौकिनही तेथे उपस्थित होते. काय ऐकायचे (?) आणि काय बघायला मिळणार ह्या विचारांचाच तो परिणाम होता. केवळ अश्र्लील चित्रपटांपेक्षा जितेजागते जिवंत सौंदर्य पाहत नेत्रसुख घेण्याच्या विचारांमुळेच ती उत्सुकता शिगेला पोचली होती.

चेतनाचे गाणे आणि ते सुध्दा ,Live.,. लाखो, हजारो प्रेक्षक श्र्वास रोखून पहात होते. त्या संपूर्ण प्रसंगाचे चित्रण करण्यसाठी असंख्य मोबाईल उंचावले गेले होते. रात्रीची वेळ असल्याने ते सर्व मोबाईल अगणित काजव्यांप्रमाणे दिसत होते.

“अंतिम स्पर्धेत तुझे खूप खूप स्वागत... आज तू कोणत्या पध्दतीचे गीत सादर करणार आहेस?....” निवेदक.

“मी आज बाथ-टब स्टाईलमधले गीत सादर करीत आहे.”

“अरे वा, तुझी वेशभूषा त्याला अगदी साजेशी दिसते आहे. शिवाय तुझा आत्मविश्र्वासपूर्ण चेहरा बरेच काही सांगत आहे. अगदी पूर्ण तयारी करुन आली आहेस वाटतं..”

“हो, मी या प्रसंगासाठी खूप मेहनत घेतली आहे. घरी, हॉटेलमध्ये तसेच वेगवेगळ्या आकाराच्या बाथटबमध्ये सराव केला आहे. त्यातही गरम/थंड पाणी, गुलाबपाकळ्या खास शॉवर अशा विविध वातावरणात मी स्वतःला आजमावून पाहिले आहे..... चेतना.”

“तुला खूप शुभेच्छा”

एक गोड स्मितहास्य करुन , प्रेक्षकांना हात उंचावून अभिवादन करीत चेतनाने बाथरुममध्ये प्रवेश केला.

“इन्ही लोगोंने ... इन्ही लोगोंने, ले लिया दुपट्टा मेरा” या गाण्याने सुरवात करीतच चेतनाने आपला दुपट्टा खुंटीवर टांगला आणि त्याचबरोबर असंख्य शिट्ट्या, टाळ्या , उसासे अशा सर्व प्रकारच्या आवाजात प्रेक्षकांनी तिला प्रतिसाद दिला. बाथरुम, त्यातील टब आणि त्याच्या एका बाजूला असलेले विविध प्रकारचे नळ पाहून ती जरा बुचकळ्यातच पडली. पण लगेच स्वतःला सावरत तिने एकेक नळ सोडून पाणी गरम आहे की गार वगैरे गोष्टी चेक केल्या. अचानक एक नळ फिरवल्यावर डोक्यावर पाण्याच्या धारा पडताच तिला तेथे शावर असल्याची जाणीव झाली. तरीही अनपेक्षिपणे झालेल्या वर्षावाने ती दचकली आणि सहजच “ऊई मा रे ऊई मा , क्या हो गया,” गाण्याची तान तिच्या गळ्यातून बाहेर पडली. गरम व गार पाण्याचे मिश्रण योग्य होण्यासाठी तिने मिक्सरचे सेटींग केले व टब भरण्यास सुरवात केली. “रिमझिम गिरे सावन”, “अब के सजन सावनमे”, वगैरेच्या ताना मारत ती “भिगी भिगी” रातोंमे च्या वळणावर पोचली. प्रत्येक गाण्याला, तानेला (?) आणि सुराला (?) प्रेक्षकांची विविध प्रकारची प्रतिक्रिया येत होती. संगिताचा असा आनंद घेत असतानाच तिने एकेका वस्त्राला रजा द्यायला सुरुवात केली. प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोचली होती पण हुशार चेतनाने ते कपडे असे टांगले की बहुतेकांची निराशाच झाली. तोपर्यंत टब भरत आला होता, अंगावरच्या किमान कपड्यांनिशी चेतनाने त्यात शिरण्यासाठी पाउल उचलले... पण... दुर्दैव तिचे.. दुसरा पाय उचलून टबमधे शिरताना तिचा तोल गेला , प्रयत्न करुनही स्वतःला सांभाळता न आल्याने ... ती धाडकन पडली. पाय टबवर आपटले आणि भरलेल्या टबच्या पाण्यात शिर्षासन केलेल्या अवस्थेत पडून तिचे डोके काठावर आपटले. एक अस्फुट किंकाळी तिच्या तोंडून बाहेर पडली.

प्रथम कोणालाच काही कळले नाही. चेतनाची थांबलेली हालचाल आणि खोल गेलेला तिचा आवाज ऐकल्यावर काहीतरी वाईट घडल्याचे जाणवले. तेथे तैनात असलेल्या मदतनीसांनी धाव घेऊन चेतनाला बाहेर काढले. पण उभे रहाण्याच्याही स्थितीत नसलेल्या चेतनाला शेवटी त्यांनी स्ट्रेचरवर ठेवले. अर्थातच “रिटायर्ड हर्ट” स्थितीत चेतनाला स्पर्धा सोडावी लागली.. पण त्याही परिस्थितीत तिने “ये क्या हुआ…” म्हणत प्रेक्षकांना अभिवादन करीत निरोप घेतला. 

चेतनाला झालेल्या दुर्दैवी अपघातामुळे सगळेचजण हळहळले. पण show must go on या वाक्याप्रमाणे किंवा त्या ब्रीदाला जागत पुढे जायचे या इराद्याने एका जाहिरातीच्या ब्रेकनंतर निवेदक माईक घेउन हजर झाले.“मंडळी, स्पर्धेच्या दुस-या भागात आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत.”“स्पर्धेतील रंगत वाढविण्याच्या विचाराने हा दुसरा भाग सादर करतांना आम्ही एक नाविन्यपूर्ण कल्पना मांडली आहे. या वेळी पुरुष व महिला विभागातील एकेक स्पर्धक एकाच वेळेस आपले सादरीकरण करतील. अर्थातच दोघांनाही स्वतंत्र बाथरुम देण्यात येत आहे. त्यांची कला एकाच वेळी सादर होत असले तरी बाकी सर्व नियम सारखेच आहेत. या वेळी त्यांना Duet म्हणजे युगुल गीत गाण्याची सुसंधी आहे.”“चला तर मग, जोरदार टाळ्यांनी आपल्या पुढील स्पर्धकांचे स्वागत करुया... मिहीर आणि मोनिका.”

“मिहीर, तुझे स्वागत. तू कोणती पद्धत वापरणार आहेस ?”“Direct नळाखाली किंवा शॉवरखाली, पण वेळ पडल्यास मी बादलीही वापरेन. फक्त मला टब आवडत नाही. ती पद्धत भारतीय नाही. ( थोडी अस्वच्छताही वाटते.) जीभ चावतच तो म्हणाला. शिवाय नदी, विहीर किंवा पोहण्याच्या तलावात धाडकन उडी अथवा सूर मारता येतो, तसे बाथटबमध्ये करता येत नाही.”“बरोबर, तर एकंदरीत तू मानसिक दृष्ट्या व परिस्थितीचा अभ्यास, अशी पूर्ण तयारी करूनच आलेला दिसतोयस. तुला खूप शुभेच्छा”

