STORYMIRROR

Aarna 🖤

Romance Tragedy

3  

Aarna 🖤

Romance Tragedy

अवारणीय क्षते

अवारणीय क्षते

14 mins
170

संवत् पञ्चाशीति अधिकनवशताधिक सहस्त्र (१९८५), चैत्रवसंताची ती एक संथ दुपार...


"हॅलो..."



द्विनेत्रे अन् एकचित्ताने नित्याच्या आवडत्या वार्तापत्रिकेत शीर खुपसून बैसले असता कोणी व्यत्यय आणणे तिला अति त्रासिकतेचे भासे. ग्रंथालयी पुष्कळ दिवसांमागे एखाद्या मध्यान्हसमयास अशी 'निर्जन' सवड लाभते नि त्यात आता कोण हे महाशयश्रेष्ठ.....


"हॅलो, आपणच लायब्रेरीयन ना..."

शिसमी कार्यपीठिकेपुरत तिष्ठलेला तो तिलाच प्रश्नत होता...


"नमस्कार, काय मदत करू शकते मी आपली...?!"


आपल्या मधुर स्वरी शक्य तेवढा संयम ठेवून तिने पृच्छले असता तो म्हणाला, "मदत तर हवी होतीच. पुष्कळ दिवसांनी वाचायचं ठरवतोय. आपण काही सुचवू शकाल का...??"


बहुकालापश्चात पुस्तकपठण करण्याचे आयोजिलेल्या या वाचकसुहृदाची वाचनतृष्णा शमविण्यास कुबेरसंपन्न भारतीय साहित्यपयोधितील कुठले ग्रंथामृत यांस प्राशन करण्यास सुचवावे बरे...?!!


"प्रयत्न करते हं... विनोदीमध्ये चिं. वि. जोशी, अत्रे, पु.ल., भयमध्ये धारप, मतकरी आहेतच. खांडेकरांच्या 'ययाति'ला जोडच नाही. 'अश्रू', 'दोन ध्रुव'ही आहेतच. यांशिवाय कुसुमाग्रज, बा.भ. बोरकर, ना.सी. फडके, गदिमा... वैचारिक लेखन घ्यायचं झाल्यास..."


"अं... या सर्वांहून जऽरासं वेगळं..." तिच्या शब्दशृंखलेस अर्धमार्गीच विराम देत तो उद्गारला, "उर्दू गझल..."


"अय्या... तुम्हालासुद्धा गझल आवडते...??" तिचे नेत्र बालिशपणे चकाकले. हा तर सहपथिकच निघाला की...!! 


"म्हणजे तुम्हीही...?! अरे व्वा...!! हे तर बेस्टच...!! तुम्ही सजेस्ट कराच आता काहीतरी..."


"नक्कीच तर...!!" पाटलकुमुदवर्णी साडीचा नाजूक मोतिया पदर अलगदच सावरून उत्तिष्ठत ती वदली, "चला ना... या बाजूस... सावकाश हं... ही रांग जरा अरुंदच आहे तशी..."


त्या ग्रंथकपाटिकांच्या अगदी पंक्तिअखेरीस तो तिच्या पाठोपाठ चालत आला. 


.....अन् तो विस्तृत ग्रंथनिधी नजरेत मावविताना तिचे नि त्याचे उभयही हस्त नकळत स्पर्शिले ते 'फ़ैज़ अहमद फ़ैज़' साहेबांवर येऊनच...!!


"अय्या...!!"


"सॉरी, ते...."


परंतु, तिने तर ते पुस्तक अलवार खेचून घेत प्रथमपृष्ठ उघडून अंतरी डोकाविण्यास केव्हाच प्रारंभिले होते...!! हर्ष तरी किती वेचावा त्या आननपुष्पावरचा, खजिना गवसलाय जणू...!!


"हे घ्या... हे ना माझं फार आवडतंय... तुम्हालाही आवडेल...!!" उर्ध्व दिशेस वळलेल्या लांबसडक कृष्णगडद पक्ष्मनांची विलोभनीय उघडझाप करणाऱ्या चकोरचक्षुंच्या अतिमधुर विनवणीस सहमती दर्शविणे त्यास अर्थात भाग होते...!


"अं... हो, हो... नक्कीच...!!"


"आपलं नाव...?? ती नोंदवहीत नोंद ठेवावी लागते... त्यासाठीच..."


"अरिंदम कर्णिक..."


"धन्यवाद...!!"



....नि तिज ठाऊक नाही; परंतु छातीशी कवटाळूनच त्याने ते पुस्तक स्वगृही आणिले...!! कारण आक्का म्हणायची, 'हाताळणाऱ्याचा गंध लागत असतो वस्तूला...' आणि त्या पुस्तकी दडवून आणलेला तो सुगंध, तो स्निग्ध स्पर्श निसटून जाऊ द्यायचा नव्हताच त्याला....!!!

.

.

प्रतिवर्षी अमेरिकेहून रजेसाठी परतल्यावर पुस्तकालयास दोन अथवा तीन भेटी देणाऱ्या त्याच्या या खेपेस मात्र दररोज दुपारच्या वाऱ्या होऊ लागल्या, तेव्हाच रमा आक्कास जरा-जरा कळलं होतं, की यावेळी तो वाचतोय ती पुस्तकं कागदी नव्हेच...!!! परसात शतपावली घालताना ती बोलली देखील, "काय एवढं वाचायला लागलास रे हल्ली...?!!" 


