सिगारेट...
सिगारेट...
ऑफिसचं काम संपवून किरण आणि मी बाहेर पडलो. तशी मला घाई झाली होती पण तितक्यात किरण म्हणाला
"निल्या थांब की जरा जाशील एवढी काय गडबड आहे..?"
बऱ्याच दिवसांनी त्याला आग्रह करताना पाहून मीही थांबलो. साधारण साडे पाच वाजून गेले होते माझी गाडी यायला अजून अवकाश होता म्हणून विचार केला आज थंबूयातच. मुख्य रस्त्यावर आल्यावर किरण ने पान टपरीवर जाऊन एक सिगारेटचं पॉकेट घेतलं. मग आम्ही दोघे हिंगणे विठ्ठलवाडी च्या बस स्टॉपवर जाऊन बसलो. तसं तिथे बसणं म्हणजे मला थोडं अवघडल्या सारखं झालं पण म्हणावी अशी वर्दळ नसल्याने मनावरचा भार आपोआप कमी झाला.
किरण म्हणजे एकदम धाडसी आणि मनमिळाऊ मुलगा. त्याचे आणि माझे विचार जुळले आणि आमची गट्टी कधी जमली ते कळलंच नाही. आमच्यातल्या बऱ्याचश्या गोष्टी एकमेकांशी जुळायच्या. पण आज त्याचा रंग मला वेगळा दिसत होता. बसल्या-बसल्या त्याने एक सिगारेट सुलगावली आणि म्हणाला....
"निल्या तिची खुप आठवण येतेय रे..!"
अचानक त्याने उद्गारलेल्या या वाक्यावर मीही थोडा भांबावून गेलो. कारण सतत हसरा असणारा किरण चक्क अवंढा गिळत होता. मी त्याला थोडा धीर देत म्हणालो
"काय झालंय मला नीट सांग.."
त्यावर त्याने बोलायला सुरुवात केली
कराडला माझं घर आहे. वडील कन्ट्रक्शनची कामं करतात. कॉलेज सांभाळून मीही त्यांना कामात मदत करायचो. सगळं मस्त चालू होतं आणि ती आयुष्यात आली. जास्त वेळ न घेता मी तिला विचारलं तिच्याकडूनही होकार मिळाला. आम्ही एकत्र फिरायला जायचो. हातात हात घेऊन उद्याची स्वप्न पहायचो. सगळं कसं सुरळीत चाललं होतं. कॉलेज पुर्ण झाल्यावर वडिलांच्या कामात लक्ष देऊन पुढचे प्लॅन आखायचे आणि मग तिच्या सोबत लग्न करायचं. एवढं सगळं ठरवून ठेवलं होतं. खुप प्रेम करायचो रे आम्ही एकमेकांवर.....
पण काही दिवसात तिच्या भावाला कुठून तरी आमच्या बद्दल कळालं आणि एक दिवस त्याने कॉलेज मध्ये येऊन खुप धिंगाणा केला. मला मारलं असतं तर ठीक आहे रे पण त्याने एवढ्या मुलांसमोर तिलाही मारहान केली. एवढं सगळं झाल्यावर गप्प बसणाऱ्यातला मीही नव्हतो. मी काही मित्रांना सोबत घेऊन त्यालाही खुप मारला. आणि होत्याचं नव्हतं झालं. पोलीस तक्रार झाली. मी चौकीत होतो. पण काळजी करण्या सारखं काही नव्हतं कारण ती माझ्या बाजूने बोलणार याची मला खात्री होती. त्याच संध्याकाळी तिचे वडील आणि मामा पोलीस स्टेशन मध्ये आले होते. मला बाहेर घेऊन ते दोघेही माझ्या अंगावर धावून येत होते. तिच्या मामाने तर हद्द पार केली. त्याने माझ्या कानाखाली मारली. आणि मग त्याच रागात मीही त्याला एक ठेऊन दिली आणि नेमकं त्याच वेळी तिचं तिथे येणं अपघाती ठरलं. माझं असं वागणं तिला आवडलं नसेल बहुतेक आणि ती तिथून निघून गेली ते परत कधीच न येण्यासाठी. तिचं तरी काय चुकलं म्हणा कारण नेमकं तिने जे पहिलं ते चुकीचच होतं ना रे.!
हे सगळं सांगत असताना किरण ने घेतलेलं सिगारेटचं पॉकेट कधीच संपुन गेलं होतं. थोडंस रागातच मी त्याला बोललो "एवढी सिगारेट पितोस तू..?"
त्यावर त्याने दिलेल्या उत्तरावर मात्र मी निःशब्द झालो होतो. तो म्हणाला होता.. "या सिगारेटच्या उडणाऱ्या धुरात ती मला स्पष्ट दिसते आणि चढलेल्या नशेत दुःख कमी होतं"
त्याला थोडासा धीर देत मी तिथून उठलो आणि घरी येण्यासाठी निघालो. त्यादिवसानंतर आम्ही रोज त्या स्टॉपवर बसत होतो. मनातलं सांगत होतो. बोलत होतो.
या सर्व गोष्टीतून बाहेर येण्यासाठी त्याला पुण्याला बहिणीकडे पाठवलं होतं. काही दिवसात तो जाणार होता परत कराडला. त्यावेळी माझंही एका मुलीवर प्रेम होतं. आमच्यातल्या बऱ्याच गोष्टी मी किरण ला सांगायचो.
बघता बघता दिवस निघून गेले आणि अवघ्या चार महिन्याच्या काळात माझ्याही बाबतीत अगदी सेम किरण सारखा किस्सा झाला. तिच्या घरी कळालं आणि सगळंच बिनसलं. फक्त पोलीस केस झाली नाही तेवढाच काय तो फरक. मग मात्र त्याच्या मनातलं दुःख अगदी जवळून पाहायला मिळालं. मला आठवतंय हे सगळं झाल्यावर मी त्याला फोन करून म्हणालो होतो.
" किरण मलाही सिगारेट प्यावीशी वाटली आहे रे.. "
त्यावर तो त्याच्या नेहमीच्या अस्सल सातारी भाषेत म्हणाला होता. " निल्या खुळा हाइस का..? चांगलं नसतय ते...."