“आणि तुझे ग काय मोनिका”“मिहीरप्रमाणेच मलाही टब आवडत नाही. अर्थात बायकांच्या बाबतीत नदी, विहीर अशा जागा आता थोड्या धाकादायकच आहेत. आम्हां गोपिकांना बघायला इथे असंख्य कृष्ण आलेले आहेत. पण तरीही आतल्या बाजूस CC-TV न लावण्याची काळजी घेऊन आयोजकांनी आमची सुरक्षितता जपली आहे. त्याबद्दल त्यांना धन्यवाद”“तू अगदी मिष्कील आहेस, पण स्पष्टही बोलतेस. आवडलं आम्हाला”.... निवेदक.“तुलाही खूप खूप शुभेच्छा”एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी हात मिळवतानाच “अभी ना जाओ छोडकर” ची तान मारुन मिहीरने बाथरुमचा दरवाजा उघडला आणि “आज फिर जीने की तमन्ना है” ची लकेर सोडत मोनिकाने बाथरुम मध्ये एन्ट्री घेतली.दरवाजा बंद करुन वस्त्रांशी फारकत घेतानाच मिहीरने मोनिकाले साद घातली. बादली नळाखाली सरकवत त्याने पाणी सुरु केलं आणि बाकी साबण तांब्या इत्यादी जागेवर असल्याचे पाहून घेतले. संगिताची मूळची आवड असल्याने पत्र्याच्या बादलीत पडणा-या पाण्याच्या आवाजावरच त्याने “हुं हुं, हा हा” करत नाचही सुरु केला.“आई...ई.. ला, या बादलीचा आवाज मस्तच आहे. माझ्या गाण्याला झकास background music .. मजाच आहे.”… मिहीर.ठआजा आजा मैं हूँ प्यार तेरा,,ठ आपल्या भसाड्या आवाजात त्याने सुरवात केली... आणि त्याचवेळी तिकडून मोनिकाने “मैं आई.. आई.. आई.. म्हणत प्रतिसाद दिला.दोघांच्या या प्रसंगावधानावर परीक्षकही जाम खूष झाले.मधेच ट्रक बदलत शॉवर चालू करुन मिहीरने “रिमझिम झरती श्रावणधारा” चालू केले. त्याबरोबरच नळ आणि शॉवरकडे बघत “रुक जाना नही” अशी विनंती केली. तर तिकडे “मोकळ्या केसात माझ्या तू जीवाला गुंतवावे” म्हणत मोनिकाने प्रतिसाद दिला. तिच्या किरट्या , किन-या आवाजाने गाण्याची पुरेशी वाट लावली.. पण आजच्या स्पर्धेची तीच तर main theme होती. शास्त्रीय, प्रथितयश आणि सुरेल गायकांना तिथे पूर्ण मज्जाव होता.!!!