संप
संप
अगतिकता , आशाळभूत पणा
नेहमी प्रमाणे सकाळी ८ वाजता ८३, ८४ च्या बस थांब्यावर उभा होतो . बस ची वाट पाहता पाहता आजू बाजूला नजर गेली. ५० - ६० माणसांचा जमाव दिसला . हातात मोठे फलक , झेंडे घेऊन असलेल्या त्या माणसांच्या मनात एक अस्वस्थता जाणवत होती .चेहेर्यावर कसलीतरी चीड असावी. सहजच विचार करता करता वर्तमानपत्रातली बातमी आठवली . आजपासून गिरणी कामगारांचा संप चालू झाला होता. समोरची गर्दी तीच होती. हळू हळू संख्या वाढत होती. थांब्यासमोर इंदू मिल होती. मिलचे कामगार जमा झाले होते. सुमारे १० मिनिटातच जवळपास १०० एक कामगारांचा जमाव दिसू लागला . तेवढ्यात बस आली आणि मी पटकन बस पकडली .
,...
दुसरा दिवस
..
आजही कालच्याप्रमाणेच मोठा जमाव....
आज त्यांनी घोषणा देण्यास सुरुवात केली होती.
मिलच्या दरवाज्यासमोर एका फलकावर संपाची कारणे लाल अक्षरात लिहिली होती.
बाजूलाच दुसर्या फलकावर कामगार नेत्यांचे फोटो हा रा सहित. पलिकडे थोड्या अंतरावर मिलच्या मालकांचे व व्यवस्थापकांचे फोटो. त्याखाली त्यांचा निषेध.
अरे , बस आली..
..
..
तिसरा दिवस
तसाच घोळका. तेच फलक . तेच फोटो.
पण आज समोर काही खुर्च्या आणि त्यावर पांढर्या कपड्यात काही उग्र चेहरा असलेली माणसे. बहुधा नेते मंडळी असावीत.
अरेरे, बस आली.
....
....
पुढचा दिवस
जमाव, नेते , कालच्या सारखेच .
अचानक एक नेता उठून उभा राहिला . कोणीतरी त्याच्या हातात माईक दिला. हातात माईक आल्यावर थोडे पुढे सरसावत, हाताच्या बाह्या वर सरकवत , घसा खरडवून त्याने सुरुवात केली.
माझ्या प्रिय कामगार बंधू आणि भगिनीनो , आज आपल्या संपाचा चौथा दिवस आहे. पूर्वी सांगितल्याप्रमाणे हा बेमुदत संप आहे. आपल्या मागण्या मान्य होई पर्यंत हा लढा चालूच ठेवायचा आहे. .....
बस आली..... आता उद्या पाहू काय हात ते असा विचार करत मी बसमध्ये चढलो. पण दोनच दिवसावर आलेल्या सुट्टीच्या दिवशी या संपाच्या सर्व बातम्या वाचायच्या असे ठरवून टाकले .
पुढचे दोन दिवस असेच गेले .
कामगारांच्या घोषणा, नेत्यांची भाषणे , संपाचे फलक , मिलचा बंद असलेला बुलंद दरवाजा, सारे सारे तेच .
...
रविवारी सुट्टी. सोफ्यावर अजगरासारखा पसरून पेपर चाळत होतो. हो , संप . पगारवाढ , अधिक सोयी सुविधा , कामाच्या वेळात बदल, अधिक प्रवासभत्ता , इत्यादी नेहमीच्याच मागण्या वाचनात आल्या. त्या जरा अवज्वीच वाटत होत्या. गिरणी मालक वाटाघाटी साठी तयार असूनही , प्रश्न सामोपचाराने न सोडविता बेमुदत संप करण्याचा निर्णय पटत नव्हता. भडक भाषणे करून नेते फक्त कामगारांना चिथाव त होते. पेपर मधील बातम्या वाचून मन उगीचच खट्टू झाले. पाहूया पुढे काय होते असे म्हणत मी पेपर ठेवून दिले.
...
...
