मरण....जगावेगळे
मरण....जगावेगळे
जगावेगळे .... मरण
माता , मातेच प्रेम , मातेची ममता , त्यातली कोमलता, तरलता, ओढ, आंधळे प्रेम, .....
एक माता आणि तिचे लेकरू , यांच्या नात्यावर असंख्य लोकांनी, असंख्य भाषेत , अगणित प्रकारे लिहिले असेल, बोलले असेल, गाणी गोडवे गायली असतील, कथा कविता केल्या असतील. त्याची गणती अशक्यप्रायच आहे.
तर असे हे मातेचे प्रेम, ते आपल्या सर्व अपत्यांसाठी सारखेच असते. त्यात कोणताही दुजाभाव नसतो, पक्षपातीपणा नसतो. त्या मातेचे प्रत्येक मुल हे तितकेच हुशार असते, smart असते, किंवा बावळट नसते , कशातही कच्चे नसते वा पिछाडी ला नसते.
.....
....
प्रत्येक गोष्टीला काही अपवाद असतात.
"आमचा मोठा मुलगा हुशार आहे, धाकटा तेवढा नाही," असे जेंव्हा आईच म्हणते, किंवा " मोठी नाजूक आहे पण धाकटी मात्र धसमुसळि आहे " असे बाबा सांगतात, तेंव्हा हि गोष्ट थोडीशी जाणवते. आपल्या भारतीय संस्कृतीत तर मुलगा म्हणजे वंशाचा दिवा अणि मुलगी परक्याचे धन असे मानले जाते. त्यामुळे एकाचे कौतुक तर दुसर्याचा राग हे ठरलेलेच. मुलाचे दुर्गुण झाकले जाण्याचे ,हे एक कारण तर दुसरे म्हणजे आंधळे मातृप्रेम.
...
सून म्हणून घरी आलेली मुलगी कितीही चांगली, सदगुणी असली तरी ती जणु काही आपले घर लुटायला आली आहे , ती आता आपला मुलगा , धन , पैसा अडका आपल्यापासून हिरावून घेईल असा विचार करून तिच्याकडे संशयाने पाहिले जाते, आणि सासरी गेलेल्या मुलीला सर्व काही मिळावे अशा विचाराने तिला संसाराचे वेगळे राजकारण पढवले जाते. यातही मग पक्षपाती प्रेमच दिसून येते. ..
पुत्र व्हावा ऐसा गुंडा, जयाचा त्रिलोकी झेंडा किंवा माझ्या लेकीचीच सत्ता सासरी असावी, हि प्रत्येक मातेची इच्छा असते.
याला अपवाद कुणी पाहिलेत?
अशीच एक कथा
चार मुली आणि दोन मुलगे.
हुशारीत, वागण्यात किंवा अन्य गुण अवगुण पाहायला गेले तर सर्व सारखेच. पण तरीही काही वेळा ( फार थोड्या असतील, ) मुलींचे माप झुकते असायचे आणि ते अगदी परक्या, अनोळखी माणसालाही जाणवण्या इतके. योग्य वागूनही मुलगे वाईटच. का, तर लग्नानंतर आलेली त्याची बायको घर लुटून नेणार आहे!
आपल्या जिद्दीने, हुशारी व कर्तबगारीने, घराचा भक्कम आधार बनलेली, सुख आणि दुख्खात, जीवनाच्या लढाईत नवर्याला साथ देणारी, आयुष्याचा हा सामना जिंकू पाहणारी, वाईट कशी असू शकेल?
नोकरी आणि संसार , दोन्हीची जबाबदारी समर्थपणे सांभाळणारी, सासू सासर्याचा ( सासू कशीही असली तरीही, तिच्याकडे दुर्लक्ष्य करत ) मान राखणारी , दूर जाणार्या नातेवाईकांना आपलेस करणारी, तुटू लागलेली नाती पुन्हा जुळवणारी, ती, वाईट कशी असू शकते?
डोळ्यासमोर असे घडताना पाहिल्यामुळे मला असे प्रश्न पडू लागले. सासूने कधीही विश्वास दाखविला नाही ....... पेन्शन आणण्यासाठी बॅंकेत जायचे असेल तर सुनेची मदत चालत नसे. त्यासाठी लांब रहाणार्या लेकीने येउन ते काम करायचे.
.... पैसे किंवा दागिने सुनेपासून लपवायचा प्रयत्न करणे....( जी सून तिच्या अपेक्षेपेक्षा अधिक पैसा नोकरी करुन मिळवत होती. ).
.... स्वतःचा मान राखण्यासाठी नोकरी सोडून व्यवसाय करु पहाणार्या नवर्याला साथ देणारी , त्याला प्रोत्साहन देणारी, आणि वेळप्रसंगी आर्थिक मदत करणारी,,,, आणि हे सर्व करताना वडिलधार्या मंडळींची मर्जी सांभाळणारी ती सून खरे तर " सुपरवुमन" च असली पाहिजे. पण,.... नाही, माझ्या मुलीच श्रेष्ठ, त्यांनाच मी सर्व काही देणार, तिचेच (मुलीचे) बरोबर, तू चूक, अशी सतत बडबड. ...
हा सर्व जाणवणारा भेदभाव , अगदी नातवंडांपर्यंत दिसून येत होता. काही जणांवर खास मर्जी, लाड व कृपाद्रुष्टी तर काहीना उगीचच रागावणे , अगदी परक्या व्यक्तीलाही जाणवत असे. आणि तरीही सर्व नातवंडांमध्ये सारखीच लोकप्रियता मिळवणार्या माम्यांना आपले काय चुकले असा प्रश्न पडायचा. !!!
..
