uday joshi

Inspirational

4.0  

uday joshi

Inspirational

बहुरुपी

बहुरुपी

7 mins
226


   अकबर बादशहाच्या आणि बिरबलाच्या अनेक गोष्टी आपण लहानपणापासून ऐकल्या आहेत, वाचल्या आहेत. त्या सर्व बिरबलाच्या चातुर्यकथा म्हणून प्रसिद्ध आहेत. आता इतक्या वर्षांनी त्या आठवत नाहीत, पण काही मात्र विसरल्या जात नाहीत. त्यातलीच एक मी अजूनही विसरलो नाही. बिरबलाच्या तल्लख बुद्धीमत्तेचा परिचय करता करताच अतिशय सोप्या पद्धतीने व्यवहारज्ञान देणार्या या गोष्टी त्यामुळेच अजरामर झाल्या आहेत.

त्यातलीच एक गोष्ट. अनेकविध सोंगे हुबेहुब घेणारा एक बहुरुपी आपली कला दाखवून काही बक्षिस मिळवावे , या हेतूने दरबारात आला होता. विविध प्राणी, पशुपक्षांची सोंगे तो अगदी त्यांच्या लकबींसह आणि आवाजाची साथ देत हुबेहुब वठवत होता. सर्व दरबारी त्याचे कसब पाहून आश्चर्यचकित झाले. राजाही बेहद्द खूष झाला.

सरतेशेवटी त्याने एका गाईचे रूप घेतले. गाईचे मान हलवणे, हंबरणे, रवंथ करणे, सर्वच त्याने इतक्या अचूकपणे दाखवले की राजासह सर्व दरबारी लोकांनी मनापासून टाळ्या वाजवत त्याला दाद दिली. उभे राहून राजा त्याला इनाम जाहीर करणार. . . इतक्यात " थांबा " असा आवाज आला. चमकून बघणार्या प्रेक्षकांना एक छोटा , तरतरीत मुलगा दिसला.

" महाराज, आपली परवानगी असेल तर मी याची परीक्षा घेऊ इच्छितो."

अचंबित झालेल्या राजाने नकळतच मानेने होकार दिला.

हा आता पुढे काय करणार याची सगळ्यांनाच उत्सुकता होती.

बाजूलाच पडलेला एक लहानसा दगड उचलून त्याने तो गाईच्या दिशेने भिरकावला. दगड लागताच गाईची झालेली हालचाल पाहून त्याच्या चेहर्यावर समाधानाचे स्मित दिसले.

" उत्कृष्ट" "छान" असे म्हणत, बक्षिसादाखल त्याने आपली टोपी बहुरूप्याच्या दिशेने भिरकावली.

" गाय , बैल हे प्राणी अंगाला काही लागले किंवा माश्या बसल्या तर अगदी सहजतेने आपली कातडी थरथरवितात , याच गोष्टीची मी परीक्षा घेतली. त्यात हा बहुरूपी उत्तीर्ण झाला" ". सर्व प्रेक्षकांच्या चेहेर्यावरील कुतुहल पाहून त्याने आपल्या कृतीचे स्पष्टीकरण केले.

सूक्ष्म निरीक्षणशक्ती, त्यातून मिळालेले ज्ञान आणि समज , या सर्वांचा समयोचित वापर हे गुण अंगी असलेला तो छोटा मुलगा सर्वांनाच भावला आणि राजासकट सर्वांनीच त्याचे मनापासून कौतुक केले. !!!

....

....

थोडीशी अशीच एक घटना आमच्या ऑफिसमध्ये घडली आणि कदाचित त्यामूळेच वरील गोष्ट मनावर बिंबली, आठवणीत राहिली..!


ऑफिसच्या दिवाळी सुटीनंतरचा पहिलाच दिवस होता. कॅंटीनमध्ये लंच झाल्यावर आमचा नेहमीचा ग्रुप... मी, पंकज, मनोज, नितीन, अजय, विकास उर्फ विकी, आपापल्या टेबलाकडे निघालो. सुटीमुळे आलेला आळस चालीमधे जाणवत होता. हाय-बाय करून निरोप घेत सगळे मार्गाला लागले. सकाळचा अर्धा दिवस नाही म्हटले तरी थोडा आळसातच गेल्यामुळे आणि सलग तीन दिवस सुट्टी .... टेबलावर तुंबलेल्या कामाचा ढीग दिसत होता. कामाचा उरक वाढविण्याचा विचार करतच मी खुर्चीत बसलो.


