सुंदरता आणि प्रेम
सुंदरता आणि प्रेम


तनाची आणि मनाची. सुंदरता वागण्याची आणि बोलण्याची. वागण्या बोलण्याला आपण शिष्टाचार असे म्हणतो. देखणेपणातले सौंदर्य वेगळे. आचरणातले सौंदर्य वेगळे. संवाद साधण्याचे सौंदर्य वेगळे. विद्वत्तेचे सौंदर्य वेगळे. कमनीय बांधा, ठेंगणा -ठुसका बांधा, उंच बांधा, शरीर कमावलेला बांधा, स्थूल व्यक्तिमत्त्वाचा बांधा या प्रत्येक बांध्याचे सौंदर्य खूप वेगळे आहे. देखणेपणा आपल्या विचार आणि विद्वतत्तेवर अवलंबून आहे. पूर्वीच्या काळी माणसाची विद्ववत्ता बघून, तू काय काम करतो, हे बघून मुली लग्न असतं अथवा घरातील मोठी माणसे लग्न जमवत असत. तसेच मुलगी पाहताना तिची नाकीडोळी नीट आहे का? ती घर कामात हुशार आहे का? कुटुंब तिला आवडते का? घरादारावर प्रेम करेल का? आपले घर सांभाळेल का? इत्यादी प्रश्नांद्वारे मुलीची निवड केली जात असायची. लग्नानंतर प्रेम होतेच की, त्या लग्नातही एक ओढ असायची. लग्नानंतर आपोआप प्रेम होत असायचे. आणि ते प्रेम टिकून राहत होते. पूर्वी मुलींना दिलेली समज 'दिल्या घरी तू सुखी रहा...' या वचनात मुली बांधल्या गेल्या असायच्या. त्यामुळे पूर्ण घरादारावर प्रेमाची बरसात करायच्या. हालात दिवस काढायच्या. पण आई-वडिलांसमोर ब्र शब्द बोलायचे नाहीत. असे हे नितांत सुंदर प्रेम होते. वेडे प्रेम होते. खरंच मुलींनाही त्रास होत होता. केवळ आई-वडिलांना काही वाटू नये म्हणून मुली बोलत नसायच्या. दिल्या घरी सुखाने नांदायच्या. प्रेमाची बरसात करत राहायच्या. हे सुंदर मनाचं प्रतीक. मुली जर सासरकडच्यांनी खूप त्रास दिला तर, समाज काय म्हणेल यामुळे आईवडील स्वतःच्या मुलींना जास्त जवळ करत नसायचे. समाजाकडून काही बंधन लादली गेली होती. त्यातूनही मुलीला खूप त्रास झाला तर एखादे कुटुंब आपल्या मुलीला आपल्याजवळ ठेवायला समाजाशी चार हात करायचा हे झाले आपल्या मुलीवरचे प्रेम. पण हल्लीच्या ह्या दिवसांमध्ये हे प्रेम पाहायला मिळत नाही. एकतर सर्व मुला मुलींना शिक्षण घेतलेला, चांगल्या पगाराचा जोडीदार लागतो. शिक्षण, विचार आणि सौंदर्य या तिन्हींचा संगम असेल तर उत्तम संसार होऊ शकतो असे त्यांचे म्हणणे असते. परंतु काही ठिकाणी सौंदर्याला खूपच महत्त्व दिले जाते. त्या ठिकाणी त्या मुलीची विद्वत्ता किंवा कुटुंबामध्ये राहणार आहे की नाही हे पाहिले जात नाही. हल्ली बऱ्याच मुली मुलाला अशी अट घालतात की तू परदेशी आहेस का? बाहेरगावी राहतोस का? तुझ्या आई-वडिलांबरोबर मला राहायचं नाही. असं बोलणाऱ्या मुली खरंच संसार करू शकतील का? असा विचार बऱ्याचदा मनात येतो. मुलींना फक्त नवरा हवा आहे असे कसे चालेल. शिकले सवरलेले आहात तर कुटुंबाची जबाबदारी घ्यावी. सासरकडच्या माणसांना जवळ करावं. फक्त नवरा कसा मिळेल आपल्याला? नवऱ्याला देखील आई-वडील आहेत ना. आई वडिलांना तो कुठे सोडणार. आपल्या आई-वडिलांप्रमाणे त्याही आई-वडिलांना स्वीकारावे. त्यांच्यातील मनाचे सौंदर्य जाणावे. त्यांच्यावर प्रेम करून पहावे. जर त्यांनी प्रेम केले नाही तर मग पुढचे पाऊल उचलायला हरकत नाही. परंतु प्रेमाची परिभाषा अशी असते की तुम्ही प्रेम दिलं तर प्रेम नक्कीच मिळतं हा अनुभव आहे. आणि पूर्वी कसं होतं आई-वडिलांनी