"एक बोलकं पुस्तक सापडलंय गं..."

त्या नीरव निशेहून मौन; तरी तारकासहस्त्रांची ज्योत्स्ना परिधानलेलं उद्दीप्त स्मित त्याच्या राजस अधरपात्री स्थापिलं, "प्रयत्न करतोय वाचण्याचा...!!"

.

.

.

ग्रंथमित्रांसह हृदयपरस्परांचंही झालेलं आदानप्रदान...

शुभ्रपृष्ठांच्या कोऱ्या गंधासह एकमेकांस पोहचता केलेला प्रीतिसंवेदनेचा गुलाबी परिमळ...

कधी न कळता, तर कधी मुद्दाम घडवून आणलेली दृष्टिभेट झाल्यास अंतरी मनविहंगाचा होणारा चिवचिवाट...

...अन् पुस्तक परत करताना त्याने आवर्जूनच सोडलेला "बुकमार्क"...

.

.

"अहो... हे यामध्ये काहीतरी राहिलंय तुमचं... अहो...!! प्चच्.... गेलेत सुद्धा....!!"


मध्यपृष्ठांत दडलेला (की दडवलेला?!) तो जरासा जाडसर रंगीत पुठ्ठ्याचा नक्षीदार महिरप... 

नि तयावर गडद द्रवशाईने गोंदविलेल्या वळणदार काव्यवल्लरी...


"अभी इस तरफ़ न निगाह कर

मैं ग़ज़ल की पलकें सँवार लूँ,

मेरा लफ़्ज़-लफ़्ज़ हो आईना

तुझे आईने में उतार लूँ।"


एखाद्या 'खयाला'वर एकांतातच लाजणे काय असते, हे तिला त्या रोजी प्रथमतःच ज्ञात जाहले असावे...!


.....अन् त्यावरच द्वितीय बाजूस संलिखित होती अल्लामा इक़बालरचित ती पद्यवेल...


"भरी बज़्म में राज़ की बात कह दी 

बड़ा बे-अदब हूँ, सज़ा चाहता हूँ"


शततारकाचंद्रिकेवत् लखलखलं पद्माननविराजित सुहास्य...


ती साठवत गेली तिच्या दैनंदिनीत त्याच्याकडून आलेली ती 'प्रेमप्रतिकं", जणू त्याची भावसुमनेच त्यांतून तिच्याशी गुज साधत होती; कारण दृष्टीस दृष्टी भिडवून, काळजात कोरून लिखित असलेल्या प्रितीची पानं उघड वाचून दाखवण्याची अनुमती ना तेव्हाचा काळ देत होता; ना नियम-चाकोऱ्यांच्या बेड्या धारलेली समाजव्यवस्था...!!

.

.

.

आताशा प्रतिदिनी उभयही पाखरे जर मिर्झा ग़ालिब, वसीम बरेलवी, अहमद फराज, अकबर इलाहाबादी, बशीर बद्र ह्यांच्या काव्य पंक्तिखेरीज एकमेकांकडून काही स्विकारत असतील, तर ती होती प्रथम प्रेमानुभवाची ती दृष्टि, नवनवी, हवीहवीशी, अर्धोन्मिलीत पुष्पदलांच्या सुकुमार वर्णासम निष्पाप, प्राजक्तपुष्पावर ओथंबलेल्या बालनिरागस शिशिरबिन्दुसम आर्द्र, नवपरिणीतेच्या नजरेसम लज्जित अन् नवशिशुकपोलांवर नुकत्याच उगवू पाहणाऱ्या लवेएवढी तलम...!!!

.

.

.


तिच्या आसनस्थानापासून त्याच्या काष्ठासनापर्यंत; तिच्या दैनिक वार्तापत्राआडून त्याच्या काव्यग्रंथाआड; हल्लीच प्रारंभित जाहलेली दृष्टि-लपंडावक्रिडा कुठल्या क्षणी बुद्धिद्यूतात परिवर्तीत जाहली नि कुठल्या समयांशी उभयपक्ष (?!) पराजित होऊन परस्परहृदयार्पणसोहळा साजरा झाला, ह्याचा बोध होण्याइतपत तरी सचेतन होती का ती भावसंमोहित मने......?!!


"फ़क़त निगाह से होता है फ़ैसला दिल का,

न हो निगाह में शोख़ी तो दिलबरी क्या है।"

.

.

.

त्या संध्येस समस्त कर्मचारीवृंदाने आपापल्या सदनी गमन केलेसमयापश्चात निर्गमन-पूर्वकालात एकांतात ग्रंथफलिकांवर अवसर्पलेल्या कादंबऱ्या उभारून ठेविताना श्रवणास आलेल्या पायरवाला प्रत्युत्तर म्हणून न वळताच ती उत्तरली, "वाचनालयीन कालावधी संपलेलाय...! उद्या सकाळी अकराच्या सुमारास येणे केलेत तरी चालेल...!"


"पण आम्हांस कुठे बंधन आहे कार्यकालाचे...?!!" मध्यस्थानस्थित कोष्ठकाधाराने तिष्ठून तो वदला, तशी ती झर्रकन् वळली...


"अरिंदम, अ... आपण...??! या वेळी इथे...??!"


