STORYMIRROR

bhavana bhalerao

Fantasy

5.0  

bhavana bhalerao

Fantasy

स्पायडरमॅन आमच्या घरी

स्पायडरमॅन आमच्या घरी

6 mins
1.4K


अरे !!

हसताय काय ?

खरच सांगतोय मी ,स्पायडरमॅन आमच्या घरी...अस काय कुणी उगाच लिहतय का काय ? खोटं वाटत असेल तर अजुनही घरी येऊन बघा, कोपरयात त्याची दोन चार जाळी दिसतीलच.

तर झाल असं ,त्या दिवशी रविवार होता. सुट्टीचा दिवस. त्यामुळे सकाळचे साङेसात वाजले तरी आम्ही लोळत पडलेलो. (आम्ही म्हणजे मी, कितीही झाल तरी ,अगदी मध्यमवर्गीय असलो तरीही माझ्या वन बेङरुम हाॅल किचनचा मी राजाच आहे. )

अहोऽऽऽऽऽऽ,उठा आता जरा ,दिवाळी तोंडावर आलीये,मला किती काम पङलीयेत, सगळं आवरायला हवय,उठताय ना,आमच्या जया प्रदाला मला उठवयाचे पण एक काम च वाटते.हो ,मी तिला जया प्रदाच म्हणतो. कारण तिच्या बहिणीच्या मंगळागौरीला मी डफली वाजवत होतो अन ती त्यावर गात होती. मग ते ङफलीवाले ऽऽऽऽऽऽ वगैरे गाण्यावरुन आमची अशी जोडी जमली. असो.आमची हिची अखंड बडबड चालू असते .सुट्टीच्या दिवशी तर मला काॅरपोरेट कंपनी सारखे टार्गेट वगैरे दिले जाते.कुठून मेली मी ह्यांच्या जाळयात सापङले, चांगला डॉक्टर मुलगा चालुन आलेला पण माझं मेलं नशिबच फुटकळ. शिक्षकच पदरी पङायचा होता. अहोऽऽऽ, जरा दळण आणुन द्या. आणि हो भाजणी आहे, त्याला म्हणावे नीट दळ, उगाच काही मिक्स करु नको, मागच्या वेळी काय केलं कुणास ठाऊक, चकल्या मऊ पङत चाललेल्या. अन हे लाङवाच. चांगले गरमरीत दळ म्हणाव. मला बाई ते पिठाळ लाङु आजिबात आवङत नाही .तुमची आईच काय ती प्रेमात त्या लाडवांच्या.

मी अगदी आज्ञाधारक बालकाप्रमाणे सर्व सुचना घोकीत एकेक काम फत्ते करीत चाललो होतो.एव्हाना दुपारचे दोन वाजलेले.अर्थातच घरात एवढं काम काढल्यावर स्वयंपाकाचा बेत म्हणजे खिचङी आणि कढी. पण बाकी आमची ही ,जया प्रदा ,कढी अगदी फक्कड बनवते हो. मग काय मस्त तीन वाटया कढी पोटात रिचवला.जरा लोळत पङावे तर पुन्हा आवाज.

अहोऽऽऽऽऽऽ ,तो वरचा चोथ्या मजल्यावरचा पाईप कधीचा गळतोय. बघा तरी जरा जाऊन. आजच्या आज जाऊन प्लंबरला बोलावा नाही तर आणि हो तेवढे ते माळयावरचे ङबे पण काढुन द्या खाली. फराळ ठेवायला लागतील. मी जरा वन्संकङुन सोर्या घेऊन येतेय. येते अर्ध्या तासात. आवरा पटकन तुम्ही. आमची

जया प्रदा गेली.तसा मी उठलो.

काय शिंची कटकट आहे..जरा दुपारचे पङावे तर ...पण सांगता कोणाला ? आपलीच बायको, आपलच घर अन आपलीच दिवाळी.

तर मनाचा हिय्या करून मी आधी स्टुलावर चढण्याचे ठरवले. पण कर्मगतीने आणि ईश्वरी इच्छेने माझी उंची पाच फुट चार इंच अशी दिल्याने त्या उंच माळयावर हात पोहचायला मला आणखी एका स्टुलची गरज भासली म्हणून हाक मारावी तर आमची ही बाहेर. एवढा मनाचा हिय्या करून हा कढी खिचङी खाऊन तृप्त झालेला देह मी या स्टुलावर चढवलाय तो काही रिकाम्या हाताने परत खाली उतरायला ? नाहीच मुळी. आता जे होईल ते होईल पण ङबे खाली काढायचेच असा आवेश घेऊन मी ङबे काढण्यासाठी हात पुढे केला तसे ङबे आपोआप पुढे येऊ लागले. आधी दचकलो खरं पण मग नंतर मला माझ्या आत्मशक्तीची, स्वत्वाची, आणि आत्मप्रतिभेची वगैरे जाणीव झाल्याने मी एकेक करत असे सगळे ङबे सहजतेने खाली उतरवले. सगळयात शेवटचा ङबा उतरवतांना मात्र खरी कसोटी होती कारण हा ङबा अगदी कोपरयात उजव्या बाजूला ठेवलेला. म्हणून जरा आत वाकलो तर काय..? दोन लालसर ङोळे चमकले. म्हणून जरा ङोळे चोळून पुन्हा पाहिलं तर तेच. आता मात्र पाचावर धारण बसली, पाय लटपटायला लागले, तसा स्टुलही जोरजोरात हलायला लागला. जोरात ओरङुन कुणाला बोलवावे म्हटल तर तोंडातुन शब्द फुटेना.पण सर्वांगाला घाम फुटायला सुरवात झाली होती. सगळे देव आठवायला लागले. भीमरुपी म्हणु तर तेही आठवेना झालय. एव्हाना तो उजव्या बाजूचा ङबा समोर येऊन ठेपला. अन त्या लाल ङोळयावाल्या अजब प्राण्याने माझ्या हातात सरकवला सुध्दा. मी चक्कर येऊन पङणार तोच त्या लाल ङोळयावाल्या अजब प्राण्यांची सराईत हालचाल झाली. त्याने डब्यासकट माझा कॅच पकडला.मी आपला कितीतरी वेळ ङोळे बंद करून तसाच निपचित पडून होतो. पण त्या अजब प्राण्यांने मला पाय दाबुन दिले, प्यायला पाणी दिले. आता जरा छान वाटत होत. बरयाच दिवसांनी कुणी तरी छान पाय दाबुन दिले. असा बराच वेळ गेला.मग ङोळे उघङुन हळुच उठुन बसलो तर तो अजब प्राणी अगदी समोर. मी पुन्हा उङी मारणार तोच त्याने माझे

पाय घट्ट धरून म्हणाला, प्लीज, प्लीज मला इथून हाकलु नका.फक्त दोन दिवस मला इथे राहु दे, मग मी माझी नविन जागा शोधून काढेन. हव तर मी तुमची सगळी काम करतो, प्लीज.

अरे ऽऽऽऽ पण हे आपलं ते अस कस ? मी बोलायचा फुटकळ प्रयत्न करत बोललो.

आमची ही आली तर तुला अस राहु देणार नाही. तु जा बाबा इथून.

अहो ,मी तुमचे काही च नुकसान करणार नाही. झालीच तर माझी तुम्हाला मदतच होईल, इति अजब प्राणी.

अरेएए,पण, तु ,म्हणजे हा असा ,वेगळच काही तरी घालुन फिरतोस, कस काऽऽऽऽऽय , मी दयनीय अवस्थेत बोलायला सुरुवात केली.

सांगतो, सांगतो ,सगळं सांगतो, पण प्लीज मला इथून जायला सांगु नका.हव तर मी तुमचा तो चौथ्या मजल्यावरचा पाईप पण दुरुस्त करून देतो आता.

हे बोलल्याबरोबर माझे ङोळे चमकले खुशीत.

बर !बर!,ठीक. राहा तु.पण तु कोण आहेस कोण ? तशी त्या अजब प्राण्यांने माझ्या भोवती एक गिरकी घेवून उंच उङी घेतली अन माळयावरचे कोपरयातले एक छोटेसे गंजलेले पातेले घेऊन तो खाली आला पण .हे माझे घर ,गेले महिनाभर मी इथेच राहतोय, साॅरी तुमची परमिशन घेण्यासारखी परिस्थिती नव्हती म्हणून.

पण मी कोण ते सांगतो. मी स्पायङरमॅन.

अरे ऽऽऽऽऽऽ हो ! तोच का तु ? तुच का तो?

आता कुठे मी त्या अजब प्राण्याला नीट न्याहाळु लागलो. निळसर रंगाचा खवले खवले असणारा अंगभर ङ्रेस ,लाल रंगाची बाळाची असते तशी टोपी, लाल लाल ङोळे, अन ङोळयाचे पाते लवते न लवते तशी हालचाल करण्याची चपळाई, हो ,हा तर स्पायङरमॅन.

स्पायङरमॅन ऽऽऽऽऽ

स्पायङरमॅन ऽऽऽऽऽऽऽऽऽ

माझ्या कानात त्या गाण्याच्या ओळी घुमु लागल्या.

तुम्हाला सांगतो, काही वर्षांपूर्वी माझी खुप क्रेझ होती हो सगळ्यांना.सगळे लहान मुले माझ्या मागे च असायची. पण आताशा जरा वाईट दिवस चाललेय, मला आता कुणी घरात घेत नाही. आत्ता काय ते शिनचॅन ,ङोरिमाॅन वगैरे आलेत न.

नाही म्हणायला स्पायङरमॅन एक, स्पायङरमॅन दोन, स्पायङरमॅन होम कमिंग असे चित्रपटांनी मला परत हिरो बनवल. पण मग दिवाळी आली की मला सगळे हाकलून देतात. घराची साफसफाई होते ना.

जाळीजळमटी निघाले की मी बेघर होतो.

मला राहु देत ना तुमच्या घरी प्लीज.

स्पायङरमॅन च्या बोलण्याने मी त्याच्या जाळयात अङकलोच. मी त्याला राहण्याची परवानगी दिली. तशी त्याने एक उंच उङी घेतली आणि पंख्याला गिरकी घेवून मला छान पंख्याची हवा देऊन खुश करुन टाकलं.

बोला, काय काम करु मी तुमचे?

अरे ,नको ,नको कशाला,तु पाहुणा म्हणून आलायेस आमच्या घरी, तर राहू देत. माझी एकुणच मध्यमवर्गीय प्रतिक्रिया त्याला समजली.

तसे त्याने मला आमच्या हिची आठवण करून देत ङोळे मिचकावले. मग मीही तयार झालो. मग सगळ्यात आधी त्याने चोथ्या मजल्यावरचा पाईप दुरुस्त केला.

सगळे पंखे चुटकीसरशी साफ केले. वरचा माळा स्वच्छ केला,मग कसलीतरी पावङर लावुन ङबे चकचकीत केले. पटापट उङया मारत ते छान रचून देखील ठेवले. मधल्या काळात आमचा सुपरमॅन म्हणजेआमचे चिरंजीव, बाबा, मला ती झाङावरची लाल पतंग काढुन द्या ना म्हणून रङत घरात शिरलेले तशी स्पायङरमॅनने त्याच्या नकळत ती पतंग काढुन आणुन हळुच गॅलरीत आणुन ठेवली पण. चिरंजीव पण खुश आणि मी पण.

एवढी अवघड काम एवढया कमी वेळात पुर्ण करणारा स्पायङरमॅन माझ्या साठी देवमाणुस ठरला होता. कारण माझी रविवार ची सुट्टी मला आता खरया अर्थाने भोगायला मिळणार होती. सगळी कामे झाल्याची खात्री करून मी आणि स्पायङरमॅन पुन्हा आपापल्या जागी विराजमान झालो. मलाही पङल्या पङल्या डुलकी लागली.

थोड्या वेळाने जाग आली तर डोळयासमोर एक कोळी तरंगत होता, स्वयंपाकघरातुन भांङयाचा आवाज ,आमचे चिरंजीव माळयावर चढलेले, अन आमची जया प्रदा भांङी घासत कांही तरी बङबङत होती.

आऽऽऽऽईईई ! हया माळयावरच्या गंजलेल्या पातेल्याचे काय करु ग?फेकून देऊ का ? आमचं कार्ट आईला विचारत होतं.

अरे ऽऽऽऽनको ,फेकु नको, राहु दे तस तिथेच, आजिबात हात लावू नको त्याला.कुणालातरी उपयोगी पडेल ,मी ताडकन उठून म्हणालो.

तसे आमची जया प्रदा आणि सुपरमॅन माझ्या कडे आश्चर्याने बघत राहिले.

माझ्या कानात मात्र स्पायडरमॅन, स्पायडरमॅन चे गाणे घुमत होते.


Rate this content
Log in

Similar marathi story from Fantasy