आली दिवाळी गेली दिवाळी
आली दिवाळी गेली दिवाळी
*आली दिवाळी, गेली दिवाळी*
सोन पावलांनी हसत नाचत दिवाळी आली
मना मनातील सारे क्लेश संपवून गेली...
घराघरातील मांगल्य दीप प्रज्वलीत करण्या आली
घराघरातील वाईट विचारांची जाळी - जळमटे घेऊन गेली....
महालक्ष्मी आली, निवास करून राहिली
आशीर्वादरुपी मानवाच्या मनात स्थान करून गेली...
असा हा दिवाळी सण सात ते आठ दिवसांचा. घरातील सर्वांनी घरातल्या सर्व कामांसाठी हातभार लावला. घराच्या स्वच्छते पासून ते घरातला आकाश कंदील लावण्यापर्यंत.
17 तारखेपासून चालणार हा सण आता जरा स्थिरावला आहे.
17 ते 23.. वसुबारस ते भाऊबीज या दिवसातील हे क्षण सर्वाना खूप आनंद देऊन गेले. प्रत्येकाच्या मनात पवित्रतेची ज्योत पेटवून गेले.
आपण समाजाचे काही देणं लागत असतो त्यामुळे काही जणांनी समाजातील गोरगरिबांना, अनाथांना वृद्धाश्रमांना मदत करूनही आपली दिवाळी साजरी केली.
आपल्या घरातील लक्ष्मीपूजन केल्यानंतर नोकरदार वर्ग दोन दिवसांसाठी का होईना घराच्या बाहेर फिरून आला. निसर्गाच्या सानिध्यात रमला. आपल्या कुटुंबियांसमवेत आनंदाचे दिवस घालवले. आणि सर्वांना आनंद दिला.
जवळपास या दिवाळीमध्ये सर्वजण एक छान छोटीशी ट्रीप काढतातच. तेवढाच एक एन्जॉय असतो आणि वातावरण निर्मिती छान असते.
नुकताच पाऊस झालेला असतो सगळीकडे हिरवळ असते धबधबे असतात मुलांना नयन मनोहर अशी दृश्य पहायला मिळतात आणि निसर्गात रमल्याने माणूस मन शांती करून घरी जातो.
घराघरातील आकाश कंदील, पणत्या, नव्या आणलेल्या पणत्या सर्व साफ करून आता माळावर गेले असेल अथवा लॉफ्टवर गेले असेल. आता ते पुढच्याच वर्षी दिवाळीला निघेल.
काही जणांकडे तुळशीचे लग्न होईपर्यंत आकाश कंदील ठेवला जातो. तुळशीच्या लग्नानंतर तो उतरवला जातो.
तर असा हा दिवाळी सण आनंदाचे अनेक क्षण घेऊन आला आणि मंगल्याचे दीप पेटवून गेला. आता फटाक्यांचा आवाज नाही. वयोवृद्ध किंवा लहान मुले यांना होणारा फटाक्यांच्या आवाजाचा त्रास नाही. दिवाळीच्या या दिवसांमध्ये घरासमोर मोठी रांगोळी काढली जाते आता त्याचे स्वरूप छोट्या रांगोळीत बदलेल.
घरातल्या माऊलीने दिवाळीत केलेल्या पदार्थांचे सेवन आता दिवाळी संपल्यानंतर ती करेन. कारण घरातील पदार्थ करून त्याच्या वासानं तिला ते खावेसे वाटत नाही पण जसे पदार्थ संपत येतात तसे तिला त्याची चव चाखायची इच्छा होते.
अशी ही दिवाळी सोन पावलांनी हसत नाचत आली खरी, काही ठिकाणी लोकांचं दिवाळही काढून गेली. दिवाळी म्हटली की एवढं तर चालणारच ना! म्हणून म्हटलं मी दिवाळी गेली दिवाळी....
*वसुधा वैभव नाईक*
*धनकवडी, जिल्हा - पुणे*
*मो. नं. 9823582116*
