STORYMIRROR

Sanjay Phadtare

Inspirational

4  

Sanjay Phadtare

Inspirational

सुंदर हात

सुंदर हात

4 mins
1.7K

सायंकाळी शाळा सुटण्यापूर्वी शिपाईमामा नोटीस घेऊन कन्याशाळेत आला.सर्व मुलींनी उत्सुकतेने गुरुजींच्या नोटीस वाचनाकडे लक्ष दिले."सर्वं मुलींना कळविण्यात येते की,उद्या वार्षिक स्नेह संमेलन निमित्त छोटी स्पर्धा आयोजित केली आहे.उद्या स्पर्धेतुन 'सुंदर हाताची'निवड करण्यात येणार आहे;तरी सर्व मुलींनी स्पर्धेत सहभागी व्हावे".सर्व मुली एकदम खुश झाल्या.सर्वानी आनंदाने एकच गलका केला.प्रत्येक मुलगी मी माझा हात कसा नटवणार याचं मनोरथ रचु लागल्या.शेवटच्या बाकावर बसलेली गायत्री गरीब असून देखील आनंदाने हात कसा सजवावा याचा विचार करत होती.तेवढ्यात शाळेची घंटा वाजली आणि शाळा सुटली.घरी परततांना साऱ्या मुलींची आपला हात कसा सजवायचा हीच चर्चा सुरु होती.

    गायत्रीला वडील नव्हते,आई धुणे-भांडी मोलमजुरी करुन संसाराचा गाडा कसातरी ओढत होती.गायत्रीही आईकडून मेहंदी काढून घेण्याचं ठरवीत घराकडे निघाली होती.आईला हे सगळं घरात गेल्या गेल्या सांगायचं असं ठरवित झोपडीत शिरली. पण पाहते तर आई कोपऱ्यात पोत्यावर कण्हत पडलेली होती. "आई काय झालं ग? का झोपलीस"?आई म्हणाली," गायु मला बरं वाटत नाही.थंडी वाजून आलीय".आई,दवाखाण्यात जाऊया काय? असे असाह्यपणे विचारताच म्हणाली,"नको पोरी,मी घरातल्या गोळ्या घेतल्या आहेत बरं वाटल उद्यापर्यंत.तु तेवढं सांज होतेय दीवा लाव आन चुलीवर थोडा भात ठेव. सकाळची आमटी आहेच".गायत्री परिस्थितीचं भान ठेवून कामाला लागली. तशी मनातून घाबरलेली होती. आई लवकर बरी होईल ना? याची तिला धास्ती होती.गायुला तशी कामाची सवय होतीच पण आज तिच्यावर सगळीच जबाबदारी होती.चुकत-माकत तिने सगळ काम उरकलं.आईला गरम भात-आमटी वाढून जेवायला आग्रह करू लागली. पण तापाने आईचे तोंड कडू झाले होते. गायूच्या आग्रहाने कसेतरी दोन घास खाल्ले.आईने गायुलाच पोटभर जेऊन झोपण्यापूर्वी तिचं अंग दाबायला सांगितले.आई म्हणाली सकाळपर्यंत मला नक्की बरं वाटल, तू झोप आता. गायु देखील थकली होती अन आईजवळ लागलीच झोपी गेली.

   सकाळी आईला थोडसं बरं वाटताच तिनं जमेल तसा स्वयंपाक केला. पण अजून तिला थकवा वाटत होता. गायत्री देखील मदत करीत होती.आई म्हणाली," गायु संध्याकाळ पर्यंत बरं वाटल मला, पण शाळेत जाण्याआधी वाटतल्या दोन घरातील भांडी घासून शाळेला जाशील का? त्या मावशींना सांग,माझी तब्बेत बरी नाही,उदया नक्की येईल म्हणून".गायुला परिस्थीतीमुळे जबाबदारीची जान होतीच.जेवण करुन दप्तर पाठीला लावून आईन सांगितलेल्या कामावर गेली.तिथली भर-भर कामं उरकून शाळेत पोहचली.उशीर झाल्यानं धापा टाकत मागे तिच्या बाकावर जाऊन बसली.दप्तर काढून ठेवत आसपास पाहतेतरं सर्व मुलीं पूर्ण तयारीनिशी स्पर्धेची वाट पहात होत्या.ती एकदम भानावर आली.आईच्या आजारपणात स्पर्धा आहे हेच ती पुरती विसरून गेली होती. इतक्यात शिक्षक वर्गात शिरले आणि म्हणाले,"मुलींनो 'सुंदर हाताची' निवड करायला सुरुवात करायची काय? तसे मुलींनी लागलीच एका आवाजात होकार दिला.

   शिक्षकांनीही प्रत्येक मुलींचा हात पहायला सुरवात केली अण एका कागदावर नोंदी घ्यायला सुरवात केली.सर्व मुलींनी त्यांच्या परीने हात सजवले होते किंबहूना नवीन कपडेदेखील घातलें होतें. शिक्षक शेवटच्या बाकावर गायूच्या जवळ पोहोचले,ती हिरमुसलेली होती.

स्पर्धेची तयारी करु न शकल्याने ती मनोमन नाराज झाली होती.शिक्षकांना आपला हात न दाखवताच खाली मान घालून उभी राहिली. शिक्षकांना न कळत जाणीव झाली,तरी पण चौकशी करण्यासाठी म्हणाले,"गायत्री,तुला आज स्पर्धा आहे हे माहीत न्हवते काय?" त्यावर तीने मान खाली ठेवूनच " हो" म्हंटले. त्यावर शिक्षक म्हणाले,"मग तुझा हात दाखव पाहु. तू का तयारी केली नाहीस काय?" त्यावर आपला हात शिक्षकाना दाखवताच गायत्रीस चक्क रडू कोसळले.तिचा हात घरकामाने,भांडी घासल्याने काळपट रापलेला होता.शिक्षकांनी तिला जवळ घेत पाठीवर हात थोपटून विचारले," काय झालं? शांत हो,सांग बघु काय झाले ते?" तशी गायत्रीने आवंढा गिळत सर्व खरी हकीकत सांगितली.शिक्षकांना परिस्थीतीची जाणीव झाली.हरकत नाही असे म्हणत तिला शांत करुन निघून गेले.काहीवेळ शांततेत गेल्यावर पुढला तास सुरु झाला.मधल्या सुट्टीत इतर सर्व मुलींची माझाच कसा पहिला नंबर येईल याची चर्चा सुरु होती.

    सायंकाळच्या सुट्टीनंतर स्पर्धेच्या बक्षीस वितरन कार्यक्रमाची तयारी सुरु झाली.मुख्याध्यापक इतर शिक्षक स्थानापन्न झाले.औपचारिक सुरवातीनंतर पहील्यांदा तिसरा अन मग दुसरा नंबर जाहीर करण्यात आला. सर्व मुलींची उत्सुकता शिगेला पोहोचली होती; कारण ज्या मुलींना पहिल्या नंबरची खात्री वाटत होती त्यांना दुसऱ्या व तिसऱ्या नंबर वर समाधान मानावे लागले होते.शेवटी शिक्षकानी पहिला नंबर घोषित करताना मुलींना प्रश्न विचारला ओळखा पाहू कोण पहिला? शेवटी शिक्षकांनीच शांतता भंग करत पहिल्या नंबरचे "गायत्रीचे"नाव त्यांनी जाहीर केले.तसे सर्व मुलीनी नवल आणि आश्चर्य व्यक्त केले.इकडे मात्र गायत्री एकदम मोहरून व मनोमन हरकून गेली होती. संभ्रमात देखील होती.तिला हे सर्व अनपेक्षित वाटत होते.तिला नंबर जाहीर होताच उठून बक्षीस घेण्याचेही भान राहिले नाही.

   शेवटी समारोपीय भाषणात मुख्याध्यापक म्हणाले, मुलींनो सर्वानी "सुंदर हाताच्या"स्पर्धेत भाग घेतला त्याबद्दल सर्वांचेच अभिनंदन.

पण एक गोष्ट ध्यानात घ्या, स्पर्धेसाठी तुम्ही सर्वानी पूर्ण तयारी केली,स्पर्धेसाठी हात आकर्षक बनवण्यासाठी बरेच प्रयत्न केलात,हात सजवलात; पण त्यामुळे तुमचा हात केवळ सजेल,नटेल पण त्याच हाताने जर काम केले,कष्ट केले तर तोच हात 'अतिसुंदर' बनतो किंबहुना त्याची प्रतिष्ठा वाढते म्हनूनच आज स्पर्धेची खरी मानकरी ही गायत्रीच आहे. तिचाच हात सर्वात सुंदर आहे.सर्व मुलीना देखील याची जाणीव होताचं टाळ्यांचा कडकडाट होत कार्यक्रम संपन्न झाला.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational