सर्कस
सर्कस


सर्कस
सर्कस बघायला जाऊ चल असे आपल्या आईजवळ सकाळपासून विजय एकच हट्ट धरला होता. शेवटी त्याचा हट्ट मान्य करण्यात आला.
सायंकाळी पाच वाजताच विजय तयार होऊन बसला होता. सायंकाळचा शो सात वाजता सुरू होणार होता.
सर्कस शहरात सुरू होऊन जेमतेम पंधरा वीस दिवसांचा काळ लोटला होता. एका ऑटो रिक्षातून मात्र त्याची मोठ्या प्रमाणात जाहिरात करण्यात येत होती.
विजयच्या घरासमोरून दिवसातून सकाळ आणि संध्याकाळ ती गाडी फिरत होती. त्याच्या भोंग्यातून मेरा नाम जोकर चित्रपटातील ' ए भाय जरा देख के चलो'
हे गीत सदा न कदा वाजत होते. त्या गाण्याची धुन कानावर पडली की विजय पळत घराबाहेर यायचा आणि त्या ऑटोवरील विविध चित्राकडे न्याहाळून पाहायचा.
सायकलवरील ती फिरणारी मुले, वाघ, सिंह, आणि हत्ती त्याचे लक्ष वेधून घ्यायचे. त्यामुळे कधी एकदा सर्कस पाहायला जातो असे त्याला वाटू लागले.
जवळपास त्याच्या सर्व मित्रांनी सर्कस पाहून घेतले होते. पण बाबांना सुट्टी मिळत नव्हती म्हणून सर्कसला जाणे लांबत होते. शेवटी त्याची प्रतीक्षा संपली.
आज ऑफिसमधून लवकर निघण्याची मुभा मिळाली होती. म्हणून आई-बाबा आणि विजय हे तिघे जण आपल्या स्कुटीने सर्कस पाहण्यासाठी बाहेर निघाले.
सर्कसची बाहेरील बाजू पाहून विजयच्या मनात उत्कटता अजून वाढत होती. बाहेरून सर्व प्राणी त्याला दिसत होते. हे सर्व प्राणी आपणांस काय करून दाखवणार ?
सर्कस म्हणजे खूप हसायचे ठिकाण असते असे कोठे तरी वाचल्याचे त्याला आठवले होते. हे प्राणी आपणास कसे हसविणार ? असा विचार त्याच्या मनात येऊन गेला.
बाबाने काउंटरवर जाऊन दोन फुल्ल एक हाफ तिकीट काढले आणि आई बाबांच्या सोबत तोही सर्कसच्या तंबूमध्ये प्रवेश घेतला. गोलाकार ढेऱ्या मध्ये सर्व लोकं बसलेले होते. बसण्याची व्यवस्था म्हणजे लाकडी फळीवर बसायचे. खुर्चीची तेथे सोय नव्हती. सर्वाना बघता यावे म्हणून स्टेडियममध्ये जसे बसण्याची व्यवस्था असते तशी व्यवस्था करण्यात आली होती. थोड्याच वेळात सर्कस सुरू होणार म्हणून जोकरने येऊन सांगून गेला. सर्कसची सुरुवात अगदी झक्कास झाली. पाच सहा मुले मुली आले आणि जमिनीवरच्या अनेक प्रकारच्या उड्या मारून दाखविले. तशा उड्या मला ही मारता येतील याचा विचार विजय करू लागला होता. अधूनमधून छोट्या उंचीचा जोकर विनोद करत होता त्यामुळे सारे लोक हसत होते. चार पाच मुली सायकल घेऊन आले. सायकलवरच्या विविध कसरती त्यांनी करून दाखविले. नंतर एका चाकाची सायकल घेऊन दोन मुली आल्या.
त्यांनी त्या सायकल सोबत अनेक करामती केल्या. त्यांची ही कला विजय डोळे विस्फारून पाहत होता. एक जादूगार आला आणि त्याने जादूच्या अनेक कला लीलया करून दाखविले. त्यानंतर पिंजऱ्यात वाघ आणि सिंह घेऊन एक माणूस आला. त्याने काही इशारे केले तसे ते वाघ आणि सिंह करू लागले. हे पाहून विजयला त्या व्यक्तीची खूप कमाल वाटू लागले. कारण वाघ आणि सिंह पाहिले की अनेकांची पांढरी होते. मात्र यांनी तर त्या दोघांना त्याच्या मनासारखे वागवित होता. त्यास रिंगमास्टर म्हणतात ही माहिती विजयच्या बाबांनी त्याला दिली. त्यानंतर एक हत्ती आणि त्याचे छोटे पिल्लू घेऊन तोच रिंगमास्टर गोल रिंगणात आला. सुरुवातीला हत्तीला एक फुटबॉल देण्यात आले. मोठा हत्ती आपल्या सोंडेत बॉल धरून छोट्या हत्तीकडे फेकले की तो पायाने बॉल लोकांमध्ये लोटून देत होता. ज्या व्यक्तीजवळ ते बॉल जात ती व्यक्ती खुश होत असे. असाच एक मारलेला बॉल सरळ विजयच्या हातात आला तसा तो खूप आनंदी झाला. आनंदाने उड्या मारत त्याने बॉल परत केला. थोड्या वेळाने छोट्या हत्तीच्या सोंडेत बॅट देण्यात आले. आत्ता तो छोटा हत्ती पायाच्या ऐवजी बॅटने बॉल मारू लागला. ते ही सरळ बसलेल्या प्रेक्षकांत जात होता. जोकर लोकांमध्ये जाऊन बॉल आणत होता. ह्या खेळात खूप मजा येऊ लागली. त्यानंतर हवेत उड्या मारण्याचे कसब दाखविण्यात आले. ते पाहून तोंडात बोटे टाकणे एवढंच बाकी होतं, असे ते कसरती करू लागले. खाली पडणार असे वाटत असतानाच पकडल्या जायचे आणि वर निघून जायचे. खूपच रोमांचक खेळ होता तो. सर्वात शेवटी सर्कसमधील सर्व हत्ती आपल्या सोंडेत विविध साहित्य घेऊन आले. एकाने आपल्या सोंडेत महादेवाची पिंड आणले होते, त्याने मधोमध ते पिंड ठेवले. त्यानंतर एका हत्तीने त्यांच्या वर आपल्या सोंडेने पाणी शिंपडले. दुसऱ्या एका हत्तीने पिंडावर पुष्पमाला अर्पण केली. त्यानंतर एका हत्तीने अगरबत्ती फिरवली. सर्वात छोट्या हत्तीने आपल्या सोंडेने नारळ फोडले. मग सर्वांनी नमस्कार केला. विजयला हे शेवटचे दृश्य खूपच आवडले आणि त्या सर्कसमधला छोटा हत्ती तर त्याला खूपच आवडला होता. तो छोटा हत्ती खूपच क्युट दिसत होता. दोन तास कसे निघून गेले हे कळलेच नाही. घरी जातांना एका चांगल्या हॉटेलात जेवण करून ते तिघे घरी गेले आणि विजयला रात्री केव्हा झोप लागली हे कळलेच नाही. सकाळ झाली. तसा तो उठला. सकाळच्या सर्व क्रिया संपवून स्नान झाल्यावर तो सरळ घरातील मंदिरासमोर उभा राहिला. हातात अगरबत्ती घेतली आणि देवाला ओवाळून नमस्कार केला. तसेच लगेच आईच्या देखील पाया पडण्यास विसरला नाही. हे सर्व विजयची आई आश्चर्यकारकपणे पाहत होती. न राहवल्याने ती विचारली, विजय, हे कसे काय ? आज परीक्षा वगैरे आहे का ? यावर विजय म्हणाला, नाही गं आई, हत्ती प्राणी असून देवाची पूजा करू शकतो, मी तर शेवटी मुलगा आहे. मला ही देवाला नमस्कार करायलाच हवं. म्हणून आजपासून देवाला आणि तुम्हाला रोज सकाळी नमस्कार करणार. हे ऐकून आईने विजयला गळ्याला लावून घेतली आणि त्याचा गोड पापा घेतला. सोबत मनोमनी सर्कसचे ही धन्यवाद मानायला विसरली नाही.