बी. एल. ओ. चे काम काळजीपूर्वक करावे
बी. एल. ओ. चे काम काळजीपूर्वक करावे
बी . एल . ओ . प्राध्यापकाचा लोह गावात अपघाती मृत्यू. ही बातमी, दिनांक १५/०४/२०२६ सकाळ पेपर मध्ये वाचली.
हे प्राध्यापक उपजिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने बोलावलेल्या बैठकीला जात असताना लोहगावला त्यांचा अपघाती मृत्यू झाला यांचे नाव होते ज्ञानेश्वर रोटे. वडगाव शेरी या मतदारसंघात बी. एल. ओ.म्हणून कार्यरत होते आणि सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमाराला उपजिल्हाधिकाऱ्यांनी बोलवलेल्या तातडीच्या बैठकीमध्ये ते दुचाकीवरून निघाले असताना धानोरी - लोहगाव रस्ता येथील स्पार्क स्प्रिंग सोसायटी समोर त्यांच्याच गाडीवरून घसरले व या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. ही बातमी जीवाला चटका लावून गेली. त्यांची बायको आणि त्यांची मुले उघडी पडली. त्यांच्या सहकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ते अतिशय मनमिळावू आणि चोख कामगिरी पार पाडणारे होते. अतिशय हुशार सहकारी होते. अधिकाऱ्यांच्या सततच्या दबावामुळे ही वेळ त्यांच्यावर आली अशी भावना शिक्षक वर्गातून व्यक्त होत आहे.
अशीच काही स्थिती आमची झाली होती. मी व माझी मैत्रीण मनीषा आम्ही दोघी सुद्धा बीएलओ चे काम देण्यासाठी, फोटो अपलोड करण्यासाठी जिल्हाधिकारी ऑफिस मध्ये चाललो होतो.
पद्मावती पुणे सातारा रोड येथे पंपिंग स्टेशन जवळ आमची गाडी आली आणि आम्हाला मागच्या हत्ती टेम्पो धडक दिली. धडक एवढी जोरात होती की मी मागच्या मागे उडून खाली पडले. आणि मनीषा च्या गुडघ्याला जबरदस्त लागले आणि तिचा छोटा पाच वर्षाचा मुलगा नशिबाने साईबाबांच्या आशीर्वादाने अगदी अलगद उचलून डिव्हायडर वर ठेवल्यासारखे झाले. मी खाली पडले मला जागेवरून उठताच येत नव्हते. त्यात मागून एक ट्रक वाला आला. लोकांना असे वाटले की त्या बाईच्या त्या डोके उडवेल लोकांनी गोंधळ घातला बाईचे डोके गेले मी जरा शुद्धीवर आले आणि पटकन माझी मान फिरवली व एवढ्या जवळून ट्रक गेल्यानंतर माझी काय अवस्था झाली असेल हा विचार आपण सर्वांनी करावा.
मला चार लोकांनी उचलून रिक्षामध्ये बसवलं. माझी मैत्रीण गाडी घेऊन माझ्याजवळ आली कारण माझे घर जवळ आहे तिथून तिथे गाडी ठेवली रिक्षामध्ये बसली. छोटू बरोबरच होता. आमच्या फॅमिली डॉक्टर कडे आम्ही गेलो परंतु फॅमिली डॉक्टरांनी सांगितले होते की एक्सरे काढावा लागेल तरच काही समजेल. तशाच आम्ही दोघी नाईक निंबाळकर हॉस्पिटल,बालाजीनगर येथे गेलो. एक्सरे काढला. तो पर्यंत तिची आई आली. ती आणि तिचा मुलगा मला सोडून गेले. माझी मुलगी व जावई आले होते.
डॉक्टर नाईक निंबाळकरांनी आम्हाला पुढे एक्स-रे मध्ये जास्त काही दिसत नाही म्हणून एमआरआय करण्यासाठी पुढे पाठवले. लोटस कोर्ट येथे एम आर आय काढला परत आम्ही डॉक्टरांकडे गेलो. त्यावेळी समजले की पाच मणक्यांना इजा झालेली आहे. आता पूर्ण बेडरेस्ट चार ते पाच महिन्यांसाठी असेल. मी तर खूप घाबरले घरामध्ये अनेक अडचणी होत्या सासूबाई जागेवर झोपून होत्या, सासरे ९४ वर्षाचे होते.कसे होणार काही कळत नव्हते.
त्यात अधिकाऱ्यांचे फोन चालूच होते. त्यांना खरी परिस्थिती सांगितली पण त्यांनी एक माणूस घरी पाठवला आणि खरंच ही अवस्था माझी आहे का? हे पाहण्यासाठी माणूस पाठवल्यानंतर तो माणूस देखील जो आला होता अधिकारी तो अगदी अवघडल्या सोफ्यावर बसला होता आणि तो म्हणाला" सॉरी मॅडम, त्या सरांनी मला पाठवल म्हणून मी आलो.मी आपली परिस्थिती डोळ्यांनी पाहिली मी त्यांना रिपोर्टिंग करतो काय करायचे ते." आणि तो मान खाली घालून निघून गेला.
असे हे अजब अधिकारी असतात. विश्वास नावाची चीज नाही. हे त्यावेळी अगदी निक्षुन सांगावेसे वाटले आणि आत्ता हे मला हाच विश्वास आहे की या अधिकाऱ्यांना खरच कोणाचे काही घेणे देणे नसते हा परंतु एक असते की त्यांना जबाबदारी पार पाडायची असल्यामुळे ते अशा गोष्टींकडे निश्चितच कानाडोळा करीत असावेत. त्यांनाही त्यांची ड्युटी निभवायची असते मला त्यांच्याबद्दल काहीही म्हणायचे नाही. परंतु कधीतरी विश्वास दाखवावा एवढे मात्र निश्चितच आहे. माणुसकीच्या विश्वासाला तडा जाता कामा नये.
त्यानंतर बी. एल. ओ.मधून माझी सुटका त्यांनी केली खरी परंतु त्यावर्षीचा जे मानधन होते, माझ चार-पाच हजार रुपये तो काही त्यांनी दिला नाही परंतु तिसऱ्यानेच तो घेतला असे मला कळले कारण त्या जागेवर माझी सही होती पण मी जाऊ शकत नव्हते असो..तर मला हे मानधन वर्षभराचे त्यांनी का दिल नाही ही अजूनही माझ्या मनात आलेली शंका पूर्ण होऊ शकलेली नाही. काम झाले तर किमान त्याचा मोबदला द्यावा एवढेच मला म्हणायचे आहे. त्याच्या चार हजाराने मी काय बिल्डिंग बांधू शकणार नाही परंतु त्याचा मोबादला दिला असता तर मला बरे वाटले असते मग हा मोबदला कोणी घेतला, काय केलं,का दिलाच नाही कोणाला? अनेक शंका कुशंका मनामध्ये अजूनही आहेत.तेरा वर्षे या गोष्टीला झाली पण ह्या शंका माझ्या मनातल्या मिटलेल्या अजिबात नाही.मग त्या वेळी मानधनाचा फॉर्म भरून दिला नाही म्हणून पैसे जमा झाले नाही की काय ते समजत नाही.
पण जर अधिकारी फोन करून आम्हाला सांगू शकतात की बीएलओच्या या कामासाठी इथे मीटिंगला हजर राहा तर हे सुद्धा त्यांनी केलं पाहिजे असं मला ठाम म्हणायचं आहे.
आमचा जो एक्सीडेंट झाला त्यामुळे माझ्या पाच मणक्याना इजा झाली होती.बरे व्हायला पाच महिन्यांच्या वर गेले आणि आजही अजूनही मला खाली वाकता येत नाही आणि खूप उभ राहता येत नाही. जिन्यांची चढउतार मी जास्त करू शकत नाही. पण साईबाबांच्या कृपेनें मला उभे केले आणि माझ्या घरासाठी मला परत काम करता येऊ लागले हे त्या देवाचे उपकार आहेत.
माझी मैत्रीण मनीषा तिला सुद्धा आजही गुडघ्याचा त्रास होतोच आहे पण या गोष्टी आम्ही कोणाला सांगणार कोणामुळे झाल्या काय बोलणार. त्याला कोणीही वाली नसतो हे मात्र समजून चुकले आहे. आणि खर्चाचे म्हणाल तर माझा स्वतःचा खर्च त्यावेळेला जवळजवळ चाळीस हजारापर्यंत केला आणि मनीषाचा तो सुद्धा तिचा एक्स-रे वगैरे असा धरून मी दहा हजाराच्या पुढे गेला असावा हे पैसे आम्हाला कोणीही दिले नाहीत आमच्या खिशातून गेले. शारीरिक नुकसान झाले ते झालेच. ते आजही आहे, पुढेही राहील.भविष्यामध्ये म्हातारपणामध्ये आम्हाला त्याचा खूप त्रास होणार आहे हे मात्र निश्चित.
बी एल ओ प्राध्यापकाचा लोहगाव गावात अपघाती मृत्यू हे वाचून मला आमच्या एक्सीडेंटची आठवण झाली आणि म्हणून हा लेख लिहिला गेला.
बीएलओ चे काम करणाऱ्या सर्व माझ्या बंधू-भगिनींना एकच सांगावेसे वाटते की काम करा, पण ते प्रेशर घेऊन करू नका. काम तर आपल्याला करायची आहेतच.त्यातून काही आपली सुटका होणार नाही.कोणीही सुटका करू देणार नाही,तर आपणच आपली तब्येत सांभाळून, आपणच आपल्या गाडीचा वेग सांभाळून कामाला लागावे. आपल्या मागे आपला संसार आहे कुटुंब आहे याची जाणीव ठेवून काम करावेत.बस इतकेच सांगते.
वसुधा वैभव नाईक
धनकवडी, जिल्हा - पुणे.