..
काही जणांवर खास मर्जी..असे मी मगाशीच म्हटले. त्याचा अतिरेक किती असावा याचा आपण विचार करु शकत नाही. या बाईला सख्खी, मावस , किंवा चुलत , अशी काही भावंडे होती. परंतु जुन्या काळी असलेल्या एकत्र कुटुंबपध्दतीमुळे चुलत मावस असा भेदभाव कधीच जाणवला नाही, किंबहुना ते नाते सांगितल्याशिवाय कळतच नव्हते, इतकी सहज , स्वाभाविक जवळीक होती.
काही मुले जशी लाडकी असतात, तसेच काही वेळा एखादे भावंडही लाडके , इतरांपेक्षा अधिक जवळचे असते. यात गैर किंवा नवीन काहीच नाही. पण त्या लाडामध्ये, कौतुकामध्ये अतिशयोक्ती नसली, तारतम्य असले, तर त्याचे काहीच वाटत नाही.
यशोदाबाईंचे असेच काहीसे होते. एका धाकट्या भावावर त्यांचा भारी जीव. सदैव त्याचे कौतुक, प्रत्यक्ष तो समोर असो वा नसो. संधी मिळताच त्याचे गुणगान सुरु. त्याच्यापुढे बाकी सर्व क्षुद्र, तुच्छ, क:पदार्थ. यामध्ये अगदी नवरा, मुले, भाचे, पुतणे सगळेच. बंडूच सर्वश्रेष्ठ !!! (दुर्दैवाने त्याचे हेच नांव सर्वांना माहित होते. ) इतर सर्वांचे गुण, वर्तन, यांची त्याच्याबरोबर तुलनाच होउ शकत नव्हती. कधी कधी तर या अतिरेकी प्रेमाचा इतरांना त्रास व्हायचा. त्याच्या कौतुकात, आदरातिथ्यात काही कमी पडू नये म्हणून त्या घरातल्या इतरांना अक्षरश: पळवायच्या. बंडूला मात्र त्याचे फारसे सायरसुतक नव्हते, उलट तो थोडासा अवघडूनच जायचा. उच्चशिक्षित, तल्लख बुद्धिमत्ता, साधा मनमिळावू अशा बंडूचे बायकोपुढे मात्र फारसे चालत नसे. पण तरीही बंडूची बायको म्हणून, बंडूबरोबर तिचेही अफाट कोडकौतुक ! कसे कुणास ठाउक, पण इतर दोन तीन बहिणींनाही या बंडूबद्दल जरा जास्तच आस्था होती. कोकणातल्या वातावरणात मोठ्या झालेल्या या भोळ्या भाबड्या बहिणी तिने केलेला अपमानही विसरुन तिचे गुणगान करत असायच्या. शिक्षण, त्यामुळे मिळालेला पैसा आणि त्यामुळे आपोआपच आलेला माज तिच्या वागणुकीत नेहमीच जाणवत असे. टाकून बोलणे, अपमान करणे वगैरे तर नित्याचेच. क्षुल्लक कारणावरुन धरलेला अबोलाही त्यातलाच एक भाग. हा अबोला काही तासांपासून ते दिवस, महिने, अगदी वर्षभरही असायचा! त्या तिघींपैकी सर्वात मोठ्या नणंदेशी , यशोदाबाईंशी तर तिने २५ वर्षे अबोला , असहकार, पुकारुन जवळ जवळ नातेसंबंध तोडले होते. पण तरीही यशोदाबाईंचे आपल्या भावावरचे प्रेम तसूभरही कमी झाले नव्हते. खरे तर हे थोडेसे विचित्रच वाटत होते. पण इतके वर्ष हे सर्व पहात असल्याने कोणालाच त्याचे विशेष वाटत नव्हते. त्याकडे बहुतेकांचे दुर्लक्षच व्हायचे.
दिवस, महिने, वर्षे जात होती. वयोमानाप्रमाणे, खालावत जाणारी तब्येत, विविध आजार, यांचा सामना करत यशोदाबाई दिवस ढकलत होत्या. त्यांच्या यजमानांची प्रकृती वयाचा विचार करता ठणठणीतच म्हणायची. पण तरीही भाळी लिहिलेले कधी चुकत नाही म्हणतात. ( " भालावरचे विधिलिखित " आधी वाचता येत नाही, हीच खरी गंमत आहे. )
एका छोट्याशा आजाराचे निमित्त होउन, नानांचे निधन झाले. मुलाने, सुनेने सर्वांना कळविले. नानांच्या प्रेमळ , मनमिळावू स्वभावाने सर्वांना आपलेसे केले होते. सहाजिकच हळहळ वाटली. त्यांना अंतिम निरोप देण्यासाठी नातेवाईक मंडळी जमू लागली. वेळ तशी रात्रीचीच. रात्री सुमारे ९ वाजता बातमी समजल्यावर नाही म्हटले तरी सर्वांना जमायला जवळ जवळ १२ वाजत आले. काही मंडळी वेळप्रसंगास अनुसरुन पुढील तयारीला लागले. फक्त नानांची सोलापूरला असलेली मानसकन्या, सुषमा आल्यावर निघायचे ठरले.
यशोदाबाई, आतल्या खोलीत शांत, सुन्न , बसल्या होत्या. सोबत काही नातेवाईक, शेजारच्या बायका, मुली वगैरे होत्या. सांत्वनाचे चार शब्द बोलत धीर देत होत्या. पुरुष मंडळीही बाहेर विमनस्क पणे बसली होती. नानांच्या आठवणीना उजाळा देत, आपले दु:ख सुसह्य करायचा प्रयत्न करत होती. जेवणाची वेळ असूनही तहानभूक हरवली होती.