त्याक्षणीचे सत्य सांगावे, तर तैलचित्रागत पुरत उभी ठाकलेली त्याची अशी प्रतिकृती कोटिजन्मही न्याहाळत बैसण्यासाठी तिच्या मुखातून कधी नकाराक्षर बाहेर पडले नसते की तिची पक्ष्मने लवली नसती...!!


"सहजच...!!" त्याचे किंचित घोगरे तरी मृदू स्वर बोलत राहिले, "कसे गेलेत ना अडीच-तीन महिने...?! जरादेखील जाणवलं नाही..."


त्रि-मासांचा समयकाल त्यांना त्रि-घटिकांगत सरला, ही चित्ताला पडलेल्या प्रथमप्रेम-संमोहनाचीच कृपा म्हणावयास हवी...!!


"व्यस्त आहात का...??! मी अवेळी येऊन व्यत्यय आणला का...?!"


...नि तिला जाणवले, आपण दृष्टि एकटक रोखून बघत बसलोय...!! पुनश्च एकवार ग्रंथदिशेस वळून ती म्हणाली, "एकेरीत बोललात तरी चालेल...!!"


"मला वाटलेलं, दुपारी आलो नाही, तर वाट पाहिली असशील..."


....अन् जलदगतीने पुस्तके सावरणाऱ्या हस्तलता अकस्मात विश्रामल्या...!!


धक् धक्....

.

धक् धक्

.

मनाच्या तिजोरीकप्प्यात निःशंक होऊन पोलादतालक घालून दडविलेला संदेश भरदरबारी कुणीतरी घोषणा देत वाचून दाखविला, तर स्पंदिन् गाज अशीच नाही का सभोवार घुमणार...??!


"म... मी...?! मी का म्हणून वाट बघेन आपली, अरिंदम...?!!"


"त्याच प्रश्नाचं उत्तर घ्यायला आलोय मी, नीरा...!! रजा संपतेय माझी...!! उद्या रात्री परतायचंय... एक वचन घेऊन परतायचंय... एक आश्वासन घेऊन परतायचंय..."


"तुम्ही समजत आहात, तसलं काही माझ्या मनातदेखील नाही..."


तिच्या उभयस्कंधांस स्वहस्ते धरून स्वदिशेस वळवोन तो पृच्छला, "का मग हे असे पाणावलेत तुझे मृगनयन...?!! का असा उर भरून आलाय...??! नेहमीसारखे अस्वस्थ होताच पदराशी चालणारा चाळा का सुरू झालाय...?!" अंबरवर्णी पदराचे चुरगाळलेले टोक सोडवून तिच्या सुकुमार अंगुल्यांना स्वांगुलींत गुंफून घेत नित्य तेजःपुंज किंतु सांप्रत क्षणी म्लापलेला तो मुखचंद्र क्वचित निमिष तो तसाच निरखत राहिला...!!


"आता वाट बघायला लावू नकोस, नीरा...!! बोल गं एकदाचं, वेडे...!! डोळ्यांनी, ओठांनी खोटं बोलशील, पण सारं सत्य मज उलगडून सांगणारे हे लज्जारक्त गाल कुठे लपवशील...??! प्रत्येक आसवाला काय कारण देशील...??! जिवाची होणारी तगमग आतच कोंडून ठेवशील...?!! बोल ना, नीरा, बोल ना..."


त्या प्रश्नशृंखलेस तिच्या मंद श्वासोच्छ्वासांखेरीज कसलीही प्रतिवचने आली नाहीत, ना पूर्तता केली गेली त्या उत्तर-विनवणीची...

ती उदंड प्रशांतता कर्णकर्कश्श भासू लागली...

तो अवकाश जेव्हा प्राणांतिक पाश वाटू लागला....

ती कधीच न दिलेली प्रतिपत्ति जेव्हा हलाहलतुल्य जाणवू लागली.....



तेव्हा.....



......तेव्हा त्याच्या घामेजलेल्या करांगुली, तिच्या मृदुल अंगुल्यांत गुरफटलेल्या त्याच्या वत्सल सकरुण हस्तांगुली किंचित सैलावल्या....


परंतु...



परंतु.....



......तिच्या नयनार्द्रांतून श्यामलस्निग्ध केनारी घरंगळत आलेला अश्रुहिमवल त्याच्या गौरहस्ती विराजला.....


......नि पुनः एकवार तिची सुबकसुकुमार बोटे त्याच्या करांभोवती संकृषली गेली, घट्ट-घट्ट आवळली गेली, सौहार्दोलाव्याने तृप्त-तृप्त जाहली...!!!


उन्नतनेत्र सांगू पाहणाऱ्या स्वीकृतीवचनास वाचताना आज शाब्दिक उणीव भासली नाही त्यास, ना त्या आमोदित चक्षुरत्नकांना काही दडवावे वाटले.....


"अरिंदम, या मावळतीच्या रविराजाची, या सुवासिक सांजवाऱ्याची, अगदी आपल्या पवित्र मंगल हृदयभावनांची साक्ष ठेवून ही नीरा आपणांस वचनबद्ध होतेय, हो, तुम्ही माझ्या नयनी पाहिलेल्या प्रीतिच्या गोडगुलाबी नक्षी मीच रेखाटल्या होत्या... अजाणता झालेल्या स्पर्शाने सरसरून जाणाऱ्या शीतल लहरी मीही अनुभवल्या होत्या... पुस्तकांच्या पानांआडून मीही बांधलेत स्वप्नमनोरे... मला गझलांच्या, शायरींच्या ओळींत दर्पण बघण्यास तुम्ही शिकवलंत.... पण आता काव्यपंक्तीत नाही, आपल्या नजरेत बघायचंय, अरिंदम, मला माझं प्रतिबिंब...!! सांगा, आणखी वदवून घ्यायचंय काही, सांगा....."


संतृप्त जाहलेल्या अंतःकरणास आणखी हवे तरी काय...?!! 


"वेडी गं वेडी... हे डोळे पुसून टाक बघू आधी...!! असे मोती सांडवायचे नाहीत हं...!! आणखी जरा त्रास देणार आहे बरं का मी...!!!"



".....आणि ते काय...??!"



"तुम अपने चाँद तारे कहकशाँ चाहे जिसे देना

मेरी आँखो पे अपनी दीद की इक शाम लिख देना..."



"म्हणजे....??!!" विस्फारल्या नजरेने पाहत ती उद्गारली.


"म्हणजे.... उद्याची एक सायंकाळ करशील का माझ्या नावे...?!!"


विचाराधीन नेत्रांनी एकवार त्याच्याकडे, मग दूरवर कोठेतरीच, मग एकदा भुमीदिशेस अन् परत त्याकडे बघून स्मितत ग्रीवा दोलवतच तिने होकार पोहचता केला अन् अत्यानंदाने काहीच न कळून अजूनही स्वहस्तांत गुंफलेल्या तिच्या करकमलावर त्याने अलवारच अधरपात्रे टेकविली....


"स्स्स.... अरिंदम...."



त्या लाजऱ्या-बुजऱ्या सावळ्याशा शशिमुखावरील रक्तिमा स्मरणात साठवून लगोलग त्याने निरोप घेतला...

.

.

.

प्रतिदिनीचाच नव्हता का हा बिछाना...?!

की नव्यानेच प्रवेशलाय ह्यात रेशम-स्पर्श...?!

या भित्तिकांनी धारलेला हा रंगलेप पुरानाच नाही का...?!

ही सर्वत्र दिसणारी चकाकी यापूर्वी का दिसली नाही...?!

वारा दरवळतोय की श्वास...?!

धुंदी हवेत आहे की दृष्टीत...?!

निशा आली पण निद्रा नाही....

.....अन् येईलही कशी...?!

स्वप्नी चांदणं पेरून जातं, ते प्रेम...

डोळ्यांतील झोप चोरून जातं, ते प्रेम...

मोरपीसांचा स्पर्श, कस्तुरीचा गंध, तारकांचं लावण्य, हरिणीचं वात्सल्य...

...आणिक काय नसतं पहिल्या प्रेमात...?!

का चिंब होऊ नये या प्रितीसरींत...?! 

का दंग होऊ नये या हृदयछंदात...?!

का माखून घेऊ नये स्वतःस या रंगी...?!


केवळ पहुडण्याने कशी येईल झोप, जेव्हा खुली नेत्रे प्रियसख्याचा मनोरम स्वप्नपटल अलङ्कृत करीत असतील...?!

त्याचे मधुमधुर बोलस्वर अजूनही कर्णी गुंजन करीत असता यामिनी गात असलेली अंगाई कशी बरे श्रवणास येईल...?!

ती मंगलातिमंगल प्रेममूर्ति चक्षुकनीनिकांतरी वसत असताना कसा बरे धीर होईल अन्य कुठले सौंदर्य बघण्यास...?!


त्याचीही अवस्था काही विशेष निराळी असू नयेसे वाटते.....

कशी सारी दुनियाच परीकथेमध्ये रुपांतरित जाहल्यासम भासतेय....

परंतु, हे सुमधुर-गोड गुपित या रजनीस ठावं नाही हो...

अखेरीस तिने कुशीत जोजवल्यावर पेंगलेली नयनकवाडे मिटमिटायचं विश्रामली, प्रभातेपर्यंत लवली.....

.

.

.

"नीरा, किती हा पसारा...!! कधी आवरून होणारेय तुझं...?? ....आणि काय गं, कार्यालयाव्यतिरिक्त कुठे बाहेर जाते आहेस का आज...??" ज्येष्ठ भगिनीसाहेब कडाडल्या, तसे ती अधिकच बावचळून गेली. कितीही, अगदी कितीही जिवापार प्रयत्न केला धीट होण्याचा, तरीही ताईसाहेबांच्यापुढे काही तिला शूर व्हायला जमायचे नाही...!!


"छे गं...!! बाहेर कुठे...! सहज तुळशीबागेत जाऊन येईल म्हणतेय मैत्रिणीसोबत लायब्ररीची वेळ संपल्यावर...!!" अतिहिम्मतीने रूधिरधमन्यांत साहस प्रवाहित करून आज प्रथमसमयीच तिने अशी थाप मारली....!


"काही नको....!! लवकर ये सायंकाळी...!! मला काही जिन्नसं खरेदी करायचीये नि घरी थांबायला कोणीच नसलं, तर दिवेलागण कुणी करायची...?! अप्पा ओरडतील उगाचच मला...!!" त्वरितच हलवल्या गेलेल्या नकारघंटेने आमचं सारं उसनं अवसानच ओसरलं...


तरीही-

"म... मी दिवेलागणीआधीच परतेल..."


"हं... पूर्वीच ठरवलेलं दिसतंय सारं...!! ...नि कोण ही नवी मैत्रीण आता....?!" नजर रोखून ताई म्हणाली, तसंं तिला देहातील त्राणच गेल्यागत झालं...!! आत्ता नि काय सांगावे...?!


