STORYMIRROR

Shrutika Bhosale

Action Fantasy Thriller

3  

Shrutika Bhosale

Action Fantasy Thriller

बारा रात्रींची, सूर्याणी नगरी

बारा रात्रींची, सूर्याणी नगरी

31 mins
218

प्रस्तावना


जादुच्या गोष्टी, पंचतंत्र, रहस्यमय कथा, शूरवीरांच्या गोष्टी, भयकथा, काल्पनिक कथा, या सगळ्या गोष्टी आपण लहानपणापासून वाचत व ऐकत आलेलो आहोत. गोष्टी ऐकण म्हणजे लहान मुलांच्या अगदी जवळचा विषय. त्यातल्या त्यात काही रहस्यमय कथा व सोबत काल्पनिक जोड असेल तर रस अजून वाढतो. या कथांपासून मिळणारे चांगले बोध, वाईट अनुभव, शिकवण ही मुलांना त्यांच्या भविष्यात खूप उपयोगी पडते. अशीच एक साहसी, शूर भावांची काल्पनिक कथा म्हणजेच 'बारा रात्रींची सूर्याणी नगरी'. एक सूर्याणी नावाची अत्यंत सुंदर अशी नगरी होती. सुख समृद्धीने भरलेली, कोणीही पाहून मंत्रमुग्ध होईल अशी. परंतु काळाच्या ओघात तिच्यावर आलेल्या संकटामुळे तिचे अस्तित्व नष्ट झाले. पण पुढे ही नगरी पुन्हा एकदा कशी उदयास येते, हे या कथेमध्ये पहायला मिळेल. ही कथा पूर्णतः काल्पनिक आहे याचा कोणत्याही व्यक्ती, स्थळ,अथवा गोष्टीशी काहीही संबंध नाही. तसे आढळून आल्यास हा निव्वळ योगायोग समजावा.


- 'गुरूवर्य प्रणाम करतो', मुले म्हणाली. 'या सगळे बसा खाली'. 'गुरूवर्य आज आपण काय शिकवणार आहात? आज सराव की मग पठण घेणार आहे? 'मुलांनो आज मी सराव नाही तर मी आज एक गोष्ट सांगणार आहे तुम्हाला. तुम्ही खूप मन लावून ऐका ती, त्यातून मिळणारे चांगले बोध लक्षात ठेवा. मला तुम्ही मुलांनी आयुष्यात खुप पुढे जावे, जीवनात सफल कामगिरी करावी हीच अपेक्षा आहे. चला आपल्या वटवृक्षाच्या खाली बसून सुरूवात करू. गुरूवर्य व मुले वटवृक्षाच्या खाली गेले. सर्वजण आपापले स्थान घेऊन बसले. मुले खूप कुतुहलाने गुरूवर्यांकडे पाहत होती. गुरूवर्यांनी गोष्टीला सुरूवात केली

              फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. गोष्टीचे नाव 'बारा रात्रींची सूर्याणी नगरी'. खूप वर्षांपूर्वी 'केंसू' नावाचे गाव होते. गाव तसे फारच छोटे होते, चहुबाजुला वनांत घेरलेले, पशु- पक्षांनी बहरलेले, प्रगत नसले तरी सुख समृद्धीने भरलेले होते. या गावाला मिळालेली सर्वात मोठी देणगी आणी ज्या मुळे या गावाचे नाव पडले ती म्हणजे 'केंसूया' नदी. केंसूया ही खूप मोठी नदी होती, सुंदर आणि समृद्ध अशी. 'वासू' पर्वताच्या पायथ्याशी हे गाव वसले होते. या गावाचे मुखिया 'शूलसेन' होते व त्यांची पत्नी 'मायावती'. मायावती ला तीन मुले होती. मोठा मुलगा 'शाकुंत्य' त्यानंतर 'नीलकर्ण' आणि सर्वात लहान 'शरू'.

अत्यंत तेजस्वी, पराक्रमी, शूर, हुशार असे ही तीन ही भाऊ होते. वासू पर्वताची पूजा, आराधना करून त्यांच्याच कृपेने त्यांच्याचसारखा बलवान, शक्तिशाली असा पहिला मुलगा 'शाकुंत्य' झाला. तो लहानपणापासून आपल्या शक्तीचे प्रदर्शन दाखवून सगळ्यांची बोटे तोंडात घालणारा, उंच कदकाठीचा, थोड्या सावळ्या वर्णाचा, दहा हत्तींचे बळ असलेला युवक होता. उंच धबधब्यातून पाणी ओसंडून ते एका छोट्या तळ्यात जाऊन शांत व्हावे तसे त्याचे काळेभोर पाणीदार असे डोळे होते. भरगच्च खांदा आणी त्याचे दोन बाहू म्हणजे विशाल हत्तीच्या पायासारखेच वाटत, त्याची ती भारदस्त छाती तर हजारो गदांच्या माराणेही जराही न डगमगणारी भक्कम अशी होती. त्याचे ते पिळदार पाय तर तो आल्याची आधीच धरतीला आपल्या कंपणाने सूचना देत असे. 

केंसूया नदीची पूजा करून तिच्या आशीर्वादाने दुसरा 'नीलकर्ण' झाला होता. गोर्या वर्णाचा, अत्यंत सुंदर, तेजस्वी असा तो होता. पाण्यावर सूर्याची किरणे पडून ते जसे चमकावे तशी त्याची कांती होती. त्याचे डोळे तर जणू विशाल केंसूयेने स्वतः ला एकवटून घेऊन आपले दोन थेंबात रूपांतर करावे तसे ते निळेशार होते. एखाद्या स्त्रीलाही इर्शा होईल असे सुंदर काळे सरळ केस त्याच्या खांद्यापर्यंत होते, सुंदर साच्यातून काढलेल्या उत्तम मुर्तीप्रमाने त्याचे शरीर होते. तो लहानपणापासून तल्लख, हुशार होता, गुरूंकडून अनेक विद्या तो शिकला होता. अनेक खेळीचे डावपेच त्याला येत होते, स्वभावाने तसा शांत, कमी बोलणारा पण मधुर स्वराचा होता. 

 आणि या दोघांपेक्षा अगदी वेगळा असा 'शरू' होता. दारी आलेल्या एका महान गुरूंची सेवा करून त्यांनी आनंदी होऊन दिलेल्या आशीर्वादाने की 'तुझ्या पोटी माझ्या पेक्षा सर्वश्रेष्ठ धनूरधारी जन्म घेईल'. आणि अगदी तसेच झाले होते शरू लहानपणापासून तसा चंचल होता, अगदी वार्यासारखा इकडे तिकडे धावत असे. पण वयाच्या केवळ तीन वर्षापासून तो धनूरविद्येचे धडे घेऊ लागला. डोळे बंद करूनही तो अगदी अचूक निशाणा साधत असे. गोल चेहर्याचा, तांबूस कुरळ्या केसांचा, देखण्या रूपाचा तो होता. सर्वात लहान असल्यामुळे सर्वांचा लाडका होता. प्रत्येक गोष्टीत अनेक प्रश्न विचारून तर, तो लोकांना वेड करत असे. हे तीनही भाऊ खूप प्रेमाने, आनंदाने एकमेकांसोबत राहत होते. आई वडिलांनाची आज्ञा पाळणारे, खूप चांगल्या संस्कारात वाढलेली ही मुले होती. तसे हे तिघेही लहानपणापासून गावामधल्या आश्रमात शिक्षण घेत होते.

          'आई आम्ही निघतोय...' शाकुंत्य म्हणाला. 'अरे मुलांनो थांबा, ही शिदोरी घेऊन जा'. मुलांनी शिदोरी घेऊन आई वडिलांचे आशिर्वाद घेतले. गाव तसं लहान होत म्हणून जास्त सुख सोई गावात न्हवत्या, निसर्गाच्याच कृपेने काय ते सुरळीत चालू होते. इतर प्रदेशांशी संपर्क व्हावा, दळणवळणाची साधणं उपलब्ध व्हावी म्हणून गावातल्या लोकांनी, गुरूंनी ही जबाबदारी गावाचा मुखिया म्हणून शूलसेन वर सोपवली. आपली मुले आता मोठी झाली आहे आणी जाणतीही म्हणून शूलसेन ने आपल्या मुलांना या कामगिरी साठी पाठवायचे ठरवले. 'हे बघा ही कामगिरी खूप मोठी आहे आणि गावाचा विकास हेच तुमचं ध्येय असलं पाहिजे'. 'पण आत्ताच यांना पाठवणं योग्य ठरेल का? आधीच हे भयानक पावसाचे दिवस, त्यात मुलेही कुठे एवढी मोठी झाली आहेत? शूलसेन मायावती ला धीर देत म्हणाला, 'हे बघ तुझ म्हणन पटतय मला पण संपूर्ण गावाची जबाबदारी आहे माझ्यावर. म्हणून मुलांनी प्रत्येक संकटावर मात करावी हेच मला वाटतं आणि ते करतील याची खात्री मला आहे. घरातला मोठा मुलगा या जबाबदारी ने शाकुंत्य म्हणाला, 'आई-बाबा तुम्ही नका काळजी करू, आम्ही नक्कीच ही कामगिरी सफल करू'.

आणि असे बोलून तिघेही आई वडिलांना नमन करून घराच्या बाहेर पडले. मागे वळून पाहताना दारात उभ्या असलेल्या आईच्या डोळ्यातून पडणारे मोत्याचे अश्रू बघून शरू चे मन भरून आले. आज पहिल्यांदा एवढा लांब जाण्याचा हा दुरावा त्याच्याही डोळ्यात दिसत होता. समोर उभ्या असलेल्या गावाच्या लोकांचे, गुरूवर्यांचे आशिर्वाद घेतले. प्रत्येकाच्या डोळ्यात असलेला तो विश्वास, तो आनंद तिघेही आपल्या डोळ्यात साठवून पुढे निघाले.

           पण आज नियतीच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच होते. जणू तिघांच्या धैर्याची परीक्षा घ्यायचे तिने ठरविले होते. सोसाट्याचा वारा सुटला होता, गर्द काळ्या ढगांनी सारे आकाश झाकून गेले होते. जोरदार येणार्या पावसाची जणू ही चाहूल च होती. आणि थोडेच अंतर पार केल्यावर जोरदार पाऊस सुरू झाला, अगदी इतका की समोरचेही दिसेनासे झाले. वादळी वार्यासह तो भयावह पाऊस पडत होता. शाकुंत्य ने एका दगडाच्या गुहेचा आडोसा घेऊन थांबण्यास सांगितले. 'इतक्या वर्षात हा इतका भयानक पाऊस पहिल्यांदा च पडला असेल नाही दादा'...शरू शाकुंत्य ला म्हणाला. 'हो, या पावसाचे काही वेगळेच संकेत दिसत आहेत, 'नीलकर्णा तुम्हाला भूक लागली असेल तर दोन घास खाऊन घ्या. हा पाऊस इतक्यात थांबेल असे दिसत नाही'. नीलकर्ण ने होकारार्थी मान हलवून शिदोरीतील भाजी भाकरी काढली. 'अरे वाह खूपच जोरदार भूक लागली होती मला, असे म्हणत शरू पटापट तुकडे मोडून खाऊ लागला. शरूकडे बघून हलकेसे हसून शाकुंत्य गुहेबाहेर पडणारया पावसाकडे बघत काहीतरी विचार करत बसला. इतक्या वेळ गप्प बसलेल्या नीलकर्ण ने शाकुंत्य ला विचारले, 'दादा आज रात्री इथेच थांबुया का? शाकुंत्य ने होकारार्थी मान हलवली. मग जवळ असलेल्या लाकडाच्या मुळीतून लाकडे काढून त्याची शेकोटी पेटवली आणि तिघांनी झोपण्याची व्यवस्था केली.

मातीच्या घरात असलेल्या उबेची सर गुहेत झोपताना शरूला मात्र भासत होती. इतक्या दूर आईच्या कुशीची कमी आपल्या भावाला भासू नये म्हणून नीलकर्ण ने आपल्या मांडीवर शरूचे डोके ठेवून त्याला झोपण्यास सांगितले. शरूला आता आईची मांडी कमी पडत असली तरी त्याचे बालहट्ट काही कमी झाले नव्हते. अजूनही कोणत्यातरी विचारात असणार्या शाकुंत्य ला नीलकर्ण म्हणाला, 'दादा कोणता एवढा विचार करत आहेस?

'कधीतरी माणसाला कोणत्यातरी वाईट गोष्टींचे संकेत येतात. काहीतरी चुकीचे घडणार आहे असे वाटते, अशी माझ्या मनात एक वेगळीच चलबिचल सुरू आहे. आज अचानक एका खडकापेक्षाही मजबूत असलेले माझे मन पाकोळी सारखे फडफडत आहे. का? कुणास ठाऊक पण घरातून बाहेर पडल्यापासून एक वेगळीच पाल मनात चुकचुकत आहे'. नेहमी आपल्या भारदस्त आवाजात सल्ले देणारा, हिंमतीचे धडे शिकवणारा दादा, आज कोणीतरी गळा पकडावा आणि त्या धडपडणार्या कंठातून निघणार्या स्वरासारखा झाला होता. पण तो एकटा नाहीए हे सांगण्यासाठी मी त्याला धीर देत म्हणालो, 'काळजी करू नकोस दादा अस काहीच होणार नाही. ज्या कामगिरी साठी आपण निघालो आहोत ती नक्कीच आपण पूर्ण करू.

आई-बाबांचे आशिर्वाद आपल्या सोबत आहेत'. आपल्या डोळ्यात दिसणार्या काळजीपोटी आपल्या लहान भावाच्या तोंडून निघालेले हे धीराचे शब्द ऐकून शाकुंत्य हलकेच हसला. काहीही झालं तरी मी माझ्या भावांसोबत आहे याची खात्री त्याला होती. आई-वडिलांनंतर वाटणारा मोठा आधार म्हणजे मीच. कधीकधी त्यांच्यापेक्षा माझ्यावर जास्त विश्वास दाखवणारे असे माझे भाऊ. माझे प्राणही पणाला लावेन परंतु यांना काहीही होऊ देणार नाही असा जणू एक निश्चयच आपल्या मनात करीत तो झोपी गेला.

               वरूणदेव जणू आपल्या शक्तीचे प्रदर्शन दाखवावे तसे विविध कलांमध्येच ते पावसाचे नाच दाखवित होते. आणि त्यांना साथ देत होती विजांची राणी. आकाशात जणू एक प्रकारे तांडवच सुरू होता. आज नवीन दिवस उजाडला तरी सुर्यालाही त्याची किरणे काही या तांडवात दाखवता आली नाही. अखेर सार्या पृथ्वी ला जलमय करून या आकाशावर माझेच वर्चस्व आहे असे सिद्ध करून बहुतेक त्यांना शांती मिळाली असावी म्हणून की काय ते थोडे शांत झाले. ते शांत झालेले बघून मग सूर्य हळूहळू वर येऊन आपली किरणे पसरवू लागला. रात्रभर पडणारया पावसाच्या, वादळी वार्याच्या आवाजानंतर आता कुठे गोड मधुर पक्ष्यांचे आवाज कानी पडू लागले. वातावरण तसे थंडगार झाले होते, त्या बोचणार्या वार्याचा हलका काटा झोपलेल्या शरू च्या अंगावर आला.

हलकी शिरशिरी येवून आलेल्या काट्यावर हात फिरवत तो डोळे उघडून उठला. रात्रभर अवघडून झोपल्याने जखडलेल्या अंगाचे एक दोन आळोखे पिळोखे देत तो बाहेर बघू लागला. गुहेच्या छतावर पडलेल्या छिद्रातून हलक्या धुलीकणां सोबत आलेलं एक किरण नीलकर्णा च्या पायाला जणू हळूवार गरम फुंकर मारून त्याला जागं करत होतं. त्याच्या हळूहळू उघडणार्या डोळ्यात पडलेल्या प्रकाशात ते जणू दोन निलम चमकावे तसेच दिसत होते. तो उठून मांडी घालून बसला, आपले दोन्ही हात जोडून डोळे बंद करून आपल्या आराध्याचे, गुरूंचे स्मरण करू लागला. गुहेबाहेरच उभ्या असलेल्या शरूच्या किंचाळीने मात्र तो डोळे उघडून उभा राहिला.

'दादा, लवकर बाहेर ये'. त्याच्या या घाबरलेल्या, रडवेल्या आवाजाने मात्र काही क्षणांसाठी एक भितीचा गोळा नीलकर्ण च्या पोटात आला. आणि तो धावतच बाहेर गेला, समोरच दृश्य बघून त्याच शरीर काही काळ पुतळाच बनून राहिल. मी कुठे दुसर्या जगात तर नाही?, कालपर्यंत माझ्या समोर ऐटदार, दिमाखात उभी असलेली ही वृक्ष आज अगदी भुईसपाट झाली होती. कोणी अवाढव्य राक्षसाने येऊन एक हलकी फुंकर मारून ती कोलमडून पडावी तशी दिसत होती. समोर सैरभैर पळणारे पशु पक्षी जणू कालपर्यंत एका आसर्यात राहणारे आणि आज अगदी पोरके झालेले बघून आक्रोश करीत होती. वास्तवात सुंदर दिसणारी सृष्टी जेव्हा रौद्र रूप धारण करते तेव्हा ते फक्त बघण्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही, ना ते थांबवण्याची ताकद आपल्या मध्ये असते.

आज आपलं दैव बलवान म्हणून या वासूच्या टोकावर कधीतरी आपण तिघे इथे येवू आणि आपल्याला आसर्याची गरज लागेल म्हणून की काय ही गुहा इथे एका सुरक्षित स्थानीच तयार झाली असावी, नाहीतर अशा निर्दयी पावसात आपला टिकाव लागणं अगदी मुश्किलच. असा एक विचार नीलकर्णा च्या मनात आला. समोरचे दृष्य पाहून अजूनही न सावरलेली ही दोघे, स्वतःला थोडी सावरत आपल्या नजरा गुहेत, गुहेच्या बाहेर, इकडे तिकडे चहुबाजुला फिरवू लागली कारण आपला मोठा भाऊ कुठेच दिसत नाहीए याची त्यांना जाणीव झाली. डोळे इकडे तिकडे फिरवत असताना वर वासूच्या अगदी टोकावर एक औंदुंबराच्या झाडाखाली समाधी अवस्थेत बसलेला शाकुंत्य त्यांना दिसला. त्याला बघून जीव भांड्यात पडल्या सारखे श्वासाचा एक मोठा सुस्कारा बाहेर सोडत दोघेही झपाझप पावले टाकत त्याच्या दिशेने जाऊ लागली. 'दादा अरे काय हे, तुला सांगून येता आलं नाही का? आम्ही किती वेड्यासारखं शोधत होतो तुला. आणि हे दृष्य बघितलस का तू? काय अवस्था झाली आहे इथली.