,....
१२:३० पर्यंत येणार्यांपैकी जवळ जवळ सर्वच माणसे आली होती. सुषमाला मात्र बराच उशीर होणार होता. सर्वानुमते ती आल्यावर मगच अंत्ययात्रेस जाण्याचे ठरले.
....
कसा कुणास ठाऊक पण साडे बारा झाले, तरी बंडू अजून आला नव्हता. योगायोग म्हणजे कुणीतरी असे म्हणत असतानाच बेल वाजली. बंडूच आला होता. जरासा दमलेलाच , आणि आफिसच्याच फॉर्मल वेशात होता. अचानक ठरलेल्या आफिसमधल्या अर्जंट मिटिंगमुळे त्याला उशीर झाल्याचे समजले. थोडे स्थिरस्थावर झाल्यावर, सहजच यशोदाबाईंना भेटण्यासाठी तो आतल्या खोलीकडे वळला. ...
.....
त्यानंतर झालेला प्रकार शब्दात सांगणे कठीण आहे. बंडूला पाहून यशोदाबाई लगबगीने उठल्या. नेहमी व्हायचे तसेच त्यांना प्रेमाचे भरते आले. "ये ये, बस, अरे किती उशीर केलास, मी वाटच बघत होते,".
"तू येशील याची खात्रीच होती, पण तरीही चैन नव्हते". "दमलेला दिसतोयस, थांब, मी पाणी आणते" असे म्हणत त्या स्वैपाकघराकडे वळल्या !
इतका वेळ शांत बसलेल्या यशोदाबाई लगबगीने उठल्या, . बंडूला पाहून न जाणे त्यांच्या अंगात काय संचारले ! आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा दु:खी प्रसंग आहे हेच जणू त्या विसरल्या. स्वरातली कातरता, कंप नाहीसा झाला होता. बाज्ञूला बसलेल्या बायकांना उठायला सांगून त्यांनी बंडूला बसायला सांगितले . धीर दयायला , सांत्वनासाठी आलेल्या त्या बायका , यशोदाबाईंचा हा अवतार बघून सर्दच झाल्या. तोही जरासा चरकलाच, पण शांत राहून त्याने वेळ निभावली. तो काही बोलायच्या आतच यशोदाबाईंनी पुढे बडबड चालूच ठेवली.
" तू चहा घेशील ना ?, "
" अरे बरेच पाहुणे येणार, म्हणून जरा जास्ती दूध आणायला सांगितले" , त्यांची टकळी चालूच होती.
सर्द होणे, आश्चर्य वाटणे, अचंबित होणे, अवाक् होणे, वगैरे सर्व शब्दांचा अर्थ जमलेल्या माणसांच्या चेहर्याकडे बघूनच कळला असता. एखाद्या चेहर्यावर बारीक आठी, तर तीन चार जणांच्या नजरेत एक चीड, एक प्रकारची तिडीक दिसू लागली. पण यशोदाबाईंना त्याचे काहीच सोयर सुतक नव्हते !!!
प्रसंग काय, माणसे कशासाठी आली होती, वातावरणाचे गांभीर्य, या सर्वांना विसरून , केवळ बंडू, त्याचे आदरातिथ्य, त्याचे कौतुक यालाच प्राधान्य देणार्या यशोदाबाईंचे ते वागणे,,,,,
जगावेगळाच प्रकार म्हणावयाचा. !!!!
....
हा जगावेगळा प्रकार अधिक काळ पहाणे शक्य नव्हते. मी तिथून हळूच काढता पाय घेतला. विचाराच्या तंद्रीतच दुस- या बेडरूमकडे वळलो. अगोदर आलेली अन्य काही नातेवाईक मंडळी तेथे बसली होती. रात्रीची वेळ आणि ओढवलेला प्रसंग, यामुळे कोणी काही फारसे बोलत नसावे. दबक्या आवाजात , गंभीरपणे चाललेल्या गप्पा, विषय बहुधा नानांच्या आठवणींचाच असावा. बेडरुमचे दार बंद नाही, पण लोटून ठेवलेले होते. सहजच कानोसा घेतला. दोन तीन नातवंड एका कोप- यात, त्यांच्या बाजूला यशोदाबाईंचा एक लांबचा भाऊ, नानांचे दोन भाऊ, जावई, सुनेचे वडिल आणि काका अशी बरीच मंडळी होती. नाही म्हटले तरी साधारण समवयस्क मंडळींचे छोटे छोटे ग्रुपच झाले होते. चाललेल्या गप्पांत आठवणी प्रामुख्याने असल्या तरी नाना आणि यशोदाबाईंचे वेगवेगळे स्वभाव, मुलानातवंडांना मिळणारी वागणूक , अन्य नातेसंबंध ( कौतुक आणि शिव्याशाप, प्रेम व रागावणी, लाड, ) वगैरे सर्वच प्रकार होते. थोडक्यात सांगायचे तर विविध व्यक्तिमत्वाच्या लोकांचे विचार प्रकट होत होते. पण तरीही गंभीरच. खूप रात्र झाल्यामुळे नातवंडे थोडीशी पेंगुळलीच होती.
" केंव्हा निघणार आहेत रे" आवाजात थोडा कंटाळा, थोडी दमणूक जाणवली, पण त्यापेक्षाही नाराजी, चिडचिड अधिक जाणवली. वळून बघितले. सुभाषराव. यशोदाबाईंचा मावस जावई. प्रश्नाबरोबरच त्यांच्या कपाळावरील आठ्या नजरेत भरल्या.
" अहो, बाकी सर्वजण आले आहेत, फक्त सुषमाची वाट बघतो आहोत." कोणीतरी दिलेले उत्तर.
" पण ती आहे कुठे? कुठून येणार आहे? "सुभाषरावांचे चिडके प्रश्न, तेही एका दमात.
" ती सोलापूरहून निघाली आहे. दोन तासांपूर्वी"
" बापरे, म्हणजे अजून ५- ६ तास नक्की" सुभाषराव, स्वर अधिकच चिडका"
" नाही हो, ती वडलांबरोबर प्रायव्हेट कारनेच निघाल्येय, येईल लवकरच"
" अहो, सोलापूर काय जवळ आहे? मी अनुभवाने सांगतोय, "
सुभाषराव आता नाराजी लपवू शकत नव्हते, किंवा मुद्दामच ती उघडपणे दाखवत होते.
" तिला पोचायला कमीतकमी सकाळचे सहा वाजतील. "
" हो, पण काय करणार, नाईलाज आहे, ".
" तिलाही अंत्यदर्शन व्हायला नको कां ?"
जमलेल्या कोणीतरी विचारले.
एव्हांना त्या खोलीतले संभाषण सुभाषराव आणि इतर असे दोन पार्टीज् मधे विभागल्याचे द्रुष्य दिसू लागले होते. सहभाग दोन तीन जणांचा, तर बाकीच्यांपैकी काही कुतुहलाने, काही त्रासिकपणे , काही आश्चर्याने, तर एक दोघे सुभाषरावांकडे रागाने बघू लागले होते. सर्वसाधारणपणे ती वेळच अशी असते की माणसे आपली महत्वाची कामे अपॉईंटमेंट्स वगैरे गोष्टी तात्पुरत्या बाजूला ठेवून , पुढे ढकलून , मदतीला , सांत्वनाचे चार शब्द बोलून दु:ख हलके करण्यासाठी आलेली असतात. कदाचित थोडी गैरसोय झाली, वेळ कमीजास्त झाली तरी कोणी तक्रार करत नाही. किंवा टीकाही करत नाही. या गोष्टी सहसा कोणाच्या गावीही नसतात. पण सुभाषरावांचे बोलणे , वागणे काही औरच वाटत होते. त्यांनी बडबड चालूच ठेवली.
" मग आम्हांला आधीच का कल्पना दिली नाही?
" अहो, नसेल सुचले, होते असे एखाद्या वेळेस, "
" अणि काय, ४- ५ तासाचा तर प्रश्न आहे. "
" पण मग आम्ही सकाळीच आलो असतो , थेट स्मशानात, ". " उगीच वेळेचा अपव्यय , जागरण, , मला उद्या ऑफिस आहे"
सुभाषरावांची ही मुक्ताफळे ऐकून उपस्थित मंडळी सर्दच झाली. काहीतरी मनात ठरवून मी दरवाजा ढकलून आत शिरलो.
" माफ करा सुभाषराव, आमची चूक झाली. आपल्याला त्रास झाला, आपला अमूल्य वेळ वाया जात आहे याबद्दल क्षमस्व. तुम्ही वेळात वेळ काढून येथे आलात त्याबद्दल मनापासून आभार. आपले सांत्वनाचे चार शब्द आमच्यापर्यंत पोचले, आपल्या भावना समजल्या, "
" आपण आपले केलेत, आमचेही मन भरून आले आहे. " एका दमात न थांबता बोलल्याने मला धाप लागली. थोडा श्वास घेतला.
" यापुढे आम्ही तुम्हांला अधिक अडचणीत टाकू इच्छित नाही. "
" आपण सकाळपर्यंत थांबणार असाल, तर इथे विश्रांतीची पूर्ण व्यवस्था आहे. मात्र निर्णय सर्वस्वी तुमचा असेल. ".
माझ्याकडे पहाणारे अनेक नेत्र, माझे बोलणे ऐकणारे कान , कोणाला काय वाटेल किंवा सुभाषरावांची प्रतिक्रिया, कशाचाही विचार न करता , एका तडक क्षणी , भडाभडा स्वत:चे मन ओकून, मी खोलीतून बाहेर पडलो व हॉलमधे शांत चिरनिद्रा घेत असलेल्या नानांच्या बाजूस जाऊन बसलो !!!!
..........
विचार करायला लावणारी अशीच दुसरी एक कथा.
थोडी पुढच्या पिढीतली म्हणा.
एक अतिशय उच्चशिक्षित जोडपे. नवरा प्राध्यापक , तोही गणिताचा. शालेयच नव्हे तर , कॉलेजच्या विद्यार्थ्यांना गणित शिकवण्यात याचा हातखंडा. पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्याना मार्गदर्शक म्हणून काम करायचा. तल्लख बुद्धी आणि शिकवण्याची मनापासून आवड, दोन्हींचा संगम असलेली व्यक्ती तशी दुर्मिळच.... बायकोही पदव्युत्तर शिक्षण घेतलेली. दोघ मिळून खासगी शिकवण्या करीत. त्यामुळे आवक भरपूर.
मुलगा आणि एक मुलगी डॉक्टर. धाकटी चार्टर्ड अकौंटंट.
....
सासू सुनांचे सर्व ऐकीव माहीत असूनही हिचे मात्र डॉक्टर सुनेशी पटले नाही. सून तर हुशारीबरोबरच सौजन्याचा, पुतळाच. मितभाषी, प्रेमळ... पण तिला वेगळा संसार थाटावाच लागला.....
वैद्यकीय व्यवसायात दोघांनी खूप प्रगती केली. नावलौकिक मिळवला. पण सासूकडून कधीच कौतुक झाले नाही.
डॉक्टर मुलीने मात्र बरेच रंग दाखविले. वैद्यकीय व्यवसायातील अनिष्ट गोष्टींचा उपयोग, पैसै मिळवण्यासाठी कोणताही मार्ग , .....
खाजगी आयुष्यातही सर्व घोटाळेच. प्रेमविवाह करुनही नंतर दुसरी प्रकरणे, पैशाच्या हव्यासापोटी दुसरा घरोबा ( तोही घटस्फोट न घेता ) वगैरे.
या सर्व पार्श्वभूमीवरही ही माता मात्र संपूर्णपणे डॉक्टर मुलीवरच लळा ठेवून होती. तिचा नवीन फ्लॅट, तिची नवीन गाडी, तिचा नवीन व्यवसाय याचेच तिला अधिक कौतुक. पण मुलगा ,सून मात्र लांबच होते. त्यांच्या आनंदात, मिळवलेल्या यशात सहभागी होणे तर दूरच,पण कोणत्याही अडी अडचणीला ( कौटुंबिक किंवा व्यावसायिक ) तिने कधीच मदतीचा हात पुढे केला नाही.
पैसा आणि मानमरातब( की खोटा बडेजाव) यानाच महत्व देणार्या त्या स्रीने प्रेमळ नातेवाईकांचाही कित्येकदा अपमान केला. नवर्यावर जिवापाड प्रेम करणार्या त्याच्या मोठ्या बहिणींनाही ती तुच्छतेने वागवायची. त्यांची मुले मोठी होउन भरपूर शिकली,यशस्वी झाली , तरीही तिला त्याचे कौतुक वाटले नाही. आणि नंतर जेंव्हा त्यांनी गाडी घेतली , तेंव्हा तिला ती आपलीशी वाटू लागली!! कारण ती आता आपल्या तोलामोलाची आहेत अशी तिची भावना झाली . तसे पाहिले तर या गोष्टीतही जगावेगळे काहीच नाही असे मी म्हणेन. व्यक्ती तितक्या प्रक्रुती या न्यायाने चांगल्या वाईट, चित्र विचित्र , भिन्न विभिन्न स्वभावाची माणसे असतात, आपल्याला भेटतात किंवा नाही आणि आपणही आपल्याला जमेल तसे त्याला रिअॅक्ट करत असतो.
पण...
मुलगा रुग्णालयात , अत्यवस्थ अवस्थेत , मरणाशी , न संपणारी झुंज घेतो आहे ( आणि ज्याचा अंत डॉक्टरांसकट सर्वांना माहित आहे, ) .... अशा स्थितित जर ती माता ( खरे तर माता न तू वैरिणीच) मुलीच्या नव्या मर्सिडीजला हार घालण्यात दंग असेल, तर...
जगावेगळाच प्रकार म्हणावयाचा ! ! !
आणि या जगावेगळ्या वागण्याचा कळसही पहावा, अनुभवावा लागला.
कॅन्सर सारख्या दुर्धर रोगाशी लढा देणार्या मुलाची अखेर हार झाली. अंत्य यात्रेला माणसे जमत होती. पण सकाळपासून धो धो कोसळणार्या पावसाने सगळ्यांचीच पंचाईत झाली होती. तीव्र इच्छा असूनही या निसर्गाच्या तांडवाकडे हतबल होऊन पहाण्याशिवाय काहीच करता येत नव्हते. नाईलाजाने मग फोनवरच सांत्वनाचे चार शब्द बोलून वेळ निभावून न्यावी लागली...जमलेल्या मोजक्या लोकांनीच हातभार लावून सर्व काही व्यवस्थित होईल याची काळजी घेतली....
...
दिवस जात होते. जवळ जवळ सहा महिने झाले असतील....
त्या जगावेगळ्या मातेशी बोलण्याचा योग आला. थोड्या गप्पा झाल्या, ख्याली खुशाली विचाऱुन झाल्यावर सहज म्हणून तिने विचारलेल्या प्रश्नाने आश्चर्या बरोबरच एक धक्काच बसला.
" तुम्ही त्यादिवशी का आला नाही" असा प्रश्न तिने जवळ जवळ जाब विचारण्याच्या थाटात केला !!!...
आणि त्यापुढेही जात न आलेल्या व्यक्तिंची यादीच ऐकवली!!!
काहीतरी गुळमुळीत उत्तर देत मी ते संभाषण संपवत फोन बंद केला
...
मुलाच्या अकाली निधनाचे दु:ख मोठे होते की अंतिम निरोप देण्यास पोचू न शकलेल्या ( अर्थातच पावसामुळे) नातेवाईकांवरचा राग ... हे मला अजूनही पडलेले कोडे आहे.! ! !
---
मरण... वाईटच असते. मग ते कोणाचेही असो. आवडत्या व्यक्तिचे वा नावडत्या, मित्र असो वा शत्रू, नातेवाईक वा अनोळखी.,. मरण कोणाचेच नको असते, ते पहाण्यासारखेही नसते, आणि पहावतही नाही. कुठल्याही अंगाने विचार केला तरी तो प्रसंग दु:खदायक, क्लेशकारकच असतो. कोणत्याही प्रकाराने, कारणाने आलेले मरण हे स्वागतार्ह , आनंद देणारे नक्कीच नसते. त्याकडे पहाण्याचा प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगळा असेल किंवा प्रतिक्रिया वेगळी असेल, कमी जास्त तीव्रतेचीही असेल, इतकेच काय , प्रतिक्रीया संपूर्ण विरोधाभासाची असली, तरीसुध्दा त्या क्षणी ती उघडपणे प्रकट केली जात नाही. ...