अखेरीस नेत्रकवाडे गच्चगच्च मिटून घेऊन पदांगुष्ठ्याने भूमीस उकरीत स्वसांत्वन करताना आम्हांस (असत्य का होईना?!) कंठ फुटला, "ती... ती सरोज आहे ना, तिची दूरची मामे बहीण आहे, ती पहिल्यांदाच आली आहे पुण्यात... काय बरं नाव तिचं... हां, निमी... निमी, तर... हां, निमीला जायचंय तुळशीबागेत... म्हणून... ठरलं आपलं सहज... खास असं काही नाही...." एवढे सांगेपावेस्तोवर ललाटमैदानी जमलेले घर्मबिंदू तिने लगेच चाचपडत पदरटोकाने टिपले...!


"ह्म्म... झालं की निघा लगेच... मी जातेय श्यामलताईंकडे, पत्त्यांचा बेत ठरलाय आज... तिकडूनच खरेदीसाठी निघेल..." वाम स्कंधावर 'पर्स' लटकावून ताई निघूनही गेलीदेखील!


ग्रंथालयसमयास अर्धघटिकावकाश शेष होता...


हळूचच दर्पणी डोकावलं, आज मुद्दामच नेसलेली ठेवणीतली चंदेरी किनारविभूषित सौम्य हरित साडी केवढी खुलून दिसत होती...!!! अभिराम मृगलोचनी अंजनरेघा रेखल्या गेल्या अन् मुळच्याच कान्तिमत्त अधरकलिकांवर ओष्ठशलाकेने मन्दलोहितरंगी उधळण करण्यात आली...!! कुंतलकेशवेलींस बद्ध करून केशसूचीच्या ताब्यात दिधले गेले...!!


.....अन् द्विभ्रुकमानींमधोमध अलवारच विराजली कुमकुमवर्णी चंद्रकोर....!!


रूपचारुतेने श्रील हा आरसप्रतिबिंबालंकार लेऊन दर्पण मुग्ध-मुग्ध स्मितला असावा...!!

.

.

.

अर्धदिवसीय रजेचा अर्ज व्यवस्थापक पीठिकेवर प्रस्तुत केला गेला...!


अन् आता..... 


......पीसाएवढ्या हलक्या पावलांनी चालायची होती ती पुढची वाट, ती वाट परकी होती, परि आपलासा होता तो सोबतीचा सखा.....

.

.

.

"माझ्या मोटारीतूनच गेलेलं चालेल का...?!"


त्याच्या विचारणेस "हरकत नाही" हे द्विशाब्दिक प्रत्युत्तर आले, तसे त्याने पुढील आसनस्थानाचे द्वार उद्धाटले अन् तिने बैसून घेतले...


अखेर काही क्षणांपश्चात तो मौन-प्रवास बोचरा वाटू लागून त्यानेच पुढाकार घेऊन ती शांतता संपुष्टात आणिली.....


"आणखी, घरी कोण-कोण असतं...?!"


"....काका असतात, त्यांना अण्णा म्हणते मी, ताई असते, ताई म्हणजे काकांचीच मुलगी आणि मी, असे आम्ही तिघेच असतो, काकी चार वर्षांपूर्वी आजारपणाने गेली... फार जीव लावायची...!! कधी-कधी तिची आठवण येते नि अगदी भरून आल्यागत होतं बघा...."


"ताईंचं लग्न वगैरे....?!"


"ती दुःखद कहाणी पुन्हा कधी सांगेन...."


"ओह... आणि तुझे आई-वडील...??!" वळण घेतेवेळी सुकाणू-चक्रास फिरवित एक दृष्टिक्षेप तिच्याहीकडे टाकत तो पृच्छला. 


तो प्रश्न ऐकताच मात्र ती सैरभैर झाली... खरे पाहता अपेक्षितच नव्हती का ही विचारणा...??


"....आमच्याकडे घरी कुणीही त्यांच्याबद्दल बोलत नाही...!! पण जेवढ्याही माझ्या जुन्या आठवणी आहेत त्यात ते कुठेच नाहीत... त्यांचं नाव हीच एक आठवण... बस्स..." हरवलेल्या नजरेने ती बोलत होती.


"आयम् सॉरी..... खरंच... मला माहीत नव्हतं.... तू वाईट वाटून घेऊ नकोस, नीरा....."


"नाही हो, तुम्ही कसली माफी मागताय... प्राक्तनीच्या गोष्टी या साऱ्या..... माझं सोडा, तुमच्याकडे कोण-कोण असतं...??"


"आई असते, बाबा असतात, रमा आक्का असते... रमा आक्का म्हणजे माझी आत्या हं... आईहून अधिक तिनेच सांभाळलाय मला..... या सुटीत आई-बाबा गेले आहेत उत्तर भारतात सफरीवर... पण मी मात्र खास आक्कासाठी आलोय... आणि तुला सांगू, इथे आल्यावर अजून एक खास कारण सापडलंय पुन्हा-पुन्हा येण्याचं... ते कारण की नाही, फारच गोड दिसतंय आज... गुपित आहे बरं का, सांगू नकोस कुणापाशी..."


"इश्श्श्......"


"अशी लाजलीस, तर अपघात नाही का व्हायचा, वेडाबाई...??!!"

.

.

.

.....अन् तद्दिनी तिचा मृणालिन् सलज्ज मुखचंद्र, पाणीदार आलोकित नेत्रहीरके अन् प्रसन्न सुकुमार कपोलद्वये अनेकवार लाजलीत,


जोडीने विघ्नेश्वराचं दर्शन घेताना.....


त्याच्याकडून चमेली-कुंदकुमुदांचा गजरा माळून घेताना.....


त्याच्या उबदार हाती स्वहस्त देऊन काचकङ्कणे उभयही करांच्या मणिबंधी भरून घेताना.....


त्याच्या " 'नीरांजनी परांजपे'ऐवजी 'नीरांजनी अरिंदम कर्णिक' ऐकण्यास आवडेल का...??" या प्रश्नी ग्रीवा दोलवित होकारताना.....

.

.

.

तो क्षण अखेर आला...

येणारच होता, नाही का....??!

तो क्षण, जेव्हा परस्परांस निरोप द्यावा लागेल...

साऱ्या-साऱ्या मधुर स्मृतिंना समुच्चयित करून, उराच्या ठेवणीत जपायला ठेवून भावविभोर नयनांनी एकमेकांस साठवून-आठवून स्वमार्ग क्रमावा लागेल.....


किंतु, हे सारं अल्प कालाकरिता...

स्पंदनांनी स्पंदनाना साद घातली, की पुनः घडणारच होत्या त्या स्वच्छंद भेटी...


"घ्या... आलं वाचनालय.... इथून मात्र नीरा मॅडम, तुम्हाला एकटं जावं लागेल..."


"मला फार आठवण येईल हो तुमची...."


"मलासुद्धा..... मी पत्र लिहिलं तर चालेल का...?! हवं तर लायब्ररीच्या पत्त्यावर पाठवत जाईल.... उत्तर मात्र दे हं नक्कीच...."


"ह्म्म...."


".....आणि काही गरज पडली तर रमा आक्काला भेटलीस तरी चालायचं... अप्पासाहेब कर्णिकांचा वाडा म्हटलं की कुणीही सहज सोडेल.... तसं तिला बोलणारच आहे मी आपल्याबद्दल.... लवकरच परतेन मी, नीरा...."


"मी वाट पाहीन, अरिंदम.... काळजी घ्या....!!"


"तू सुद्धा.... अच्छा... येतो मी... बाय्....!!"


"बाय्.....!!!"

.

.

.


उंबरठा ओलांडून गृहांतरी प्रवेश केला अन् पावलं जराशी थबकलीच...


सुखासनावर आसनस्थ झालेले अण्णा अन् व्हरांड्यात अस्वस्थ येरझारा घालीत द्वारदिशेसच दृष्टि असणारी ताई अन् कोपऱ्या-कोपऱ्यातून झिरपणारा सायंसमयीचा मंदप्रकाशित काळोख...


"आलीस.....?!" तिजकडे निरखून पाहत ताई विचारती झाली. 


"अं... हो...!! अंधारलंय ना... दिवे लावायला घेते मी....!!"


"त्याची काही गरज वाटत नाही, नीरा...!! रस्त्यावर भरबाजारात तू लावलेल्या दिव्यांचा प्रकाश कसा लख्ख पडलाय बघ आपल्या घरात...!!"


"असं... असं का बोलतेय तू, ताई.....?? काय झालंय...??"

स्पंदनांची धडधड वाढून काळीज बाहेर पडतंय की काय वाटू लागलं. हाता-पायांना सुटलेला कंप लपेनासा झाला. 


अन्...

"चांडाळणी, लाज कशी वाटत नाही तोंड वर करून खोटं बोलताना...??!"

......क्रोधभरल्या हस्ताचा तलप्रहार त्या काही क्षणांपूर्वी टवटवीत फुललेल्या कपोलकुसुमावर झाला.

ती स्वस्थानी थिजून तिष्ठत राहिली...


".....गजरे काय माळताय, हातात हात घालून काय फिरताय..... संस्कार-वळणांचा काही-काही मान ठेवला नाही.....! योगायोगाने मी आज तुळशीबागेकडे फिरकले नि बघितलं तर काय...!! अप्पा, तुम्हाला सांगते, अगदी लाज आली मला हे सारं पाहून..... तरी नाही म्हणत होते मी हिला नोकरी करू द्यायला; पण तुम्हीच वसा घेतलाय जसा स्री-सक्षमीकरणाचा....!! होत्याचं नव्हतं करून बसलीय हो ती...! कुणास ठावं कधीपास्नं चाललंय हे सारं...! की तुळशीबागेतच वाचनालय भरतं हल्ली...?!"



"अण्णा, मी सांगते ना सारं... माझं ऐका एकदा तरी....." कधी नव्हे तो आज सारं धैर्य एकवटून ती उद्गारली.


"काही नको, अप्पा....."


"कावेरी, तिला बोलू देत..... हं.... बोल, कोण होता तो इसम...?!" त्यांनी दरडावून पृच्छले, तेव्हा-


"अण्णा, गेले तीन-चार महिने ओळखत आहे मी त्यांना..... ते म्हणालेत की... की त्यांना मी.... मी पसंत आहे म्हणून.... अन्.... मला.... मलादेखील ते... ते आवडतात, अण्णा..."


"काय आडनाव म्हणालीस...?!"


"क... कर्णिक...!!!"


