उध्वस्त नाते
उध्वस्त नाते
*वयस्कर जोडपे एकमेकाला सावरत रस्ता कापत होते. दोघांच्या डोळ्याला अश्रूंच्या धारा लागल्या होत्या. दोघे एकमेकाला आधार देत होते. पाय जड झाले होते. तिच्या हातात कपड्याचे बोचकं होते. त्यात अंगावरचे कपडे होते. गाठीला पैसे नव्हते. आजूबाजूला दुकानं होती. बाजूने येणारा खाद्यपदार्थाचा वास भुकेत आणखी भर टाकीत होता. पण पैश्याचे सोंग जगाच्या बाजारी वठण्याची शक्यता कमीच.*
*अजून पर्यंत आबाजीने कुणापुढे हात पसरले नव्हते. स्वाभिमानाने तो जगला होता. पण आज तो भुकेपढे लाचार ठरू पाहत होता. आणि भूक एकट्याची नव्हती. तर दोघांची होती. शेवटी आबाजीने मनात काहीतरी ठरवून एक हाॅटेल गाठले.*
*गल्ल्यावर बसलेल्या माणसाला विचारले.*
*"मी आणि माझी पत्नी, दोघांना भुक लागली आहे. जेवायला मिळेल का ? त्या बदल्यात मी तुमच्याकडे काही काम असल्यास करीन."*
*हाॅटेलचा मालक चांगला माणूस होता.*
*"काका जेवणाच्या मोबदल्यात, काम करायची काय गरज आहे ? तुम्ही असेच जेवा."*
*पण आबाजीने स्पष्ट नकार दिला.*
*"काही काम देणार असला तर बोला. तसेही आम्ही एकादशीचा उपवास करतोच की..."*
*हाॅटेल मालकापुढे पर्याय नव्हता. दोघांनी जेवण केले. जेवण झाल्यावर पत्नीला आबाजी बस स्थानकात घेऊन आला. तिला सावलीत आराम करायला लावले. आणि थोड्यावेळात येतो म्हणून सांगीतले. हाॅटेलमध्ये काही काम नव्हते. मालकाला काय काम द्यावे, हे समजत नव्हते. मग खरकटी भांडी घासण्याचे काम मिळाले. दोनतीन तास आबाजीचे भांडी घासण्यातच गेले. भांडी घासून झाल्यावर मालकाला विचारून आबाजी निघाला. निघतांना एका अोळखीच्या माणसाने त्याला पाहिले. तो हाॅटेल मालका जवळ गेला.*
*"शेठ हा माणूस आत काय करीत होता ?"*
*जेवणाची वेळ सरली होती. त्यामुळे हाॅटेलची गर्दी कमी झाली होती. मालकाने विचारले.*
*"तुम्ही अोळखता त्या काकांना ?"*
*त्या व्यक्तीला आबाजी बद्दल अपुलकी वगैरे काही नव्हती. त्याला पण हाॅटेल मालकाशी गप्पा करून टाईम पास करायचा होता.*
*"काका ! आहो पक्का बाराचा आहे म्हातारा...., काल दुपारी सुनेवर हात टाकला म्हातार्याने."*
*हाॅटेल मालक विचारात पडला. कसे शक्य आहे. वयस्कर व्यक्ती. आणि तरूण सुनेवर का हात टाकील ? तसेच ती व्यक्ती प्रामाणिक वाटली. आबाजी निघून गेला होता. मालक बाहेर आला. आबाजीला शोधू लागला. त्याची उत्सुकता शिगेला पोहचली होती. पाचसहा मिनीटाच्या शोधाशोधी नंतर आबाजी सापडला. मालकाने त्यांना पुन्हा हाॅटेलवर चहा पिण्यासाठी आग्रह केला.*
*आबाजीचे दांपत्य चहा पित असता. मालक त्यांच्या समोर बसला होता. आणि सहज त्याने विषयाला हात घातला.*
*"काका असे काय कारण झाले तुम्हाला घर सोडावे लागले ?"*
*चहाचा घोट घेऊन आबाजीने कप खाली ठेवला. आणि सहज उत्तर दिले.*
*"तुम्हाला ज्या गोष्टीचे कुतूहल आहे; आणि मला तो विषय दु:खदायक वाटतो आहे."*
*मालकाने पण तसेच उत्तर दिले.*
*"पण दु:ख वाटल्याने हलकं होते."*
*काळजावर दगड ठेऊन आबाजी सांगू लागला.*
*"माझी मिसेस पण घरात होती. नातू रडत होता, मिसेसने आवाज दिला. त्याला गप्प करा. मी त्याला घ्यायला सरसावलो. आणि तो रडतरडत बेडरुममध्ये घुसला. सूनबाई कपडे बदलत होती. तिने मला पाहिल्यावर, तिच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. मूर्ख माणूस बोलून, कानाखाली मारली. एव्हढ्यावर न थांबता. तिने माझ्या मुलाला सांगीतले. त्याने आमचं काही एक न ऐकता. घाणेरड्या शिव्या देऊन. मारझोड केली. आयुष्यात सर्वात मोठे दु:ख होते. मुळात आम्हाला घरातून हाकलण्यासाठी हे सारे होते. असो."*
*आणि दोघे आपल्या अश्रूंना नाही आवरू शकले. हाॅटेल मालकाकडे त्यांच्या सांत्वनाला शब्द नव्हते.*