साठलेल्या पेपर्सचा ढिगारा बघून जरा टेन्शनच आले. तरीसुध्दा हळूहळू नजर टाकत कामाच्या स्वरूपानुसार / तातडीनुसार वर्गवारी करत पेपर्स खालीवर करून आवश्यक त्या क्रमानुसार लावण्यास सुरवात केली. सालाबादप्रमाणे, नुकतीच दिवाळी झालेली असल्यामुळे , ट्रेमधे ५- ६ भेटकार्डे पडली होती. त्यातल्या एकाकडे त्यातील नाविन्यामुळे लक्ष गेले. आकाराने मध्यम, मोजकेच रंग पण रांगोळी सारखे एक आकर्षक चित्र होते. पाठविणारी कोणी एक व्यक्ती नसून कंपनीचाच कोणीतरी सप्लायर असावा, कारण .... एंटरप्राईजेस असे काहीतरी नाव त्यावर छापलेले होते. ही गोष्ट लक्षात यायचे कारण सहजच होते. एखादे परिपत्रक जेंव्हा सर्व संबंधित व्यक्तींना पाठवायचे असेल तेंव्हा त्याच्या अनेक प्रती न काढता एकाच प्रतीवर सर्व व्यक्तींची आद्याक्षरे लिहून ते पुढे पाठविले जात असे. वाचून झाल्यावर प्रत्येकजण सही करून ते पुढची आद्याक्षरे असलेल्या व्यक्तीकडे देत असे. त्या भेटकार्डावरही अशीच डिपार्टमेंटमधील सर्वांची नावे होती. ....पण.. नेहमीपेक्षा त्यांचा क्रम वेगळा होता. एक म्हणजे सर्व नावे फक्त तळमजल्यावर बसणार्या व्यक्तींचीच होती. पहिल्या किंवा दुसर्या मजल्यावरील कोणाचेच नाव त्यात नव्हते. सर्वात आधी बॉस आणि त्यानंतर अधिकारी , अन्य स्टाफ हा कोणत्याही ऑफिसमधला अलिखित नियमही इथे पाळलेला दिसत नव्हता. डाव्या कोपर्यात अगदी टोकाला सर्वात पुढे असलेल्या परशा पाटलापासून सुरू झालेला नावांचा क्रम वेडीवाकडी वळणे घेत घेत सगळ्या टेबलांना कव्हर करत होता. कोणीतरी अगदी जाणून बुजून, ठरवून, एका विशिष्ट हेतूनेच तसे केले असावे, याची जाणीव झाली. विचार करता करताच मी नकळत कार्डाचे अंतरंग पहाण्यासाठी घडी उघडली ....

...

दोन मिनिटे चक्क बघतच राहिलो... आतमधे संगिताचे हुबेहुब रेखाचित्र ( स्केच ) काढलेले होते. पेन्सिल , खोडरबर यांचा अजिबात उपयोग न करता डायरेक्ट पेन वापरूनच ते काढलेले दिसत होते, आणि तरीही अचूकता अशी होती की बघणार्याला ते चित्र कोणाचे आहे हे सांगायची गरजच पडली नव्हती. चित्रातील व्यक्ती ओळखण्याबरोबरच नावांचा तो क्रम तसा का होता याचा आपोआपच उलगडा झाला. त्यामध्ये संगिताचे नाव सर्वात शेवटी होते,,, म्हणजेच सगळ्यांनी पाहून झाल्यानंतरच ते संगिताकडे पोहचावे हा हेतू स्पष्ट होता. मनातल्या मनात त्या चित्राला दाद देत, हसत हसतच मी माझ्या नावापुढे सही केली आणि कार्ड पुढच्या टेबलावर मन्याकडे सरकविले.. मान वर करून आजूबाजूला बघितले तर अजय , पंकज, स्नेहल माझ्याकडे पहात माझी प्रतिक्रिया आजमावत होते. त्यांना प्रतिसाद देत मीही थम्स अप स्टाईलने अंगठा दाखविला. !!!!

कोणी बरे ते काढले असेल ? कोणाचा हा उद्योग? आणि काय हे कसब ? आजूबाजूला कंपूकडे नजर टाकूनही प्रश्न अनुत्तरीतच राहिला.

