uday joshi

Others

4.5  

uday joshi

Others

जमाना बदल रहा है

जमाना बदल रहा है

8 mins
251


आठवले काका

अत्यंत प्रेमळ , मनापासून बोलणारे, मला नेहमीच उत्तेजन देणारे, माझ्या घरच्या लोकांची आस्थेने चौकशी करणारे, आणि स्वतःचा व्यवसाय सुरु केल्याबद्दल माझे प्रचंड कौतुक करणारे. त्यांचे स्वभाव विशेष एक एक करून डोळ्यासमोर येतात.

तसे पहीले तर त्यांची माझी जवळिक अधिक झाली ती गिरगावातून दादरला आल्यानंतर. ते माझा शाळकरी मित्र अजयचे वडील. ५ वी ते ११ वी पर्यंतच्या शालेय जीवनातील माझा मित्र . दोघेही उंचीने कमी, त्यामुळे वर्गात आमची जागा ठरलेली, अगदी शिक्षकांच्या पुढ्यातील पहील्या बाकावर. त्यामुळे मस्ती करायला किंवा खोड्या करायला फारशी संधीच नसायची.

साधा पण अत्यंत तल्लख बुद्धीचा, मितभाषी पण सडेतोड बोलणारा, विचारांचा पक्का, त्यामुळे तसा तो reserved type होता.

शालेय जीवनानंतर कॉलेज मधेही आम्ही २ वर्षे एकत्र होतो. त्यानंतर तो IIT ला आणि मी VJTI ला. मला वाटतं , आमच्या शाळेच्या ग्रुप मधला तो एकटाच IIT ला गेला. engineering साठी गेलेले बाकी बहुतेक सर्व VJTI किंवा SP ला गेले होते. अर्थातच त्यामुळे संपर्क कमी होत गेला. IIT मधून engineer झाल्यावर अजय अमेरिकेला गेला.

अभ्यास, खेळ किंवा अन्य काही कारणामुळे सर्वजण एकमेकांच्या घरी जात असू. त्यामुळे पालकही सर्वाना ओळखत होते.

१९७८ ला गिरगावातून आम्ही दादरला राहायला आलो. “Motor & Pumps Specialists ( MPS) ”नावाच्या कंपनी मध्ये नोकरी लागून रुटीन चालू झाले. हळू हळू college च्या मित्रांचा संपर्क कमी होऊन ऑफिसमधील ग्रुप झाला. MPS मध्ये मी आता बर्यापैकी स्थिरावलो .

४-५ वर्षानंतर एकदा अचानक आठवले काकांची भेट झाली. ते माझ्या जवळच अर्पिता apartment मध्ये राहायला आले असल्याचे कळले. गिरगाव सोडून आता दादरलाच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मधून मधून काकांची भेट, गप्पा, ख्याली खुशालीची चौकशी, वगैरे चालू होते. धाकटा अतुलही माझ्या ओळखीचा होता. तो , त्याची बायको, आई सर्वच हळू हळू जवळच्या परिचयाचे झाले. काकू थोडया अबोलच. पण नंतर त्याही बोलत्या झाल्या.


अजय सगळ्यात मोठा. त्यानंतरची संगिता, दोन भावात एकटीच बहीण, त्यामुळे अर्थातच सगळ्यांची लाडकी. डॉक्टर झाल्यावर तीही उच्च शिक्षणाच्या निमित्ताने परदेशी गेली. मोठ्या दोघांप्रमाणे अतुलही अतिशय हुशार, तल्लख बुद्धिमत्तेचा होता. अर्थातच engineer सहज झाला. त्याचाही परदेशी जाण्याचा विचार असावा, पण बहुतेक काकांनीच, एकानेतरी इथे राहा अशी गळ घातली असावी.

माझ्या बरोबरच वासंतीचीही ओळख झाली. स्वभाव बोलका आणि मन मिळाऊ असल्यामुळे ( खर तेच सांगतोय, बायकोची उगीच प्रशंसा नाही ) तीही त्यांच्या चांगली ओळखीची झाली. आम्हा दोघांना तर भक्कम पाठींबा , आणि मानसिक धैर्य देणारी, एक वडीलधारी व्यक्ती मिळाली होती.