"बाई, बाई, बाई.... परांजप्यांच्या एकवीस पिढ्यांत तरी कोणी परजातीत विवाह केला का....?! अगं, वडीलमंडळी पार स्मशानात पोहचवून स्वतःच घाट घातलाय का लग्नाचा....?!! या ऐवजी एखाद्या विहिरीत जीव दिला असतास, तरी अब्रू शिल्लक राहिली असती आमच्या संस्कारांची....."


"ताई, अण्णा, माझं...."


"बास झालं..... जाऊन नोकरीचा राजीनामा द्यायचा अन् गपचूप सांगेन त्या स्थळासोबत बोहल्यावर चढायचं..... अजून तमाशा नकोय मला..... तू माझ्या सख्ख्या भावाची मुलगी आहेस म्हणून माझ्यासमोर दोन पायांवर उभी तरी आहेस; नाहीतर तुला माहीत नाही हा पुरुषोत्तम परांजपे काय चीज आहे तर....." नेत्र नव्हे, निखारेच ते, ज्वलंत निखारे... ज्यांची धग जाळू पाहत होती तिच्या इवलाल्या स्वप्नकळ्या.....


मनोमन प्रार्थत राहिली ती, हे सारं-सारं स्वप्न असावं अन् झगझगीत पहाटेस खडबडून जाग यावी; किंतु सत्यस्थितीचा दाह पुन:पुन: वास्तवाच्या डागण्या देतच राहिला.....

.

.

.

नोकरी सोडविण्यात आली.

ताईकरवी तिने साठविलेली संपूर्ण रक्कम काढून घेण्यात आली.

अन् बाहेर पाऊल टाकण्यास मज्जाव करण्यात येऊ लागला.


पंचमासांचा अवकाश असाच सरला...


तद्दिनापश्चातही समय त्याच्याच गतीने वाट क्रमत राहिला असता, जर एका माध्यान्हेस ग्रंथालयीन लिपिक महाशय द्वारात प्रकटले नसते.....


योगायोगानेच ती त्या समयी अंगणात आली.


"नीरा बाईसाहेब, हे पत्रं आलेलं कार्यालयात आपल्यासाठी, घ्या, निघतो मी....."


पदराआड दडवून आणत स्वकक्षेत प्रवेशून त्या पाकीटबंद पत्राची घडी तिने उलगडली.....


नि काय हे....?!!



'माझी प्रिय नीरा, 


तुला 'माझी' म्हणण्याचा अधिकार आता राहिला नसेल मला कदाचित, पण तू कायम मला प्रियच असशील... 


तू लग्नाचा निर्णय घेतला आहेस आणि तुझा निर्णय अंतिम आहे, तर ठीक आहे; अर्थात तू काहीतरी विचार नक्कीच केलेला असणार...


माझ्या सदिच्छा कायम तुझ्यासोबत असतीलच. 


...आणि मी अधिक पत्र पाठवून तुला त्रास देणार नाही, हेही तुझ्या इच्छेप्रमाणेच.


तुझ्या सहवासात घालवलेले दिवस नेहमी स्मरणात राहणार आहेत आणि सोबतच तुझ्यात झालेल्या या परिवर्तनाचं नवल वाटत राहील...


सुखी हो! 

                             

                        तुझाच,

                       -अरिंदम.'



'ही अक्षरे....?!!


ही लेखनशैली.....?!!


त्यांची.....?!!


हो.....!!


त्यांचीच......!!!


हे पहिलंच पत्र की....?!!


मग ह्या पूर्वीची पत्रं.....?!!


......पण मी तर कुठलंच पत्र लिहिलं नाही....!!


मग कुणी......?!!!'



एक क्षण तिला काहीच कळले नाही अन् दुसऱ्याच क्षणी सारा उलगडा झाला.....!!!



'ताई.....?!!


ती असं करू शकते.....?!!


का....??!'



"ताई, कावेरी ताई, कुठे आहेस तू...?? ताई....." निरातीशय सालस लोचनी दाटलेल्या आसवांत काय नव्हतं...?!!


असह्यता, अगतिकता, अपयश, क्रोध, दुःख अन् उद्भवलेल्या परिस्थितीचा द्वेष.....


तिच्या हाकेला साद देऊन जेव्हा कावेरी तिच्या पुढ्यात येऊन उभी ठाकली, तेव्हा विश्वासच बसला नाही तिचा स्व-हृदयावर.....


मायेचे सागर रिते केले होते तिने या भगिनीसाठी.....

ममत्वाच्या आदर्शस्थानी ठेवलं होतं हे नातं.....

ह्या नेत्रांच्या मायाळू पडद्याआडचा मत्सर आजवर कधी दृष्टिस पडला नाही अन् आज कसा तो दात विचकून हसतोय.....


"का असं वागलीस, ताई.....?!! तू स्विकारलीस ना गं माझी पत्रं अन् प्रत्युत्तरंही लिहिलीस......??!"


"हो.... मीच...!!" त्या कुटील स्मिताखेरीज पश्चात्तापाची एक रेघही नव्हती त्या मुखावर..... तो असुरी आमोद अंधःकारसम्राटासही शोभून दिसला नसता, जो सांप्रतघटिकेस त्या दुष्टत्वाने बरबटलेल्या आननपटलावर दिमाखात विराजला होता.....


"का ताई, का.....?! मला तुझाच आसरा होता ना गं..... असं वागून पोरकं का केलंस मला..... तुझ्या मोडलेल्या संसाराचा सूड माझ्या निष्पाप नात्यावर का उगवलास गं.....?!! कधी तुझा शब्द खाली पडू दिला नाही मी..... वेळ आल्यास प्राणही दिला असता तुझ्यासाठी... तू तर माझ्या सर्वस्वाचंही सर्वस्व हिरावून घेतलंस.... माझा एवढा द्वेष का.....??! एवढी वाईट असते का गं प्रेमाची शिक्षा...?!!"


सीमा नव्हती त्या दुःखावेगास अन् अखंड प्रवाहणाऱ्या नयनजलास..... भुमीस स्पर्शणाऱ्या बिंदू न् बिंदूची आर्त हाक चौ-भित्तिकांवर आदळून परावर्तित होत होती.....


अखेर नि:श्वासापाठोपाठ बोल उमटू लागले, ज्यांच्या अपार यातनांनी नीराचे काळीज ओरबाडून काढले. 


"आजवर नीरा, आजवर माझ्या वाट्याला फक्त नि फक्त दुःखच आलेलं असताना तुझ्या वाट्याला कसं सुख येऊ देऊ मी.....?!! ऐकायचंय तुला, ऐक मग..... माझ्या आईला माझ्याहून जास्त तू जवळची होतीस; एवढी की शेवटच्या क्षणी मरणशय्येवर तुझ्या हातून पाणी घेऊनच जीव सोडला तिने.....!! शाळेत मी नापास व्हायचे म्हणून अप्पा रागवायचे, पण तू वरच्या नंबरने पास व्हायची, म्हणून माझ्यावर जास्त राग निघायचा.....!!

माझा नवरा, हं, नीचच होता तसा मेला..... इकडे मुक्कामाला काय आला दोन-तीन दिवस अन् तुझ्यावर हात टाकला त्याने.... का नीरा....?!! कारण त्याला तू आवडलीस, पण मी असताना देखील...?!! माझं अस्तित्व काय मग, नीरा...?!? माझा संसार मोडण्याला तूच अप्रत्यक्षपणे कारणीभूत नाहीस का...??!


प्रत्येकवेळी चांगुलपणाचं पांघरुण तू पांघरलंस आणि आपल्यातली तुलना वाढत गेली...!!


अप्रत्यक्षपणे का होईना, तूच जबाबदार आहेस या साऱ्यास.... तू नसतीस तर यांतलं काहीएक घडलं नसतं...! पण आता फार दिवस नाही, नीरा..... अप्पा बोलणी करायलाच गेलेत तुझी...!!


जे प्रेम मला कधी मिळालं नाही, ते मी तुलाही कधीच मिळू देणार नाही, लक्षात ठेव...!!"


धाड्दिशी द्वारफलिका आदळून कावेरी निघून गेली.....!!


"तुलना कधी नव्हतीच तुझ्या-माझ्यात...!! तू जन्माला घातलीस ती मनात तुझ्या...!! दोन ध्रुवांएवढं अंतर निर्मिलंस तू आपल्यात...!! फार दूर गेलीस गं, फार-फार दूर गेलीस...!!"


ढळणाऱ्या एकेका आसवास दर्पणाएवढं लख्ख दिसत होतं काळोखलेलं भवितव्य...!!! परंतु, स्वतःस आश्वासित करण्याइतक्या धैर्याचं दानही तिच्या पदरी टाकायला कुणी नव्हतं....!!

.

.

.

आठवणी पुसून टाकता आल्या असत्या, तर किती बरं झालं असतं.....

पुनर्जन्मच झाला असता, नाही का.....?? 


तो तसा प्रेमानंतरही होतोच.....

कातळातही मृदुत्व जन्मांस येतं......


आरसपटावरचं प्रतिबिंब नित्याचंच, तरीही किती-किती वेगळं भासतं...!!


साऱ्या क्षति-यातना भरून काढतं ते प्रेम.....

क्रौर्यभरल्या विश्वाने दिधलेल्या जखमा, आप्तस्वकीयांनी विश्वासघाताने ओवाळलेल्या जखमा, संघर्षपथी रक्ताळून भूषविलेल्या जखमा.....

साऱ्यांवरचीच उपचार-चिकित्सा जमते त्याला.....


परि, खुद्द प्रेमानेच दिलेल्या क्षति....??!


त्या असह्य वेदना केवळ असाध्य, अवारणीयच...!!!

.

.

.

आजदिनी तब्बल सप्त संवत्सरे उलटली, तरीही अंतःकरणावकाशात रुंजी घालीत असलेल्या स्मृतींचा तो चिरपरिचित दरवळ अद्यापही परिमळून टाकतो एक न् एक श्वास...


एखाद्या काळोख्या निशेस नभांगणी साऱ्या तारकांना जुळवलं, की तोच प्रिय चेहरा अवतरेल, असं भासतं...


वास्तवाचं भान सुटत जातं; किंतु जळत्या सळीने मनावर कोरल्यागत पुनःपुनः स्मरतात त्या अखेरच्या पत्रातील पंक्ति...


"आये तो यूँ कि जैसे

हमेशा थे मेहरबान

भूले तो यूँ कि गोया

कभी आश्ना न थे..."


......अन् विवाहरात्रौ मणिबन्धी फुटलेल्या कङ्कण-वलयांचे व्रण हलकेच कुजबुजतात, 


"तेरे आने की क्या उमीद मगर 

कैसे कह दूँ कि इंतिज़ार नहीं..."


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance