जीवनाई
जीवनाई
आजही निमाचे डोळे सुजलेले दिसतच होते, नक्कीच रात्री मनसोक्त रडून उशी भिजवली असेल हिने हे रमा आजीने हेरलं, खरंतर अशी परक्याकडे अश्रित आली तेव्हां पासूनच तिचे डोळे केविलवाणे झालेले आजीने ओळखले होते पण नवीन जागा, नवीन माणसं म्हणून रडू येत असेल हिला अस वाटून आजी दुर्लक्ष करत होती पण आज महिना झाला तरी पोरगी काही रुळत नाही हे बघून दुपारी झोपळ्याकडे अंग टाकत आजीने निमाला हाक मारलीच, "निमे जरा पायाला रॉकेल चोळून देतेस का गं??" निमा म्हणाली, "हो एवढं धुणं वाळत घालून आलेच हं रमा आजी, म्हणत ती ओसरीकडे गेली.” आजीचं झोपाळ्यावरून लक्ष होतं पोरीकडे, अगदी आईसारखी टापटीप आहे पोरगी, कपडा सुद्धा अगदी झटकून फटकून एक सुरकुती पडणार नाही ह्याची काळजी घेत वाळत टाकते पण देवाने हिच जगणं सुरकतून टाकलं, गावाकडे आपल्या वाड्यावर कितीतरी वर्ष हिची आई काम करायची, आपण इकडे शहरात आलो मग जरा सम्पर्क कमी झाला होता, पण मध्येच हिची आई गेली आणि गावातल्या तरण्यांची नजर ह्या पोरीकडे वळलेली पाहून आबाने फोन करून गळ घातली, "आजपर्यंत तुमच्या घरची चाकरी आम्ही दोघांनी इमाने इतबारे केली होती, आता ह्या पोरीला कामावर ठेवा तिच लगीन होईस्तोवर, इथं रानटी नजरांनी माझं लेकरू भिऊन चाललं आहे, दोन एक वर्ष सांभाळा लै उपकार होतील, पगार नाही दिला तरी चालल पण आश्रय द्या," अस म्हणत एक दिवस भरपावसाची निमी आपल्याकडे आली चिंब भिजलेली, जराशी भेदरलेली अगदी एखाद्या हरणीच्या पाडसासारखी, टपोरे पाणीदार डोळे फिरवत बघत होती, आपल्या दोन्ही सुनांची बाळंतपणं, सगळी काम तिच्या आईने चोख केली होती त्यामुळे त्यानाही हिची सहानुभूती होतीच आणि शिवाय, दोन वेळच जेवण आणि थोडी जागा झोपायला दिली की सार निभणार होतं तसही शहरात किती महागाई, मोलकरीण लावणं म्हणजे खुप पैसा मोजणं, निमी फुकट काम करणार म्हंटल की कोणीच नकार दर्शवला नाही, हिच्याच वयाच्या आपल्या नाती किती मुक्त जगतात आणि हि बिचारी, परिस्थितीने दबलेली, अगदी हताश होऊन जगते हे आजीला खटकत होतं, तिच्या जगण्याला मार्ग मिळावा असं आजीला वाटत होतं पण तिचं शिक्षण वगैरे काही करणार नाही हे आधीच सुना आणि लेवकांनी तिच्या बापाला सांगितलं होतं, तशी दहावी झाली बस आणखी कशाला शिकवायचं हे ही बापाच्या मनात होतच, फक्त आश्रय एवढंच लक्षात ठेवा हे ही मोठ्या सुनेने तेंव्हा ठणकावून सांगितलं होतं, तो शब्द घेऊनच तर निमी वागत होती, ताटात दिलेलच खायची, कुठला हावरटपणा नाही काही मागणं नाही फक्त एक आवड छान होती पोरीची, लोकरीची फुलं बनवत बसायची वेळ मिळाला की, कोपऱ्यात अडकवलेल्या पिशवीत ती गावाकडून तिच्या घेऊन आलेल्या जगात काही लोकरीचे रंगीबेरंगी तुकडे आणि एक पेन्सिल होती, पेन्सिलवरची फुलं निमा सुरेख बनवायची, पण लोकरीच्या सुंदर रंगांचा एकही रंग स्वतःच्या चेहऱ्यावर घ्यायची नाही सतत उदास, आजी तिला एक दोन वेळा म्हणाली, “ह्या फुलांचे हार कर, विठ्ठल मंदिरात भजनाला येणाऱ्या बायका घेतील, पण इतकं ऑर्डर घेण्यासारखं आपल्याला जमणार नाही हे निमाने आजीला सांगितलं होतं, सगळं येत असून भीतीने आणि आई गेल्याच्या दुःखाने निमा काळवंडत होती आजीला तेच खटकत होतं हिच्यात जगण्याची ओढ निर्माण करायला हवी हिची आई किती आशादायी होती, आजीला आठवलं अपघातात आपली लेक गेली तेंव्हा आपल्याला मानसिक हिच्या आईने उभं केलं होतं, कदाचित त्या वेळेचे हे ऋण आपण फेडायला हवे, आज तर बोलूच हिच्याशी म्हणत अजूनही आजी झोपाळ्यावर तिची वाट बघत होती, तिच्यातली छोटी मुलगी मात्र कपडे वाळत घालून पलीकडे तिने आणि नातीने बनवलेल्या किल्ल्याकडे डोकावली, तिथेच थोडी रेंगाळली आजीने परत जरा जरबेने हाक मारली, “अग निमे येतेस ना?"
ओढणीला हात पुसत निमा आजीजवळ आली, "बोला आजी रॉकेल चोळायचं आहे ना मग तुम्ही पडा आडवं मी देते पाय चोळून," आजी म्हणाली, "बसल्या बसल्याच कर ग, झोपायचं नाही मला,” “बरं” म्हणत निमा झोपळ्याजवळ बसली, कोवळ्या पोरीकडे बघून आजीला एकदम गहिवरून आलं, तिच्या डोक्यावर हात फिरवत आजी म्हणाली, "निमा तुला इथे करमत नाही का? तू खूपच शांत शांत असतेस??"
निमाला आजीच्या स्पर्शाने आईची आठवण झाली, किती दिवसात असा मायेचा स्पर्श आपल्याला झाला नव्हता, ती आजीकडे बघून म्हणाली, "आजी इथं मला काही कमी नाही पण सतत आश्रिताचा ठपका घेऊन वावरावं लागतं ना ते नकोस वाटतं हो, मला कोणाची तक्रार नाही करायची पण वाटतं स्वतः काही करावं हे असं उधार जगणं नको, दोन एक वर्षात आबा माझं लगीन करतील आणि परत त्या नवऱ्याकडे अश्रित जगणं सुरू होईल," आजीने तिच्या बोलण्याचा तोच धागा पकडला आणि तिला समजावलं, बघ काल तू आणि माझी नात मिळून दिवाळीचा किल्ला करत होत्या, खरंतर दिवाळी अजून आठवड्यावर असली तरी त्याची तयारी तुम्ही आधीच सुरू केली होती, किल्ल्यासाठी विटा, माती आणली ती चाळली, वीटकरीचा भुगा करून ठेवलात, चिखलाचे मावळे बनवलेत, जागा चांगली निवडलीत त्या किल्ल्याला ऊन, वारा पाऊस लागू नये म्हणून काळजी घेतली आणि किल्ल्यावर लक्ख उजेडाची सोय केली छोट्या पणत्या ठेवून आता किल्ला रात्रीच्या अंधारात उजळून निघेल ना,” निमा आनंदाने म्हणाली, "हो अगदी छान दिसेल तो भव्य आणि झगमगता," आजी हसत म्हणाली, "तसंच आयुष्य असतं निमा, त्या किल्ल्यासारखं बांधत जायचं, हिमतीने, खम्बिरपणे, आई गेली म्हणून जगणं सोडता येत नाही, मन रमवायला शिक, आपल्याला येत असलेल्या गोष्टींचा किल्ल्याच्या माती, विटासारखा उपयोग कर, मेहनतीची भक्कम तटबंदी उभी कर, नव्या स्वप्नांच्या दिशेने जाणारे मावळे जागोजागी उभे कर जे आलेल्या संकटांशी झुंजून पुढे सरकतील सतत नव्या स्वप्नांकडे,..
मायेची, ओलाव्याची हिरवळ सतत पेरून ठेव आयुष्याच्या ह्या किल्ल्यावर त्यामुळे आयुष्य हिरवंगार राहिल, आणि हो एक पणती आनंदाची शांत उजेड मनात पसरवणारी त्या किल्ल्यात लावायला विसरू नकोस, आजीच हे बोलणं अंगावर प्राजक्ताची फुलं घरंगळावी तसं निमाला वाटत होतं आणि तेवढ्यात किल्ल्यात कोणीतरी ती छोटी पणती पेटवली होती, किल्ला सोनेरी दिसत होता, निमाला तो प्रकाश आपल्या मनात खोलवर झिरपला असं वाटलं, आता तिचे डोळे वेगळ्याच उत्साहाने चमकत होते, आता हा किल्ला आयुष्यात मजबूत राहणार हे आजीला मनोमन जाणवलं आणि आजीने त्या मिणमिणत्या दिव्याला हात जोडले.
