ऋणानूबंध
ऋणानूबंध
मुलगा दिवाळीत येणार म्हणून ते दोघे ही खूष झाले. विणा कंबर कसून कामाला लागली. माधवाने किराणा आणून दिला. बघता बघता विणाने चिवडा, चकल्या, शंकरपाळी, बेसनलाडू बनवले.
लेकाला आवडतात म्हणून मक्याचा चिवडा केला. पाकातले चिरोटे. मुलगा येणार म्हणून माधवने नवीन आकाशकंदिल आणला.
मुलाची बंद असलेली रूम साफ करून घेतली.
मूलगा येणार त्या दिवशी दोघांना ही रात्री निटशी झोप आलीच नाही. माधव पहाटे पाचलाच उठला, तशी जागी असलेली विणा एर्फ रमा म्हणाली अहो सहाला येते फ्लाईट बाहेर येईपर्यंत आठ तरी वाजतील. झोपा थोडा वेळ. तरी ही माधव उठलाच.
सातलाच घरातून गाडी घेऊन गेला. न जाणो ट्रॅफीक जाम मध्ये अडकलो तर ?
नऊ वाजेला सर्व आले. घर भरून गेले. विणाने लेकाला कवटाळले. मागे माधवने ही डोळे पुसले.
आश्विन बारीक झालास रे ?
तिने लेकाला विचारले.
काहीही काय आई ?
मस्त दोन्ही टाईम हादडतोय तिथे.
लेक नव्या अभ्यासाचे अन मिनियापोलीसच्या जाॅबचे अनुभव सांगत गेला. कॉलेजच्या गमती. दिवस कधी उगवायचा कधी संपायचा कळायचेच नाही.आई आज मस्त मसालेदार झणझणीत मटनाचा रस्सा कर.आई आज मस्त पिठल भाकरी. लेकाच्या मायकडे फर्माइशी.
विणा ने धाऊन धाऊन पूर्ण केली.
लेक बापाला घेऊन एका बाजूला गेला. तुमच्यासाठी मस्त नवीन व्हिस्की आणली आहे. लपवून ठेवा. आई कुठे बाहेर गेली की घ्या. माधव ही खूष झाला. केलेल्या फराळाचा फडशा पडला. एरवी सुने सूने असलेल्या घरामध्ये गप्पाटप्पा हास्याचे फव्व्वारे फुटले. बहिण राधिकाही खूश झाली.
*होम स्वीट होम ....*
बघता बघता दिवाळी आली,
अभ्यंगस्नानाला आश्विनला ऊटण लावून चोळून चोळून कढत पाण्याने आंघोळ घातली.
*करीतसे मंगल स्नान दयाघना*
लक्ष्मीपूजनाला पूजा झाल्यावर फटाक्यांची आतीषबाजी झाली. लेकाचे मित्रमैत्रिणी घर अगदी फूलून गेले. पाडव्याला ओवाळून झाले. लेकाने आईला छान साडी दिली. विणा ही हरखून गेली. लेकाने नमस्कार केला तसे विणा, माधव अन राधिका तिघांनाही अगदी भरून आले.
एक दिवशी लेकाने कपडे भरायला घेतले.
अरे निघालास .....?
हो आई रजा संपली ऊद्या जॉईन व्हावे लागेल
थांबला असतास दोनचार दिवस.
नको. अभ्यास आहे आणि जाॅब ही नविन आहे उगाच दांड्या नको. कपडे भरले म्हणाला अभ्यास पण खूप करावा लागेल. घरी होत नाही
बॅगा भरल्या खायच बांधून दिल. संध्याकाळी भरल्या गळ्याने व डोळ्यांनी विणाने निरोप दिला.
माधवला ही कार चालवतांना हुरहुर वाटत होती. माधव रात्री एक वाजता थकल्या पावलाने घरी आला.
रात्र कुस बदलण्यात गेली.
माधव ने सकाळी उठून आकाशकंदील काढला.
विणा मुलाच्या रूममध्ये गेली.पांघरूणाच्या न केलेल्या घड्या, कोल्ड्रींकच्या रिकाम्या बाटल्या, फ्रीजमधल्या न भरलेल्या पाण्याच्या बाटल्या, चिवडा फराळ संपवून तशाच पडलेल्या प्लेट व वाट्या.
बाई, बाई बाई काय हा पसारा ? ती पुटपुटली. भराभर कामाला लागली. उष्ट्या प्लेट वाट्या घासायला टाकले फ्रीजमधील बाटल्या पाणी भरून ठेवल्या कोल्ड्रींकच्या बाटल्या भंगारमध्ये टाकल्या. चादरी धुवायला टाकल्या. रुम अगदी स्वच्छ केली.
कॉटवर स्वच्छ चादर टाकली. एकही सुरकुती न पडलेल्या त्या चादरीवर समाधानाने हात फिरवला. अचानक विणा ला भडभडून आल. त्याच कॉटच्या कडेला बसून ती ओक्साबक्षी रडू लागली.
तेवढ्यात तिच्या पाठीवर हात फिरला.
तीने मागे पाहीले.
माधव शांतपणे उभा होता.
ती वळली आणि पुन्हा रडू लागली.
माधव समजूत घातल्यासारखा तिच्या पाठीवरून हात फिरवत राहीला.
दोघांच्या हातात काही नव्हते. पिल्लू भूर्रऽऽक्कन ऊडू लागल होत. घर पुन्हा सुने झाले होते..
आता त्याला ती तीला तो ...
*ऋणानूबंधाच्या गाठी दूसर काय.*
