शिंकाळी
शिंकाळी


फार नाही पण सुमारे ३०-३५ वर्षापूर्वीची गोष्ट असेल. कोणत्यही कारणाने प्रवास करायचा असेल तर लोकल ट्रेन सारखा दुसरा पर्याय नव्हता. सर्वसामान्य माणसाचे आवडते आणि खिशाला परवडणारे एकमेव साधन . एक मात्र खरे कि कार्यालयात जाण्या येण्याच्या वेळा सोडल्या तर आजच्या सारखा गर्दीचा सामना करावा लागत नव्हता. हा विचार करूनच मी आणि माझा मित्र संजय , एका महत्वाच्या कामासाठी निघालो होतो.
दुपारी १२ ची वेळ. दादर स्टेशनचा प्लट्फ़ोर्म नंबर ३ माणसांनी तुडुंब भरला होता. प्रचंड उकाड्याने होणारी अंगाची लाही, चेहेर्यावरून आलेल्या घामाच्या धारा पुसत लोक माना वर आणि वाकड्या करकरून गाडीच्या आगमनाची चाहूल घेत होते. फाटक्या चपले पासून ते करकरीत बुटा पर्यंत , चमकणाऱ्या टकला पासून ते डोळे झाकणाऱ्या झुल्फ पर्यंत, आंधळ्यापासून ते गॉगलवाल्या पर्यंत , लहानथोर , सर्व जाती जमातीचे लोक येणाऱ्या गाडीची वाट पाहत होते. आपापले सामान अथवा लहानगे मूल घट्ट धरून अंदाज घेत होते.
" बारा वाजून पाच मिनिटांनी येणारी विरार लोकल आज सुमारे अर्धा तास उशिरा येत आहे. प्रवाशांच्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत." ध्वनि क्षेपकावरून झालेल्या या घोषणेनंतर राग, चीड , संताप, वैताग, व्यक्त करणाऱ्या असंख्य प्रतिक्रिया उमटल्या. रेल्वेला भरपूर शिव्या शाप मिळाले. थोड्याच वेळात प्रत्येक जण अस्सल मुंबईकराच्या आवेशात किंवा जाती धर्मास अनुसरून अर्धा तास टाईमपास करण्याचे मार्ग शोधू लागला.
मी आणि माझा मित्र संजय, वसईला जाण्यासाठी त्याच गर्दीत हातातील समान सांभाळत उभे होतो. कपाळावर अर्धा तास वेळ घालविण्याचे प्रश्नचिन्ह ! कुठेतरी बसायला जागा मिळेल म्हणून चारी बाजूला ३६० अंशात मान फिरवून बघितले. आशा , शक्यता नव्हतीच, पण तरीही नजर टाकल्याशिवाय राहवले नाही. अपेक्षेनुसार निराशा झालीच.
एका बाकावार एक साधा पण निटनेटका वेश असलेला मध्यम वयीन गृहस्थ बसला होता. शेजारी एक कपडे वाळत घालण्यासाठी असते तशी काठी. काठीच्या दोन्ही टोकांना बरीच शिंकाळी अडकवली होती. बटाटे, कांदे किंवा अंडी ठेवण्यासाठी घराघरात वापरली जाणारी नेहमीचीच वस्तू. निरीक्षण करताना ती शिंकाळी खूपच सुंदर वाटली. तारेचे प्रत्येक वेटोळे अगदी अचूक दिसत होते. लहान मोठी वेटोळी वापरून त्याचा football सारखा आकार केला होता. सगळ्यात वरती ३ तारा वापरून त्याचा उलटा कोन जोडला होता. त्यावर एक छोटी गोल रिंग. कामातली सुबकता जाणवत होती.
काहीतरी संवाद सुरु करावा म्हणून मी विचrरले," काका, याची किंमत काय आहे हो?"
" सात रुपये"
" तुम्ही स्वत: हि तयार केली का ?'
" हो आणि नाहीही"
" म्हणजे ?"
" मी बहुतेक वेळेला विकायचे काम करतो. माझे तीन मुलगे घरी, विरारला हि बनवितात"
" पण विरारहून इथे दादरला विकण्यासाठी?"
" काय करणार, तिकडे त्यामानाने वस्ती कमी, विक्री फक्त आठवड्याच्या बाजारातच थोडीफार होते. त्यामानाने इकडे शहरात चांगला खप होतो."
" दिवसाला किती शिंकाळी बनविता?"
"७०,".
मुलाखत आता खरच इंटरेस्टिंग होऊ लागली होती. मित्रा बरोबर नेत्र पल्लवी झाली, आणि आम्ही दोघे जरा सरसावून बसलो. आळीपाळीने सुचेल तसे प्रश्न विचारण्याचा निर्णय न बोलताच ठरला. engineering ची पदवी, ३-४ वर्षांचा मोठ्या कंपनीतील कामाचा अनुभव, management चे पुस्तकी ज्ञान , वगैरेमुळे डोक्यात प्रश्नांची गर्दी होत होती.
" ७०?" , थोडासा अविश्वासाचा सूर.
" हो, माझे तिन्ही मुलगे साधारणपणे पहाटे ४- ४:३० ला काम सुरु करतात, आणि दुपारी ४-५ पर्यंत ६५ -७० नग तयार होतात. त्यानंतर थोडी विश्रांती घेऊन ते रात्रपाळीच्या शाळेत जातात. व्यवसाय असला तरी साहेब, शिक्षणाची जोड हवीच, नाही का?"
तोच पुढे बोलू लागला.
" मी हा असा अडाणी , पण पोर तरी शिकावी, मोठी व्हावी असे वाटते."
तो माणूस अगदी सहजपणे उत्तरे देत होता. काहीही लपवून ठेवत असल्याचे वाटत नव्हते. अनोळखी असूनही आमच्या प्रश्नांचा त्याला राग येत नव्हता किंव्हा संशयही नाही. अत्यंत सरळ, निष्पाप बोलणे.
" रोज इतकी शिंकाळी विकली जातात का?"
" हो, तेव्हढे करावेच लागते"
" का? "
" नाही तर दुसर्या दिवशी जास्त फिरावे लागते" आणि ७० ऐवजी १४० विकावी लागतात."
आमच्या प्रश्नाचे त्याने अगदी सहजतेने दिलेले उत्तर अंतर्मुख करणारे होते. शब्द, भाव, साधे व सोपे, पण अर्थ मात्र गहन होता. रोजच्या रोज ठराविक काम झालेच पाहिजे, हा जणू अलिखित नियमच, त्याला पर्याय नाही आणि अर्थातच आळसाला थारा नाही. दर महिन्याला कॅलेंडरच्या लाल तारखा नाहीतर casual आणि sick leave चा हिशेब करणाऱ्या आमच्या कारकुनी वृत्तीला हि एक चपराकच होती. "
जास्त खप होण्यासाठी काही युक्ती?"
" बहुतेक वेळेला मी ७ - ८ इमारती असलेल्या सोसायटीत जातो. दुपारच्या वेळी. त्यावेळेस घरातल्या गृहिणी थोड्या निवांत असतात. एक दोघींनी घेतले कि नंतर आणखी ५-६ तिथेच खपतात." ladies psychology
" तरी सुद्धा ७० संपण्यासाठी खूप वेळ लागत असेल?"
" हो, निदान ५ - ६ तास भटकंती करावीच लागते."
" पण मग तुम्ही दुकानदारांना का विकत नाही ?"
" त्याचे काय आहे साहेब, मी सांगताना जरी ७ रुपये सांगितले तरी बायका घासाघीस करतातच. मग मी त्यांना ५ रुपयांना देऊन टाकतो. पण दुकानदार मात्र सरळ सरळ ३६ रुपये डझनाला देतात. वेळ वाचेल, पण दिवसाला १४० रुपये नुकसानच होईल !"
अगदी साधी, सरळ पण परिणामकारक strategy . रेल्वेचा मासिक पास असल्याने कुठल्याही स्टेशनवर उतरता येत होते, आणि वाहतूक खर्च कमीच. स्टेशनवरचे खाद्य पदार्थ किंवा एखादे जवळचे हॉटेल पोट्पुजेचि काळजी घेऊ शकत होते. एखद्या दिवशी घरून जेवणाचा डबा न मिळाल्यास काळजी नव्हती.
Management च्या गुरुनी चार भिंतींच्या आत फळ्यावर नियम लिहित , काल्पनिक उदाहरणांच्या सहाय्याने शिकविलेल्या युक्त्या त्याला जणु नैसर्गिकपणे अवगत होत्या.
मार्केटिंग strategy , pricing , टार्गेट customers , मानवी स्वभावधर्म, या सगळ्यांचा विचार केलेला दिसत असूनही आमच्या चेहर्यावरची प्रश्नचिन्हे कमी होत नव्हती. थोडे अधिक खोलात शिरून आपल्या ज्ञानात अजून काय भर पडते ते बघावे असा विचार करून मी आता production कडे वळायचे ठरविले. कच्चा माल , त्यावरची मेहनत, ( Labour Cost ), लागणारी साधन सामग्री, ( tools & machinery ), प्रोसिस्सिंग techniques , कामगारांची कार्यकुशलता ( labour skill ) , वीज, पाणी, असे अनिवार्य खर्च , वगैरे सर्वच शब्द डोक्याभोवती एखाद्या डrसrप्रमाणे घोंघावत होते.