आणखी काही दिवस तसेच गेले. सरकार, गिरणी मालक, आणि कामगार नेते आपला हट्ट सोडत नव्हते आधी संप मागे घ्या मगच मागण्यांचा विचार करू अशी मालकांची भूमिका तर मागण्या संपूर्ण मान्य झाल्याशिवाय संप मागे घेतला जाणार नाही हा नेत्यांचा हट्ट . कोणीही मागे हटायला तयार नव्हते. पेपरमध्ये सर्वच येत होते पण पगार बंद होऊन दिवसच्या दिवस जात होते. त्याची झळ कामगारांना बसत होती . मालक आणि नेते यांना काहीच सोयर सु तक नव्हते.
....
सुमारे एक महिना झाला असेल. रोज सकाळी बस थांब्यावर दिसणारे ते दृश्य तसेच होते. गर्दीतल्या लोकांच्या चेहऱ्यावर आता थोडी चिंता दिसू लागली होती. जाणारा प्रत्येक दिवस त्यांच्या खिशाचा खड्डा मोठा करत होता. साठविलेली पुंजी हळू हळू कमी होत होती. एकीकडे भर भक्कम पगारवाढीची आशा , सुखी भविष्याच्या रंगविलेल्या कल्पना , स्वप्ने पुरी होण्याच्या आशा , तर दुसरीकडे संपणारे पैसे , लांबट गेलेला, चिघळत चाललेला संप , ताठर सरकारी भूमिकेने वाढत जाणारी निराशा. ...
...
रोज त्याच बातम्या, तीच चिथावणारी भाषणे, घोषणा, आणि तेच सरकारी इशारे, .....
संपवाले हळू हळू सर्वसामान्य जनतेची सहानुभूती सुद्धा गमावत चालले होते. मुंबईच्या धकाधकीच्या जीवनात , प्रत्येकाला स्वताची काळजी अधिक. चुकणारी बस, लोकल, होणारे खाडे , घर आणि ऑफी स मधली विविध tension स, या मधून अन्य गोष्टींसाठी कोणाकडे वेळच नव्हता.
...
हळू हळू मिलच्या गेट वरची गर्दी कमी हो
ऊ लागली. घोषणांचा जोर, त्यातील उत्साह कमी झाला. ७५ - १०० ऐवजी आता २५-३० माणसेच राहिली. नेते मंडळी एक एक करत गायब झाली होती. उरले होते स्थानिक पुढारी आणि काही उत्साही मंडळी....
.....
.....
...
ती उरलेली २५_३० माणसे , आता ओळखीची वाटू लागली होती. म्हणजे कमीत कमी त्यांचे चेहरे लक्षात राहिले होते.
पण...
जाणार्या दिवसागणिक त्या चेहऱ्यावरील भाव मात्र बदलत असल्याचे जाणवू लागले. ते पाहण्याचा एक छंद , मला नकळत जडला होता. ...
संपाचा आज १०० वा दिवस!!
,..
समोर एक १० जणांचा घोळका. नित्य नियमाने मिलच्या गेटवर जमून संपाची गाडी रडत खडत चालू ठेवणारे तेवढेच मावळे आता दिसत होते.
१०० व्या दिवसानिमित्त फलकाला हार घातलेला होता.
नेत्यांचा जयजयकार, व्यवस्थापनाचा धिक्कार, झिंदाबाद, मुर्दाबाद , सर्व रीतीप्रमाणे झाले आणि मंडळी चक्क खाली बसली. आता बहुतेक बैठा संप !!!!
...
त्यातील एकाने खिशातून पत्ते काढले. गेटसमोर बसूनच मेंढीकोट चा डाव सुरु. ....
...
आणखी काही दिवस लोटले....
घोषणा, फलक लेखन , आणि नंतर पत्ते ठरलेल्या क्रमाने चालू होते. ..
संपाचा आजचा .... दिवस...रोज फक्त आकडा बदलण्याचे काम कोणीतरी करत होते...
..
..
