STORYMIRROR

Shrutika Bhosale

Comedy Drama

3  

Shrutika Bhosale

Comedy Drama

न संपलेला प्रवास

न संपलेला प्रवास

10 mins
211

जन्मल्यापासून शेवटच्या श्वासापर्यंत माणूस हा एक प्रवासीच असतो नाही का?

   प्रवासात अनेक अनुभव येतात कधी चांगले , कधी वाईट, कधी हास्यमय, तरी कधी भयानक. माणूस प्रवास त्याच्या योग्यतेने करतो हे खरे....आपल्या खिशाला परवडेल त्याच वाहनाने प्रवास करावा. म्हणजे कसं, अगदी गरीब असेल तर त्याला सहसा प्रवास नावानेच धाप लागावी, तरी करावाच लागला तर एसटी किंवा लांब असेल तर रेल्वे तिही जनरलच. श्रीमंतांचा विषयच नाही. एसटी आहे, रेल्वे आहे नाहीतर स्वतःची मोटारगाडी. कुठल्याही वाहनाने जा तो बघूनच श्रीमंत आहे हे कळेल.

     मध्यमवर्गीय माणसाचे फारच वाईट हाल. धड गरिबी दाखवता येत नाही ना श्रीमंती. अहो जनरलच्या डब्यात तो शोभत नाही आणी स्वतः ची गाडी परवडत नाही. हे म्हणजे सगळीकडून उगीचच नाकाररेल्या धोंड्याची गत!

      असो या कथेतही असेच काहीतरी घडले आहे. काल्पनिक जरी असली तरी आपल्यासोबत ही, असेच घडते असे वाटेल.

माझे नाव 'दिनकर प्रभाकर जोशी' आहे.

काय? 'जोशी' नावाने ब्राह्मण वाटले का?

होs, आहेच.  खोटे ब्राह्मण.

म्हणजे त्याचे काय झाले आम्ही मुळचे कोल्हापूरचे. खरे नाव 'दिनकर पांडबा पाटील'. आता ९० च्या काळात एम.ए केलेल्या ह्या मुलाला चांगली नोकरी मिळवी म्हणून याने पुण्यात इंटरव्ह्यू दिले. पण बर्‍याच ठिकाणी आपण आपल्या नावाने नोकरी गमवत आहोत हे कळल्यावर त्यावर उपाय म्हणून एका शुभचिंतकाच्या सांगण्याने नावाचे एफिडेविट करून घेतले.

आधी फक्त आडनाव जोशी करू असे ठरले पण जोशी आडनावाला पांडबा माणूस शोभत नाही म्हणून बापाला न सांगताच त्यांचेही बारसे घातले.

        आता गेली सात-आठ वर्ष मी पुण्यात शिक्षक म्हणून काम करतो. शाळा मात्र चांगली नावाजलेली, मेहूण्याच्या शिफारसी वरून मिळालेली नोकरी आणि चाळीतली जागा. ज्याची आठवण रोज बायको नवरा विसरभोळा असल्यासारखी चहा पिताना, पेपर वाचताना, निवांत पलंगावर लोळताना,   'हे माझ्या भावामुळेच झाले हो, नाहीतर तुमच्याकडून होणे शक्य तरी आहे का?' असे उगीचच मी बिनकामी असल्यासारखे मला वाटवून देई.

    असो उद्या बड्या साहेबाच्या उगीचच केलेल्या शिफारसीने मला नागपूर ची स्वारी होती. आठ दिवसांपूर्वी शाळा तपासणीस आले असताना येताना हातात लेटर आणी मिठाई चा बाॅक्स देत अदाशासारखे हसत म्हणाले,

"जोशी तुमची बदली नागपूरास केली आहे. एक चांगला गणिताचा शिक्षक हवा आहे त्यांना. मग, जाल ना नक्की."

या अचानक बसलेल्या धक्क्यावर माझे हो/नाही न ऐकताच हा शहाणा बाॅक्स मधील मिठाई स्वतःच्या तोंडात कोंबत निघूनही गेला. सोबत मुंबई वरून ट्रेन चे टिकीटही होते.

'आलेया भोगासी असावे जोशी' अशी गत माझी.

   

        सकाळी लवकरच उठलो. मित्राची जिप्सी मुंबई ला जाणार होती त्याच्यासोबत जायचं ठरलं होत. हातात दोन बॅग घेतल्या, बायकोला

'चला मग येतो काळजी घे स्वतःची. पोहचल्यावर तुलाही बोलावून घेईन काही दिवसात' असे म्हणताच तिच्या डोळ्यातले अश्रू वाॅशर गेलेल्या नळासारखे गळू लागले. हळूहळू ते नळ तुटल्यावर जोरात पडणार्या पाण्याच्या प्रवाहासारखे मोठ्या आवाजात येऊ लागले. अगदी शेजारच्यांना नवरा नागपूरला जाण्याआधी स्वर्गवासी झाला असेच वाटेल. शेवटी कसेबसे तिला समजवले लहान मुलाला देतो तसे पन्नास रूपये तिच्या हातात ठेवले, आश्चर्य म्हणजे ती लगेच रडायची बंद झाली.

         मित्र नाक्यावर वाट बघत होता. आम्ही गाडीत बसलो आणि माझा प्रवास सुरू झाला. मुंबई पर्यंतचा प्रवास अगदी सुखदायक होता. मस्त मित्रासोबत गप्पा मारत, निवांत आम्ही मुंबई जंक्शन ला पोहोचलो. ट्रेन लागली होतीच. मी माझी सीट शोधली आणी बॅग नीट ठेवल्या. १२ ची वेळ होती. निघायला थोडा वेळ होता तोवर प्लॅटफॉर्म वरती चकरा मारू म्हणून खाली उतरलो. बापरे एवढी गर्दी पाहून पुण्यातल्या मंडईची आठवण झाली. जरा चटरपटर काही मिळते का खायला, बघायला मी थोडा पुढे गेलो.

  लहान मुलाला बजावतात तसे बायकोने बाहेरचे काही खाऊ नका सोबत दिलेला फराळच करा असे सांगितले होते. तरी जवळच्या म्हातारी कडे टोपलीतली तीन केळी घेतली आणि परत माझ्या सीटकडे यायला निघालो. सीटजवळ जाताच मी चुकलो की काय अशी अवस्था झाली. कारण माझ्या सीटवर भला मोठा पहिलवान माणूस सोबत त्याची सोजवळ वाटणारी बायको आणी दोन दिवटी मुलं. असं भलतच कुटूंब माझ्या स्वागताला तिथे बसलेलं होतं. आता आपली जागा परत मागणं हे सर्वात मोठं लाजिरवानं काम वाटतं.

      'अहो, ऐकलत का मिस्टर ही माझी सीट आहे.' असं बोलताच माझी अपेक्षा पहिलवान माझी मानगुटी पकडतो की काय असं वाटण्याआधीच त्याच्या बायकोच्या तिरसट नजरेतच मी एक आवंढा गिळला. मी काही न बोलताच समोर टिकीट दाखवल्यानंतर ते उठून समोर बसले. हुश्श.

माझे सामान नीट आहे की नाही हे बळेच तोंडावर हसू ठेवत तपासून घेतले. आता ही मंडळी प्रवासात सोबत असणार या गोष्टीनेच घाम फुटला. तेवढ्यात एक कोट घातलेला माणूस माझ्या शेजारी येऊन काहीतरी शोधत होता. त्याच्याकडे बघून मला 'प्रोफेसर धोंड' पात्राचीच आठवण झाली. अगदी तसेच कपडे, तोच काळा चश्मा.

"ही माझीच सीट काय?"त्याने विचारले.

अरेच्चा अगदी बोलनेही तसेच की, 

माझ्याही तोंडातून 'हाss' बाहेर पडले. त्याने लगेच रागातच पाहीले आणि शेजारी बसला.