हा झाला सर्वसामान्य शिरस्ता,,, जगन्मान्य रीत... आणि ती योग्यच आहे म्हणा,..
पण..
तरीही काही वेळा अकल्पित घडते, ज्याचा विचारही आपल्या मनाला शिवत नाही अशी वागणूक, प्रतिक्रीया अनुभवास येते, की क्षणभर आपण नि:शब्द होऊन जातो. रागही येतो, पण तोही व्यक्त करण्याची ती वेळ नसते किंवा त्या वागण्याचे कोणतेही समर्थन होऊ शकत नाही. ...
अशाच काही अनुभवांच्या ह्या चित्तरकथा....
रात्री दोन वाजता फोन वाजला, डोळे चोळतच हात लांब करून , रिसिव्हर उचलला,. पलीकडे अभिषेकचा शांत पण कापरा स्वर, ..... क्षणात झोप उडाली आणि अंदाजही आला. अण्णासाहेब गेले,...
गेले सहा महिने, पॅरंलिसिसमुळे अंथरूणाला खिळलेले, मृत्यूशी झुंजत अखेर त्यांनी प्राण सोडले. त्यांच्याइतकी शांत व्यक्ती मी अजूनही पाहिली नाही, अनुभवली नाही. त्यांच्या चेह-यावरची ती सात्विक शांतता न विसरण्यासारखीच होती.
अभिषेक, त्यांचा मुलगा आणि माझा आतेभाऊ, .... त्यानेच ही दु:खद बातमी कळविण्यासाठी फोन केला होता. त्याच्याशी बोलता बोलताच लगोलग निघण्यासाठी मी आवरायला सुरवात केली. मुंबईतल्या आणखी काही नातेवाईकांनाही पटकन फोन करून कळवले.
जास्वंदी, माझी आतेबहीण (अभिषेकची बहीण ) परळला रहात होती. मिस्टर प्रभाकरपंत, दोघांनीही निघायची तयारी केली होती. आमचे एक काका गिरगावात रहात होते. ते खरं तर नुकतेच एका दीर्घ आजारातून बरे झाले होते. पण तरीही ते येणार होते. काकूही बरोबर येणार होती.
रात्रीची वेळ, काका काकूंचे वय, लवकरात लवकर नाशिकला पोचायची निकड, या सर्वाचाच विचार करत प्रवासाचे प्लॅनिंग करायचे होते. फोनाफोनी होत आणि विविध पर्यायांचा विचार करून मग सर्वानुमते पहाटे साडेचार वाजता सुटणा-या एस.टी. ने जायचे ठरले. त्यानुसार प्रत्येकाने याेग्य वेळेवर मुंबई सेंट्रलला पोचायचे ठरले. अण्णासाहेबांच्या आठवणी अनेक होत्या. झोप येत नसल्यामुळे त्या एखाद्या चित्रपटासारख्या डोळ्यांपुढुन सरकत होत्या. आत्या, अभिषेक कसे असतील , सावरले असतील का, तिथे कोण कोण जमा झालेत का, अंत्य विधीची तयारी करायला / मदतीला कोणी पोचले असतील कां ,,.... असंख्य प्रश्न, ज्यांची उत्तरे फक्त तिकडेच होती.... पण इथे आम्हांला मात्र स्वस्थ बसू देत नव्हते.
साडेचारची पहाटेची वेळ, परिक्षांचे दिवस आणि अलीकडच्या काळात तयार झालेले एस.टी.पेक्षा सोयीस्कर पर्याय, यामुळे गर्दी कमीच होती. नशिबाने बस वेळेवर सुटली आणि आम्ही सर्वांनी नकळतच सुटकेचा निश्वास टाकला.
सुमारे तासाभराने मुंबईची हद्द ओलांडल्यानंतर बसने वेग घेतला आणि मोकळी हवा, पहाटेची वेळ, झालेले थोडेसे जागरण यांचा परिणाम म्हणून, सर्वांना थोडी डुलकी लागली.
तीन तासाच्या प्रवासानंतर विश्रांतीसाठी बस थांबली. पाय मोकळे करणे आणि चहाची तल्लफ, त्यामुळे सगळेच खाली उतरून तिथल्या हॉटेलात गेलो. चहाचा घोट घेत , मग थोड्या गप्पा सुरू झाल्या. बहुतेक सिरीयसच. त्यात अण्णासाहेबांच्या आठवणीच अधिक.
" सहा महिने तरी झाले असतील नाही त्यांच्या आजाराला? " मी
"हो"
" अटॅक तसा मोठाच, पण वेळीच उपचार मिळाल्यामुळे , हळूहळू सुधारत होते."
"अचानक काय झाले कुणास ठाऊक, पण आठवड्याभरापूर्वी परत तब्येत बिघडली". काका.
"हा आजार म्हणजे तसा त्रासाचाच. शरीर साथ देत नाही आणि परावलंबी झाल्यामुळे खचून जायला होते."
" तरीसुध्दा काही जण बरे झालेले मी पाहिले आहेत. अगदी पूर्ण नाही पण स्वावलंबी झालेल्याची उदाहरणे आहेत. "
" पण अटॅक जोराचा असेल तर उपयोग नसतो. "
अरे पण मी म्हणते,....
इतक्या वेळ गप्प असलेल्या काकूनी तोंड उघडले. थोडेसे दचकूनच सर्वांनी कान तिकडे केले. काकूंचा फटकळ स्वभाव सर्वांच्याच परिचयाचा होता. काकांच्या चेह-यावर तर टेंशन स्पष्टच दिसले.
” तसं बघायला गेले तर , बरंच झालं म्हणायचं. सहा महिने अंथरूणाला खिळलेले, सगळ्यांनाच त्रास."
"काय उपयोग अशा जगण्याचा, इथून तिथून सगळ्यांनाच वैताग"
"त्या माईंची तर ससेहोलपटच झाली की"
"आता सुटल्या. सुखाने जगता तरी येईल"
काकू थांबतच नव्हत्या.
" नसती कटकट"
एव्हांना ऐकणा-या सगळ्यांच्याच कपाळाला आठ्या पडल्या होत्या, भुवया वाकड्या झाल्या होत्या आणि नाराजीचा भाव चेह-यावर दिसू लागला होता. साहजिकच होते. काकूंच्या बोलण्यात काही प्रमाणात तथ्य असले तरी ते व्यक्त करण्याची पध्दत बरोबर नव्हती , आणि तसले बोलण्याची ती वेळही नव्हती. " वैताग" , " नसती कटकट" वगैरे शब्दांची उधळण करायची गरज नव्हती.
" जाउ दे ग" म्हणत काकांनी तिला गप्प करायचा प्रयत्न केला, पण तोही अपुराच होता. काकूंची टकळी चालूच.
रडून रडून थकलेल्या जास्वंदीच्या डोळ्यात आता राग अधिक दिसू लागला. प्रभाकरपंतही आपली नाराजी लपवू शकत नव्हते.
एकंदरीत गप्पांना वेगळेच वळण लागायची चिन्हे होती, आणि त्याचे वादात/ भांडणात कधी रुपांतर होईल , ते सांगता येत नव्हते.
" चला, निघूया, बस सुटायची वेळ झाली" असे म्हणत मी उठलो, आणि योगायोगाने त्याचवेळी कंडक्टरची हाकही आली. सुटकेचा निश्वास टाकतच सर्वजण लगबगीने बसमधे चढलो.
डेपोमधून निघून हायवेवर आल्यावर बस ड्रायव्हरने वेग वाढविला. आता बहुतेक नाशिकपर्यंत मधे कुठे थांबायचा विचार नसावा. अस्वस्थ मनात येणा-या विचारांचा, आठवणींचा वेग मात्र त्यापेक्षाही जास्त होता.
तिथल्या परिस्थितीचे चित्र दिसत होते, जवळच्या , लांबच्या नातेवाईकांचे चेहरे, त्यांची हळू आवाजातली बोलणी कर्तव्यबुध्दीने, पण जड अंत:करणाने पुढची तयारी करणारी हितचिंतक मंडळी, .....डोक्यात गर्दीच झाली होती.
पुढचा प्रवास तसा सरळ रस्त्याचाच होता. कसा-याचा छोटा घाट मघाशीच मागे पडला होता. उजाडलेला दिवस आणि चहाची तरतरी, त्यामुळे झोप येण्याचा प्रश्नच नव्हता. तासभर कसा गेला ते कळलेच नाही. थोड्याच वेळात सर्वजण नाशिकच्या एस टी स्टॅंडवर उतरलो. डेपोच्या बाहेर आल्यावर रिक्षाला हात करत आम्ही दोन रिक्षांना थांबवले. पत्ता सांगून रिक्षा सुरू करणार तेवढ्यात " अरे जरा थांबा की, एवढी काय घाई लागलेय" ?
चमकून, दचकून मागे बघितले, तर आमच्या काकूबाई एका फळवाल्यासमोर उभ्या !
" अहो, जाता जाता थोडी द्राक्ष घेऊया. चांगली दिसतायत, " " अगदी टपोरी आहेत. "
" नंतर कुठे वेळ मिळणार आहे? " आणि मुंबईच्या मानाने खूपच स्वस्त "
” अग,पण आत्ता काही खरेदीची, शॉपिंगची वेळ आहे का? आपण आलोय कशासाठी? तिथे काय गिफ्ट द्यायचे आहे? " न रहावून वैतागानेच काका म्हणाले.
" होतील हो आपल्यालाच, परतीच्या प्रवासात, मी घेते अर्धा किलो "
" एवढा काही उशीर होत नाहीये"
फर्र... फर्र... रिक्षाचा आवाज ऐकून मी वळलो.
" आम्ही जातो रे पुढे, तू ये कसा तो, "
आधीच रडकुंडीला आलेल्या, चिडलेल्या, संतापलेल्या जास्वंदीने रिक्षातून वळतच मला सांगितले, आणि प्रभाकरपंतांबरोबर ती निघून गेली. काकूंच्यावरचा तिचा राग लपवणे तिला अशक्य झाले होते.
जाणारी रिक्षा आणि द्राक्षखरेदी यांच्याकडे आळीपाळीने बघत दुस-या रिक्षाच्या बाजूला हतबुद्ध होउन उभे रहाण्याशिवाय मी काहीच करू शकलो नाही !
इगो..
“ तू आधी हे पैसे घे आणि खिशात ठेव. प्रश्न विचारुन जास्त शहाणपणा करु नकोस. “
अचंबित झालेल्या आशुतोषने मागे वळून त्याच्या खिशात पैसे कोंबणाया-या त्या व्यक्तीचा चेहरा पाहिला. खरे तर ती व्यक्ती ओळखण्यासाठी त्याला तेवढेही करायची गरज नव्हती. काही न बोलता आणि कोणतीही प्रतिक्रिया न देता तो सरळ परतीच्या दिशेने घाटाच्या पाय-या चढू लागला. !
चालता चालताच गेले पंधरा दिवस सर्वांना शोकसागरात बुडविणा-या त्या घटनेची आठवण त्याला पुन्हा पुन्हा येत होती. ऑफिसमध्ये काम चालू असतांना आत्याबाईंचा फोन... त्यांनी दिलेली धक्कादायक बातमी,. तापलेल्या सळईसारखी त्याच्या कानातून आरपार गेली होती. त्यांचा कापरा स्वरही त्यात भर घालत होता. ऐकून हतबुद्ध झालेला आशुतोष जागच्या जागीच खाली बसला. त्याचा विश्र्वासच बसत नव्हता. विजय, त्याचा एक मामेभाऊ ( नात्याने लांबचा पण परिचय आणि एकमेकांशी सलगी या द्रुष्टीने सर्वात जास्त जवळ असलेला ) अचानक हृदयविकाराच्या झटक्याने गेला आणि तीच बातमी त्याला आत्याबाईंनी फोनवर सांगितली होती.
थोडे सावरल्यावर , धीर गोळा करत आशुतोषने बायकोला फोन करुन सांगितले, आणि ताबडतोब रजा घेऊन घरी यायला सांगितले. वेळ न घालवता , लगोलग सिन्नरला जायचे होते. अन्य काही नातेवाईकांना फोन करुन त्याने तयारी सुरु केली.
आत्याबाई आणि त्यांचे यजमानही येणार असल्याने चौघांनी एकत्रच मुंबई नाशिक टॅक्सीने जावे व नंतर पुढचा प्रवास करावा असे ठरले. वसंतरावांना ऑफिसमधून यायला लागणारा वेळ , अंतर वगैरे सर्वांचा विचार करुन दादरला टॅक्सीस्टँडवरच भेटण्याचे ठरले.
एकंदरीत वेळेचा अंदाज बांधतच आशुतोष आणि चैताली थोडेसे लवकरच टॅक्सीस्टँडवर गेले. लगोलग पैसे भरुन त्याने बुकिंगही करुन ठेवले. ती दोघे आल्यावर वेळ जाऊ नये हा हेतू.
वसंतराव येताच , चला लवकर, मी टॅक्सी तयारच ठेवली आहे असे म्हणत आत्याबाईंना हात देण्यास तो पुढे झाला..
“ अरे पण पैसे?”
“तुम्ही नका काळजी करु, मी दिले आहेत.”
“सगळ्यांचे?”
“हो. उगीच वेळ जायला नको.”
या संवादानंतर प्रवास सुरु झाला. पण वसंतरावांचा चिडलेला चेहरा मात्र आशुतोष – चैतालीच्या नजरेतून सुटला नाही. मी याच्यापेक्षा मोठा असतांना हा कोण पैसे देणारा वगैरे भाव स्पष्ट दिसत होते. त्यांच्या त्या स्वतःच्या “इगो” ने भरलेल्या चेह-याकडे दोघांनी दुर्लक्षच केले. त्या दुःखद प्रसंगाचे गांभीर्य, अचानक आलेले संकट, वगैरे गोष्टींपेक्षा त्यांना मोठेपणाचा मान आणि स्वतःचा इगो महत्वाचा वाटत होता. टॅक्सीत बसलेले चौघेही झालेल्या घटनेने हादरलेलेच होते. विमनस्क आणि मनांत प्रचंड विचारांचे काहूर.... विजयच्या भूतकाळातील असंख्य आठवणी......कोणीच कोणाशी बोलत नव्हते..
प्रवास लांबचा असल्याने इगतपुरीजवळ चहासाठी ब्रेक घेतला. थोडेसे ताजेतवाने होऊन पुढचा प्रवास सुरु होत असतांनाच “तू सगळ्यांचे पैसे कशाला दिलेस, आम्ही येतच होतो ना” या वसंतरावांच्या प्रश्र्नावर आश्चर्यमिश्रित वैतागलेला आशुतोष , तरीही गप्पच राहिला. त्या प्रसंगामधे पैसा हा त्याच्या द्रुष्टीने अत्यंत गौण प्रश्र्न होता. किंबहुना तो त्याचा विचारही करत नव्हता. आणि आपण काही चूक केली असेही त्याला वाटत नव्हते.
नाशिक सिन्नर बस प्रवास.... विजयचे घर... सर्व शोकाकुल मंडळींची भेट, आठवणींचे आदान प्रदान,, नीता वहिनी आणि त्यांना बिलगलेल्या आरती व आदिती... सर्वच वातावरण कष्टप्रद....
सर्व नातेवाईक आल्यावर अंत्ययात्रा.... परत येतांना झालेले सुन्न , भकास चेहेरे, वर्णन अशक्य पण तरीही आपल्यातील प्रत्येकाने अनुभवलेला क्षण...
सर्व आटोपल्यावर जवळचे नातेवाईक, मित्र, हितचिंतक निरोप घेऊन पांगले. लांबच्यानी उद्या सकाळी जायचे ठरवून अंथरुणावर अंग टाकले.
रात्रभर डोळा लागलाच नाही. एक प्रकारची गुंगीच ती.. सकाळी आशुतोष, चैताली, आत्या आणि वसंतराव... वहिनींचा निरोप घेऊन निघाले. येतानाप्रमाणेच सिन्नर – नाशिक बस प्रवास झाला. चहा वगैरे घेऊन झाल्यावर मुंबईला जाण्यासाठी टॅक्सी करण्याचा निर्णय झाला.
आणि त्याचवेळी सुरवातीला असलेले वाक्य उच्चारुन त्याही परिस्थितीत वसंतरावांनी आपली “वृत्ती” , “आपला अहंपणा” आणि “इगो” दाखवून दिला.
त्याचमुळे कुठलाही “शहाणपणा” न करता आशुतोष ते पैसे घेऊन टॅक्सीच्या बुकिंगसाठी असलेल्या खिडकीकडे वळला. !!!!
जगावेगळाच प्रकार म्हणायचा....
