दिवाळीचे स्वरूप बदलले आहे का?
दिवाळीचे स्वरूप बदलले आहे का?
नमस्कार मित्रहो,
आज प्रत्येक विषयावर भिन्न मतप्रवाह असू शकतात जसे काळाप्रमाणे दिवाळी सण साजरा करण्यात काही बदल झाला आहे अथवा नाही? माझ्या मते बदल नक्कीच झाला आहे. खरे तर दिवाळीचा मुख्य उद्देश्य होता समाजिक आणि धार्मिक सलोखा जपणे व जतन करणे. परंतु आज त्या विषयाला कात्री मारली गेली आहे.
भारतात अनेक जाती धर्माचे आणि विविध भाषिक लोक राहतात, जे दीपावली सण खूप आनंदाने साजरा करतात.
हा एक प्रकारचा असा दीपोत्सव आहे की, जिथे अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल असा संदेश दिला जातो.
अवतार पुरुष श्री राम यांनी आपला चौदा वर्षाचा वनवास संपवून अयोध्या नगरीत प्रवेश केला तेव्हा, त्यांचे स्वागत सर्व जनतेने रांगोळी काढून अन लक्ष दिवे लावून केले.
माणसाच्या मनातील, जीवनातील अंधार दूर करून असत्यावर सत्याचा आणि अंधारावर उजेडाच्या विजयाचे प्रतीक म्हणून दिवाळी साजरी केली गेली जाते.
घराघरात स्वच्छता, घरांना रंगरंगोटी केली जाते. जीर्ण कपडे काढून नवीन वस्त्र परिधान केले जाते. घराबाहेर रांगोळी काढणे. दिव्यांची आरास करणे आणि केलेले फराळ हे मुख्यता शेजार्यांना, नातेवाईकांना देऊन संबंध दृढ करण्याच्या दृष्टीने आदान प्रदान केले जाते.
खरंच ह्या गोष्टी आता कोणाला होताना दिसतात का? तर याचे उत्तर नाही असे आहे.
पूर्वी नाते संबंध, एकमेकांकडे येणे जाणे विचारपूस करणे. ह्या बाबी सर्रास केल्या जायच्या. आणि आता घरात राहून सुद्धा शुभ दिवाळी असे बोलायला वेळ नाही. मोबाईलमुळे जग जवळ यायच्या ऐवजी खूप दूर होत चालले आहे. आभासी दुनियेत आता सर्व आपण वावरत आहोत. फराळ सुद्धा घरी न बोलवता ऑनलाईन मागवले जाते. पूर्वी शॉपिंग करताना सर्व कुटुंब एकत्र असायचे. आता प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या मर्जीचे मागवतो.
ना विचारपूस राहिली, ना मोठ्या व्यक्तीविषयी आदर ना प्रेम. राहिलय फक्त स्वार्थ आणि कामं काढून घ्यायची भावना बस्स.
लहान मुलं तर घराच्या बाहेर किल्ला बनवण्यात व्यस्त असायचे. आणि रात्री अख्ख घर फटाके वाजविण्यासाठी एकत्र जमायचे. दिवाळीचे चार दिवस हे संपूर्ण वर्षातील उत्साहाचे असायचे. ज्याची वाट आपण सर्वच पहायचो.
वर्ष बदलत जातात, पिढी बदलत जाते.
विचार बदलत जातात, रूढी बदलत जाते.
फक्त बदलत नाहीत ते कॅलेंडर मधील दिवाळीच्या तारखा.