लहान असुनही भावाच्या काळजीने ओरडून विचारणारा शरू मध्येच थांबला, एक नजर नीलकर्ण कडे टाकून पुन्हा शाकुंत्य कडे बघू लागला. इतक्यावेळ आपण विचारत असलेले प्रश्न दादाच्या फक्त कानांपर्यंत जाऊन पुन्हा माघारी फिरले होते. स्वतःच्या वेगळ्याच विश्वात गेलेल्या शाकुंत्य ला आपले भाऊ आल्याचे भानही नव्हते. आपल्याकडे लक्ष नाहीए हे कळताच नीलकर्ण ने पुढे जाऊन त्याच्या खांद्यावर हात ठेवला, 'दादा काय झालं'? मनात अनेक विचारांच जाळ विणत तो त्याला विचारू लागला.

कुठेतरी विशाल सागरात बुडताना कोणीतरी हलकेच हात देऊन वर काढावे, तसा तो दचकून भानावर येऊन आपली नजर नीलकर्ण कडे फिरवत एकटक बघू लागला. 'कर्णा तू'? त्याने विचारलेल्या त्या दबक्या आवाजाने वातावरण अधिकच गंभीर झाले. एका धिप्पाड, महाबली युवकाला तो रडवेला चेहरा अजिबात शोभून दिसत नव्हता. आपल्या दादाची झालेली ही अवस्था दोन्ही भावांना बघवत नव्हती. नक्कीच कोणत्यातरी अपशकुनाचा हा संकेत तर नसावा असेच वाटत होते. अजून कोणताही स्वर तोंडातून बाहेर पडावा एवढा प्राणही त्याच्यात नव्हता. त्याने फक्त मानेने इशारा करून टेकडावरून खाली बघितले, त्याच्या नजरेला नजर मिळवीत दोन्ही भाऊ खाली बघू लागले. 'वासू' तसा उंच पर्वत होता, खालून बघताना त्याचे टोक आकाश फाडून वर गेल्या सारखे वाटे. आणि वरून पाहताना त्याने जणू केंसू गावाला आपल्या कुशीतच घेतले आहे असाच भास होई. रात्रीच्या त्या भयावह पावसानंतर मंद मंद पसरलेली ती धुक्याची झालर दुर होत होती, परंतु आपले डोळे बारीक मोठे करीत एक मोठा खडक अंगावर येऊन कोसळावा, पायातून अचानक प्राण जावा तसे दोघेही धाडकन खाली कोसळले. त्यांच्या त्या कोसळल्याने मात्र टोकावरचा एक दगडाचा भाग तुटून सुss सु‌sssप... आवाज कापीत खाली पडला, तसा पाण्यात एखादी जड वस्तू पडावी अगदी तसाच आवाज त्या निरव शांततेत वर पर्यंतही ऐकू गेला. केंसूयेने रात्रीच्या त्या पावसात गावातल्या सर्व गावकर्यांना, प्राणीमात्रांना इतके वर्ष आपल्यावर केलेले प्रेम, पूजाअर्चा, श्रद्धा याच्या प्रेमापोटीच उदार होऊन की काय, तिने सर्वांना आपल्या कुशीत घेऊन कधीच स्वर्गाची वाट दाखवली होती.

आज कुण्या अनोळख्या ने जर, 'केंसू गाव कुठे आहे?' विचारले असते तर स्थान सोडाच पण बोटाने दिशा दाखवणे ही आता शक्य नव्हते. 'कधी कधी नियती एवढे मोठे आघात देऊन जाते की, काही क्षणांपूर्वी बघितलेली ती आक्रोशांची किंकाळी कधी माझ्या वाटेला येईल असा विचार करायला ही वेळ देत नाही'. असा एक विचार नीलकर्णा च्या मनात पटकन येऊन गेला. 'पोरकेपणाचे अश्रृ गाळणार्या शरूला आपण कोणत्या नशेत तर नाही? की मद्य धुंद होऊन आपण काहीही बघत आहोत, की जागेपणी पाहिलेले हे कोणते वाईट स्वप्न तर नाही असेच वाटत होते'. 'नाही, नाही मला असे खचून जाता येणार नाही. आज मोठा भाऊ अजून जिवंत असताना माझे भाऊ पोरके कसे? असे मनात म्हणत शाकुंत्य जागेवरून उठला. आपल्या भावांच्या खांद्यावरून हात फिरवत त्यांनी त्यांना जवळ घेतले. त्याच्या त्या दोन्ही भक्कम बाहूंत काही क्षणांसाठी का होईना आपण पोरके नाही असे विचार त्यांच्या मनात येऊन गेले.

"आज नियतीच्या मनात जर आपल्या पासून सगळं हेरावून घेण्याचा विचार होता तर त्याला कोणी थांबवल असत काय? हे माता पित्याच असलेल आश्रय जर आज आपल्या पासून तुटणार होत तर त्याला जोडणार कोणी होत काय? ज्या नदीच्या पाण्यात आपण लहानपणापासून निर्धास्त होऊन खेळत आलो ती एक दिवस आपलं सर्वस्व नेईल अस कधी वाटलं होत काय? नाही, कधीच नाही...कारण हे घडणार होत आणी ते घडलं. आज जी इथे आपल्या पात्राची मर्यादा ओलांडून, आपल्या आकाराची दुप्पटीने वाढ करून जोरात वेगाने धावत आहे त्या नदीवर मी कसला राग धरू, उलट मी तिचे आभार मानेन की आज तिने केंसूयेच्या तीन पुत्रांना जिवणदान दिले होते". असे म्हणत शाकुंत्य पुढे होऊन दोन्ही हात जोडून नदी कडे तोंड करून उभा राहिला. अचानक मिळालेल्या धक्क्यातून सावरत, 'दादा म्हणत आहे ते बरोबर आहे, पण ज्यासाठी घरातून निघालो होतो ते कारणच आता राहीलं नाही. आता पुढे काय करायचं? आता पुढच भविष्य काय? आपण कुठे जाणार, काय करणार?

अश्या अनेक प्रश्नांनी नीलकर्ण च मन भरून गेल. 'दादा म्हणत आहे ते बरोबर ही असेल पण हे सत्य मी कस स्विकारू? रोज माझ्या प्रिय आईला रानातून आणणारी गोड फळे आता कोणाला आणून देवू? तिच्या त्या खरबडीत पण मायेने डोक्यावरून फिरवत भरवलेला घास आता कोणाच्या हाताने खाऊ? चुकल्यावर डोळे मोठे करून ओरडणारे बाबा, माझ्या अंगणात नुकतच जन्माला आलेले ते माझं प्रिय पांढरशुभ्र वासरू, माझ्या मित्रांसोबत लागणारी माझी धनूरविद्येची शर्यत, माझा प्रिय सखा म्हणून रोज चाफ्यांच्या फुलांनी गुंफलेली, परडीतून आणून देणारी ती 'शाल्मली' ची माळ, रोज गुरूंच्या आशीर्वादाने सुरू होणारा सराव, माझ्या हट्टासाठी लहानपणी बाबांनी बांधलेल ते झाडावरच छोट घर, आणि अस अजून बरच काही...कसं विसरून जाऊ मी हे सर्व एका क्षणात? शरू या सार्या आठवणींने पार व्याकूळ झाला होता.

               'मला माहीत नाही आता इथून पुढचा प्रवास कसा असेल, पण नक्कीच आपण अस काही करून दाखवू की त्याचा आपल्या माता-पित्यांना गर्व वाटेल. आज त्यांचे शुभ आशिर्वाद आपल्या सोबत आहेत. गुरूवर्यांनी सांगितल्या प्रमाणे आपला प्रवास हा पूर्व दिशेनेच सुरू ठेवू. नक्कीच आपल्या भविष्यात काहीतरी चांगले असेल हीच आशा आहे. ज्या केंसूयेने आपल्या पासून आपले सर्वस्व वाहून नेले तिथे मला थांबण्याची आता जराही इच्छा नाही'. असे म्हणत शाकुंत्य सरळ तिथून निघून गुहेच्या दिशेने चालू लागला. शरू अजूनही व्याकूळ होऊन डोळ्यातून घरंगळणारे पाणी उलट्या हाताने पुसत होता. नीलकर्ण आपल्या पाठमोर्या जाणार्या दादाकडे बघत होता.

