सिकंदर
सिकंदर
डायोजिनिज या अवलियाबद्दल त्याने बरंच ऐकलं होतं. वाटेत त्याच्या भेटीचा योग होता. तो साधायचा ठरवून सिकंदराने त्याच्याकडे शिपायांकरवी निरोप पाठवला.
डायोजिनिज गावाबाहेर एका नळकांडीसारख्या, दोन्ही बाजूंनी उघड्या घरात, बहुतेक काळ उघड्यानेच राहायचा.
सकाळी ऊन खात नागव्यानेच निवांत पहुडलेल्या डायोजिनिजला सैनिकांनी सांगितलं, महाराज, तयार व्हा, अलेक्झांडर द ग्रेट तुमच्या भेटीला येत आहेत.
डायोजिनिज खदाखदा हसू लागला.
कसंबसं हसू थांबवून म्हणाला, जो माणूस आपल्या नावापुढे द ग्रेट वगैरे विशेषणं लावतो, त्याच्यापेक्षा छोटा माणूस दुसरा असू शकत नाही.
सैनिक म्हणाले, सबूर महाराज.
अशी अवमानकारक बडबड कराल, तर शिरच्छेद होईल.
डायोजिनिज पुन्हा हसला आणि म्हणाला, जा, जाऊन सांगा तुमच्या सिकंदराला की मी या धडाचा आणि या शिराचा एकमेकांशी असलेला संबंध कधीच तोडलाय. आता तू काय तोडशील?
हा सगळा प्रकार कानावर आल्यानंतर अतीव उत्सुकतेने सिकंदर डायोजिनिजला भेटायला आला.
डायोजिनिजने विचारलं, गेले कित्येक दिवस मी पाहतोय, सैन्य चाललंय, हत्ती चाललेत, घोडे चाललेत, भयंकर धावपळ सुरू आहे, ती सगळी कशासाठी?
सिकंदर गर्वाने म्हणाला, मी हा प्रांत जिंकून घेणार आहे.
डायोजिनिजने विचारलं, हा प्रांत जिंकल्यानंतर काय करणार?
सिकंदर म्हणाला, मी नंतर हिंदुस्तान जिंकणार.
डायोजिनिजने विचारलं, त्यानंतर?
सगळं जग जिंकणार.
त्यानंतर?
त्यानंतर मी मस्त आराम करणार.
डायोजिनिज पुन्हा खदखदा हसून म्हणाला, अरे, सगळं करून जर पुन्हा स्वत:पाशीच परतायचं असेल, तर एवढी यातायात करतोस कशाला?माझ्याशेजारी आताच पहुडून जा आणि कर मनसोक्त आराम.
सिकंदर म्हणाला, छे, माझी कामगिरी, माझा प्रवास संपल्याशिवाय मला आराम नाही.
डायोजिनिज म्हणाला, आजवर जगात असा एकही माणूस जन्माला आलेला नाही, ज्याचा प्रवास त्याच्या हयातीत संपला. तुझाही संपणार नाही. तुलाही आराम लाभणार नाही.
सिकंदर म्हणाला, तुझं बोलणं मला फार आवडलं. बोल, मी तुझ्यासाठी काय करू शकतो?
डायोजिनीज म्हणाला, मघापासून माझं ऊन अडवून उभा आहेस, जरा बाजूला झालास तरी पुष्कळ.
डायोजिनिज म्हणत होता, तसंच झालं...
सिकंदर जिवंतपणी आपल्या मायदेशी परतू शकला नाही.
असं म्हणतात की सिकंदर आणि डायोजिनिज हे दोघेही काही तासांच्या अंतराने एकाच दिवशी मरण पावले.
स्वर्गाच्या वाटेवर दोघांची पुन्हा भेट झाली.
सिकंदर म्हणाला, अरे वा, आज सम्राट आणि फकीर पुन्हा एकमेकांसमोर आले!
डायोजिनिज म्हणाला, आले खरे! फक्त सम्राट कोण आणि फकीर कोण हे तुला अजूनही कळलेलं नाही.
