समाधान...
समाधान...
काही दिवसांपूर्वी मी चिंचवड़ स्टेशन जवळ माझ्या मित्राची वाट पहात उभा होतो, दुपारची वेळ असल्याने रस्त्यावर खूप गर्दी तशी नव्हती, परंतु एक गरीब कुटुंब रस्त्याच्या कडेला भिक मागताना मला दिसले, एवढ्या भर उन्हात एक लहान बाळ कडेवर घेवून एक स्त्री येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या पाया पडत होती. परंतु तिचा नवरा मात्र वीडी ओढत झाडाच्या बाजूला आडवा पडलेला दिसला... ती स्त्री मिळालेले पैसे त्याला आणून देत होती आणि पुन्हा त्या लहान मुलाला घेवून भिक मा मागायला जात होती. खरच ही गोष्ट खेदजनक आणि निंदनीय होती..
परंतु करणार काय? हा प्रश्न माझ्या समोर उभा होता. कारण मला वाटले की, मी जर पैसे दिले तर ति स्त्री, तिच्या नवरयाकड़े ते पैसे देईल म्हणून मि माझ्या बॅग मध्ये हात घातला त्यामध्ये 1 पारले जी बिस्किट चा पुडा होता. माझ्या बॅग मध्ये मि नेहमी रस्त्यावरील गरजूंना देण्यासाठी 4-5 पुड़े ठेवत असतो. परंतु त्यावेळी 1 च शिल्लक राहिला होता , तो त्या स्त्रिला दिला. तिने ही लगेच तो पुडा थोडासा फाडला आणि काही बिस्किट त्या बाळाला दिली. तिच्या चेहऱ्यावर मला खूप समाधान दिसले आणि त्या लहान मुलाच्या सुद्धा... मला ही खुप बरे वाटले ते दृश्य पाहताना,
परंतु अचानक एक कुत्री तिथे आली आणि त्या स्त्रीच्या बाजूला पडलेला तो बिस्किटचा अर्धवट राहिलेला पुडा तोंडात घालून ती एका गल्लीत पसार झाली.. मला वाईट वाटले की , त्यांना ते पूर्ण खाता आले नाही.. माझा मित्र तोपर्यंत तिथे आला होता, आम्ही तिथुन निघालो आणि समोरिल गल्लीत शिरलो, मित्राचा फ़ोन आला म्हणून आम्ही रस्त्याच्या कडेला थांबलो माझे लक्ष बाजूला गेले तर पहातो काय!
थोड्या वेळापूर्वी ज्या कुत्रीने तो बिस्किटचा पुडा पळवला होता तिने ति बिस्कीटे तिच्या ५-६ पिल्ला समोर टाकली होती आणि ति लहान पिल्ले भूक लागल्यामुळे त्यावर तूटून पडली होती... त्या कुत्रीचे ही अचानक माझ्याकडे लक्ष गेले आणि तिचे डोळे काहीशे चमकल्यासारखे वाटले. जणू ते मला धन्यवाद म्हणत होते...
त्या दिवशी मी दोघांच्याही चेहऱ्यावर समाधान पाहिले होते. आणि त्यांचे समाधान पाहुन मी परमेश्वराचे आभार व्यक्त केले. विचार करा मित्रांनो, जर आपल्यापैकी काहिंनी जर बॅग अथवा पर्स मध्ये 1 बिस्किटचा पुडा ठेवला तर तो मनुष्यालाच काय तर प्राण्यानासुद्धा समाधान देवू शकेल. आणि आपल्या जीवनाचे थोड़े का होईना सार्थक होईल...