आपल्यालाही दुसरा कोणता उपाय सुचत नाही म्हणून त्याने थोडी मान खाली घातली आणि एक मोठा श्वास घेत तो शरू जवळ गेला, त्याचवेळी त्याच्या गालावरून खाली पडणारा एक अश्रृ चा थेंब आपल्या एका बोटाने पुसत, दोन-तीन वेळा त्याच्या पाठीवरून मायेने हात फिरवला. त्याला आपल्या तोंडानेच पुढे चालण्याचा इशारा केला. आपल्या मागे आपले दोन भाऊ येत आहेत की नाही बघण्यासाठी शाकुंत्य मध्येच थांबला, थोडी मान तिरकी करत मागून येणार्या दोन सावल्या बघून तो परत पुढे चालू लागला. तिघेही गुहेत येऊन पडलेलं ते सामान उचलू लागले. शांत....अगदी शांत वातावरण होते. दुरून आतून गुहेत कोठेतरी झिरपणार्या पाण्याच्या थेंबांशिवाय दुसरा कोणताही आवाज येत नव्हता. धिप्पाड शाकुंत्य च्या दोन तीन मोठ्या श्वासांनी ती शांतता भंग झाली. 'घेतलं का सर्व सामान'? त्याच्या त्या भारदस्त आवाजाने दोन तीन वेळा तो आवाज थोड्यावेळ तसाच घुमला. 'हो' शिवाय अजून दुसरे काहीच ऐकू आले नाही.

शाकुंत्य ने गुहेच्या बाहेर पाय टाकला, त्याच्या खांद्यावर त्याची प्राणप्रिय 'गदा' होती. 'गदा' हा शब्दही काही वर्षांपूर्वी इथल्या लोकांना माहीत नव्हता. पण शाकुंत्य खूप लहान असताना एक गदाधारी वीर या गावात आला होता. पुढची काही वर्षे तो गावातच राहीला. त्याने त्या छोट्या मुलात बघितलेली अद्भुत शक्ती ज्यामुळे त्याने आपला शिष्य म्हणून शाकुंत्य ला निवडले. लहानपणापासून त्याला याचे शिक्षण दिले, सोबत आणखी मुले ही आली. आज त्यांच्याच मुळे गावात एक प्रशाला बांधली होती. मात्र दोन भावांकडे धनुष्यासोबत धारेधार शस्त्र होते. शाकुंत्य ने बाहेर येत पूर्व दिशेचा अंदाज घेतला व पुढे चालू लागला. आता वासू पर्वत ओलांडून पलिकडचा प्रवास सुरू झाला. ते सारे घनदाट अरण्य होते. पावसाने मात्र सारे जग जिंकून विश्रांती घ्यायचे ठरवले असावे म्हणून तो जरा शांतच होता. समोर असलेली मोठमोठाली वृक्ष वाटेचा अडथळा म्हणून उभी होती. आपल्या हातात असलेल्या थोड्या मोठ्या धारेधार चाकूने शरू वाटेत येणारी छोटी छोटी काटेरी रोपटी तोडून वाट मोकळी करत होता.

त्या घनदाट अरण्यात किरर्र किड्यांचे, जंगली पशु पक्ष्यांचे, सरपटणार्या प्राण्यांसोबत सकाळ असुनही कुठेतरी ताडमाड वृक्षावरती बसलेल्या कोण्या एका घुबडाचाही आवाज मध्येच कानी पडत होता. त्या संपूर्ण डोक्यावर भरलेल्या फांद्यांच्या छतातून डोळ्यांनी वाट काढत मावळतीला जाणार्या सूर्य बिंबाकडे बघत नीलकर्ण म्हणाला, 'दादा सूर्यास्त होईल काही वेळांतच आपल्या रात्रीच्या निवार्याची व्यवस्था करावी लागेल. 'हो रे दादा खूप चाललो आता थोडे थांबुयात' म्हणत शरू तिथेच दगडावर हात टेकत बसला. 'ठीक आहे मी शेकोटी साठी थोडी वाळकी लाकडे आहेत का बघतो, तुम्ही झोपण्यास जागा मोकळी करा'. असे म्हणून शाकुंत्य डावीकडून आत अरण्यात जाऊ लागला पण दोन पावले पुढे जाऊन मध्येच थांबला, 'आणि हो काही संकट आल तर लगेच मला हाक मारा'.

आपल बोलणं कळलं की नाही बघण्यासाठी त्याने मानेनेच नीलकर्ण ला इशारा केला, त्याचा तसाच होकार आल्यावर तो पुढे निघून गेला. तोपर्यंत पायाखालची छोटी मोठी गवत, काटेरी झुडुपे, पालापाचोळा काढून तिघांना पुरेल एवढी जागा शरूने स्वच्छ केली. कुठली फळे विषारी आहेत तर कुठली खाऊ शकतो, कुठली कच्ची आहेत तर कुठली पिकलेली याची गावातच राहिल्यामुळे योग्य पारख असलेल्या नीलकर्ण ने अरण्यात थोडे आत जाऊन ती घेऊन आला. तेवढ्यात शाकुंत्य लाकडे घेऊन आला, खांदा जड झाला होता म्हणून त्याने ती गोष्ट धाडकन जमिनीवर टाकली. त्या बलाढ्य युवकाच्या केवळ एकाच गदेच्या वाराने उजवीकडून एक सुळाचा दात तुटलेलं, जबड्यातून रक्त ओघळणार ते एक रानडुक्कर होत.

'आज रात्रीच्या जेवणाला होईल' असे म्हणत शाकुंत्य ने त्याचे पाय धरून थोडे फरफटत दुर ओढले, खाली पडलेल्या चाकूचे सपासप वार त्याच्या पोटात केले. पहिल्या वारातच उडालेल्या रक्ताच्या चिंकाळी चे काही थेंब त्याच्या कपाळावर पडले. त्याच्या मांसाचे तुकडे करून त्याने ते पेटलेल्या शेकोटी जवळ ठेवले. सूर्य आता पुरता डुंबून गेला होता, रात्रीचं ते सुंदर चांदणं पडू लागल. तिघांनी ही खाऊन घेतल व शेकोटी पेटून देत या घनदाट अरण्यात असुरक्षीत नको म्हणून आळीपाळीने झोपायचा विचार करू लागले. रात्रीच्या वेळी काळोखाने ते जंगल अधिकच भयानक भासत होते. किरर्र किड्यांचे आवाज, मध्येच कोल्ह्यांची कोल्हेकुई, सरपटणारे प्राणी पानांवरून जाताना मध्येच त्या आवाजाने डोळे उघडत. रात्रीच्या त्या थंडी मध्ये गुडघे पोटाला कवटाळले तर त्या बोचणार्या वार्याचे अनेक काटे अंगावर येत होते. कसे तरी करत रात्र काढायची आहे म्हणून तिघेही हे सहन करत झोपले.

सुर्याची चाहूल लागताच पक्षी मधूर आवाजात किलबिलाट करू लागले. आणी तो राज्यासारखा डोके वर काढीत आपल्या करोडो किरणांचा प्रकाश फेकीत वर येऊ लागला. हलक्या पडणारया प्रकाशात, विझलेल्या शेकोटी तून निघणार्या पुसटश्या धुरात तिघांना जाग आली. नित्यनेमाप्रमाणे नीलकर्ण ने उठताच हात जोडून आपल्या आराध्याचे, गुरूंचे स्मरण केले. बाकी सामानाची आवराआवरी करून, कालच्या झुडपांवरच्या माराने बोधट झालेल्या शस्त्रांना पुन्हा धार करून, थोडा फलाआहार घेऊन आपल्या पुढच्या प्रवासाला निघाले. आता वासू सोडल्यावर पुढचा प्रदेश अनोळखी होता. 'उंच उंच गगनचुंबी वृक्ष होते, विविध प्रकारांच्या वेलींच्या नक्षा जागोजागी पसरल्या होत्या, मध्येच कुठेतरी सपाट जमिनीवर गुडघ्यापर्यंत उंच फुलांचे रान होते, वाटेत गवत चरणारी हरणांची कळपं मान वर करीत डोळ्यांची उघडझाप करून बहुतेक हे तीन नवे प्राणी कोण म्हणून त्यांच्याकडेच बघत होती. आजवर या दिशेने आत्तापर्यंत कोणताच मनुष्य गेला नव्हता, म्हणून की काय झाडावरची माकडे, रानटी रेडे, हत्तींचे कळप, तरस, जंगली घोडे, वाघ, चित्ते, अगदी छोटाले ससे, संथ गतीतले कासव, झाडावरचे सर्व पक्षी, सारे...सारे दृष्टीचे कटाक्ष टाकून तिघांना ही निरखून पाहत होते.

खायला झाडावरची फळे होती नाहीतर एखादा प्राणी मारून खायचा, रात्रीच्या निवार्याची व्यवस्था करायची आणी सकाळी परत पुढे प्रवास सुरू. भाग्य चांगले म्हणून तो रस्ता नदी लगतचाच होता म्हणून पाण्याची सोय झाली. असे करीत दहा दिवस कसे गेले कळलही नाही. आज सकाळी त्यांचा प्रवास एका आड वळणावर येऊन थांबला. 'दादा आता कसे जायचे रे?' समोर आडव्या गेलेल्या नदीकडे बघत शरूने शाकुंत्य ला विचारले. 'नदी तशी मोठी आहे, पोहून जाणे अवघड जाईल. दुसर्या मार्गाने.....मग पुन्हा मागे फिरून जावे लागेल त्यात एक दिवस पुन्हा जाईलच'. नीलकर्ण नदीकडे आपली नजर फिरवीत म्हणाला. 'काय??आता परत मागे? नको त्यापेक्षा डावीकडून दुसर्या दिशेने गेलो तर नाही का चालणार? 'नाही.

पूर्व म्हणजे पूर्व दिशाच, कारण तीच आपल्याला योग्य मार्ग दाखवणार आहे. शाकुंत्य थोड्या मोठ्या आवाजात शरूला म्हणाला. 'झाडांची लाकडे तोडून एक ओंडक्यांचा तराफा बनवू, आणि ही नदी पार करू'. दादाला कोण नाही बोलणार म्हणून शरू थोडा नाखुषीनेच कामाला लागला. पटापट जमेल तेवढ्या ताकदीने तिघांनी कमी बुंध्याचे एक ताडमाड वृक्ष खाली पाडले, त्याचे एकसारखे भाग करीत चिवट वेलींच्या सहाय्याने ते एकमेकांना बांधले. दोन छोट्या बुंध्याची लाकडे वल्हे म्हणून घेतली.

तराफाला नदीच्या किनारी पाण्यात टाकून बघितले, ते त्या लाटांवर छान तरंगत होते. हे पाहून तिघेही त्या तराफावर चढले आणि वल्हयांच्या सहाय्याने गदी आडवी कापीत पुढे जाऊ लागले. नदी संथ वाहत होती. आणी जास्त खोल नसावी कारण वल्हयांच्या वरून कोपरापर्यंतचा भाग सोडला तर खालीच काय ते ओले होत होते. पण कधीच पाहीली नाही अशी ती नदी होती. अगदी स्वच्छ, नितळ, शिवाय वरच्या निळ्या आकाशाला दाद न देता पाण्याला कुठे रंग असतो... म्हणत, त्या पाण्याचे खरे रूप दाखवत त्यातले पोहणारे विविधरंगी मासे, त्या सर्व जलपर्णी, अगदी रेतीतले शिंपले सुद्धा ती स्पष्ट दाखवत होती. मोह न आवरता त्या निर्मळ पाण्याला हात लावावा म्हणून शरूने आपली बोटे तिच्या लाटांवर फिरवली तोच अनेक रंगीत माश्यांचा समुह आपल्या चंचू ओठांनी त्याच्या बोटांना स्पर्श करू लागला.

खळकन हसत त्याने आपला हात वर काढला. गुडघ्यावर बसून नीलकर्ण पाण्यात बघताना खोलवर निळे रत्नखडे त्याला दिसले, आश्चर्याने अजून खाली वाकत निरखून पाहताना आपल्याच डोळ्यांचे प्रतिबिंब पाहून त्याला क्षणभर हसू आले. त्या सुंदर निसर्गाचे रूप आपण डोळ्यांनी टिपण्याशिवाय दुसरे काय करू शकतो, म्हणून सर्वत्र आपली नजर फिरवीत शाकुंत्य ते दृष्य आपल्या डोळ्यात साठवून ठेवत होता. थोड्याच वेळात किनारा लागला, तिघेही खाली उतरून पुन्हा जमिनीवर पुढे चालू लागले.

                 नदीपासून पुढे दोन्ही बाजूंनी झाडांच्या फांद्यांनी वेढलेले एक भुयार लागले त्यातून पुढे जात, आपण कुठे आहोत? पुढे काय लिहिले आहे? याचा विचार करत गुरूवर्यांच्या आज्ञेचे पालण करत हा प्रवास पुढे चालला होता. त्यांना जणु आपण कुठल्या दुसर्या धरतीवर तर आलो नाही असे वाटू लागले. तिथे गगनचुंबी वृक्ष असूनही ते मेल्यासारखे उभे होते, वरचे आकाशही काळ्या ढगांनी वेढले होते, एक गंभीर उदासिनता सगळीकडे पसरली होती, एक वेगळीच घुसमट जाणवत होती, क्षणभर आपण इथून मागे फिरावे का? असे विचारही मनात आले. पण ते शक्य नव्हते आता जे काही पुढे असेल त्याला फक्त सामोरे जाणे एवढेच काय ते माहीत होते. 'दादा हा प्रदेशही निर्मनुष्यी असेल असेच वाटत आहे नाहीतर अशा या भकास वातावरणात कोण वस्ती करून राहील'.

शरू डोक्यावरच्या घोंगावणार्या माशांना दूर सारत बोलला. शाकुंत्य त्याच्या त्या वेडसर हालचालींकडे बघत पुन्हा काहीतरी विचार करू लागला. 'कुठे आलो आहे मी? ही निस्तेज पडलेली फुले काय सांगत आहेत? झाडांच्या त्या हिरव्यागार पालवी कुठे आहेत? ते किलबिलणारे पक्षी का असे शांत आहेत? इथे वार्याला का कुठली गती नाही? इथल्या अंधारलेल्या जगाचे रहस्य काय आहे? डोक्यावर कितीही विचारांची बोटे फिरवली तरी उत्तर काही मिळत नाही. इतक्यात नीलकर्ण शाकुंत्य च्या खांद्यावर हात ठेवत आपली नजर खाली फिरवत म्हणाला, 'थांब दादा इथे नक्कीच आपल्या शिवाय आणखी कोणीतरी आहे, नक्कीच कोणीतरी इथे राहत असावे'. आपली मान मागे फिरवीत कपाळावर दोन तीन आठ्या देऊन, 'का? नीलकर्ण, तुला या अश्या जागेत कोणी राहत असावे असे का वाटते? शाकुंत्य ची नजर खाली जमिनीवर आणीत तो म्हणाला,

'बघ या अरणायातील फक्त ही जागा राखून स्वच्छ केल्यासारखी दिसत आहे. आणि समोर ती फुलांची रोपटी कोणीतरी प्रेमाने फुलवल्या सारखी दिसत आहे. नक्कीच दादा कोणीतरी इथे राहत असावे किंवा अजूनही राहत आहे'. आपला भाऊ पटण्यासारखे बोलत आहे म्हणून शाकुंत्य आणखी त्या जागेची पहाणी करू लागला. 'चला त्या फुलांपाशी जाऊन पाहुयात' असे म्हणत तो त्या दिशेने चालू लागला. जसजसे जवळ जात होते तसा एक प्रसन्न सुवास मंद मंद पसरला होता, कानावर खळखळणार्या पाण्याचा आवाज येत होता, त्याच भागात उगवलेली हिरवी कुरणे पाहून तिघे भाऊ आश्चर्याने एकमेकांकडे बघत होते. समोर आलेल्या कोवळ्या फांद्यांना हाताने दूर करत समोरच दृश्य बघून सगळे स्तब्ध झाले. निसर्गाची किमया ही किती वेगळी असते, ती कधी तिचे रंग बदलेल कोणाला कळणारही नाही.

अनेक फुटांवरुन वाहणारा पांढराशुभ्र झरा, त्यात एक पाय वर करून डोक खाली करून उभे राहीलेले काही बगळे, आपल डोक वार्यासोबत झुलवणार्या त्या अनेक गोंडस कळ्या, त्या छोट्या फुलांभोवती घिरट्या घालणारी फुलपाखरे, नाजूक आपले अंग हलवीत एकमेकांना विळखा घातलेल्या वेली, टुणटुण उड्या मारत कुरणात पळणारे छोटाले ससे, त्यात निसर्गाची आणखी एक भर म्हणून दुरवर दिसलेला पिसारा फुलवलेला मोर, अगदी विलोभनीय असे ते दृष्य होते. दिसते आहे ते सत्य आहे की आसुसलेल्या डोळ्यांनी स्वतःची समजूत घालण्यासाठी दाखवलेला एक भ्रम, काहीच कळत नव्हते. शेजारी वरून वाहणार्या धबधब्याच्या खाली येऊन संथ झालेल्या पाण्याच्या तरंगांकडे तिघांचे लक्ष गेले.

त्यातून हळूहळू एक आकृती बाहेर येत होती, तिला बघून तिघेही आश्चर्याने तिच्याकडे बघतच राहिले. दोन्ही हात छातीपाशी जोडून डोळे बंद करून, अंगावर एक पांढरशुभ्र वस्त्र असलेली, पाण्यातून बाहेर येताना त्या ओल्या शुभ्र पांढर्या बटा डोळ्यांपुढून खांद्यांपर्यंत आलेल्या, हलणार्या ओठांतून कोणत्यातरी मंत्रांचे उच्चार करीत पाण्याबाहेर येणारया एका वृद्ध माणसाची ती आकृती होती. जसे त्या वृद्धाने डोळे उघडले तेव्हा समोर उभ्या असलेल्या तीन युवकांना बघून तोही चकित झाला. तो थोडा वेळ फक्त अनेक विचारांच्या भवर्यात आणि बाहेरून दिसणार्या त्या शांततेत गेला. मग शाकुंत्य ने पुढे जाऊन विचारले, 'बाबा कोण तुम्ही? आपण कोणी ऋशी आहात का? या अरण्यात तुम्ही एकटेच राहता का? त्याच्या त्या अनेक प्रश्नांना थोडे गोंधळून जाऊन काही न बोलता फक्त मानेनेच नाही म्हणून ते पुढे चालू लागले. 'अहो बाबा थांबा एवढं तरी सांगा की आम्ही नक्की कुठे आहोत? इथे आसपास कोणते गाव आहे की नाही? शरू त्या विचित्र वाटणार्या वृद्धाकडे बघून थोड्या मोठ्या स्वरात म्हणाला.

नीलकर्ण ने हातानेच इशारा करून त्याला त्याचे शब्द आवरण्यास सांगितले. 'इथून चार पाच मैल दूर एक गाव आहे'. त्या वृद्धाने उजवीकडे हात दाखवून सांगितले. 'तुमचे खुप खुप आभार, चल दादा जाऊयात मग पुढे'. शरू खांद्यावरून सरकणारे गाठोडे वर ओढीत म्हणाला. 'थांबा, तिथे जाऊ नका'. त्या पांढर्याशुभ्र भुवयांच्या खाली असलेल्या तेजस्वी डोळ्यात तो वृद्ध काही वेगळाच दिसत होता. 'का बाबा? आम्ही का जाऊ नये तिथे? आपल्या शांत पण उत्सुकता असलेल्या स्वरात नीलकर्ण म्हणाला.'मी सांगत आहे ना जाऊ नका तिथे, तुमचे जीवन तुम्हाला प्रिय असेल तर जाऊ नका.' एक काळजी चा कटाक्ष टाकीत तो वृद्ध बोलत होता. 'ठीक आहे, पण आम्ही का जाऊ नये यामागे काही कारण तरी असेलच ना? शाकुंत्य ने त्या वृद्धाच्या जवळ जाऊन विचारले. 'कारण....कारण काही नाही....मी सांगत आहे तेवढे पुरेसे नाही का तुम्हाला?....आपला आवाज थोडा वाढवून तो वृद्ध बोलत होता. त्याचे हात जरी थरथरत असले तरी त्याच्या आवाजात कुठेही अस्पष्टता नव्हता नाही त्याचा स्वर कापरा होता.

'बाबा या इथे बसा'. त्या वृद्धाच्या हाताला धरून नीलकर्ण ने त्यांना शेजारीच असलेल्या झाडाखाली बसवले. श्वासाचा एक मोठा सुस्कारा देत तो वृद्ध खाली बसला. थोडे विचित्र वागत असले तरी मोठ्यांचा मान ठेवावा या संस्कारांमुळेच शरूनेही लगबगीने शेजारच्या नदीवरचे पाणी एका मोठ्या झाडाच्या पानातुन त्यांना प्यायला आणून दिले. ते गार पाणी पिऊन ते थोड्या वेळ शांत झाले. 'कोण आहात तुम्ही? कोठून आले आहात? 'बाबा आम्ही केंसू गावातून आलो आहोत, आणि हे माझे दोन लहान भाऊ आहेत. आपल्या दोन्ही भावांकडे हात दाखवीत शाकुंत्य म्हणाला. 'काय? तुम्ही तिघे सख्खे भाऊ आहात? आणी...आणी गाव काय म्हणालास केंसू? हे नाव तर कधी ऐकले नाही. तो वृद्ध आश्चर्याच्या स्वरात म्हणाला. 'हो हे खर आहे आम्ही भाऊ आहोत. आणी गाव तुम्ही जरी ऐकले नसेल तरी त्याचे नाव आता कळून काही फायदा नाही. असे म्हणत शाकुंत्य ने आत्तापर्यंत घडलेल्या सर्व घटना त्यांना सांगितल्या. घडलेल्या सर्व घटना जरी दुःखद असल्या तरी त्या वृद्धाच्या पाण्याने काठोकाठ भरलेल्या डोळ्यांत एक वेगळीच चमक दिसत होती. का कुणास ठाऊक पण एका वेगळ्याच आशेने तो त्या तिघांकडे बघत होता. 'तुम्ही तिघे परत आलात, तुम्हाला माहीत नाही मी गेली कित्येक वर्ष तुमची वाट बघत होतो'.

आपल्या जागेवरून उठून तो वृद्ध आनंदाच्या स्वरात हे बोलत होता. हा वृद्ध काय बोलत आहे? याचा काही गैरसमज झाला आहे का? या सार्या विचारात ते तिघे एकमेकांकडे पाहत होते. 'हो, मी गेली कित्येक वर्ष तुमची वाट पाहत होतो. तुम्हीच मला या संकटातून बाहेर काढू शकता'. 'संकट? कसलं संकट बाबा? आपल्या भुवया उंचावून शरू ने विचारले. 'सांगतो, सार काही सांगतो.

आपला कणा ताठ करीत, मान थोडी उंचावून, एका वृद्धातून एक वेगळीच ऐटीची चाल घेत तो म्हणाला, 'मी सूर्याणी नगरीचा राजा दुर्वानील आहे'. आणी ती समोर दिसत आहे ती माझी सूर्याणी नगरी आहे. माझी सूर्याणी....एकेकाळी माझं वैभव असलेली, समृद्धीने नटलेली, खळखळत्या झर्यासारखी आनंदाने वाहणारी, माझ्या नगरजणांचा एकमेव विश्वास असलेली, अनेक संकटांना धाडसाने तोंड देणारी, जीला आजपर्यंत कोणीही जिंकू शकले नाही अशी माझी सूर्याणी. पण आज तिचा राजा त्याच्या चुकांच्या शिक्षा भोगत तुमच्यासमोर उभा आहे. त्याची मान प्रायश्चित्ताच्या ओझ्याखाली दबून गेली आहे. त्याचे श्वास फक्त आशेवरती चालू आहेत. अशा या अभागी राजाला तुम्ही मदत कराल काय? एका बलाढ्य, संपन्न नगरीच्या राजाने आपल्या समोर लाचारासारखे हात पसरावे, एका राजाला आपली मदत भासावी, आणी फक्त आपणच का? कोणत्या विश्वासाने आपल्याकडे ही मदत मागितली जात आहे. या सार्या विचारांत नीलकर्ण गुंतून गेला होता त्याने झटकन विचारले, 'पण असे काय घडले की तुम्हाला आमची मदत लागते आहे'. एका गंभीर आवाजात तो राजा सांगू लागला.

                 

 'सूर्याणी' अर्थात सूर्य देवांचा आशिर्वाद लाभलेली नगरी आहे. अतिशय संपन्न, सोन्याने मढलेली, सूर्याणी महल तर इतका सुंदर की सूर्याचे पहिले किरण त्यावर पडताच त्याच्या उंचावरच्या टोकावरून त्याचा प्रकाश बारा किरणांनी दूरवर पसरत असे. आसपासच्या अनेक प्रदेशांत माझे वर्चस्व होते, सूर्याणी ची ख्याती तर दूरदूर पसरली होती, माझे बलाढ्य आणी विश्वासू सैन्य सगळ्यांवर भारी पडत होते. आजपर्यंत अनेक राजांनी प्रयत्न केला पण सूर्याणी कोणीच जिंकू शकले नाही. माझ्या नित्यक्रमात मी रोज सूर्य देवांना जल अर्पण करत असे, माझ्या त्यांच्यावरच्या भक्तीने त्यांचा आशिर्वाद सूर्याणी वर सदैव होता आणी म्हणूनच वर्षातून एकदा त्यांच्यासाठी नगरीत एक मोठा सूर्योत्सव साजरा केला जाई. त्या दिवशी ते स्वतः त्यांच्या किरणांनी आपले शुभ आशिर्वाद आम्हाला देत असत. त्यांच्या कृपेने मलाही तीन मुले होती.

या शाकुंत्य सारखा बलाढ्य, शक्तिशाली असा 'अरूनील' होता. नीलकर्ण तुझ्या इतका खोल गडद निळ्या डोळ्यांचा नाही पण तशीच थोडी नीळी सर असलेला 'विराजस' होता. आणि शरू अगदी तुझ्याच सारखा माझा 'गंधार' होता. एका कर्तृत्ववान राजानंतर त्याची ही नगरी सांभाळण्यासाठी त्याचे हे पुत्र सक्षम होते. कोणीही त्यांचा हेवा करावा असेच ते प्रत्येक कार्यात निपून होते. कधीकधी वैभव, सुख, संपत्ती पुढे माणसाला त्याची कर्तव्य विसरायला होतात. आपण किती श्रेष्ठ आहोत असा उगीचच एक शुद्र अहंकार निर्माण होतो. माझेही तेच झाले, जी मुळात निसर्गतः सुंदर आहे तिचा मी काय अहंकार बाळगावा. मी मरताना जर कुठली संपत्ती मला वाचवू शकणार नाही तर तीचा मी कसला अहंकार बाळगावा.

पण डोळ्यावर हे ऐश्वर्याच, संपत्तीच, श्रेष्ठत्वाच लागलेल झापडं सहज काढणं शक्य नव्हतं. सकाळी येऊन आपल्या किरणांनी सार विश्व उजाडण हे तर त्या सूर्य देवतेच कामच आहे म्हणून की काय असा विचार करून माझं त्यांच्यासाठी जल अर्पण करणही कमी झालं. माझी तिनही मुले अत्यंत गुणवान, पराक्रमी, धाडसी आणी आजूबाजूच्या राज्यात नावाजली जाणारी होती. एक राजा....जो एक पिता ही आहे, त्याला त्याच्या मुलांवरच प्रेम खरंच किती आंधळं करतं. तो दिवस मी कधीच विसरु शकणार नाही ज्याने माझ सारं जीवनच बदलून टाकलं. 'तो सूर्योत्सवाचा दिवस होता,

अनेक दिवसांनी आज हा दिवस आला म्हणून त्या दिवशीच काय ती मला त्यांची आठवण झाली. अन्यथा आज ज्यांच्यामुळे मला हे वैभव दिसत आहे त्यांना तर मी कधीच विसरून गेलो होतो. सारा राजवाडा सुंदर पुष्पांनी सजला होता, सगळीकडे ढोल नगारे वाजत होते. राजवाड्या समोरील भव्य मंडपात एक मोठा यज्ञ होणार होता, सार नगरजण आनंदाने जल्लोष करीत होत. अनेक ॠषीमुनी आले होते, त्यांच्या मंत्रांचे उच्चार सार्या राजवाड्यात ऐकू येत होते. हिरे, माणिक, मोती, सोने, चांदी, वस्त्रे, अनेक सुशोभित वस्तूंनी तो सारा मंडप भरून गेला होता. तिथे सर्व बाजूंनी नगरजणांचे राजाविषयी चे जयजयकार ऐकू येत होते. "राजा दुर्वानील चा विजय असो", "राजपुत्रांचा विजय असो ", "विजयी सूर्याणी शतशः काल विजयी". राजाला त्याच्यावरच्या प्रेमाशिवाय अजून दुसरी मौल्यवान गोष्ट काय ती प्रजा देणार. राजवाड्यावरून खाली उतरताना अनेक टाळ्यांच्या गजरात माझं स्वागत झालं. भव्य सिंहासनावर बसून हात वर करून मी सार्या जणांना तिथूनच प्रणाम केला.

महागुरूंनी जवळ येऊन यज्ञ सुरू करण्याची आज्ञा मागितली. त्या सिंहासनावर डाव्या हाताने जोर देत मी तिथे उभा राहिलो, 'इथे जमलेल्या सर्व ॠषीमुनी, महागुरू, श्रेष्ठ योद्धे, अतिथी आणी प्रजाजनांना मी प्रणाम करतो. आपण इथे का जमलो आहोत हे सर्वांना माहितच असेल. दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही मोठ्या जल्लोषात हा सूर्योत्सव साजरा होईल. तरी मला असे वाटते की आज माझ्या श्रेष्ठ पुत्रांना या यज्ञाचा मान द्यावा. आणी या दानासाठी मी स्वतः या यज्ञ्यास उभा राहील'. एका वेगळ्याच आत्मविश्वास आणी उर्मीत मी हे सर्व काही बोलत होतो. आज राजाच्या वेगळ्याच संकल्पनेने थोड्यावेळ सगळीकडे चुळबुळ सुरु झाली. तेवढ्यात राजमंत्र्यांनी घोषणा केली, 'राजा दुर्वानील चा विजय असो'.....आणी सारे त्यांच्या सुरात सूर मिसळून या संकल्पणनेला पाठिंबा देऊ लागले. यज्ञ सुरू झाला, अनेक भस्माच्या, मंत्राच्या,जलांच्या आहुती त्या यज्ञात पडल्या. माझ्या मनात मी काही चुकीचे तर करत नाही अशी पाल एकदाही चुकचुकली नाही, कदाचित तिला माझी या नंतर होणार्या अवस्थेची मजा घ्यायची असावी.

अचानक सूर्याचे किरण अधिकच प्रखर होऊ लागले, असे की आकाशातून जणू तो आगच ओकत आहे. तो तळपता गोळा अधिकच मोठा मोठा होऊ लागला. सार आकाश वीजांनी कडाडू लागल. एक प्रखर प्रकाशाची आकृती समोर उभी राहिली. "हे राजा आज तू माझा जो अपमान केला आहेस त्याची जाणीव तरी आहे काय तुला? ज्याच्या आशीर्वादाने ही नगरी समृद्ध आहे आज तू त्या कर्त्याला विसरलास? कुठल्या गर्व, अहंकारात जगत आहेस तू". त्या देवतेचे ते रसरशीत कानात आग ओकणारे शब्द ऐकून मी पुढे झालो, नतमस्तक झालो. 'माफ करा, माफ करा सूर्य देवता तुमचा मला विसर पडावा एवढी मोठी चूक माझ्या हातून व्हावी. नाही तुम्हाला अपमानित करण्याचा माझा उद्देश नाही. काही काळ खोट्या अहंकाराची झापडे माझ्या डोळ्यांवर होती, आता या क्षणाला ती दूर झाली'. "माफ करू तुला? कुठल्या तोंडाने तुझ्या चुकांची माफी तू माझ्या समोर मागतोय? नाही...नाही राजा आज मी तुला शाप देतो, ज्या वैभवाचा तुला माज आहे जी नगरजण आज मला सोडून तुझ्या पुजेला उपस्थित आहेत ते कायमचे इथे गुलाम बनून राहतील.

ज्या राजाची आजवर इथे पुजा होत आली ती सूर्याणी आजपासून असूरांची होईल. इथली सुख समृद्धी कायमची नष्ट होईल. जी किरणे आजवर सूर्याणी ला सुंदर बनवीत होती, ज्या वैभवाची ती शान होती ती इथून कायमची निघुन जातील. सूर्याणी इथून पुढे अंधकाराचे जीवन जगेल. आणी ज्या पुत्रांना तू माझ्या पेक्षा श्रेष्ठ म्हणवून घेत इथे उभे केले त्यांना मी या क्षणाला भस्म करीत आहे'. कोणीतरी माझ्यावर अनेक बाणांची छिद्रे पाडावीत, अनेक वीजा माझ्यावर येऊन कोसळाव्या, अनेक दगडांनी माझे काळीज ठेचावे अश्या भावना मला होत होत्या.

एक अभागी पिता खाली कोसळून त्याच्या जिवंत पुत्रांचे झालेले तीन राखेचे ढिगारे पाहत होता. माझ्या अश्रूंनी फक्त त्यात छोटी तळी भरत होती पण आता व्यर्थ त्याच्यामुळे थोडीच त्यांचे प्राण परत येणार होते. एका क्षणात सारे सारे काही संपले. तो आकाशातून आलेला प्रकाश पुन्हा तसाच आकाशात परतला. त्याच्या अनेक अनेक जखमा माझ्यावर करून, माझ्या चुकांची एवढी मोठी शिक्षा मला देऊन. त्याच्या जाण्याने सार आकाश काळ्या ढगांनी वेढल, वीजांचे कडकडाट होऊ लागले, आकाश फाटून त्यातून अनेक असुर त्या रानटी प्राण्यांवर बसून खाली येऊ लागले. ते जसजसे खाली येत होते त्यांच्या शस्त्रांनी दिसेल त्यावर वार करीत होते. सगळीकडे आक्रोश पसरला होता, सर्वत्र किंकाळ्या ऐकू येत होत्या, सगळे मिळेल त्या दिशेने आपला जीव वाचवण्यासाठी पळत होते. आणि मी स्तब्ध पुतळा होऊन हे सारे दृष्य पाहत होतो. इतक्यात कोणीतरी माझ्या हाताला धरून मला ओढत तिथून दूर नेले.

मला रथात बसवून तो रथ सूर्याणी सोडून दूर पळू लागला.एकामागून एक मागे पडणार्या वृक्षांसोबत ते सारे दृष्य मला सतत दिसत होते. दूरवर जाऊन तो रथ थांबला त्यातून रथ हाकणारा मनुष्य उतरला, 'राजा खाली उतरा तुम्ही इथे सुरक्षित आहात'. तो माझा राजमंत्री 'सुकान्ता' होता. किती आपुलकीची त्याची एकनिष्ठता यातून दिसत होती. त्याच्या गळ्यात पडून रडण्याशिवाय तेव्हा दुसरे मला काहीच सुचले नाही. 'हे काय करून बसलो मी, माझ्या नगरीचा सर्वनाश माझ्या डोळ्यांसमोर व्हावा याहून मोठे दुःख कोणते. सांग सुकान्ता काय करू मी आता?' त्याचे दोन्ही खांदे गदागदा हलवून मी त्याला जीवाच्या आकांताने विचारू लागलो. "महाराज तुम्ही खचून जाऊ नका, तुम्ही जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत सूर्याणी पुन्हा पहिल्यासारखी होईल ही आशा आहे. तुम्हीच यातून सर्वांना बाहेर काढू शकता". त्याचे हे सोपे वाटणारे शब्द मला अधिकच ओझ्याखाली दाबत होते. पण मीच काहीतरी करून माझी नगरी वाचवली पाहीजे या निश्चयाने मी जागा झालो. पण असूरांच्या एवढ्या मोठ्या सैन्यापुढे माझ्यासारख्या शुद्राचा काय टिकाव लागणार. या विचाराने माझं मन सैरभैर पळू लागलं. "महाराज" तुम्ही इथे रहा, तुम्ही इथे सुरक्षित आहात. थोड्या वेलींचा गुच्छ हाताने सारत त्याने आत जाण्याचा इशारा करत मला सांगितले. ती एक सुरक्षित जागा आहे म्हणून मी तिथे राहू लागलो.

माझ्या राहण्याची सगळी व्यवस्था त्याने गुप्तपणे तिथे केली. माझं सार सैन्य कैद केल होत, सार्या नगरजणांचे हाल होत होते, सारी प्रजा असूरांची गुलाम होती. "चर्मणासूर" हा असूरांचा असूर होता. माझ्यावरती अजून माझे अर्धे शरीर लावावे इतका तो उंच आणि धिप्पाड होता. डोक्यावरून पाठीपर्यंत त्याचे सोडलेले केस तो चालताना हवेचा वेग घेत, त्याचे गोल बटबटीत डोळे, काळ्याकुट्ट वर्णाचे ते शरीर, सिंहासारखी त्याची ती आयाळ, अनेक राजांनी मारून त्यांच्या हाडांच्या तुकड्यांची त्याच्या गळ्यात वाजणारी ती माळ त्याने तो अधिकच भयानक, विद्रूप, रानटी दिसत असे. त्याच्यासारखेच, त्याच्याएवढेच शक्तिशाली अशी त्याची दोन्ही मुले होती "वज्रासूर आणि किन्मासूर".सगळीकडे फक्त हाहाकार माजला होता. यातून बाहेर निघण्यासाठी मला पुन्हा सूर्य देवांचीच मदत घ्यावी असे वाटले. आणी म्हणूनच मी या वृक्षाखाली सलग बारा वर्षे घोर तपश्चर्या करून सूर्य देवांना प्रसन्न केले. आणी शेवटी त्यांनी प्रसन्न होऊन, 'बोल राजा तुला काय हवंय' विचारले. 'हे देवा आज या सूर्याणी ची काय अवस्था झाली आहे हे तुम्ही बघतच आहात. तुम्ही दिलेल्या शापाने ती उध्वस्त झाली आहे. मला तिची ही अवस्था नाही बघवत. तुम्ही कृपा करून तुमचा शाप मागे घ्यावा आणि या असूरांच्या जाचापासून,या अंधारलेल्या जगातून त्यांना मुक्त करावे'.

'हे राजा मी दिलेला शाप पुन्हा मागे घेणे आता शक्य नाही. पण तुझी सूर्याणी एक दिवस या असूरांपासून नक्कीच मुक्त होईल. इथला अंधकार मी कायमचा दूर करू शकत नाही पण तुला वचन देतो की, 'दर बारा रात्रींनंतर दर बारा दिवसांसाठी हा सूर्य या सूर्याणी मध्ये येईल'. तुझ्या गेलेल्या मुलांना ही मी परत आणू शकत नाही, पण एक दिवस अशीच तीन मुले येऊन या असूरांपासून सूर्याणी ला मुक्त करतील. पण तो पर्यंत तुला त्यांची वाट पहावी लागेल आणि सूर्याणीच्या मुक्तीनंतर तूही या सगळ्यातून मुक्त होशील'.....

म्हणून आज इतके दिवस मी त्या मुलांची वाट पाहत होतो. या वृद्ध, अभागी राजाला तुम्ही मदत कराल काय? या सूर्याणीला त्या असूरांपासून मुक्त कराल काय?........."राजा आम्ही तुमची नक्कीच मदत करू" शाकुंत्य ने ठामपणे त्यांना सांगितले. इतके वर्ष एका आशेवर जिवंत राहिलेल्या त्या वृद्ध राजाच्या डोळ्यातून पडणारे अश्रू पाहून नीलकर्ण म्हणाला, 'आम्ही मदत करू हे नक्कीच पण असूरांच्या एवढ्या मोठ्या सैन्याला आम्ही तीघेच कसे काय हरवू? 'होय नीलकर्ण तू म्हणतोस ते बरोबर आहे पण यामध्ये माझं काही विश्वासू सैन्य आणि माझी प्रजा तुझ्या सोबत असेल'. राजाने छातीठोकपणे उत्तर दिले. 'पण राजा जर तुझ सैन्य, प्रजा तयार होती तर तू आधीच हे युद्ध का नाही केलंस?

शरू च्या प्रश्नाला राजाने थोड हसूनच उत्तर दिलं, 'शरू युद्ध जिंकण्यासाठी सैन्याला एका सक्षम राजाची ही गरज नेहमी असते, त्याशिवाय स्वतः कोणीही पुढाकार घेत नाही. आणी या वृद्ध राजाकडून कोण काय अपेक्षा ठेवणार'. 'ठीक आहे तर चला आत्ताच जाऊ' शाकुंत्य जमिनीवरील सामान लगबगीने उचलीत म्हणाला. 'शाकुंत्य थांब आज सूर्याचा शेवटचा दिवस आहे. उद्यापासून पुढचे बारा दिवस तो नसेल. म्हणून जे काही करायच असेल ते पुढच्या बारा रात्रींमध्येच केल पाहिजे'. सारेजण ती रात्र तिथेच राहीले.

                  आता असूरांपासून सूर्याणी ला मुक्त करण्याची योजना सुरू झाली.सारे काही गुप्तपणेच चालू राहील याची काळजी सतत घेतली जात होती. सैन्यामध्ये त्या तिघांवरचाविश्वास निर्माण झाला. आपल्या युद्धनितीचे कौशल्य दाखवून ते सैन्याला अधिकच प्रभावीत करत होते. प्रजेत खूप वर्षांनी एक नवा जोम, उत्साह, आनंद निर्माण झाला. आपल्याला या असूरांपासून मुक्त करण्यासाठी कोणीतरी आहे याची आशा त्यांच्या मनात निर्माण झाली. अनेक युद्धनिती आखल्या गेल्या. युद्धात कोणी कुठे राहून काय कामगिरी करावी याचे प्रत्येकाला प्रशिक्षण देण्यात आले. कोणत्या प्रसंगाला कसे सामोरे जावे हेही सांगण्यात आले. त्या तीन हुशार भावांच्या कल्पनेतुन हे सैन्य युध्दासाठी तयार झाले. बाराव्या रात्री 'चर्मणासूर' ला शरणागती साठीचा संदेश पाठवण्यात आला. पण हसत हसत त्याने तो संदेश आपल्या पायाखाली तुडवित युद्धाला आमंत्रन दिले. दुसर्या दिवशीच्या पहिल्या सूर्याच्या किरणांनी शंख वाजवित युद्धाला सुरूवात झाली.

असूरांचे अफाट सैन्य उभे होते पण बारा दिवसांच्या अथक परिश्रम करून मोठ्या धाडसाने सूर्याणीचे सैन्य त्यांना तोंड द्यायला उभे होते. आपल्याच गुलामांनी आपल्या विरोधात जाऊन केलेल हे षडयंत्र चर्मणासूर ला बघवल नाही आणि त्या रागाने लालबुंद होऊन हात वर करून आक्रमणाचा इशारा केला. त्याचा इशारा मिळताच ते असूर छात्या ठोकीत, गर्जना करीत मिळेल त्या दिशेने धावत येत सूर्याणी च्या सैन्याला भिडू लागले. शाकुंत्य आपल्या सोबत अनेक बलाढ्य, शक्तिशाली योद्धे घेऊन एक दिशा सावरत होता. तर नीलकर्ण आपल्या बुद्धीच्या चक्रव्हयू मध्ये अडकवून अनेक असूरांना मरणागतीला पाठवित होता. आपल्या एका शस्त्रात एकाचवेळी बारा बाण सोडीत शरूचे सैन्य लांबून येणार्या असूरांना मुंगीसारख मारीत होत. बराच वेळ हे युद्ध असेच सुरु राहिले, अनेक असूर मारले गेले.

चर्मणासूरने आपल्या दोन पुत्रांना पुढे केले. पण अंगात जणू काही संचारले आहे असे वागीत नीलकर्ण आणि शरू ने त्याच्या दोन्ही पुत्रांचा वध केला. हे पाहताच डोळ्यांतून आग ओकीत, दात ओठ खात तो स्वतः युद्धात उतरला. तो आलेला पाहून शाकुंत्य ने आपली गदा हलवित जोराचा मार त्याच्या पोटावर केला. त्याची हाडांची माळ तुटून खाली पडली. एक मोठी गर्जना करीत तो शाकुंत्य वर हल्ला करू लागला. दोघांमध्ये ही घनघोर युद्ध झाले. आणि शेवटी शाकुंत्य च्या शेवटच्या वारात तो नाकातोंडातून रक्त येत धाडकन खाली कोसळला आणि गतप्राण झाला. आपला राजा गेला बघून सारे असूर घाबरून पळू लागले. आणी सूर्याणी असूरांपासून कायमची मुक्त झाली. नगरजणांनी जल्लोषात आपल्या तीन नव्या राजांचे स्वागत केले. आणी मुक्त झालेली सूर्याणी पाहून दुर्वानीलनेही आपले प्राण सोडले. सुर्याणी पुन्हा पहिल्यासारखी बहरली, आनंदी झाली, आणी पुन्हा एकदा सूर्योत्सवही करण्यात आला.

              मुलांनो असे म्हणतात अजूनही ही सूर्याणी नगरी आहे. अजूनही ती बारा रात्रींची आहे. आशा आहे यातून तुम्ही नक्कीच चांगला बोध घेतला असावा. आजची गोष्ट संपली. जा सर्वांनी आपल्या पर्णकुटीत जा असे म्हणत सारी मुले गोष्ट ऐकून निघून गेली......


            



Rate this content
Log in

Similar marathi story from Action