दिवस, महीने, अगदी वर्षेही जात होती. वाढत जाणारे वय, आता काकांच्या चालण्या बोलण्यातून दिसू लागले होते. मंदावलेली चाल, हातापायातील थर थर , स्वरातील कंप , नजरेतून सुटत नव्हते. तरीही समोर भेटल्यावर हक्काने बोलावून, शिळोप्याच्या चार गोष्टी करत, सर्वांची चौकशी करून, कौतुकाचे / अनुभवाचे चार शब्द सांगत, प्रेमळ आशीर्वाद देत आमचा निरोप घ्यायचे. ...


एकदा अजय आला होता. अर्पिता apartment मध्ये त्याला भेटायला गेलो. शाळेपासून ते आज पर्यंतच्या अखंड गप्पा , तास दोन तास झाल्या. संगिताही आली होती. अमेरिकेत स्थाईक झालेली ती दोघे काही दिवसांनी परत गेली. उज्ज्वल भविष्य , आकाशी झेप घेऊ पाहणारी करिअर , महत्वाकांक्षा यांचा ध्यास घेतलेली ही मंडळी अशा धावत्या visit देत असतात. काही जण घरच्यांची ओढ म्हणून, काही जण कर्तव्य म्हणून , काही नाईलाजाने तर काही वाड वडिलांच्या मालमत्तेतील हक्क बजावण्या साठी मधून मधून ( दोन वर्षांनी एकदा ) येत असतात.


काकांचे अजय वर प्रेम होते, संगिता वर, साहजिकच मुलगी असल्याने थोडे जास्तच असावे, पण अतुलवर मात्र जीव होता. स्वताच्या अक्कलहुशारीने आणि धडाडीने सुरु केलेल्या व्यवसायाचे त्यांना कोण कौतुक ! त्यात " त्याने माझी आर्थिक मदतही घेतली नाही " हे सांगताना डोळ्यात एक वेगळीच चमक दिसायची. उर एका सार्थ अभिमानाने भरून यायचा.


सावरकर मार्गावरची त्यांची जागा ही तसे पाहता थोडी गैर सोयीची होती. रोजच्या गरजेच्या वस्तू, किराणा समान इत्यादी आणायचे असल्यास कमीत कमी १० मिनिटांची पायपीट होती, आणि परत येताना दोन्ही हातात वजन असल्याने परिस्थिती अधिकच कठीण व्हायची. रिक्षा नाही, Taxiwala अशा छोट्या अंतरासाठी नकारच द्यायचे. त्यात वस्तूच्या किमतीपेक्षा Taxi चे बिल जास्त होते आहे हे दिसल्यावर टाळाटाळ, चालढकल होतेच. अतुल सहकुटुंब पार्ल्याला राहू लागल्यावर तर ती गैर सोय विशेष जाणवू लागली होती.


असेच काही दिवसांनी काका एकदा रानडे मार्गावर दिसले. नेहमीच्या गप्पा झाल्यावर त्यांनीच आता डी.एल. वैद्य रोडला राहण्यास आल्याचे सांगितले. ही जागा खरोखरच सर्व दृष्टीनी सोयीची होती. सर्व जीवनावश्यक वस्तू अक्षरश हाकेच्या अंतरावर मिळाल्या असत्या. विरंगुळा म्हणून जाण्यासाठी विठ्ठल मंदिरही घरासमोरच होते. काका खुश होते, अतुलवर, जागेवर आणि एकंदर वातावरणावर. " अरे अगदी गिरगावात असल्यासारखं वाटतंय." त्यांच्या या वाक्यात वेगवेगळे अर्थही होते. दादर चांगलं असलं तरी गिरगाव ते गिरगावच हा भाव . शिवाय आयुष्याची इतकी वर्षे जिथे घालवली त्या जागेचं वास्तुच प्रेम, तिथल्या आठवणी या नवीन ठिकाणी येत राहतातच . तसेच काहीसं त्यांचं झालं होत .

" अरे मुख्य म्हणजे आम्हा म्हातार्यांना दवाखाना आणि देऊळ जवळ लागते.

एका ठिकाणी शरीराच्या तर दुसरीकडे मनाच्या जखमा सुसह्य करण्याचे उपाय करायचे ."

गप्पांच्या ओघातच काकूंची तब्येत बरी नसल्याचे कळले. मधुमेह, संधिवात आणि वयोमानाप्रमाणे येणारे आणखी काही व्याधींचे प्रकार त्यांना त्रास देत होते.

