सेलिब्रिटीजचा राज्जा
सेलिब्रिटीजचा राज्जा
लालबाग परळ ची खरी ओळख म्हणजे कष्टकरी गरिबांचे गिरणगाव. घाटी, कोकणी आणि नंतर काही अंशी गुजराती लोकांनी वसलेले. तसेच हे स्थान म्हणजे गणपती उत्सव काळात अनेक छोट्या मोठ्या मुर्तीनी, देखाव्यांनी नावाजलेले होते आणि आता ही आहे.
परंतु साधारणतः २२-२३ वर्षापूर्वी पर्यंतचा काळ हा म्हणजे उत्सव प्रेमीसाठी एक सुवर्ण काळ होता. त्यावेळी बाप्पाचे सहज दर्शन घेता येत असे. संध्याकाळी जेवण झाल्यानंतर गणपती पाहायला अख्खे कुटुंब बाहेर पडत असे. एका रात्रीत सर्व गणपती पाहून आम्ही घरी यायचो. त्यावेळी हवेत एक वेगळीच जादू होती. उंच गणपती, हलते देखावे, नवस वगैरे सर्व काही कमी वेळात होवून जायचे. परत दुसऱ्या दिवशी लवकर उठून आम्ही चाकरमानी पुन्हा कामावर रुजू व्हायचो.
बाप्पाची लाईन ही तासन् तास एका जागेवर उभी न राहता ती जलद रीतीने सरकायची. आणि प्रत्येकाला सहज , सुलभ दर्शन ही मिळायचे. भूतकाळ हा सुखद दुःखद आठवणींचा असतो. परंतु हा भूतकाळ खूप सुखद होता. जो आताच्या घडीला येणे शक्य नाही. कारण त्यावेळी कोणी कार्यकर्ता कोणाचे केस ओढून फरफटत बाहेर काढत नव्हता. मंडळाचे सदस्य स्वतःची तिजोरी भरवायला किंवा घर चालवायला वर्गणी गोळा करीत नव्हते. VIP पासेस ने गरीब श्रीमंतीचा भेदभाव केला नव्हता. आणि विशेष म्हणजे आजूबाजूला मोठे टॉवर नसल्याने धनदांडग्या( एका विशिष्ट समजाकडून) वर्गणी मिळत नव्हती. जिच्या साहाय्याने ते लोक ८-१० जणांना लाईन मध्ये घुसवत असतं. आजकाल ही साधारण गोष्ट झालीय.
मग हे अमंगल घडलं कसं? कधी? का? ह्याची उत्तरे दोन दशकांचा अभ्यास केला तर मिळतात. कोणतीतरी एखाद दुसरी वाहिनी पैशाखातर टिव्हीवर गणपतीची जाहिरातबाजी करू लागली. कश्या प्रकारे राजकीय पार्ट्यांच्या राजकीय फायद्यासाठी ह्याचा गैरवापर केला जातो. भाव नसलेले , असलेले नेते, नट, नट्या आपल्या पिताश्रीचे मंडळ असल्यासारखे केव्हाही येतात आणि बराच वेळ बाप्पा समोर उभे राहून, आरत्या करून , फोटोसेशन करून , बिचाऱ्या १०-१२ तास उभ्या असलेल्या भक्तांच्या नाकावर टिच्चून जातात. आणि त्यात सामील असतात ते मंडळाचे १० दिवस असलेले स्वयंघोषित राजे (सदस्य)
नाही हो! आम्हाला त्या लोकांच्या विषयी तिरस्कार नाही. परंतु तुम्ही त्या लोकांसाठी एक वेळ - एक दिवस निर्धारित करा. म्हणजे सामान्यांचे हाल होणार नाही. बिचारी माणसं ऊन्हात, पावसात रांगेत असतात. कित्येक जण चक्कर येवून पडतात.
उभ्या असलेल्या माणसाच्या श्रद्धेपोटी त्यांना काय सांगावे समजत नाही. पण एवढे तर सांगावेसे वाटते की, तुमच्या घरातील गणपती तुम्हाला पावत नाही का? आई वडिलांचे आशीर्वाद पावत नाहीत का?? एखाद्या गरजवंताला मदत केली, भुकेलेल्या व्यक्तीला अन्न दिले म्हणजे आशीर्वाद नाही मिळणार का?? कशासाठी एवढा अट्टाहास....
क्रिकेट मधील देव जसा त्याच्या लहानपणी ज्या मित्रांसोबत खेळायचा आता त्यांच्यासोबत खेळतो का?..काळ बदलला मित्र बदलले खेळाडू बदलले. तसेच आता राजाचा राज्जा झाला आणि तो ही सेलिब्रिटीजचा... ह्याला कारणीभूत कोण ? हा प्रश्न मात्र सर्वानाच पडलेला आहे. ज्याचे उत्तर सापडून ही काहीच उपयोग नाही . कारण पाणी आता पुलाखालून वाहून गेले आहे.