डिझाईन डिपार्टमेंटच असल्यामुळे ड्रॉईंग बोर्ड आणि त्यावर काम करणारे जवळ जवळ ५ - ६ जण तरी आमच्याकडे होते. आपल्या नेहमीच्या कामात सगळेच तरबेज होते. त्यातले तळमजल्यावर फक्त दोघेच, पंकज साळवी आणि सुरेन्द्र बोरगावकर त्यांना सहाय्यक मनोज होता , पण तो ट्रेनिंगवर होता. नविनच असल्यामुळे तो किती स्किल्ड आहे हे माहित नव्हते. साळवी , बोरगावकर हुशार व अनुभवीही, तरी ते अशा प्रकारचे स्केच करु शकतील असे वाटत नव्हते. इंजिनियरींग ड्रॉईंगमध्ये ते हुशार असले तरी फ्री हॅंड मधील त्यांचे कसब कधी नजरेस पडले नव्हते , अनुभवले नव्हते. एकमेकाला अरे तुरे करीत असलो तरी विजय तसा आमच्यापेक्षा वयाने बराच मोठा. स्वभावही थोडा गंभीरच, चेष्टामस्करी कमीच. सुन्या उर्फ सुनिलही त्याच्याच वयाचा, पण स्वभाव मात्र खट्याळ, थट्टामस्करी भरपूर, नेहमी आनंदी , प्रसन्नचित्त . नुसते दहा मिनिटे त्याच्याशी गप्पा मारल्या , तरी खराब झालेला मूड परत यायचा. इंजिनियरींग ड्रॉईंग, विशेषत: मशिनरी , त्यांचे पार्टस, डाय किंवा मोल्ड डिझाईन अशी क्लिष्ट ड्रॉईंग काढण्यात दोघेही तरबेज. पण. .. तरीही हे दोघे असे काही करतील, ? छे, मनाला काही तो विचार पटेना. मनातली नकारघंटा नकळत मान हलवून मी प्रकट केली. शी. . हा मी काय विचार करत बसलोय? एखाद्या गुन्ह्याचा शोध घेत असल्यासारखे सगळीकडे संशयाने बघत होतो. सी. आय. डी. किंवा क्राईम पेट्रोल सारख्या टिव्ही मालिका बघण्याचा परिणाम असावा. मी स्वत:शीच हसलो, .....

.... आणि अचानक माझी ट्यूब पेटली. साक्षात्कार झाला, मनातले विचारांचे वादळ शांत झाले, सभोवतालचा अंधार नाहीसा झाला, ( असे बरेच वाक्प्रचार आहेत ते सर्व. ) थोडक्यात सांगायचे तर माझ्यापुरते तरी कोडे सुटले होते. दुपारपासूनचा घटनाक्रम आठवता माझी खात्रीच झाली. ....

विकास जोगळेकर उर्फ विकी .. होय. . तोच आणि तोच एकमेव. . अशी कलागत करू शकणारा. . नेमून दिलेल्या मशीन ड्रॉईंगमधे बाकीच्या सहकार्यांइतकेच, किंबहुना काकणभर सरसच ज्ञान, दांडगी आकलनशक्ती, आणि सूक्ष्म अवलोकन. .. हा प्राणी खरं तर तसा दुर्लक्षितच होता. पण तरीही वेगळा, सतत आनंदी असणारा ... न बोलता, न सांगता सतत दुसर्याना मदतीचा हात पुढे करणारा. खट्याळ आणि मनस्वीही. ... कोणतीतरी दैवी देणगी लाभलेली माणसे ( म्हणजे गायक, चित्रकार वगैरे ) जशी कलंदर , एककल्ली असतात , तसाच हा ही, ,,, यस्स,,,,, हे काम फक्त विकीच करू शकतो.. . लंचच्या वेळी , नंतर डिपार्टमेंटकडे परत येताना तो तसा तंद्रीतच होता, खुदखुदत होता. .. आणि नेहमीची रूक्ष ड्रॉईंग सोडून अन्य प्रकारची म्हणजे फ्री हॅंड , निसर्गचित्रे, व्यक्तीचित्रे काढण्याची क्षमता फक्त त्याच्यातच होती. चित्र तर इतके अचूक होते की व्यक्तिला समोर बसवून एखाद्या कसबी कलाकाराने भरपूर मेहनत घेतली असावी, असे वाटत होते.

...


.,..

 तासभर झाला असेल. कॅंटीनवाल्याने टेबलावर चहाचा कप ठेवला. त्याच्या आवाजाने माझी तंद्री भंगली. फाईल बाजूला ठेवून मी कप ओढला. कामात गुंगलेले असताना , असा चहा मिळाला की इतके बरे वाटते , आणि तो ही न सांगता, वा, क्या बात है असे म्हणतच मी एक घोट घेतला. कोणी काही म्हणो, पण तरतरीसाठी चहा अत्यावश्यक आहे, असे माझे ठाम मत आहे. चेंज ऑफ वर्क इज रिअल रेस्ट , असे म्हणतात, ते पाळण्याचा सोपा मार्ग म्हणजे मधून मधून चहा पिणे !!!


तरतरी आली खरी , पण त्यामुळे डोक्यातील कामाबद्दलचे विचार थोडे मागे पडले आणि त्याच एका चुकार क्षणी पुन्हा ते चित्र डोळ्यासमोर दिसू लागले.


....

पुन्हा एकदा मानगुटीवर बसलेले ते चित्राचे भूत झटकून मी कामाला सुरवात करणार,....


 तेवढ्यात, पंकजने हाक मारली. माझ्या प्रश्नार्थक चेहर्याला त्याने खुणेनेच उत्तर दिले. ते भेटकार्ड फिरत फिरत संगिताच्या टेबलावर पोचले होते आणि कोणत्याही क्षणी ती ते पाहील अशी परिस्थिती होती. आजूबाजूला बघितले, तर मजल्यावरील संपूर्ण स्टाफ एकाच दिशेने नजर लावून बसला होता...... सर्वांच्या नजरा संगिताकडेच वळल्या होत्या. कोणी उघडपणे, कोणी फायलीतून चोरट्या नजरेने , तर कोणी रस्त्यावर फिरत असल्यासारखे आपण त्या गावचेच नाही असा आव आणत.... पण बघत मात्र तिकडेच होते.

....

संगिता, नुकतीच एक महिन्यापूर्वी कामावर रूजू झाली होती. एक टायपिस्ट मॅडम दीर्घ मुदतीच्या रजेवर गेल्यामुळे टेंपररी स्वरूपात तिची नेमणूक झाली होती. दिसायला साधी , पण नीटनेटकी होती. येऊन महिनाभर झाला असल्याने डिपार्टमेंटच्या सगळ्यांशी तिची तोंडओळख झाली होती. बोलायची कमीच पण हसतमुख ..त्यामुळे पटकन रूळली. टायपिंगचेच काम, त्यामुळे बोलणे कमी आणि खडखडाट जास्त. एकंदरीत स्वभाव शांतच. आपले काम बरे आणि आपण बरे, अशीच वृत्ती. वेषभूषा साधीच पण थोडीशी तत्कालीन फॅशनकडे झुकणारी. साडी किंवा पंजाबी ड्रेस वगैरे. हेअर स्टाईल मात्र तशी जुन्या वळणाची , शाळकरी मुलीसारख्या दोन वेण्या. एक पुढे तर दुसरी पाठीवर रूळणारी. ...

...

या गोष्टीची कुणकुण पहिल्या मजल्यावरील स्टाफलाही लागली असावी. त्याचमुळे सुन्या, जेराल्ड, ललिता, मंगल, वगैरे मंडळीही काहीतरी कारण काढून खाली येऊन वेगवेगळ्या टेबलांपाशी नको त्या गप्पा मारीत होती. ...

आणि कर्ता करविता, हळूच एका कोपर्यात, परशा पाटलाच्या बाजूला उभा होता..,.

चेह-यावरचे मिष्किल हास्य लपत नव्हते.

...

कार्डाकडे नजर जाताच संगिताने ते सहज कुतुहलाने उचलले. बाहेरील चित्र तसे काही फारसे आकर्षक नव्हते. आपल्या नावापुढे सही करून नंतर त्याचे अंतरंग पहाण्यासाठी तिने ते उघडले...

..... आपले हुबेहुब काढलेले चित्र पाहून,,,, बाकी काही करण्याआधी तिने पटकन स्वत:ची पुढे असलेली वेणी एका झटक्यात मागे टाकली, आणि थोडीशी कावरी बावरी होऊन तिने वर बघितले. तिची ती सहज सुलभ प्रतिक्रियाच त्या चित्राबद्दल बरेच काही सांगून गेली.. त्यातील अचूकतेची पावती देऊन गेली ...


आणि इतका वेळ उत्सुकतेने नजर लावून बसलेल्या , त्या क्षणाची वाट पहाणा-या , आणि तिच्या त्या प्रतिक्रियेने अचंबित झालेल्या सर्व उपस्थितानी, उभे राहून टाळ्या वाजवत , त्या कलाकाराला व त्याच्या कलाकृतीला मनापासून मानवंदना दिली. तो " "बहुरुपी " मात्र तिथून एका क्षणात, कोणाला काही कळायच्या आत नाहीसा झाला होता.!!!


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational