STORYMIRROR

Amruta Shukla-Dohole

Inspirational

3  

Amruta Shukla-Dohole

Inspirational

गोडधोडाचे जेवण

गोडधोडाचे जेवण

5 mins
130

"अहो दादा अजून आले नाहीत घरी.११ वाजत आले, इतका उशीर नाही होत कधी त्यांना. बघा तरी कुठे गेलेत " उमाने पुन्हा एकदा आठवण केली तशी सुरेश चिडला. "अग आता का लहान बाळ आहेत ते? मी कामावरून थकुन भागून घरी येतो तर यांची वेगळीच कटकट. नको काळजी करुस येतील घरी " सुरेशने उमाला गप्प बसवले खरे, पण मनातून त्यालाही काळजी वाटत होती वडिलांची.


रोज सायंकाळी सुमारे तीन चार तास तरी दादा फिरायला जात असत. कोणती कोणती मंदिरे, मग एखाद्या बागेत बसून येत असत रात्री ९ वाजेपर्यंत परत. आज ११ वाजून गेले होते. शिवाय दादा कोठे कोठे फिरतात याची देखील त्याला नेमकी कल्पना नसल्याने त्यांना शोधणार तरी कोठे हा प्रश्न होताच.


"अहो पण काळजी वाटणारच ना मला. आता दादा सत्तरीला पोचले आहेत. कुठे पडले झडले तर मोठाच घोळ होईल ना. शिवाय खिशात ओळखपत्र आहे की नाही ते पण माहीत नाही. काही झाले तरी कळणार कसे आपल्याला. हल्ली रहदारी पण किती वाढलीय' उमाची काळजी रास्तच होती. शेवटी चॊकापर्यंत जाऊन पाहू म्हणून सुरेश चप्पल घालून निघणार तोच त्याचा मोबाईल वाजला,


" हॅलो, मी इन्सेक्टर सावंत बोलतोय. रामनगर पोलीसस्टेशन मधून. सुरेश जोशी बोलताय का आपण ? हे मधुकर जोशी कोण आपले वडील आहेत का? "


पोलीसांचा फोन म्हंटल्यावर रमेश जरा घाबरलाच " हो, हो, सर मी त्यांचा मुलगा सुरेशच बोलतोय काय झालेय नेमके सर "


" मला फोनवर नाही सांगता येणार सारे. चोरीच्या केस मधे तुमच्या वडिलांना लोकांनी पकडून आणलेय. ते खुप घाबरकलेत त्यामुळे काही बोलायला, सांगायला तयार नाहीत. फक्त माझ्या मुलाला बोलवा म्हणून तुमचा नंबर दिला. म्हणून फोन केला तुम्हाला. तुम्ही या ताबडतोब रामनगर पोलीसस्टेशनला "


"अहो कोण होते ? काय झालेय दादांना ? सांगा तरी काही " सुरेशचा चेहरा पाहुन उमा अधिक काळजीत पडली होती.


"काय समजत नाही काय झालेय ते. काहीतरी चोरीची भानगड आहे म्हणत होते पोलिस इनस्पेक्टर. पोलीसस्टेशनला बोलावलेय मला " सुरेशने असे सांगताच उमा रडायलाच लागली.

"अग बाई काय कमी होते का घरात. हे काय भलतेच आता. चला मी पण येते तुमच्या सोबत .."


घाईघाईने दोघे पोलीसस्टेशनला पोचले तर तेथे बरीच गर्दी. एका बाकावर दादा बसलेले दिसले सुरेशला. घाबरलेले. त्यांच्या ओठातून रक्त येत होते. सुरशला पहाताच दादांनी एकदम उठून त्याला मिठीच मारली.


"दादा काळजी नका करु. मी आलोय ना. निश्चीत रहा आता. "सुरेश दादांना धीर देत होता. एका पोलिसाने तुमचेच वडील ना हे ? असे विचारत, जा केबिनमधे साहेबांना भेटा असे म्हणत केबिनमधे पाठवले.


"नमस्कार सर,.मी सुरेश जोशी. मधुकर जोशींचा मुलगा. काय झालेय नेमके? "


"अहो काय सांगणार, तुम्ही सुशिक्षित माणसे. कपड्यावरुन चांगले सुखवस्तु दिसताय. तुमच्या वडिलांना खाद्यपदार्थांची चोरी करावी लागणे हे लज्जास्पद आहे. पोटभर जेवण देत नाही का तुम्ही वडिलांना. त्यांना एका लग्नाच्या रिसेप्शन समारंभाच्या लोकांनी पकडून आणलेय. तेथे खाद्यपदार्थांची चोरी करतांना पकडलेय त्यांना. मी बाकी झडती घेतली त्यांची पण काही मौल्यवान दागिने वगैरे नाही सापडले. फक्त हे सापडले " असे म्हणत साहेबांनी चार प्लॅस्टिकच्या छोट्या पिशव्या ठेवल्या सुरेश समोर. कुतूहलाने सुरेशने पिशव्यात काय आहे ते पाहिले अन तो थक्कच झाला.


एका पिशवीत गुलाबजाम,दुसरीत लाडू, जिलेबी अन पुलाव असे पदार्थ होते. काय बोलावे सुरेशला सुचेना. वडिलांनी हे पदार्थ का चोरले असावेत त्याला समजेना. घरात खायला काही कमी नव्हतेच त्यांना उलट मधुमेह असल्याने ते गोड खाणे देखिल टाळत असत. कितीही आग्रह झाला तरी. मग हे असे कसे केले दादांनी ? चक्रावून गेला होता तो.


"बोला साहेब, वडिलांना उपाशी ठेवता की काय घरी ? भरोसा नाही आजकालच्या मुलांचा म्हातारे आईवडिल जड होतात त्यांना .." सावंत साहेबांनी सुरेशला सुनावले.


"साहेब आपण समजता तसला काही प्रकार नाहीय हो खरंच. काहीही समस्या नाहीय हो तशी. हवेतर विचारा वडिलांना तुम्ही समोरासमोर. बोलवा त्यांना इथे " सुरेशने कळकळीने सांगितल्यावर साहेबांनी शिपायाला मधुकर जोशींना आत आणायला सांगितले. शिपाई मधुकररावांना आत घेऊन आला तसे त्यांना पकडून पोलीस स्टेशनला ज्यांनी आणले होते ते चारपाच जण देखिल आत आले.


"बसा इथे अन सांगा काय झाले ते का चोरी केली तुम्ही ते .." साहेबांनी मधुकररावांना बोलते करण्याचा प्रयत्न केला. ते अपमानाने मान खाली घालून बसलेले होते.


" दादा ..बोला .. सांगा तुम्हाला आम्ही उपाशी ठेवतो का ? घरी जेवायला मिळत नाही का पोटभर. आमचे काही चुकतेय का? " सुरेशने अगतिक होवून विचारले.


"नाही रे बेटा, तुमची काही चूक नाही. माझीच चूक आहे सगळी मी असे करायला नको होते पण .. पण .." मधुकरराव अडखळू लागले.


" पण काय ? सांगा काय ते स्पष्ट " सर्वांचीच उत्सुकता ताणली गेली होती.


"बेटा मी ते पदार्थ फुटपाथवरच्या गरीब मुलांना वाटण्यासाठी चोरले होते रे...! माझे लहानपण खुप गरिबीत गेले. दोन वेळा जेवणाची देखिल भ्रांत होतीआमची. आम्ही चार भाऊ अन तीन बहिणी. मी सर्वात मोठा. वडील नोकरी सोडुन स्वातंत्र्य संग्रामात जेल मधे गेलेले, तेथेच त्यांचा आजारपणाने म्रुत्यु झाला अन एकदम त्यांचे प्रेतच पाठवले घरी इंग्रज सरकारने. आई बिचारी अशिक्षित. तिने कसे तरी धुणी भांडी करुन आंम्हाला मोठे केले. वार लावून माधुकरी मागून आम्ही भावंडे मोठे झालो. लहानपणी मला गोड खुप आवडायचे रे .. पण कधी गोडधोड नाही मिळाले खायला. पुढे मी शिकून चांगली नोकरी मिळवली. भावांना पण मदत केली शिक्षणाला. बहिणींची लग्ने करुन दिली जबाबदारीने. माझाही संसार उभा केला समर्थपणे. सारे काही मार्गी लागेपर्यंत मी सेवानिवृत्त झालो, पण पण माझी गरीब मुलांसाठी काहीतरी करायची इच्छा राहूनच गेली. सर्व जबाबदाऱ्या पार पाडण्यात काहीच करता आले नाही गरिब मुलांसाठी .." बोलता बोलता मधुकररावांचा आवाज कातर झाला ..सारेच भारावून गेले होते.


" रिटायर झाल्यावर फंड फारसा उरलाच नव्हता. कारण भावांच्या शिक्षणासाठी, बहीणींच्या लग्नासाठी मी कर्ज काढुन तो संपवला होता. माझ्या पेन्शन मधली अर्धी रक्कम मी दरमहा एका अनाथ आश्रमाला देणगी म्हणून देतो. अन उरलेल्या रक्कम माझी ऒषधे. घरात भाजी वगैरे साठी वापरतो. पण तरीही मला अजून काहीतरी करावेसे वाटत होते गरीब अन अनाथ मुलांसाठी. म्हणुन मग मी हा मार्ग पत्करला. गेल्या पाच वर्षापासून आठवड्यातुन दोन तीन दिवस मी शहरात फिरून वेगवेगळ्या लग्न समारंभाच्या ठिकाणी जाऊन तेथून असे गोडधोड अन्न घरी न्यायचेय असे सांगून छोट्या प्लास्टिकच्या पिशव्यातुन घेतो. अन रेल्वे स्टेशन व बसस्टँड फूटपाथ अशा ठिकाणी गरीब मुलांना वाटून टाकतो. माझ्या दिसण्यामुळे अन चांगल्या कपड्यामुळे मी लग्नातला किंवा स्वागत समारंभातला आमंत्रीत पाहुणा नाही हे लक्षात येत नाही कोणाच्या. अरे नाहीतरी किती अन्न वाया जाते अशा समारंभातुन. लोक किती अन्न अक्षरशः फेकतात कच-यात. किमान थोडे गोडधोड गरिबांना मिळावे म्हणून मी असे करत होतो. पण काल... काल एकाने मला स्वागत समारंभात जेवण पिशवीत घेतांना हटकले. मी गडबडलो. कोणाचा पाहुणा हे सांगता आले नाही. लोकांना वाटले मी चोर आहे. मला पकडले. एकदोघांनी चार ठोसेही लगावले अन आणले धरून इथे.." आता मधुकररावांना अश्रु आवरेनासे झाले होते. सारे स्तब्ध होऊन ऎकत होते. मधुकररांना पकडून आणलेल्या लोकातले दोन तरुण पुढ झाले " माफ करा आजोबा आंम्हाला आंम्ही हात उचलला तुमच्यावर असे म्हणत मधुकररावांच्या पाया पडले. इन्पेक्टर सावंतानी उठून एक कडक सॅल्यूट केला मधुकररावांना. अन सुरेशने त्यांना कडकडून मिठी मारली.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational