STORYMIRROR

Shrutika Bhosale

Abstract Comedy Others

3  

Shrutika Bhosale

Abstract Comedy Others

सोमवार

सोमवार

5 mins
7

      एका निवांत, आळसभर दिवसानंतर येणारा वार म्हणजे 'सोमवार'. सोमवार म्हणजे धकाधकीचा, घाईचा, जणू काही आठवड्यातील सर्व कामांचा भार आजच्या वारी आला आहे असे वाटते. तो आला की जणू आता परत रविवार कधी येणार याची दिवस मोजणी आपोआप सुरू होते. आणि मग काय ठरलेली कामे नियोजीत करून हा दिवस संपवायचा. पण प्रत्येकाचा सोमवार हा वेगवेगळा असतो. काहींना सोमवार म्हणजे उपवास, सोमवार म्हणजे शंकराचा वार, सोमवार म्हणजे पगाराचा वार आणि असे बरेच काही....


        माझंही असंच काही ठरलेलं काम असतं सोमवारी. आज या वारालाच याच्याविषयी लिहिण्याचा योग म्हणजे 'दृष्य/अनुभव/प्रसंग' काहीही म्हणू शकता. अगदी 'सोमदृष्य' ही. हल्ली अलीकडेच लागलेल्या सवयीमुळे दर सोमवारी याचा मला वेगळा अनुभव येतो. असं म्हणतात माणसाची इच्छा असल्यावर आणि देवाने बोलवल्यावर लोक मंदिरात जातात. आणि हो कधीकधी ब्राह्मणाने सांगितल्यावरही. माझं गणित हे तिसऱ्या उदाहरणात मोडत.


         सकाळी लवकर उठण्याचं सुख फक्त सोमवारीच माझ्या नशिबात असतं. छान आवरून सोबत लक्षात ठेवून लागणारी चार जिन्नस पिशवीत घेऊन बाहेर पडणे. आत्ता पर्यंत मंदिरात जाऊन फक्त हात जोडणे एवढेच काम मी केले आहे. याचा मी नास्तिक आहे असा सर्रास लोक अर्थ काढतात पण मला मनापासून ध्यानात केलेली साधना हीच पूजा वाटते. असो, घरातून बाहेर पडताच आता सोमवार म्हणजे शंकराचा वार या बिरादरीत माझा नंबर लागला असल्यामुळे महादेवाला जाताना महत्वाची गोष्ट सोबत घेणे ते म्हणजे पिंडीवर वाहण्यासाठी दूध. आमच्याकडे दूधवाला दूध देण्यासाठी सकाळी येत नाही. आपल्यालाच पायांना कष्ट देत दूधासाठी जावे लागते. दुकान वाटेत असल्यामुळे मनाला अगदी बरे वाटते. 'काका पावशेर दुधाची पिशवी द्या' हे दर सोमवारचे ठरलेले वाक्य बोलून ती पिशवी घ्यायची.माझी अंगकाठी सडपातळ असल्यामुळे कधीकधी मला शंका येते की या काकांना मी पावशेर दूध स्वतःसाठी मागते की काय असे वाटते का? आणी फक्त सोमवारीच म्हणजे मी पावशेर दूध आठवडाभर....नाही...नाही...असं नसेलच.....


          पिंडीवर दूध वाहिल्यामुळे पुण्य मिळतं. या विचारानेच पुढे चालायचं. रोज न बदलणारी लोकांची वाहतूक, प्रत्येक घरापुढून जाताना येणारे ठरलेले आवाज. आपल्या सोबत ची ती ठरलेली भक्त मंडळीही असतात. आणखी दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बेलाची पाने आणि फुले. आमच्या इथे तशी दोन तीनच पर्याय आहेत यासाठी. पहिला पर्याय बेलाची पाने नाहीत फक्त फुले आहेत आणि कधी ती फक्त झेंडूचीच किंमत दहा रूपये सोबत भाव खाणार्‍या बाईचा चेहरा, दुसरा पर्याय चार बेलाची पाने सोबत चारच फुले किंमत दहा रूपये आणि सोबत फक्त ओळख असणार्याच व्यक्तीसाठी गालावर किंचितस हसू. तिसरा पर्याय मात्र थोडा लांब आहे पण दहा रूपयात पुरेशी पाने आणि फुले, कधी अजून टाका म्हणल्यावर सांगितल्यापेक्षा जास्तच देणारी ती बाई सर्वांशी गोड, आपुलकीने बोलून सोबत खूप काही देऊन जाते.


         सकाळी सकाळी मंदिरात जाण्याने मन प्रसन्न होते. दिवस छान जातो. देवाला जाताना चार सुंदर भक्तिगीते कानावर पडावी म्हणजे कसा दुग्धशर्करा योगच. पण आमचे मंदिर नेमकी शहर आणि गाव याच्या मध्ये अडकलेले आहे. त्यामुळे मंदिरा लगतच्या परिसरात असलेल्या आधुनिक झुंबा नावाच्या प्रकारामुळे 'माय नेम इज शिला', 'चढती जवानी', 'काटा लगा', अशी विविध प्रकारची गाणी कानावर पडतात. ही गाणी ऐकून मंदिरात जाण्याची वाट सुरू होते. मंदिर परिसर तसा मोठा आहे. प्रवेशद्वारावर आल्यावर आता चप्पल, बूट बाहेर काढायचे, अशावेळेस ते चोरीला जाण्याची भिती वाटत नाही. बदलत्या काळानुसार ही भिती लोकांच्या मनातून कमी झाली असावी. मोजून तीन पायर्‍या चढून वर जायचे. आत जाण्याआधी पाय धुवून जावे म्हणून उजव्या हाताला याची सोय केलेली आहे. अगदी तीन नळ लावले आहेत. पण नेहमी आज यातल्या कुठल्या नळाला पाणी येते हे मात्र आपल्याला पहावे लागते. पाय धुवून पुढे गेल्यावर पहिले रक्षक नंदीदेवाची मुर्ती समोर दिसते. मूर्ती अगदी सुंदर, मनमोहक आहे. पाहताच असे वाटते की हे आपल्या मोठ्या भारदस्त आवाजात,'या...या तुमचे स्वागत आहे.' असेच म्हणतात की काय असे वाटते. नंदीदेवाचे दर्शन घेताना त्यांच्या तोंडापाशी वाहिलेल्या फूल व प्रसादावर घोंगावणार्या माशांचा मात्र राग येतो. त्यांनाही त्रास होत असेल का त्यांचा? आपण मात्र हात जोडून त्यांचे दर्शन घेऊन पुढे जायचे.


           'टन्ss टन्ss' घंटेचा नाद करीत आम्ही आलोय याची चाहूल महादेवाला करायची. गर्दी असेल तर रांगेत उभे रहायचे. आता आपला नंबर येईल याची वाट पहात थांबायचे तोच स्वत: ला ब्राह्मण म्हणून घेणार्या गावातल्या पोरांचे ते इतर वेळेस शिव्यांनी भरलेले स्वर मंदिरामध्ये, ' दादा चला पुढे', 'अहो काकू खाली बघून चला', 'जास्त वेळ थांबू नका पटपट आवरा', 'ऐ, इथे दिवा कोणी लावलाय? अक्कल आहे का? कळंत नाही', 'गाभाऱ्यातल्या बायकाs आवरा मागे गर्दी वाढतीय'. असे काही ऐकू येतात. जणू हे मंदिर स्वतःची मालमत्ता आहे आणि बिचारे भक्त त्याचा थोडासा भोग घेण्यासाठी तिथे जातात. पण मंदिरासारख्या त्या पवित्र वातावरणात हे स्वर शोभत नाही, प्रत्येकाची शांती भंग होते. एक मात्र चांगले आहे तिथे 'आरे ला कारे' करत नाही. बहुतेक भक्तांचे ध्येय फक्त महादेव आहे त्यामुळे कोणी अशा बोलण्यावर जास्त लक्ष देत नाही. प्रत्येकाला वाटते मला माझ्या मनासारखी पूजा करायला मिळावी पण लोकसंख्या आणि वेळेच्या अभावामुळे एकावेळेस दोन तीन जण गाभाऱ्यात जाऊन पूजा करतात. पहिला दूध, दही वाहत असतो तोच दुसरा पाणी वाहत असतो तेवढ्यात तिसर्याची फुले वाहण्याची वेळ येते. एकट्याने ही तीनही कामे शांतपणे साग्रसंगीत होत नाही. बहुतेक महादेवाला सर्वांनी मिळून माझी पूजा करा असे वाटत असेल. आपण आपले सोबत आणलेले दूध, जल, पाने फुले वाहायची आणी बाहेर यायचे. कधीकधी असं वाटत की ओळखीच्या भक्तांची पण महादेव वाट पाहत असेल का?


  " या...या.. जोशी काकू, आज काय पंचामृत वाटतं" "अहो, दत्तात्रयजी दूधात पाणी आहे की पाण्यात दूध?" "ये, ये सुमन मागच्या वेळेस सासूचे गाऱ्हाणे चुकून मंत्राच्या जागी बोलली होतीस, आज काय?"


"अरे, कोण आहे ते फ्रिज मधले गार दूध वाहत आहे?"


"आजीs, आज बिना चष्म्याच्या आलात, बघा बेला ऐवजी लिंबाचे पान वाहत आहात."


"अरे तुकाराम तुझ्या बिडीच्या हाताने ते भस्म नको लावत जाऊ मला वास येतो."


       असे नक्कीच गमतीदार किस्से रोज ते पाहत असतील. पण नावात भोळेपणा असल्यामुळे ते या गोष्टी दूर्लक्षीत करत असावे. मग काय जराही जास्तीचा वेळ जाऊ न देता बाहेर यायचे. पुन्हा एकदा हात जोडून आज चांगले दर्शन झाले म्हणून त्यांचेच आभार मानायचे. तिथे शेजारीच दत्ताचे मंदिर देखील आहे. आपल्याला फक्त महादेवाची उपासना सांगितली आहे मग दुसर्या देवाची काय गरज असे न करता निमुटपणे त्याही देवाला जायचे. कारण काही सांगता येत नाही कुठला देव आधी प्रसन्न होईल. दत्तात्रय महाराजांचे बरे आहे फक्त फुले वाहिली तरी त्यांना पुरेशी आहे. रितीप्रमाणे पुन्हा 'टन्s टन्s' . समोर असलेली प्रसन्न संगमरवरी मुर्ती फारच छान आहे. हात जोडून त्या मूर्तीकडे पाहण्याशिवाय दुसरं काही मागायची इच्छा कधी होत नाही. गर्दी कधीच नसल्यामुळे शांत दर्शन घ्यायचे आणी बाहेर पडाणार तोच वर भिंतीवर लावलेल्या आरश्याकडे मात्र लक्ष गेल्याशिवाय राहत नाही. तो आरसा का बरं तिथे लावला असेल असा प्रश्न पडतो. कधी वाटतं की दत्त तूम्हाला तुमचे खरे रूप दाखवत आहेत. "बघ, हा आहेस तू खरा. माझ्यासमोर उभा होतास तेव्हा कसा होतास ". असं काहीतरी.

           बाहेर पडल्यावर पुन्हा नंदीमहाराज दिसतात. जाताना परत एकदा त्यांचा निरोप घ्यायचा. असं म्हणतात की त्यांच्या कानात इच्छा सांगितली तर ते ती महादेवा पर्यंत पोहचवतात. माझी कधीच इच्छा होत नाही सांगायची. लोकांना एवढं काही सांगताना पाहून आपला नंबर या यादीत कधी लागेल असे वाटते. बसं इच्छा एवढीच या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण कर. या भावनेने बाहेर यायचे आता पुन्हा पुढच्या सोमवारी भेट. फक्त सोमवारीच मंदिरात जाते म्हणून महादेव "ती सोमवारवाली मुलगी आली का?" अशी तर माझी ओळख ठेवणार नाही ना असा गमतीशीर विचार मनात येतो. पुन्हा बाहेर काढलेल्या चप्पल कडे बघून "हुश्श आहे " असे मनात बोलून आता पुढच्या सोमवारची वाट बघायची.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract