समाज आणि आपण
समाज आणि आपण
*समाज आणि आपण*
मनुष्य हा मुळात सामाजिक प्राणी आहे. तो एकट्याने जगू शकत नाही. जन्मल्यापासूनच त्याचे आयुष्य कुटुंब, शेजार, शाळा, मित्रपरिवार आणि विविध संस्थांशी जोडलेले असते. या सर्वांच्या एकत्रित स्वरूपाला आपण समाज असे म्हणतॊ. समाजातील आपली ओळख महत्वाची असते. ती बनवावी लागते.
समाजातूनच आपली ओळख, संस्कार, भाषा सामाजिक, सांस्कृतिक मूल्ये मिळतात ; आणि आपण आपल्या सामाजिक कार्यातून, कृतीतून समाज घडवत असतो.
समाज ही केवळ लोकांची गर्दी नसून परस्पर सहकार्य, नियम, परंपरा आणि जबाबदाऱ्या आहेत.एक अजब सायकल आहे.
कुटुंब ही समाजाची पहिली शाळा आहे. येथेच आपल्याला प्रेम, आपुलकी, शिस्त आणि आदर यांचे धडे मिळतात. संस्कार मिळतात.
पुढे शाळा, महाविद्यालय आणि नोकरी, व्यवसाय इत्यादी कार्यक्षेत्रात आपण सामाजिक नियम, कर्तव्ये आणि हक्क समजून घेवून वागतो .
समाज आपल्याला सुरक्षितता, शिक्षण, रोजगार आणि सांस्कृतिक वारसा देतो.
परंतु समाजाच्या विकासासाठी प्रत्येक व्यक्तीची भूमिका महत्त्वाची असते. उदा.. बाग, सांस्कृतिक ठिकाणे या ठिकाणी स्वतः घाण करू नये व इतरांना सांगावे. झाडावर काही लिहू नये. खाण्याचे पदार्थ खायचे झाले तर नंतर सर्व स्वच्छ करावे .
आपण प्रामाणिकपणे आपले काम करावे, नियमांचे उल्लंघन करू नये., इतरांचा आदर करावा...तर समाज छान घडेल.स्वच्छता राखणे, पर्यावरणाचे संरक्षण करणे, गरजूंना मदत करणे आणि कायद्याचे पालन करणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे.ती सर्वांनी पार पाडली पाहिजे.आपल्या कमाईतला 5% भाग अनाथ, अपंग, गरजू यांच्या वर खर्च करावा. त्यांना लागणाऱ्या वस्तू देऊनच. पैसे कोणालाही द्यायचे नाहीत. मी स्वतः करतेय गेली 35 वर्षे.. त्या मुळे मी सांगते. जिथे आर्थिक अडचणी असेल त्या ठिकाणी कशाची कमतरता आहे पाहते आणि मग माझ्या आवाक्यात बसेल तितके मी त्या वास्तू, पदार्थ किंवा महिनाभराचे किराणा सामान भरून देते.
आजच्या आधुनिक युगात तंत्रज्ञानामुळे जग जवळ आले आहे. तरीही मानवी मूल्ये जपणे अत्यंत गरजेचे आहे. मतभेद असले तरी संवाद आणि सहकार्य यांमधूनच समाजात ऐक्य टिकते.
जात, धर्म, भाषा किंवा आर्थिक स्थिती यांवरून भेदभाव न करता सर्वांना समान वागणूक देणे हे प्रगत समाजाचे लक्षण आहे.सामाजिक बांधिलकी पाळली की सर्व सुखसोयीचे होते.
समाज आणि आपण हे एकमेकांपासून वेगळे नाही. समाज आपल्यामुळे घडतो आणि आपण समाजामुळे घडतो. म्हणूनच चांगला समाज घडवायचा असेल तर प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात करणे आवश्यक आहे. जबाबदार, संवेदनशील आणि कार्यक्षम नागरिक बनून आपण समाजाच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचलू शकतो.
आधी केले मग जना सांगितले....
वसुधा वैभव नाईक.पुणे