" तशी ती हिंडती फिरती आहे, पण घरातल्या घरातच. रस्त्यावर बाहेर पडणे कठीण आहे"l

" हो, आणि सावरायला कोण? आम्हीच दोघे एकमेकांना यथाशक्ती सावरतो, धीर देतो. सर्वजण आपापल्या व्यापात गुंतलेला. आमच्यासाठी त्यांना वेळ कुठे आहे? "

नकळतच काकांच्या मनातील एक आंतरिक वेदना चमकून गेली.


काही दिवस , कदाचित २-३ महीने असतील. काका दिसले नव्हते. अचानक काकूंच्या निधनाची बातमी समजली. २ दिवस झाले होते.


रविवारी सकाळीच त्यांच्या घरी गेलो. संगितानेच, त्यांच्या मुलीने दार उघडले. माझे नाव तिला आठवत नसावे. पुढे आलेल्या अजयला " जोशी किंवा मराठे" असे सांगतच दार उघडून मला आत बोलाविले. अजयने मात्र मला ओळखले. जवळ जवळ ३७ - ३८ वर्षांनी आम्ही भेटत होतो. थोडा वेळ गप्पा, बोलणे झाले, काका आत झोपले असल्याचे कळले. त्यांना न उठवण्याची सूचना करून मी थोडा वेळ वाट बघण्याचे ठरविले. एकमेकाची चौकशी करत , नोकरी , व्यवसाय, कुटुंबाची माहीती, इत्यादी विषयांना स्पर्श करत आम्ही बोलत होतो. अनेक वर्षांचा काळ मध्ये गेल्याने दोघानाही एकमेकांबद्दल फारच कमी माहीती होती. ..


थोड्या वेळाने काका बाहेर आले. बहुतेक आमच्या आवाजाने जाग आली असावी.

" अरे, तू आहेस होय, " असे म्हणतच त्यांनी सुरवात केली. आवाज अत्यंत क्षीण , बहुधा थकव्यामुळे असेल . समोर बसत बोलते झाले.

" खूप सहन केल रे तिन . काय काय होत होते ते अगदी असह्य होते. समजत असूनही काही करता येत नव्हते. त्या वेदना , क्लेश कसे सहन करीत होती , तिचे तिलाच ठाऊक! "

" हताशपणे बघण्यापलीकडे काहीच करू शकत नव्हतो. "

थोडा श्वास घेत, स्वताला सावरत , " पण सुटली तरी . आपल्याच माणसाचे हे असे हाल पाहवत नाहीत रे, "

" एकीकडे तिचे हाल पाहवत नव्हते आणि त्यातून ती सुटण्याचा एकाच परिणाम, जो मला नको होता"

त्यांच्याशी काय बोलावे हे तर काहीच सुचत नव्हते. त्यामुळेच त्यांना मोकळे बोलू द्यायचे असा विचार केला.

थकूनच त्यांनी खुर्चीच्या पाठीवर मन टेकली. क्षणभर डोळे मिटले. वयोमानपरत्वे आलेला शारीरिक थकवा आणि त्यात ह्या दुखाचा मानसिक ताण , , काका अगदी जर्जर झाले होते.

" खूप थकलो आहे , पण झोप लागतच नाही. एकदाची कायमची झोप लागली तर बरे ."

दुख,, निराशा, हताश अवस्था या सगळ्यांचा तो परिणाम होता.

"काका तुम्ही पडा जाऊन, " मी सहजच बोललो.

काका आत गेल्यावर अजय , संगिता बरोबर थोड्या गप्पा सुरु झाल्या. व्यवसाय, शिक्षण, family members , वगैरे बद्दल नसलेल्या माहीतीची देवाण घेवाण झाली. अनेक वर्ष नंतरच्या भेटीमुळे ते साहजिकच होते .

सहजच शाळेतील आठवणी निघाल्या. काही झाले तरी शेवटी आम्ही दोघे शाळकरी मित्रच. कोण कोण संपर्कात आहेत, कोणाचा पत्ताच नाहीये, कोण किती बदलले आहेत, भारतात कोण आहेत, परदेशी कोण आहेत, वगैरे वगैरे.

अगदी अलीकडेच सुरु झालेल्या आमच्या हायस्कूल मधल्या मित्रांच्या गेट टुगेदर बद्दल मी त्याला सांगितले.

नितीनचा पुढाकार आणि बाकी सर्वांनी दाखविलेला उत्साह यामुळे दरवर्षीचे गेट टुगेदर कसे मस्त होत आहे, राणे सर, तेंडूलकर सर यांच्या भेटी , वगैरे वगैरे. त्यालाही थोडेसे भूतकाळात गेल्यासारखे वाटले असावे. ...


पण थोड्या वेळाने आपणच एकांगी बडबड करत असल्याचे जाणवू लागले. अजयला त्यात फारसा रस दिसत नव्हता. खर तर त्याच्याकडून प्रश्नांचा भडीमार अपेक्षित होता. पण त्याची प्रतिक्रिया थंडच होती. मला ते जरा खटकलेच. अलिबागच्या न संपणार्या रात्रभर गप्पा, आणि नकळतच पुन्हा जोडली गेलेली आमची मने, पुन्हा पुन्हा उगाळूनही कंटाळा न आणणाऱ्या आठवणी, याबद्दल बोलत असतानाच त्याचा निर्विकारपणा बोचू लागला. ..

" केवळ नितीन मुळेच हे घडले रे "

" आता आम्ही सगळे वर्षातून एकदा भेटतोच, शिवाय फोनाफोनी चालू असतेच. "

" अक्षरश: आम्ही ते जुने दिवस पुन्हा नव्याने जागवतो".


माझी टकळी चालूच होती. ...

" तुला कोणाशी बोलायचे आहे? गंमत म्हणून? माझ्याकडे सर्वाचे नंबर आहेत".

माझ्या प्रश्नावरची त्याची प्रतिक्रिया अचंबित करणारी होती.

" काय बोलणार? मला कोणी ओळखतही नसेल, आणि काही विचारायचे तर विषयही नाही."

जाऊ दे, मला काही रस नाही."


ऐकून मन खट्टूच झाले. जास्त काही न दाखवता मी आवरते घेतले. पुन्हा एकदा काकांना हाक मारून मी बाहेर पडलो.


घरी परतताना मन अस्वस्थच होते. माणूस इतका बदलू शकतो? लहानपणचे संस्कार, आठवणी, नाती मैत्री इतक्या सहजतेने विसरू शकतो? हा परिणाम मधल्या तीस वर्षांचा कि बदललेल्या वातावरणाचा, आजूबाजूच्या व्यक्ती, समाजाचा ? materialistic परदेशी संस्कृतीचा ?

तरीही त्यामुळे आपले बालपणीचे, मातृभूमीचे संस्कार याबद्दल काहीही न वाटणे, ही गोष्ट पटतच नव्हती.


नकळतच आमच्या प्रदीप आरोठे ची आठवण झाली. पुष्कळ वर्षांनी भेट झाल्यावर त्याला झालेला आनंद तो शब्दात व्यक्त करू शकत नव्हता , त्याचा चेहरा आणि डोळ्यातली चमकच सर्व काही सांगून जात होती. त्या तुलनेत ( नकळतच मी दोघांची तुलना करू लागलो होतो.) अजयचा चेहरा निर्विकार , भावना विरहीत असाच वाटला. वास्तविक आम्ही दोघे शाळेची ७ वर्षे अगदी एकाच बाकावर आणि कोलेजची २ एका वर्गात एकत्र घालविली होती. प्रदीप तर फक्त चारच वर्षे बरोबर होता. पण निर्माण झालेली जवळीक, आपलेपणा आणि प्रेम यात अक्षरशः जमीन अस्मानाचा फरक होता. ....


काकांचा " पुढे काय " असा प्रश्न करणारा चेहरा आठवला. आलेली ही दोन्ही मुले काही दिवसांनी परत जाणार, अतुल पार्ल्याला, मग काका कसे राहतील एकटे? प्रश्न साधा पण त्याचे उत्तर माझ्याकडे नव्हते. मी तर मित्र होतो पण काकांचे तर ते रक्ताचे नाते ! ...

"उडुनी जा पाखरा, नयन मनोहर पाहुनी परिसर, भुलू नको रे घरा ," असच काहीसं काका म्हणत असावेत.

" साहेब, साहेब, " watchman च्या हाकेने मी भानावर आलो. काकांच्या घरी विसरलेला चष्मा घेऊन तो माझ्यामागे धावत येत होता. त्याचे आभार मानून मी मार्गस्थ झालो.

खूप दिवस हे सर्व लिहून काढायची इच्छा होती, ती आज पुरी झाली . पण घटनेचा परिणाम नकळत माझ्या लिखाणातही आला. मी चष्मा " काकांच्या" घरी विसरलो होतो, माझ्या " बाल मित्राच्या , अजयच्या" घरी नाही !!!!



Rate this content
Log in