मराठी असे आमुची मायबोली
मराठी असे आमुची मायबोली


आधी परदेशात जायचं म्हणून कोण लगबग, उत्सुकतेने बॅग भरली होती निशा मावशीने. मुलगा अमेरिकेत गेल्यापासून तिची नुसती भुणभुण सुरु झाली होती काकांपाशी. मलाही जायचं, तो कुठे राहतो, काय करतो सगळं बघायचंय. शेवटी वर्षभराने सगळं जुळून आल आणि मावशी, काका अमेरिकेत रवाना झाले. एकंदरीतच मुलाला छान घर मिळाले होते. मित्र-मैत्रिणीपण छान होते. विशेष म्हणजे सगळे मराठीच होते, त्यामुळे पहिले काही दिवस तरी मावशीला आजिबात बोअर झाले नाही, पोरांसाठी वेगवेगळे प्रकार खायला कर, बाहेर फिरायला जा, कधी नाटकाची तर कधी गाणयांची मैफिल सुरु होती. पण पुन्हा सगळे आपापल्या कामाला लागले तसे विखुरले. आणि आता मात्र मावशीची मोठी पंचाईत झाली. कारण मुलगा दिवसभर बाहेर आणि काका काय, पुस्तक आणि एक कप काॅफी असली तर दिवस दिवस कुठे ढुंकूनही बघत नसायचे. मावशीला फार फार बोअर व्हायला लागलेले मग.
बाई गं ! अजून तर आख्खे दोन महिने जायचेत, कसं राहणार मी. ती स्वतःशीच बङबङ करायची, बर पुस्तक तरी किती वाचणार, तिला काही काकांसारखी इतकी वाचनाची आवड नव्हती. नाही म्हणायला घराजवळ एका इस्काॅन मंदिरात तिला जाता यायचं. तिथे एका मराठी आजीची तिची ओळख झालेली. त्या मग खूप गप्पा मारत बसायच्या. पण मग नंतर पुन्हा बोअर. शेवटी त्या मंदिरात मावशीने कधी एकटीने तर कधी आजींची सोबत घेऊन छान मराठी भजन म्हणायला सुरुवात केली. रोज सकाळी एक तास आणि संध्याकाळी एक तास. असंही इस्काॅन मंदिरात फारशी गर्दी नसायची. त्यामुळे ह्या मनमोकळेपणाने, आनंदाने म्हणत असायच्या. पण हळूहळू इथे मराठी भजन ऐकू येते असे पाहून आजूबाजूला, लांब राहणारी मराठी कुटुंबंपण जमायला लागली, आणि मावशीचा शेवटी एकूण तेरा-चौदा जणींचा ग्रुप बनला. आता मात्र मंदिरात मोठ्या आवाजात, छान मराठी भजन, हरिपाठ, सगळं सुरू झालं. एकंदरीत मावशी खूप खुश होती.
दोन महिने कसे संपले ते समजलंपण नाही. मावशीला परत जायचं हे ऐकून तर मंदिरात सगळे खूप भावूक झालेले. जङ अंतःकरणाने सगळे मावशीला परत परत राहा असे सांगत होते. पण मावशीला थांबून चालणार नाही हे माहित होते. ती मनातल्या मनात एकच विचार घेऊन निघाली होती की आता भारतात परत गेले की पुन्हा मराठी साहित्यात नवनवीन काहीतरी शिकायचं, पुन्हा मराठी एम. ए. करायचंय, आणि शिकायचंय. कारण शेवटी तिच्या मायमराठीनेच तिला परदेशी तारले होते.