कृतज्ञतेची काठी
कृतज्ञतेची काठी


परवा पेन्शन काढण्यासाठी म्हणून बँकेत गेलो होतो.
खूप वेळ उभे राहावे लागेल म्हणून मुलगा सोबत आलेला.
मागच्या महिन्यात छोटीशी पायाची दुखापत झालेली म्हणून हल्ली काठी ठेवतो आधाराला, कधी लागलीच तर.
आजही खूप वेळ झाला होता, पेन्शनर लोकांची खूप मोठी रांग असतेच बँकेत.
एक माझ्याच वयाचे सद्गृहस्थ बाजूला बसलेले होते.
माझा मुलगा रांगेत उभा असल्याने मी निवांत बसून होतो. म्हणून मग त्यांच्याशी गप्पा मारायला सुरुवात केली.
त्यांची ती कर्मकहाणी खूप कटू होती.
खूप वर्षे रेल्वेत सफाईकामगार म्हणून काम करणारा हा गृहस्थ पत्र्याच्या दोन खोलीत राहात होता.
त्याच्या मुलाला वयाच्या सदतिसाव्या वर्षी पॅरेलिसिस ऍटॅक आलेला म्हणून तो पडून होता. या गृहस्थांचा पाय एकदा रेल्वे ट्रॅकच्यामध्ये अडकून दुखावलेला होता. त्यामुळे जास्त वेळ उभे राहू शकत नाहीत. आता पासष्टाव्या वर्षी बायको भाजी विकते, तीच आता घरखर्च चालविते.
रांगेत उभी असलेली ती माऊली बघून मला अस्वस्थ व्हायला झाले.
गेली पाऊण तास ती माऊली उभी होती. हातात बारीक छोटी पिशवी, अंगावर साधी विटकरी रंगाची साडी, गळ्यात काळ्या मण्यांचे, दोन वाट्या असलेले मंगळसूत्र, हातात काचेच्या दोन बांगड्या, चेहऱ्यावर मोठी टिकली लावलेली ती माऊली कष्टाला घाबरत नसल्याची सगळी लक्षणे मला दिसली. पण वाईटही वाटले.
त्यांचा नंबर आला तसा ते सद्गृहस्थ थोडं लंगडतच कॅशियरकडे गेलेले मी पाठमोरे पाहिले. मी पुढच्या वेळी आलो की यांना काही मदत करेन अशा विचारात मी चालत होतो.
मुलासोबत गाडीत बसणार तोच मुलगा म्हणाला, "बाबा! जरा तुमची ती काठी द्या तर... आलोच मी."
असं म्हणत तो काठी घेऊन गेला पण. बराच वेळ लागला तसं मी त्याच्या मागे गेलो.
बघतो तर त्या सद्गृहस्थांच्या हातात माझी काठी होती आणि त्या माऊलीच्या हातात थोडे पैसे.
ते दोघेही कृतज्ञतेने माझ्या लेकाकङे बघत होते.
एक वडील म्हणून मला मी केलेल्या संस्कारांचा अभिमान वाटला तेव्हा.
मुलगा आला तसा म्हटला.
"बाबा! मी असताना तुम्हाला काठीची गरजच नाही."