शिंकाळ्यrच्या तारेचे प्रत्येक वेटोळे अतिशय सुबक होते . अगदी compassbox वापरूनही आपले वर्तुळ इतके निट्नेट्के येत नसल्याचे जाणवले, काम इतके सफाईदार होणार नाही याची जाणीव होत होती.
" यासाठी लागणारी तार कुठून आणता "?
" दुकानातून नवी तार नाही घेत. ती फार महाग पडते. "
"मग"?
" त्यासाठी मी धारावीच्या भंगार बाजारात जातो. तिथे बस किंवा truck चे अगदी फेकून दिलेले टायर विकत घेतो. १ - २ रुपयांना एक मिळतो."
"पण टायर कशासाठी?"
" टायर जाळून टाकला कि त्यात असलेली हि तार वेगळी होते. ती सुताराच्या पोलिश करायच्या कागदाने घासून स्वच्छ करतो आणि गरम पाण्याने धुवून घेतो."
" एका टायर मधून किती तार मिळते? "
" साधारण पणे ८ शिंकाळी होतील एवढी "
मी आणि मित्राने एकमेकांकडे पाहिले , raw material cost चा थोडा अंदाज येऊ लागला होता. ५ रुपयाच्या वस्तू मध्ये तारेची किंमत ५० पैसे म्हणजे १० टक्के सुद्धा नव्हती.
" आणि हे रंगकाम" ?
" त्याकरता मी जाळीला लावायचा aluminium paint आणतो. एका छोट्या डब्यात १५ - २० शिंकाळी रंगवून होतात. "
" plier , खिळे , हुक लागतच असतील "?
" हो, मी त्या वस्तू बोरीबंदरच्या घाऊक बाजारातून , महिन्यातून एकदा , पुरेश्या प्रमाणात आणतो . म्हणजे सारखा प्रवास खर्च होत नाही, आणि कामातही खंड पडत नाही,"
" खर्चाचे म्हणाल तर साहेब, मुलानाही थोडे हाताशी द्यावे लागतात" वर त्यांच्या शिक्षणाचा थोडाफार खर्च आहेच"
त्याचे हे सर्व बोलणे ऐकून आम्ही दोघेही अवाक झालो होतो. छोटेखानी उद्योगाचे अचूक जमविलेले गणित, कुटुंबावरील प्रेम आणि भविष्याची तजवीज, सारे काही जागच्याजागी ठाकठीक होते. रोजच्या रोज विविध प्रकारच्या काळज्या डोक्यावर वागवत धकाधकीचे जीवन कुठे, आणि त्याचे हे शांत, समाधानी जीवन कुठे, तुलना करताच येईना. त्यामुळेच शेवटी दोघांच्याही डोक्यात भिरभिरणारा प्रश्न संजयने विचारलाच.
" माफ करा काका, रागावणार नसाल तर,पण एकंदरीत नफा किती होतो सांगाल "
" त्यात राग कसला पोरानो, जे आहे ते तुम्हाला सांगितलेच. पण तरीही थोडक्यात सांगायचे झाले तर , "
थोडा श्वास घेत तो पुढे म्हणाला
" रोजच्या खर्चासाठी मी बायकोकडे ८० रुपये देतो आणि उरलेले २०० रुपये पलीकडे माटुंग्याच्या बँकेत भरतो"
घाई घाईतच आम्हाला पुढे बोलू न देता तो म्हणाला,
" पण साहेब, मी आता त्या बँकेत नाही जाणार. हे पैसे दुसर्या बँकेत ठेवणार आहे."
" का बर " आमचा अगदी प्रतिक्षिप्त क्रियेसारखा प्रश्न.
" मागच्या आठवड्यात त्या बँकेच्या manager ने मला बोलावले होते. "
" कशाला ?"
" म्हणे हा रोज २०० रुपये भरणारा माणूस कोण आहे ते मला बघायचे आहे."
" साहेब, आम्ही अडाणी असलो तरी कष्ट, मेहनत करूनच पैसे मिळवतो ना , मग त्याची अशी , संशय घेतल्यासारखी चौकशी कशासाठी?"
त्याच्या या प्रश्नाचे आमच्याकडे अजिबात उत्तर नव्हते. क्षणभर चक्रावून जाऊन , पुढे काय बोलावे या विचारात मग्न झालो.
तेवढ्यात विरार गाडी येत असल्याची घोषणा झाली. मुलाखत घाई घाईने संपवत आणि आपापल्या bag सावरत आम्ही गाडीत उडी मारायला सज्ज झालो. त्या अर्ध्या तासाच्या मुलाखतीत धंदा व्यवसायाचे यशस्वी गणित, आणि जीवनाचे साधे, सरळ तत्वज्ञान, यांच्या मिळालेल्या मौलिक विचारांचे गाठोडे बांधून, अंतर्मुख होत आम्ही विरार गाडीला लटकलो !!!