सोनचाफा
सोनचाफा
-"गोंधळलेल्या दिसताय? काही विचारायचंय?"
-"हा रस्ता कुठे जातोय हो?"
-"इथेच असतो!"
-"हं?"
-"इथेच असतो की. तो कशाला कुठे जायला हवा?"
-"इथे जवळ कचराकुंडी कुठेय?"
-"कशाला हवी?"
-"तुमचा विनोद टाकायचाय त्यात!"
-"मग ठीक आहे! मला वाटलं, तुम्हालाच स्वतःला झोकून द्यावं वाटतं असेल कचराकुंडीत. आत्ताच आरसा बघितला ना तुम्ही, म्हणून."
-"तुम्हाला कळत नाही का हो, मुलींशी कसं बोलायचं ते?"
-"आधी कळायचं! आता लग्न झालंय ना, तर सवय सुटली मुलींशी बोलायची. आता मला बायकांशी बोलता येतं! बाय द वे, तुम्ही बसची वाट पाहताय का?"
-"नाही."
-"मग रस्ता विसरलात का?"
-"ना.... नाही."
-"मग ठीक आहे. नाहीतर मला सवय आहे, रस्ता विसरलेल्या लोकांना लिफ्ट द्यायची. अशीच एका मुलीला मी लिफ्ट दिलेली, मग वर्षभरात आमचं लग्न झालं!"
-"तुम्हाला म्हणायचंय तरी काय?"
-"आज ती परत रुसलीय ना माझ्यावर, माझी बायको हो!"
-"का? तुम्ही काही आगाऊपणा केलात का?"
-"तुम्हाला कसं कळलं?"
-"बायकांना काय शिंगं फुटलीत उगाच रागवायला?"
-"चुकून इन्स्टाग्रामवर एका मुलीच्या फोटोवर लाईक केलं गेलं, त्यासाठी चक्क भांडण करतं का कोणी? सांगा मला!"
-"नुसतंच लाईक केलं म्हणून? चुकीचं आहे अगदी! नऊवारी नेसलेल्या मुली दिसतातच अशा नक्षत्रासारख्या सुरेख, कोणीही पाघळेल हो! त्यात काय एवढं?"
-"नऊवारी नाही हो!"
-"मग? साडी?"
-"नाही ना! त्या मुलीने किनई..... बिकिनी घातली होती."
-" 'दुष्काळात तेरावा महिना'च म्हणायचा. आधीच मुलीच्या फोटोवर लाईक, तेही बिकिनी घातलेल्या!"
-"अहो, पण चुकून झालं ना सगळं!"
-"पण मला सांगा, तुम्ही गेलातच कशाला त्या मुलीच्या प्रोफाईलवर?"
-"मी का जाऊ? ती ऑफीसमधली कलीग आहे, तिने टाकला इन्स्टावर फोटो फिरायला गेलेली मॉरिशसला, तेव्हाचा. चुकून तो लाईक झाला. मग आमच्या मॅडमचं डोकं तापलं. म्हणाली, 'मी एवढे रेसिपीजचे व्हिडिओ शेअर करते, नवनव्या डिशेसचे फोटोज टाकते, ते कधी लाईक केले नाहीत नि आज बरा वेळ मिळाला ह्या बयेच्या फोटोवर रिअॅक्ट करायला!' आणि नाही-नाही ते बोलली हो!"
-"बापरे! हे जरा अतीच झालं ना! नाही-नाही ते कशाला बोलायचं होतं एवढ्यासाठी?"
-"नाही, म्हणजे एवढ्याचसाठी नाही. तिने दूध गॅसवर ठेवलेलं, मला 'लक्ष ठेवा' म्हणून वॉशरूममध्ये गेली. नेमका तेव्हाच मी मोबाईल बघत बसलो अन् तो फोटो लाईक केला गेला, तेवढ्या वेळात दूध उतू गेलं सगळं!"
-"बापरे! साडेसातीच म्हणायची ही तर! म्हणून भांडण झालेलं दिसतंय."
-"नाही, नाही, म्हणून नाही."
-"मग?"
-"तिची माफी मागायची, म्हणून मी ऑफीसमधून आल्यावर आम्ही बाहेर जायचं ठरवलं. तिला रेडी रहा म्हणून सांगितलं; पण माझा बॉस साला, आजच नेमकं त्याने जास्त काम दिलं, मग घरी जायला तीनचे पाच वाजलेत. ती वाट पाहत बसली होती. तेव्हाही तिला राग असा आलेला नव्हता. आम्ही निघणारच होतो, की मी म्हणालो, 'ही हेअरस्टाईल तुला शोभत नाहीये, दुसरी का नाही केलीस?'
-"आणि मग?"
-"मग काय? ती म्हणाली, "दरवर्षी मी आपल्या अॅनिव्हर्सरीला हीच हेअरस्टाईल करते..." आणि रागावून निघून गेली माहेरी जाण्यासाठी नि हेच मला नेमकं कळलं नाहीये, की ती असं का म्हणाली? आमची अॅनिव्हर्सरी तर सात जूनला असते ना! मला आठवतंय, पहिला पाऊस येत होता तेव्हा..."
-"चला, जातेय मी."
-"आज तर तारीख.... ओह् माय गॉड! आज आहे सात जून! म्हणजे आमची अॅनिव्हर्सरी आज.... शिट... शिट! सगळी घाण केलीये मी. आता तुम्ही कुठे निघालात?"
-"अजिबात मागे यायचं नाही माझ्या!"
-"अहो, माझं ऐका तरी...."
-"काहीही ऐकायचं नाहीये मला. जातेय मी. मला उशीर होतोय."
-"थांबा ना, प्लिज!"
-"हे बघा, हात सोडा माझा. भर रस्त्यात चांगलं दिसत नाही ते."
-"मग भर रस्त्यात रुसणं तरी कुठे छान दिसतं, तेही अशा गोबऱ्या गालांच्या चेहऱ्यावर."
-"अंहं! मस्का नाही लावायचा. सोडा म्हटलेलं ना."
-"थांबा ना जरा...."
-अहो, अहो... काय असं, सोडा मला, बघा, मी ओरडेन. तुम्ही मला जबरदस्तीने नाही नेऊ शकत. सोडा, आधी खाली ठेवा बघू लवकर मला..."
-"नाही ठेवणार. हवं तेवढं ओरड. कोणी येणार नाहीये."
-"सोडा ना! सगळे बघताहेत."
-"माझीच वेडी बायको नेतोय उचलून."
-"अजिबात नाही चालायचं आज हे लाडावून बोलणं. दिवसभर त्रास द्यायचा आणि मग हे असं लाडे-लाडे बोलून मनवायला यायचं."
-"त्यातच मज्जा आहे बघ. आता हा दिवस तुला कायम लक्षात राहील की नाही! मी मेमोरेबल केलाय तुझा दिवस. खरं तर तूच मला 'थँक्स' म्हणायला हवं."
-"मी पण मेमोरेबलच करतेय तुमचा दिवस. जातेय मी."
-"जाऊन दाखव."
-"आधी सोडा."
-"तू जाशील."
-"बरं, नाही जात. पण रागावले मात्र आहे."
-"येतो मला तुझा राग काढता."
-"आज नाही चालायचं. आधी लाल चाफ्याचा गजरा आणा; नाहीतर मी नाही बोलायचे!"
-"अरे बापरे! एवढा का राग! बरं, अशीच घरी जा."
-"नि तुम्ही?"
-"गजरा घेऊनच येणार."
-"अहो, मी तर असंच.... निघालात पण... अहो..."
.
.
.
.
.
.
-"आलात? रात्र झाली बघा. नऊ वाजायला आलेत. कुठे होतात? मी तर असंच म्हणालेले. लगेच काय निघायचं!"
-"अहं! असं कसं? माझ्या रातराणीला लाल चाफ्याचा गजरा हवा होता ना!"
-"वेडेच आहात."
-"माळू दे की मग. अगं, पळतेस कुठे? थांब, तुला तर..."
-"नाही हं जमायचं तुम्हाला मला पकडणं! मी जिल्हास्तरावर पदक पटकावलेलं.... अ.... अय्या....!"
-"अरे माझ्या फुलपाखरा! आलीस ना मिठीत बघ. तुला लाख पदकं मिळू देत, पण फुलापास्नंच कसं जमेल सांग, लांब रहायला?"
"तुम्ही ना..."
"अश्शी लाजलीस, तर सोनचाफा दिसशील, आणि सोनचाफा आवडतो बरं का मला! अरे, परत लाजलीस! आता नाही हं सोडणार!"
-"नाही! आधी कविता करा."
-"बरं..... पाहू सुचतंय का काही.... हां.... ऐक हां....
तुझ्या ओठांची मधुमालती जेव्हा माझ्या श्वासांत दरवळते
अन् जेव्हा गुलाब रंगी बोटांनी तू माझं काळीज छळते,
तेव्हा राणी, अशी काही कातिल दिसते तुझी आभा
तू लाजता तुझ्या गाली जणू उमलतो सोनचाफा.....!"
-"इश्श.........."