लग्न करून दिलं की तिथेच सासरी नांदायचं. वादविवाद झाले तरी समंजसपणाने तिथेच दिवस काढायचे. अगदीच विकोपाला गेले तर घटस्फोट घेऊन रिकाम व्हायचं. परंतु शक्यतो ही वेळ येत नव्हती. पूर्वीच्या गरजा मर्यादित होत्या. पण आता काय होतंय मुलांचं सगळं विश्वच बदललेल आहे. गरजा राहणीमाना प्रमाणे बदलू लागल्या. बंगला,गाडी,कपडा- लत्ता यात खूप फरक पडला. त्यामुळे संसाराची दोन्ही चाकं कामाला लागली. घरातल्या सुख सोयीसाठी पैसा हा कमवावा लागतोच. त्यामुळे आयटी क्षेत्रात असणाऱ्या ह्या मुलांना स्वतःसाठी वेळ देणं जमत नाही. आणि मग काय होतं प्रेमापासून ते लांब राहतात. एकमेकांना वेळ देण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नसतो. यातून एकमेकांबद्दलची ओढ कमी व्हायला लागते. एकमेकांशी पटेनास झालं, जमत नाही असं वाटले की मग तू नाही तर दुसरा कोणी असे म्हणत घटस्फोट घेऊन रिकामे होतात. आणि जर एकमेकांना प्रेमाने बांधून ठेवला असेल तर अशा गोष्टी 100% टळतात. तर सौंदर्य आणि प्रेम यांचा खूप जवळचा संबंध आहे. पुरुष बाईच्या सौंदर्यावर भाळतो. तर स्त्री पुरुषाच्या सौंदर्यापेक्षा त्याच्या कार्यावरती, कर्तुत्वावरती भाळते. यातूनच प्रेमाची निर्मिती होते. आणि खरे प्रेम असेल तर ते टिकते. पण फक्त शरीरावर प्रेम असेल तर मात्र ते शंभर टक्के टिकत नाही. आजकाल व्हाट्सअप, इन्स्टाग्राम, फेसबुक इत्यादी माध्यमातून एकमेकांचा परिचय होतो. दिसायला जरा बाई छान असेल तर तिला लगेच पर्सनल मेसेज यायला लागतो. ह्या मेसेजला किती रिस्पॉन्स द्यायचा हे स्वतः बाईंन ठरवावं. आणि मग या प्रेमाच्या, खोट्या प्रेमाच्या जाळ्यात का बाई अडकली तर पुरुष तिचा गैरफायदा हा घेणारच! यासाठी स्वतः बाईने खंबीर असायला हवे. माणसं ओळखायला शिकायला हवे. समोरच्या व्यक्तीला पण रिस्पॉन्स किती द्यायचा आहे आपण ठरवायला हवे. स्त्रियांचे काय होते माहितीये का! समोरच्या पुरुषाने म्हटले तू छान दिसते, तुझा डीपी सुंदर आहे, तुझी साडी छान आहे असे म्हटले की स्त्रिया वाहवत जातात. आणि मग इथे प्रेमाची परिभाषा पार बदलून जाते. बाह्य रूपावर प्रेम करणाऱ्या व्यक्ती नको आहे. तुमच्या अंतर्मनावर प्रेम करणारा व्यक्ती हवा. असा साथीदार शोधावा. आजकालचे युग खूप वेगळे आहे. पूर्वी एवढी सौंदर्य प्रसाधनाने नव्हती. आज काल सौंदर्यप्रसाधनांचा वापर करून आहे त्या सौंदर्यात भर घालता येते. समोरच्या व्यक्तीला त्याची भुरळ पडते. म्हणून म्हणते सर्वांना प्रेम करावे अंतर्मनावर प्रेम करावे आपल्या कुटुंबावर प्रेम करावे आपल्या सख्यावर प्रेम करावे आपल्या मुलांवर प्रेम करावे समाजावर प्रेम करावे अपंगांवर प्रेम करावे अनाथ लेकरांवर प्रेम करावे वृद्धांवर प्रेम करावे आपुलकीच्या माणसांवर प्रेम करावे स्वतःवर सौंदर्याची जपणूक आपोआप होते. आपले मानसिक सौंदर्य, विचारातील बळ आणि अंतर्मनाच्या बळावरती आपण जग जिंकू शकतो हे शंभर टक्के खरे आहे. वसुधा वैभव नाईक धनकवडी जिल्हा पुणे मो. नं. 9823582116 युवा क्रांती संघटना पोलीस मित्र भारत महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष. राष्ट्रीय किसान विकास मंच महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष... 🙏