ह्या शेवटच्या १०-१५ लोकांचे चेहरे आता मला जवळ जवळ पाठ झाले होते. त्यावरील चिंता, निराशा आता स्पष्ट जाणवत होती. गायब झालेल्या नेत्यांचा उदो उदो बंद झाला होता. सुरवातीला मोठ्या संख्येने जागरूक पहारा देणारे पोलीसही आता फक्त ३-४ च उरले होते. दंगल, गडबड, किंवा दगडफेकीचे प्रकार व्हायची शक्यता उरलीच नव्हती . त्यामुळे ते हवालदारही पत्त्याचा डाव बघत वेळ काढत होते. रोज त्याच त्याच लोकांकडे पाहून , नकळत होणारे निरीक्षण यामुळे काही गोष्टी लक्षात येऊ लागल्या. मावळलेला उत्साह , वाढणारी निराशा याबरोबरच त्यांचे बदलणारे वेषही आता नजरेला जाणवू लागले. सुरवातीला अगदी स्वच्छ, टाप टिप असलेले कपडे , बूट इत्यादी साग्रसंगीत असायचे. दर आठवड्याला अगदी नवे नाही पण इस्त्रीचे. हळू
त्यात बदल होऊ लागला. इस्त्री गेली, polish नसलेले किंवा सोल फाटलेले बूट , वगैरे.
...
..
..
मेंढीकोट खेळणारे मेम्बर आता ४-६ च राहिले. वेश गबाळा होत चालला होता. बुटांची जागा चपलेने घेतली होती. शर्ट पेंट तीच तीच असल्याचे लक्षात येऊ लागले. ...
...
उतरती कळा .... खाली खाली जात च होती.
संप मिटण्याची जराही आशा शिल्लक नव्हती. मागण्या , त्यातील अट्टाहास कमी करून, थोडे नमते घेऊन काही करावे तर नेते मंडळी गायब होती. आपल्या प्रतिष्ठेचा बाऊ करत, स्वताचा इगो सांभाळण्यासाठी कामगारांना वार्यावर सोडून नेते अदृश्य झाले होते.
...
...
मेंढीकोट बंद झाला .
...
गेटवर येणारी माणसे फक्त हजेरी लावून जाऊ लागली. संपाच्या दिवसाचा आकडा बदलतानाच हताश चेहेर्याने , पाय ओढत निघत होती. पुढे काय? हा प्रश्न सर्वाच्याच चेहेर्यावर ठळकपणे दिसत होता. ...
निरीक्षण करता करता एक गोष्ट माझ्या लक्षात आली. संप मिटेल, मिल पुन्हा सुरु होईल, रोजी रोटी चालू होऊन पुन्हा चांगले दिवस येतील हि आशा बाळगणारे हे लोक साधारणपणे ४५ च्या आसपास वय असलेले होते. ज्या वयात माणूस संसारात पुरेसा गुंतलेला असतो, स्वत बरोबरच कुटुंबियांची काळजी करण्यात मग्न असतो, जेंव्हा नोकरीच्या सुरक्षिततेची चिंता नसते , तेंव्हा अचानक आलेल्या संकटाने गांगरून जातो. दुसरी नोकरी मिळणे कठीण नवीन काही शिकून घेण्यासाठी पैसा कुठून आणावा हि चिंता आणि पोटापाण्यासाठी स्वतंत्र व्यवसाय सुरु करण्यात येणाऱ्या असंख्य अडचणी यांनी चक्रावून जायला होते.
तरुण लोक नव्या नोकरीच्या शोधात गेले ( असावेत ) निवृत्तीच्या जवळ असलेले लोक बहुधा जमा असलेल्या पुंजीवर उर्वरित आयुष्य कसे घालवायचे याचा जमा खर्च मांडत होते.
...
..
पण या मधेच सापडलेल्या मध्यम वयाच्या लोकांना काहीच सुचत नव्हते.
..........
अगतिकता, आशाळभू त पणा , नैराश्य या सर्वांचा मिलाफ त्यांच्या चेहेर्यावर ठळकपणे दिसत होता
..... त्या शब्दांचा अर्थ मला त्याच्याकडे बघताना आपोआपच कळला ! ! ! !