गाठीभेटीचा एक उनाड दिवस*
गाठीभेटीचा एक उनाड दिवस*
*गाठीभेटीचा एक उनाड दिवस*
हल्ली प्रत्येक जण व्यस्त झाला आहे. त्याला कोणाच्या घरी जाण्यासाठी किंवा फोनवर बोलण्यासाठी सुद्धा वेळ नाही. असे जरी म्हटले तरी वावगे ठरणार नाही. याचे महत्त्वाचे कारण नोकरी,उद्योगधंदा यातून मिळणारा वेळ कमी पडतो. आणि माणुसकी कमी होत चाललेली आहे. फक्त मी आणि माझ्यापुरतं पाहिल जातो. माझे वर्चस्व कुठे दिसून येईल याच्याकडे लक्ष दिलं जातं. पण यान काय होतं माणसं दुरावली जातात.
फोनवर दोन मिनिटं बोलून, वर्षातून एकदा,दोनदा तरी त्यांच्या घरी जाऊन आपण प्रत्येकाशी प्रेम संबंध साधू शकतो.
मी व माझी मैत्रीण.. वसुधा आणि वंदना. आम्ही बालवर्गापासून एकत्र आहोत. अगदी आमच्या मैत्रीला पंचावन्न वर्ष झालं असं म्हटलं तरी चालेल. आमचे शिक्षण फलटणमध्ये झाले. दोघींची लग्न साधारण 18 वर्षे पूर्ण झाली की झाली. समजायला लागल्यापासून 14 वर्षांपर्यंत आम्ही एकत्र होतो. दोघींची शाळा एक,वर्ग एक त्यामुळे आमचा घरोब्याचा संबंध होता. तिचे नातेवाईक मला माहिती माझे नातेवाईक तिला माहिती.
माझे लग्न झाले 12 मे 1985, तिचे लग्न झाले 14 जून 1985.
लग्न होऊन मी पुण्यात आले माझ्या मागे तिलाही स्थळ पुण्यातले झाले होते. परत आम्ही दोघी मैत्रिणी एकत्र आलो.
माझे मिस्टर बजाज कंपनीत होते तिचेही मिस्टर बजाज कंपनीमध्ये होते. दोघांचीही छान मैत्री झाली. आमचे येणे जाणे चालूच होते. छान टू व्हीलर काढायची मस्त रात्री हिंडायला, फिरायला जायचं. मैत्रीचे संबंध अधिक घट्ट होत गेले.
पुढे मुलं झाली. मुलं सुध्दा एकमेकांशी छान मैत्रीपूर्ण वातावरणात वागू लागली.
पूर्वी फोन नव्हते पण आमचे एकमेकांकडे जाणे येणे होते. त्यामुळे सासर आणि माहेर दोन्हीचीही ओळख उत्तमरीत्या झालेली होती.
एका मित्राची आई वारली त्या मुळे आम्ही त्यांना भेटायला फलटणला गेलो होतो.
फलटणमध्ये वंदनाचे सर्व नातेवाईक आहेत. आम्ही मित्राच्या फॅमिलीला भेटून तिच्या दीदीला भेटण्यासाठी गेलो. फराळाचे डबे बरोबर होतेच.तिने व तिच्या मिस्टरांनी अगदी प्रेमाने शेंगा दिल्या.डायबेटीस मला आहे समजल्या बरोबर त्यांनी एक औषध दिले. तिने माहेरपणाला आल्यासारखे माझी साडी चोळीने ओटी भरली.
दीदीला भेटून, दीदीला घेऊन आम्ही तिच्या माईला म्हणजे दुसऱ्या बहिणीला भेटायला गेलो. तिचा मुलगा, पती सर्वांनी छान स्वागत केले.तिने तर काय मस्त बटाटे वडे करून ठेवले होते आणि गाजराचे घारगे बनवले होते. उत्तम चव होती. याच्यापेक्षा माहेर पण असे वेगळे काय असते बरं! माईने देखील आमची ओटी भरली.
नंतर आम्ही वंदनाच्या भावाकडे गेलो. तिथेही सर्वजण एकत्र भेटले. भाऊची मुले - सुना नातवंड सर्व भेटले. त्यालाही भेटून छान वाटले.
फलटणचे रामाचे मंदिर खूप प्रसिद्ध आहे. त्या मंदिरात गेल्याशिवाय फलटणला गेल्याचे समाधान होत नाही. त्या मंदिरात जाऊन रामाचे दर्शन घेतले. अशी एक म्हण आहे 'ज्याला घडत नाही काशी त्याने जावे फलटणशी...'
आता आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. आमची शाळेतलीच एक मैत्रीण रोहिणी कुलकर्णी. आम्हाला तिला खरे तर सरप्राइज दयायचे होते पण तिचे घर सापडेना शेवटी तिच्या मुलाला फोन करून पत्ता विचारत तिच्या पोहोचलो. श्रीपूर इथे पोहोचेपर्यंत चार वाजून गेले होते. तिच्या घरी सासूबाई, नणंद तिचे दीर सर्व होते. रोहिणीला तर खूप आनंद झाला आम्ही गेल्यामुळे. तो आनंद तिच्या चेहऱ्यावरून दिसत होता.
रोहिणीने आम्ही गेल्यापासून आम्हाला काय द्यायचं या विचारात तिने अनेक पदार्थ आम्हाला बांधून दिले. माहेरपणाचे हे आणखी एक उदाहरण. साखर, मोहरी, मसाले, फराळ, मेतकूट असे अनेक पदार्थ तिने आम्हाला दिलेच.
अशा प्रकारे आमचा गाठीभेटीचा एक उनाड दिवस छान साजरा झाला.
उनाड दिवस अशासाठी म्हटले की जाता जाता आम्ही वीरधरणावर मस्त फोटो काढले. खूप गप्पा मारल्या. माझे 'आईचे हळवे मन' पुस्तकं गिफ्ट दिली.
बऱ्याच वर्षातून आम्ही एकत्र अशा दोघीच गेलो होतो. अशी ही मैत्री टिकवण प्रत्येकाच्या हातात आहे. आपल्या मैत्रीसाठी खरंच वेळ द्यावा.
गप्पांच्या मेजवानीत रमलो
मस्त फोटो सेशनही केले
सर्वांची भेट घेतली आनंदाने
सुखदक्षणांचे घट भरून घेतले..
वसुधा वैभव नाईक
धनकवडी, जिल्हा - पुणे
मो. नं. 9823582116