“च्यायला..” “अरे बापरे..” दोघांच्याही तोंडून एकाच वेळी आलेले हे उच्चार ऐकून निवेदकांसकट संपूरेण प्रेक्षकवर्गाचे तिकडे लक्ष गेले. काय झाले हे कळायला थोडा वेळ लागला... पण नंतर सर्वजण प्रचंड हास्यात बुडुन गेले. टिपीकल चाळीतील प्रसंगाप्रमाणे नळाला पाणी येत नसल्याचे सर्वांना कळून चुकले. “आ.. आ.. आजा... आ.. आ.. आजा” करत मिहीरने आपली विनंती सुरु ठेवली. अर्धी झालेली बादली, संपूर्ण अंगभर साबणाचा फेस आणि नळ आणि शॉवरमधून थांबलेले पाणी यांच्या कडे असहाय्यतेने बघत .... त्याही अवस्थेत “अरे जलराजा , कल नहीं आया, आज तो आजा...” म्हणत प्रेक्षकांची वाहवा मिळविली. “मोनिका, ओ माय डार्लिंग” म्हणत त्याने तिला मदतीसाठी हाक दिली.“अरे, मला तर त्या Le Sancy साबणाच्या एका जुन्या जाहिरातीची आठवण जाली. मिहीर सारख्याच परिस्थितीत असलेल्या एका खट्याळ मुलाला त्याची आई बाहेरुन ओरडून सांगत असते,. “राहुल , मैंने कहा था ना, पानी चला जाएगा..” परीक्षक.तिकडे मोनिकाची अवस्था याच्या अगदी उलट होती. “अरे हाय हाय ये मजबूरी” गाण्याने सुरुवात करत तिने केस मोकळे सोडले, शांपू लावला. मग नळाची धार थोडी बारीक करत तिने बाजूला असलेला heart shaped साबण सर्वांगावर फिरवायला सुरवात केली. भरपूर फेसामुळे तिच्या चित्तवृत्ती थोड्या उल्हसित झाल्या आणि तिने “सावन का महिना” गुणगुणत सर्वांना पावसाची आठवण करुन दिली. साबणप्रक्रिया पूर्ण झाल्यावर तिने पुन्हा नळाला हात घातला... पण हाय रे दैवा, साबण जागेवर ठेवतानांच तिच्या हातातून तो सटकला... त्याचे दोन तुकडे झाले. पण प्रसंगावधानी मोनिकाने “दिलका खिलौना हाए टूट गया” म्हणत प्रेक्षकांची पसंती मिळविली. बादलीतले साठलेले पाणी अंगावर घेऊन तिने आपला स्नानाचा कार्यक्रम आटोपता घेतला आणि ती नळ बंद करायला गेली. पण तिथेही वैताग.. वॉशर गेलेल्या त्या नळाचे पाणी बंदच होईना. तेवढ्यातच “गंगा आली रे अंगणी” असा सूर मारत आणि त्यापुढेही जाऊन नाईलाजाने “रुक रुक रुक, अरे बाबा रुक” अशी आर्जवे करत ती बाथरुमच्या एका कडेला जाऊन उभी राहिली.आयोजकांनीच मग दोघांना बाहेर यायला सांगितले आणि दुरुस्तीसाठी स्वयंसेवक दोन्ही बाथरुममध्ये घुसले.मिहीर आणि मोनिकाच्या या मजेदार , उत्स्फूर्त, गडबडीने भरलेल्या , भसाड्या ...वगैरे सादरीकरणाला परिक्षक व प्रेक्षक, दोघानीही कौतुकाची पावती दिली.

जाहिरातीचा ब्रेक संपल्यानंतर “या तिस-या आणि अंतिम भागात आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. आपल्यासमोर आता येत आहे………….सोनम पागोळे.”...निवेदक.“सोनम , आतापर्यंतचा तुझा प्रवास फारच Sensational झाला आहे. फँशन आणि संगीत (?) यांचा अलौकिक संगम साधत तू आता अंतिम फेरीत पोचली आहेस. काय वाटतंय आता”“मी खूप उत्सुक आहे. पण थोडेसे टेन्शनही आहे.“का बरं”अहो साहजिकच आहे. अंतिम फेरीसाठी जय्यत तयारी करुन आले असले तरी प्रत्यक्षात आपला Performance कसा होईल याची थोडी धाकधुग असतेच. पण हरकत नाही, नक्कीच आज सर्वौत्तम सादरीकरण करुन स्पर्धा जिंकायचाच माझा मानस आहे.”“तुझा आत्मविश्र्वास तुझ्या बोलण्यातून आणि देहबालीतून जाणवतोच आहे. तुला खूप खूप शुभेच्छा” सोनमच्या एन्ट्रीलाच टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. पूर्ण तयारीनिशी आलेली सोनम फक्त टॉवेल गुंडाळलेल्या अवस्थेत समोर आली. प्रेक्षकांनी तिचे अर्थातच जंगी स्वागत केले. असंख्य शिट्ट्या, उसासे “हाय हाय” वगैरे ऐकतच तिने बाथरुममध्ये प्रवेश केला.आत शिरल्यावर तिने प्रथम आंघोळीच्या सर्व सामानावर एक नजर टाकली. तिने मग सर्व नळ चालू बंद केले आणि सुरळीत असल्याची खात्री करुन घेतली. ( मोनिका आणि मिहीरच्या अडचणी पाहिलेल्या असल्यामुळे ) थोडा विचार करुन आपला मोर्चा तिने टबकडे वळविला व त्यात पाणी भरण्यासाठी नळ चालू केले. गरम थंड असे मिश्रण करत योग्य तपमान झाल्याची खात्री करुन घेतली.थोड्याच वेळात टब भरत आले. तिथे ठेवलेल्या तांब्याने थोडे पाणी अंगावर घेत शुभारंभ केला. आपल्यावर रोखलेल्या असंख्य नजरांची जाणीव असूनही , अत्यंत शिताफीने टॉवेल बाजूला करत तिने टबमधे प्रवेश केला. सोबतच “हाय हाय ये मजबूरी...” म्हणत तिने थोडी नाखुशीच व्यक्त केली.( कदाचित एवढ्या लोकांसमोर स्नान करण्याची मजबूरी )एक छानशी डुबकी मारत तिने केस भिजविले. फक्त डोके पाण्याबाहेर ठेवून हात लांब करत तिने शांपूची बाटली उचलली आणि केसांना मसाज करत भरपूर फेस केला. टबच्या पाण्यातही साबण वापरुन तिने पुन्हा भरपूर फेस केला. मोनिकाने तोडलेला साबण एकवार बघत तिने मग “टूटे हुए दिलसे…” म्हटले आणि “दिल तोडनेवाले, तुझे दिल ढूंढ रहा है” म्हणत मोनिकावर कडी केली. खट्याळपणे मग आपले पाय पाण्याच्या आतबाहेर करत गायला सुरवात केली. “आज मैं ऊपर, आसम नीचे” च्या तालावर एकाआड एक एक पाय खालीवर करत प्रेक्षकांच्या दिलाची धडकन वाढविली. तिच्या सर्व अँक्शन अक्षरशः फिल्मी स्टाईलने चालू होत्या. मराठी हिंदी गाण्यांची वाट लावत असतांनाच तिने “हल्दी और चंदनके गुण सँवारे, फंटूश, फंटूश,” किंवा “मेरी कांती के लिये” वगैरे जाहिरातगाण्यांचा, जिंगल्सचाही उद्धार केला. ( बहुधा साबण, शांपू कंपन्यांकडून स्पॉन्सरशिप मिळाली असावी)रंगात आलेल्या त्या प्रसंगावेळी अखेरीस व्हायचे तेच झाले. इतकी काळजी घेऊन , सुसज्ज व्यवस्था करुन आणि प्रत्येक बारीक सारीक तपशील तपासून पाहिलेला असूनही, नेमक्या मोक्याच्या क्षणी विजेने गायब होऊन लर्वांना अंधारात बुडवून टाकले. मिट्ट काळोखात मग फक्त मोबाईलच्या काजव्यांचाच प्रकाश होता. पण तोही अपुराच होता. आयोजकांची धावपळ, प्रेक्षकांच्या शिव्या,... परीक्षक आणि स्पर्धकांची अवघडलेली अवस्था... गोंधळ.. कोलाहल.... आणि नेमक्या याच संधीचा फायदा घेत सोनमने आपली आंघोळ संपविली, सर्व कपडे परिधान करुन ती बाथरुमबाहेर आली आणि प्रेक्षकांना अभिवादन करत असतांनाच विद्द्युल्लतेचे आगमन झाले.


 पुन्हा एक जाहिरातींचा ब्रेक..रात्रीचे बारा वाजत आले होते. आतापर्यंत पाच कलाकारांनी आपली बाथरुम सिंगिंगची कला (?) सादर केली होती. तोडीसतोड performance करीत प्रत्येकाने विजेतेपदाच्या स्पर्धेत रंगत आणली होती. त्यांनी दाखविलेल्या विविध काला () गुणांनी परीक्षकही कोड्यात पडले होते. अगदी अर्धा, पाव किंवा त्यापेक्षाही कमी गुणांचा फरक आल्यामुळे विजेतेपद कोणाला मिळणार याचा अंदाज करता येत नव्हता. अतिशय एकाग्रतेने, बारीक सारीक नोंदी करत आणि पुन्हा पुन्हा अवलोकन करत परीक्षक गुणांची गोळाबेरीज करत होते.

“रसिक प्रेक्षकहो, आतापर्यंत तुमच्यासमोर आलेल्या पाच स्पर्धकांना तुम्ही दिलेली दाद अवर्णनीयच. तुमच्या या भक्कम पाठिंब्यावरच हा सर्व कार्यक्रमाचा डोलारा उभा आहे. आपण आता शेवटच्या टप्प्यापर्यंत आलो आहोत. आजचा अखेरचा स्पर्धक, संदीप पावसकर याला आम्ही आता मंचावर... नव्हे , बाथरुममध्ये आमंत्रित करीत आहो. जोरदार टाळ्यांनी त्याचे स्वागत करुया.”खरंतर सर्व सोयी असूनसुद्धा नेहमीच्या सवयीप्रमाणे एका खांद्यावर टॉवेल आणि दुस-या खांद्यावर आंघोळीनंतरचे कपडे टाकून संदीप हजर झाला. ( बाकी सर्व अवतार म्हणजे सलमान खान आणि दादा कोंडके यांचे कॉम्बिनेशन...वरचा भाग सलमान खान आणि दादांची ट्रेडमार्क हाफ चड्डी )संदीप, आतापर्यंतच्या तुझ्या प्रवासात तू खरोखरच वेगवेगळ्या छटा दाखविल्या आहेस. आज काही खास तुझी आवडती पद्धत कोणती .... निवेदक.“मी आज नक्की काहीच ठरविले नाहीये. जसे सुचेल तसे. अर्थातच मी अगदी नैसर्गिकरित्या, सहज मनात येईल त्याप्रमाणे एखादी पद्धत वापरेन, पण त्याहीपेक्षा तिन्ही प्रकारांमध्ये काय काय रंग भरता येतील ते पहाणार आहे....” संदीप..“तुला खूप खूप शुभेच्छा ....”  निवेदक.बाथरुममध्ये प्रवेश करुन संदीपने मग टॉवेल, अन्य कपडे खुंटीवर टांगले.“ला .. ला... ल ल्ल... ला” करत त्याने आपल्या आवाजाची झलक दाखवली. मग काय वाटले कुणास ठाऊक, --- त्याने टबमधे पाणी भरण्यासाठी तिथले नळ सोडले आणि त्याचवेळी एक बादली घेऊन त्यात दुस-या नळाची धार सोडली. अर्धी भरलेली बादली उचलून त्याने ती डोक्यावर उपडी केली. त्या थंड पाण्याने हुडहुडी भरुन “ऊहु..हु..हु” असा चित्कार केला. बादली तोंडावर घेत मेहबूबा गाण्याची तान मारत पुन्हा “ऊहु..हु..हु” आवाज केला. उपड्या बादलीत तो आवाज घुमला आणि एक वेगळाच अनुभव त्याने श्रोत्यांना दिला.पाण्याची थोडी सवय होऊन थंडी कमी झाल्यावर त्याने अंगाला साबण लावला व अगदी डोक्यापासून पायापर्यंत भरपूर फेस केला. वेगवेगळ्या ताना मारत तो अंग घासू, चोळू लागला. फेसाचे फुगे उडवतच तो त्यांच्याशी खेळू लागला. ... आणि अशाच एका आनंदी पण गाफील क्षणी फेस त्याच्या डोळ्यात गेला. डोळे चोळत चोळतच तो नळ बंद करायला पुढे सरसावला आणि टबला धडकून आत पडला. नशिबाने तोपर्यंत टब भरत आले असल्याने त्याला कोणतीही शारिरीक झखम झाली नाही. मात्र त्याच्या वजनाने टबमधले पाणी उसळून सर्व बाथरुमभर पसरले. पुन्हा एकदा “गंगा आली रे अंगणी” हे गाणे वापरतच त्याने पाणी ओतत अंगावरचा व डोक्याचा साबण काढून टाकण्यास सुरुवात केली. सर्वत्र पसरलेल्या आणि वरुन पडणा-या पाण्यामुळे त्याला फारसे कष्ट पडले नाहीत.या सर्व प्रकारात प्रेक्षक आणि परीक्षक यांची चांगलीच करमणूक झाली. त्याला संदीपच्या एकमेवाद्वितीय आवाजाची आणि संगित-ज्ञानाची (?) जोडही लाभली. सर्व आटोपून मग प्रसन्नचित्ताने, हसतमुख चेह-याने बाहेर येऊन त्याने सर्वांना लवून मुजरा केला.


“रसिक प्रेक्षकहो, सर्व स्पर्धकांचे सादरीकरण आता संपले आहे. वेळ आली आहे ती निकालाची.. आपली उत्सुकता अधिक न ताणता मी आता परीक्षकांना त्यासाठी मंचावर आमंत्रित करत आहे आणि त्याचवेळी सर्व स्पर्धकांना आपापल्या बाथरुममधे जाऊन पुन्हा एकदा तो प्रसंग उभा करण्याची विनंती करतो” ... निवेदक.तीनही परीक्षकांचे मंचावर आगमन झाले. पुन्हा एकदा हातातल्या गुणपत्रिकांवर नजर टाकत त्यांनी विजेत्यांची क्रमवार यादी केली. सर्व प्रेक्षकांना अभिवादन करत आणि आयोजकांचे आभार मानत परीक्षकांनी निकालवाचनास सुरवात केली.“मंडळी आजच्या या स्पर्धेला दिलेल्या या प्रचंड प्रतिसादाबद्दल आम्ही आपले आभार मानतो.”“ही स्पर्धा अतिशय चुरशीची झाली याबद्दल शंकाच नाही, आणि त्यामुळेच विजेता ठरविणेही आम्हांला खूपच जड गेले. सर्वांनीच तोडीस तोड performance केला वा दिला आणि प्रत्येकजणच बक्षीसपात्र आहे. तरीही स्पर्धेच्या नियमानुसार एक विजेता घोषित करणे क्रमप्राप्त आहे...”

“चैतन्यचा performance खूप सुंदर झाला. विषयाची व प्रसंगाची त्याची समज आणि सादरीकरणही छानच होते.”

“चेतना गुणी आहे, तिनेही सादरीकरण उत्कृष्ट केले, पण तिच्या दुर्दैवाने अपघात झाला आणि नाईलाजाने तिचे गुण कमी करावे लागले.”

“मिहीर आणि मोनिका यांनीही भरपूर मेहनत घेतल्याचे जाणवत होते. त्यांचा performance नक्कीच कौतुकास्पद होता. पण परस्परपूरक सादरीकरणासाठी अधिक कल्पकतेची गरज होती.”

“सोनम आणि संदीप यांच्यात जोरदार टक्कर झाली. गाण्याबरोबरच पेहरावातली सजगता, कल्पकता त्यांनी दाखविली. एखाद्या अटीतटीच्या सामन्यात खेळतानाचा competitiveness आणि सावधता यांचा सुरेख संगम त्यांनी दाखवला. प्रसंगावधान हा त्यांच्या सादरीकरणाचा आणखी एक विशेष.”

Pin Drop Silence असलेल्या त्या वातावरणात थोडा pause घेत, पुन्हा एकदा हलक्या आवाजात एकमेकांशी बोलत, परीक्षकांनी पुढे सुरवात केली.“अंतिम विजेता जाहीर करतांना आम्हांला अत्यंत आनंद होत आहे....” पुन्हा एक Long Pause….“आपल्या गायलकलेबरोबरच(?) पेहरावातली कल्पकता, वावरण्यातली सहजता आणि तिन्ही पद्धतींचे मिश्रण करुन सादरीकरण करणारा.... संदीप पावसकर...”निकाल ऐकताच...स्पर्धक, प्रेक्षक, आयोजक सर्वांच्या टाळ्या, अभिनंदनाचा वर्षाव, सुरु झालेली रोषणाई पहातच टबमधे पहुडलेल्या संदीपने स्वर्ग गवसल्याच्या आनंदात “या...हू...,”ची आरोळी ठोकली आणि स्वतःची , कपड्यांची ( नसलेल्या ) पर्वा न करता तो “जिंकलो, जिंकलो” म्हणत “आर्किमिडीज” प्रमाणे टब बाहेर येऊन धावत सुटला.


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy