निशब्द
निशब्द


डआख्खा गाव अजुनही झोपलेला होता. दिवसभर शेतात राबुन थकला भागलेला जीव जागा मिळेल तिथे विसावलेला होता. विष्णू पण आपापल्या लेकराबाळांसकट झोपङीत झोपलेला. मिणमिणत्या कंदिलाची वात मात्र रात्रभर जागीच असायची त्यांची राखण करत. पण आज रात्री अचानक विष्णू चा थोरला दहा वर्षाचा पोरगा उठुन बसला खाडकन, काहीतरी जाणवत होत त्याला. पण सांगता येत नव्हते मात्र.हा पोरगा तसा कमनशिबी निघाला असे अख्खा गाव म्हणायचा. कारणही तसच होतं म्हणा.
विष्णूच्या हया गोर्या गोमट्या पोराला बोलता येत नव्हतं. मुका निपजला होता तो. पण त्या रात्री सगळ बदललं. हा अचानक उठला,समोरच्या शाळेत मोठा ढोल असायचा तो हा रात्री दोन वाजता घेऊन आला आणि त्या शाळेच्या मोठ्या मोकळ्या पटांगणात जोरजोरात बङवायला लागला तसा अख्खा गाव जागा झाला. बायका पोर घाबरुन उठली तर काही पुरुष रागारागात याला मारायला उठले, विष्णू तर गोंधळुन गेला पुरता की या गुणी पोराला असे अचानक झाले काय ? तितक्यात कुत्री जोरजोरात भुंकायला लागली, गाई, वासरे दावण तोडू पाहता होती, हळुहळु सगळा गाव त्या पटांगणात जमला.
अजुनही हे पोरगं ढोल वाजवायचे थांबत नव्हत. तशी मागाहुन हळूहळू चालत एक जख्खङ म्हातारी पुढे आली, त्या पोराला कवटाळले, म्हणाली, मला आल ध्यानात, रात्री च्या पारीला भूकंपाचा धक्का बसला मला पण. पण सगळे झोपेत होते, मला बी सुचेना काय करावे ते ,हया पोराने करून दाखवले. नंतरचे काही मिनिटे गावाला खरच भूकंपाचे धक्के बसत होते पण कुठलीही जिवितहानी मात्र झाली नाही. विष्णू च्या त्या मुक्या पोराने आपल्या कतृत्वाने आज सगळ्या गावाला मुके करुन सोडले होते. त्याने वेळेवर भान ठेवून ढोल बडवला नसता तर... विष्णू किती तरी वेळ निशब्द होता.