पोशाखावरून तो वकील वाटत होता. बापरे याच्या बोलण्याने आरोपी, गुन्हा मीच केला म्हणून स्वतःच शिक्षा भोगायला तयार होईल. समोरच्या रिकाम्या सीटकडे मी पाहतचं होतो तोच एक वयस्कर जोडप तिथे येऊन बसलं. बोलण्यावरून विदर्भाचे वाटत होते.

      झालं...भोंगा वाजला आणी ट्रेन सुरू झाली. नशीब...

    

   आता कुठे १० मिनिट पण झाले नव्हते, त्या समोरच्या बाईने दोन्ही पोरं बापाकडे ढकलली आणी विनकामाचं काहीतरी काढून तिथेच विणायला सुरू झाली. बायका अगदी कमाल असतात कधीही कुठेही काहीही करू शकतात. त्या पोरांनी पहिलवान दिसणार्या वाघाचे अगदी मांजर करून टाकले होते. नक्कीच दोन्ही आईवरच गेली असणार.

  मी आपला विरंगुळा म्हणून शिक्षक या नात्याने बॅगेतून पु. लं. च पुस्तक काढलं वाचायला. दोन ओळी वाचतोय तोवर...

"तुम्ही कुठलेs?" शेजारचा वकील बोलला.

"मी पुण्याचा आहे. दिनकर जोशी. आपण कुठले?"

"मी, मुंबई चा आहेs. काही दिवस पुण्यातही होतो राहायला. माझं नाव 'चिमण भुजबळ'. मी वकील आहेs"

"हो, ते कळलच पोशाखावरून. काय हो, हे पदवी नंतर हा पोशाख घालणे सक्तीचे असते का वकीलांना? नाही म्हणलं प्रवासातही घातला आहे म्हणून विचारलं."

   "हा..हा..हेss (मोठ्याने हसला) तुम्ही फारचं विनोदी आहातs. मी, चाललो आहे. मुलगी बघायला त्यासाठी घातला आहे. सगळं तसं ठरलेलच आहे."

   "होका, बरोबर निदान वकिल आहात म्हणून तरी पसंद करेन. "

एवढे बोलून आता पुस्तक वाचण्याचा काही योग वाटत नाही म्हणून ते परत बॅगेत ठेवले. तोच हाताला मगाशी घेतलेली तीन केळं लागली. भूकही थोडी लागली होतीच, जशी ती बाहेर काढली तशी शेफर्ड च्या नाकाच्या त्या पोरांनी दुष्काळातून आलेल्या पोरांच्या तोडांवरचे भाव दाखवले.

पोरंच ती, जाऊदे म्हणून दोघांनाही एक एक केळं दिले.

आता काय एकच केळ नशिबी. खाण्यासाठी तोंडासमोर घेतच होतो तोच आपल्या डावीकडून डाॅबरमॅन सारखा कोणीतरी लाळ गाळतोय असाच भास झाला. बघतो तर चिमणमॅन, म्हणजे चिमण वकील. शेवटच्या केळ्याचे बलिदान त्याच्या तोंडात कोंबून झाले.

   बायको सोबत असती तर आता प्रत्येक केळ्यामागे तीन वेगळे डोस दिले असते. असो मी आपला पोटाला नाही तर डोळ्यांना तरी बरे वाटावे म्हणून आपलं तोंड खिडकी कडे करून बसलो. जरा तासभर झाला असेल माझा डोळा लागून, तोच शिव्यांच्या आवाजाने जाग आली.

    "माजं टोंगळा दुकून राहीला नं" (समोरची वयस्कर स्त्री बोलली)

  "सरकून झोप नं मग, मले कायला धक्का देऊन राहीली." (नवरा बोलला)

  "हाऊन का? मायन नशिबच फुटकं. मले असं भयताड मिळलन."

    "मले भयताडss आण त्वा कोण? बाइनं ईट आणला डोक्याला."

(नवरा बायकोचे जागेवरून जोरदार भांडण सुरू होते.)

    मला जरा कुठे थोडी शांतता मिळालीच होती तोवर हे भांडण. हे भांडण म्हणजे मराठी मुलाला इंग्रजी शाळेत टाकल्यानंतर काही दिवसांनी त्याची बोलली जाणारी मराठी जेव्हा आई वडिल ऐकतात तेव्हा त्यांच्या चेहर्‍यावर येणारे भाव म्हणजे, वाटतीये तर मराठी पण कळतंच नाही नक्की काय बोलतोय तशी माझी गत झालीये.

     असो मी आपली भांडणावरून सहज नजर शेजारी वळवली तर 'चिमणराव' घुबडासारखे माझ्याकडे बघत होते. जरा घाबरलोच.

  "काय? बरे आहे ना सगळे." (मी विचारले)

"होss तुमचा शर्ट फार छान आहे. कोठून घेतला."

"पाहिजे तुम्हाला."

"अहंsहा...हा...नाहीss मला आवडला म्हणून विचारले. सांगाना कोठून घेतला?"

"हा मी पुण्याहून घेतला. कधी आलात तर भेटा सेम घेऊन देतो."

 "होss चालेल हां."

 "काय हो एक विचारू का? ही नाकातली मुळाक्षरे लहानपणापासून का? की वकील झाला म्हणून सोबत आली."

 "हं..हं..हं...मी लहानपणापासून असाच आहेss"

"अशे का? चांगले आहे. कसे काय जुळणार सूत काय माहीत." (हळूच पुटपुटलो)

  

     बापरे असे नमुने पदरी पडणे म्हणजे अवघडच आहे. हा असा असेल तर याची बायको याला बसता उठता बोलेल. इथे आम्हीच एवढी बोलणी खातो तर याचा विचारच नको.

      आता तर संध्याकाळ होत आली होती. एका स्टेशन वर ट्रेन काहीवेळ थांबली. जरा पाय मोकळे करावे म्हणून खाली उतरलो चहा पाणी घेतले आणी परत आहे तिथेच. थंडीचे दिवस होते आणी थोडं गार लागू लागलं होतं म्हणून बॅगेतून स्वेटर आणी कानटोपी काढून घातली.

    चला, आता रात्र काय झोपून जाईल असे वाटले पण कसलं काय,

    समोरचं कारटं नाकात मच्छर गेला म्हणून रडू लागलं. अरेरे काय तो आवाज दहा बोगीआड बसलेला ट्रेन चालकाला ही ऐकू येईल. मच्छर कसला हो, त्याच्याच भावाने घातली असेल काहीतरी काडीमोडी काय कळतयं.

    पण नाही, नाकात हत्ती घुसल्या सारखा हाच चवताळून आणी मध्येच माझ्याकडे बघत आवाज वाढवून रडायचा. अहो दोन तीन वेळा झाले असे आता शेजारी बसलेलेही माझ्याकडे आरोपी सारखे पाहू लागले. जसं की मीच पुण्याहून खास प्रजातीचा, उमद्या प्रतीचा खिशात अगदी लपवून तो मच्छर या पोराच्या आणी तेही नाकात सोडायला आणला होता. काय करावे कळेनाच, शेवटी डोक्यावरची टोपी संपूर्ण चेहर्यावर ओढली आणी चोरासारखा गुपचूप कोपर्यात डोक टेकून पडलो.

      'धप्पाक्' (मोठ्याने मारल्यासारखा आवाज झाला)

टोपी जरा वर करून बघितलं तर पोरगं गप झालेलं होतं.

वाह आईने एकच धपाटा पाठीत घातला आणी पोरगं रडायचं थांबलं. बाईगं हे आधीच केलं असतस तर या कानांच्या पडद्याचे हाल तरी कमी झाले असते. मात्र कमाल त्या पहिलवानाची वाटते, एवढं पोरगं रडत होत पण तोंडावरची माशी देखील हलली नाही त्याच्या. बाई ही काही न झाल्यासारखी उरलेल्या विणकामात लागली, बहुतेक या नाटकाच्या अनेक तालमी झाल्या असाव्यात यांच्या.

       रात्रीचे साधारण नऊ वाजून गेले होते. आता जेवायची वेळही झाली होती. पण माझ्या डब्यातलं काढलं तर माझ्यापर्यंत त्यातलं काहीच उरणार नाही हे केळ्याच्या उदाहरणावरून चांगलच कळलं होत. आता काय करावं याच विचारात असताना समोर चिवड्याची प्लेट आली.

  "घ्या ना...मी बनवला आहे चिवडाs" (वकील बोलला)

या माणसाच्या हातचा चिवडा खावा की नाही म्हणून क्षणभर विचारात पडलो. पण चिवड्याची प्लेट अशी काही समोर पकडलेली होती की आता आपला बळी जाणारचं आहे हे कळलं होत.

 "हो...हो..खातो नं.."

जितक्या देवांची नावे आठवली तेवढी मनात बोलून पहिला घास तोंडात घातला.

माझाच मला राग आला. कधी कधी आपण माणूस त्याच्या दिसण्यावरून, पोशाखावरूनच तो कसा असेल अशी आपल्या मनानेच प्रतिमा बनवतो. त्याचे गुण अवगुण न बघता. आता बघा ना 'चिमणराव' इतका अप्रतिम चिवडा बनवत असतील असा विचारही कोणी केला नसेल.

"वाह! चिमणराव तुम्ही फारच छान चिवडा बनवला आहे."

"धन्यवाद! मला सगळा स्वयंपाक बनवता येतो हाs"

"असे का, चांगले आहे."

  चिमण ने एवढा चिवडा आणला होता की, सगळ्यांना पुरून उरला. वाह फार छान वाटले, आता पोट भरले आहे म्हणजे झोपही शांत लागेल. बायकोने दिलेली तिच्या माहेरची शाल काढली आणी अंगावर घेऊन झोपायची तयारी केली. समोर दोन्ही मुलं गाढ पहिलवानाच्या अंगावर झोपली होती. ती बाई मात्र एकटी चादर घेऊन पडली होती.

नशीब ते भांडणारे नवरा बायकोही झोपायच्या तयारीत होते. आणि इथे चिमणराव मात्र फाईलींचा गठ्ठा काढून काहीतरी काम करत होते. आता उद्या सकाळी हा प्रवास एकदाचा संपेल या विचाराने मी ही झोपलो.

(सकाळी)

"दादाs ओ दादाs"

मला खाडकन जाग आली, आपल्याला कोणीतरी आवाज देऊन उठवत आहे. कोण बरं हे? सकाळ सकाळी आश्चर्याचा धक्काच बसला. घरी वर्षानुवर्ष बंद पडलेल्या रेडिओतून एखाद्या दिवशी सुगमसंगित वाजावे तसंच काहीतरी झालं होत.

 "दादाs चहा पाहीजे का?"

पहिलवानाच्या तोंडून इतकी करूणात्मक भावना, नक्कीच आज सूर्य पश्चिमेला उगवला असणार.

 

 "अं..अं..हो चालेल द्या..."

मी आपलं खिडकीच्या बाहेरच चूळ भरली तोंडावर पाणी मारलं आणी समोरून आलेला चहा घेतला.

"काय हो, ही तुमची सगळी मंडळी कुठे गेली. "(मी विचारले)

"ते आमची बायको मुलांना तोंड धुवायला घेऊन गेली."

"बरं बरं...तुम्ही भलतेच शांत आहात पण. कालपासून आज ऐकला तुमचा आवाज."

"हो, मी जास्त बोलत नाही."

"अच्छा, मग कुठे नागपूर ला का?"

 "हो, माझं गाव आहे. पण मी लहानपणापासून मुंबई ला च राहत होतो. तिथेच लग्न झालं आणी मुलं. आता वडिल शेती करत होते पण वय झालयं जमत नाही. म्हणून आम्ही जातोय काही दिवस बघायला."

"अरे वाह, चांगल आहे. एक विचारू काय तुम्ही पहिलवान आहात का? नाही तुमच्या शरीरयष्टी वरून वाटतं म्हणून म्हणलं"

"हा..हा..हो, होतो मी. फार आवड होती बघा मला पहिलवान बनन्याची. काय ती रोज सकाळी उठून कसरत, तो खुराक, ते मित्र. कितीतरी स्पर्धा जिंकलोय. पण आता कसंल काय, पहिलवानगिरीने पोट भरत नाही हो. नोकरी, धंधा पाहिजेच."

"हो, अगदी बरोबर. कुटूंब आले की जबाबदारी येतेच."

दोघेही चहाचे सुरके घेत होतो. कमाल आहे नाही, या माणसाने स्वतः ची स्वप्ने कुटूंबासाठी बलिदान केली. कधी कधी माणूस बाहेरून दिसतो तसा नसतो. एका पहिलवानामागे असलेली त्याची चुरगाळलेली स्वप्ने कोणी बघितली तरी असेल का?

माणसे किती प्रकारची असतात, भेटतात. प्रवास हा एक मार्ग आहे की अनेक नमुने भेटतात. अनेकांच्या गोष्टी वेगळ्या असतात. एक मात्र आहे की जो जसा दिसतो तो तसाच असेल असे नाही, हे खरं.

चला आता काहीच वेळ, नागपूर ला कधी पोहचतोय असं झालंय. एक मनातून इच्छा अशी की या चिमणरावाचे लग्न तेवढं जमूदे. हळूहळू वेळ जवळ येत होती शेजारच्या लोकांची सामान आवराआवरीची तयारी सुरू झाली. मी ही माझी बॅग आवरली. काही सामान राहू नये म्हणून एकदा पुन्हा बघितले.

 शेवटी स्टेशन आलं, चला येतो. पुन्हा हे भेटणार नाही अशी मनातच इच्छा केली. हाताच्या हातवार्याने टाटा बाय झाले. खाली उतरलो दोन तीन पावले पुढे गेलोच होतो तोच मला आमचे इनस्पेक्शनचे सर दिसले. वाह ज्यांच्या सौजन्याने इथे यायचा मान मिळाला ते आज मला स्टेशन वर घ्यायलाही आले. बघून बरे वाटले.

    "सर, फार बरे वाटले तुम्ही मला घेण्यासाठी इथे आलात. "

   "छे, जोशी. मी तुम्हाला घ्यायला नाही आलो. आमचे पाहुणेही येणार होते याच ट्रेन ने....दिसत नाहीत.....काय हो, तुम्ही एकटेच आलात आमच्या पाहुण्यांना सोबत घेऊन यायचे ना?"

"काय सर, आता मला कसं कळेल तुमचे पाहुणे कोण ते."

  "काय हो तुम्ही जोशी? ज्यांच्यासोबत प्रवास केलात आणि तरी बोलता की माहीत नाही.

घ्या...आले...आमचे पाहुणे.....या..या"

 "नमस्कार करतोss"

"अहो कशाला राहूदे, राहूदे...तुम्ही आमचे होणारे जावई!"

अरेच्चा हा काय म्हणायचा योगायोग.....ज्या चिमणराव सोबत मी हा प्रवास केला तोच आमच्या सरांचा होणारा जावई निघावा.

"काय जोशी, ओळखलत का आता?"

"हो, म्हणजे काय सर...चांगली पसंद आहे तुमची."

"आहे ना अगदी राजबिंडा. अहो म्हणून तर तुमच्या सोबत यांचेही टिकीट काढले होते. तेवढीच तुम्हालाही सोबत. चला आता, हे काही दिवस इथेच राहणार आहे. तुमची राहण्याचीही सोय केली आहे बरं का."

"अरे सर कशाला तुम्ही त्रास घेतला मी शोधली असती एखादी जागा."

"अहो कष्ट कसले त्यात. तुमची सोय आमच्या जावई सोबतच केली आहे."

"कायss? म्हणजे हा प्रवास अजून संपला नाही. अरे देवा!"

                          

                             -समाप्त-


  

 

   

  

       



Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy